आई-वडील शेतमजूर, पत्र्याचं घर; जालन्याच्या भिकन रोजेकरनं UPSC परीक्षा कशी उत्तीर्ण केली?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"त्यांनी खूप कष्ट केले आणि ती जी सालदारकी होती, मोलमजुरी होती, त्याचंच फळ आज इथपर्यंत घेऊन आलंय."

26 वर्षांचे भिकन रोजेकर आपल्या आई-वडिलांविषयी सांगतात. भिकन यांचं घर म्हणजे पत्र्याचं शेड. त्या शेडसमोर उभं राहून ते बोलत होते.

भिकन यांच्या कपाळाला गुलाल होता. येणारा-जाणारा त्यांचं अभिनंदन आणि सत्कार करत होता.

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या जळगाव सपकाळ हे भिकन यांचं गाव.

भिकन यांच्या नावाची राज्यभरात चर्चा आहे, कारण त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केलीय. 5 व्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळालं.

2025 मधील UPSC परीक्षेचा निकाल 6 मार्च रोजी लागला. त्यात भिकन यांना 812 वी रँक मिळालीय.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत भिकन यांनी इथपर्यंतचा प्रवास केलाय.

भिकन यांचे वडील सालगडी म्हणून काम करायचे, तर आई शेतजमुरी करायची.

भिकन सांगतात, "माझे वडील माझ्या जन्माच्या अगोदरच खानदेशात गेले होते. तिथं ते सालदारकी करायचे. त्यांचं आयुष्य दुसऱ्याच्या इथं सालदारकी आणि मोलमजुरीत गेलं."

मुलानं परीक्षा पास केली, याचा भिकन यांचे वडील जगन रोजेकर यांना अत्यंत आनंद झालाय.

"माझं आयुष्य गेलं सालदारकीत. सालदारकी केली. कामं-धंदे केले लोकायचे. भडगाव तालुक्यात 15-16 वर्षं कामं केले. त्याच्याबाद इथं आलो.

"मुलगा पास झाला, त्याचा आनंद खूप झालाय. आपण इमानदारीनं काम केलं, तशी तू पुढं लोकायची सेवा चांगली कर. हे म्हणणं आहे आपलं," जगन रोजेकर सांगतात.

2021 पासून UPSC ची तयारी

भिकन यांचं 10 वी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झालं. 11-12 वीचं शिक्षण विज्ञान शाखेत घेतल्यानंतर त्यांनी BSc in Agriculture मध्ये पदवी पूर्ण केली आणि मग UPSC ची तयारी सुरू केली.

भिकन सांगतात, "2021 पासून मी पूर्णपणे UPSC ची तयारी सुरू केली. 2022 ला मी दिल्लीला गेलो. 2023 ला मला महाराष्ट्र शासनाची बार्टीची स्कॉलरशिप भेटली. त्याद्वारे मला चांगले क्लासेस भेटले. 2024 ला आणि 2025 ला मेन्स लिहिली. 2025 ला मी UPSC सिव्हिलची मेन्स, UPSC फॉरेस्टची मेन्स आणि UPSC सीएपीएफ अस्टिटंड कमांडंट याच्याही मुलाखतीसाठी पात्र झालो होतो. अशा तिन्ही क्लास वन पोस्टसाठी मी लास्टच्या स्टेजपर्यंत पोहचलो."

बार्टी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था. ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेद्वारे अनुसूचित जातीच्या तरुणांसाठी UPSC परीक्षेच्या तयारीसाठी पूर्व-प्रशिक्षण दिलं जातं.

बार्टीच्या स्कॉलरशिपविषयी भिकन पुढे सांगतात, "बार्टीची स्कॉलरशिप म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं महाराष्ट्र शासनानं राबवलेला एक उपक्रम आहे. त्याच्यात ग्रामीण आणि शहरी भागातील जे गरजू विद्यार्थी आहेत, कॅटेगिरीमधले आहेत किंवा महाज्योतीचे ओबीसी, सारथीचे जनरल, त्या पोरांना दिल्लीला पाठवलं जातं. त्यांना बेस्ट ऑफ द बेस्ट कोचिंग फॅसिलिटी अव्हेलेबल करुन दिली जाते.

"सगळा खर्च सरकार घेतं आणि प्रत्येक महिन्याला 13 हजार रुपये स्टायपेंड मिळतो. त्यानंतर, तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात तर तुम्हाला सिव्हिलसाठी 50 हजार, फॉरेस्टसाठी 50 हजार आणि मुलाखतीपर्यंत पोहचले तर 25 हजार रुपये भेटतात. एवढं सगळं महाराष्ट्र शासन आपल्यासाठी करतं."

UPSC च्या यशाचं गमक काय?

UPSC परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग महत्त्वाचं असल्याचं भिकन सांगतात.

ते सांगतात, "UPSC अनेक वर्षांपासून परीक्षा घेत आहे. त्यांच्या प्रश्नांचा एक पॅटर्न आहे. तर आपण 10 वर्षांच्या प्रश्न पत्रिका काढायच्या. त्याचा पॅटर्न समजून घ्यायचा. त्याची एक प्रॉपर थीम समजून घ्यायची. प्रॉपर सिलॅबस पूर्ण करुन मॉक टेस्ट देऊन, प्रश्नपत्रिका सोडवून मग आपण पेपर दिला पाहिजे."

"मुख्य परीक्षेचा प्रॉपर सिलॅबस आहे, तो लिहून दिलेला आहे. खूप डिटेल लिहून दिलेला आहे. आपण सिलॅबस पूर्ण केला पाहिजे. डाटा, फॅक्ट्स आपल्या उत्तरांमध्ये दिसले पाहिजेत. भाषेवर कमांड असली पाहिजे. कारण भाषेचं निबंधात महत्त्व आहे. ऑप्शनल थोडा डीप पाहिजे. त्याच्यानंतर यूपीएससीनं जे जे प्रश्न विचारले आहेत, मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी त्याचे डिटेल सोल्यूशन आपण तयार केले पाहिजे," भिकन पुढे सांगतात.

'प्लॅन-बी आवश्यक'

"स्पर्धा परीक्षा या अनप्रेडिक्टेबल असतात. म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात कधी कोणता बदल होईल, हे स्पष्टपणे सांगता येत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी प्लॅन-बी हमेशा रेडी ठेवायला पाहिजे," असं भिकन यांचं मत आहे.

भिकन सांगतात, "प्लॅन बी स्पर्धा परीक्षांमध्ये असलाच पाहिजे. कारण की सांगता येत नाही की पुढे चालून कोणते पेपर समाविष्ट होतील, कोणते पेपर रद्द होतील. ऑप्शनल राहिल की नाही, सिलॅबस दरवर्षी चेंज होत जातो. त्यामुळे एक इनसिक्युरिटी (असुरक्षितता) राहते. त्यामुळे पदवीचं शिक्षण चांगलं असलं पाहिजे. नसलं जरी चांगलं तरी कोणतातरी एक प्लॅन-बी असलाच पाहिजे.

"जसं माझे घरचे, माझे भाऊ म्हणायचे एक प्रोफेशनल डीग्री घे जेणेकरुन तुला कुठं ना कुठं जॉब लागून जाईल, तर मी अॅग्रीकल्चर केलं. तर माझा तो प्लॅन बी होता अॅग्रीकल्चरमध्ये."

दरवर्षी देशभरातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यातील काही जणांचंच क्लासवन अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण होतं.

भिकनसारख्या ग्रामीण भागातील आणि त्यातही हलाखीच्या परिस्थितीतील तरुणांचं UPSC परीक्षेतील यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं.

भिकन सांगतात, "घरचे म्हणायचे तू जर गावाकडे आला तर एक नकारात्मक उदाहरण सेट होईल. लोक म्हणतील 4-5 वर्षं तिकडं राहिला, खूप हुशार होता. हा पास नाही झाला तर आपण तर होऊच शकणार नाही. त्यामुळे तू असा येऊच नको, पास होऊनच ये आणि तसंच झालं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)