You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझा मुलगा अपंग, तरीही दया दाखवली नाही', घोड्यावर बसला म्हणून दलित नवरदेवाला मारहाणीचे प्रकरण नेमके काय?
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील हटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बिजौरी पाठक गावातील एका गल्लीत लग्न विधी सुरू होते. वरात निघाली होती.
गोलू अहिरवार यांचं लग्न होतं. ते घोड्यावर बसलेले होते. त्यांच्यापुढे वरातीत बँड वाजत होता. त्यामागे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक आनंदानं नाचत होते.
मात्र त्याचवेळेस काही तरुणांनी नवरदेवाचा मार्ग अडवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळेस गोलू आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर हिंसा करण्यात आली.
गोलू अहिरवार यांनी फोनवर बोलताना बीबीसीला सांगितलं, "आमच्या गावात एरवीदेखील भेदभाव केलाच जातो. त्या दिवशी तो खूपच जास्त प्रमाणात झाला. मी दलित असूनदेखील घोड्यावर बसलो, ही गोष्ट गावातील उच्च जातीतील लोकांना आवडली नाही. त्यांनी आम्हाला मारहाण केली. तुमच्या जातीतील लोक घोड्यावर बसू शकत नाहीत, असं ते म्हणत होते."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींपैकी तीनजण एकाच कुटुंबातील आहेत. चौथा जण इतर गावकरी आहे. हे चारही जण लोधी समुदायातील आहेत.
या चौघांवरही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोधी समुदाय हा मध्य प्रदेशातील इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी समुदायात येतो. मध्य प्रदेशात ओबीसी समुदायाची लोकसंख्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे अनेक भागात या समुदायाचा प्रभावदेखील आहे.
हे वृत्त छापलं जाईपर्यंत एका आरोपीला अटक झाली होती.
इतर आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
आरोपींच्या कुटुंबांनी हे आरोप नाकारले आहेत. जमिनीच्या जुन्या वादामुळे त्यांच्या लोकांना अडकवण्यात आलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
घोड्यावर बसण्याबाबत कोणाचा आक्षेप?
गोलू यांचे काका गरीबा अहिरवार यांनी तक्रार केल्यानंतर घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, "गरीबा यांनी सांगितलं की दलित असूनही घोड्यावर बसला म्हणून गावातील काही गुडांनी त्यांचा पुतण्या गोलू याला मारहाण केली."
एफआयआरनुसार, "काही जणांनी मोटरसायकलनं वरात अडवली, नंतर घोड्यावर बसलेला गोलू आणि मागून येणारी वरात अडवून हिंसा केली."
"आरोपींनी गोलू आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल जातीवाचक शब्द वापरून, त्याच्या घोड्यावर बसण्यावर आक्षेप घेतला आणि मारहाण केली."
गोलू अहिरवार (23 वर्षे) जन्मापासूनच अपंग आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबात त्यांच्याव्यतिरिक्त, आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहे.
मंगळवारी, 21 एप्रिलला गोलू लग्नाआधी करायचा 'रछवाई'चा विधी करत होते. रछवाई ही बुंदेलखंडमधील परंपरा आहे. यात नवरदेवाची लग्नाआधी घोड्यावर बसून संपूर्ण गावातून मिरवणूक निघते.
"मी अतिशय आनंदी होतो. संपूर्ण कुटुंबच आनंदात होतं. घरात बऱ्याच काळानंतर लग्न होत होतं. मात्र माझं घोड्यावर बसणं त्या लोकांना आवडलं नाही. त्यांनी मला खाली ओढलं आणि काठ्यांनी मारहाण केली," असं गोलू अहिरवार यांनी बीबीसीला सांगितलं.
ही घटना मंगळवारी (21 एप्रिल) घडली. बुधवारपर्यंत (22 एप्रिल) या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला.
"माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली. माझी मुलगी त्याला वाचवायला गेली असता, तिलादेखील त्यांनी मारहाण केली," असं गोलूच्या आई विद्या अहिरवार म्हणाल्या.
"त्यांनी आधी मोटरसायकल आडवी लावून रस्ता अडवला. आम्ही ती बाजूला करायला सांगितल्यावर त्यांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्या भावाला घोड्यावरून खाली ओढलं आणि आम्हाला मारहाण केली.
ते चारजण होते. या गावात दलित व्यक्ती घोड्यावर बसून फिरणार नाही. दलितांना अशी वरात काढता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं," असं नवरदेवाची बहीण मनिषा अहिरवार म्हणाली.
हा हल्ला अचानक झालेला नाही. तर तो जातीवर आधारित पूर्वग्रहाशी संबंधित होता, असं या कुटुंबाचं म्हणणं आहे.
या घटनेनंतर हे कुटुंबं आणि वरातीतील लोक हटा पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तिथे तक्रार नोंदवली.
पोलिसांच्या उपस्थितीत लग्न, घराबाहेर बंदोबस्त
गावात पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. आरोपींचा शोध घेतला जातो आहे.
लग्नाचे उर्वरित विधी पार पाडण्यासाठी देखील सुरक्षा पुरवण्यात आली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
"त्या दिवशी जर पोलीस वेळेवर आले नसते तर काय झालं असतं कोण जाणे. माझं लग्नदेखील पोलीस बंदोबस्तातच झालं. घराबाहेर देखील पोलीस तैनात करण्यात आले आहेत," असं गोलू यांनी बीबीसीला सांगितलं.
दमोहचे पोलीस अधीक्षक श्रुतकीर्ति सोमवंशी यांनी बीबीसीला सांगितलं, "या प्रकरणात आम्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. एका जणाला अटक करण्यात आली आहे. आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमअंतर्गत कारवाई करण्याबाबत कलेक्टरला पत्र लिहिलं आहे."
दुसरीकडे आरोपींच्या पक्षानं मात्र हे सर्व आरोप नाकारले आहेत.
एफआयआरमध्ये नाव असलेले आरोपी, विश्वनाथ सिंह लोधी याचा पुतण्या हेमराज यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "माझ्या काकांवर चुकीचे आरोप लावले जात आहेत. आमचा हरिजन लोकांबरोबर जमिनीचा जुना वाद आहे. यावेळेस हरिजनांची संख्या अधिक होती. त्याचाच फायदा घेत त्यांनी माझ्या काकांना अडकवलं आहे."
घोड्यावर बसू न देणं आणि जातीच्या आधारे भेदभाव करण्याच्या आरोपांबद्दल हेमराज म्हणाला, "हे सर्व खोटं आहे. आम्हाला यात अडकवलं जातं आहे."
याबद्दल विचारलं असता हटा पोलीस ठाण्याचे प्रमुख सुधीर बॅगी यांनी बीबीसीला सांगितलं, "हे स्पष्टपणे जातीच्या आधारे भेदभाव आणि हिंसा करण्याचं प्रकरण आहे. नवरदेव लग्नाआधीचा विधी पार पाडत होता. गावातील उच्च जातीतील काही लोकांनी या गोष्टीवर आक्षेप घेत, नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली आहे. आमची पथकं आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल."
मात्र, गोलू आणि त्यांचं कुटुंब अजूनही भीतीच्या सावटाखाली आहे.
गोलू यांनी फोनवर बीबीसीला सांगितलं, "गावातील ज्या गल्लीत त्या दिवशी आधी बँड वाजत होता, तिथेच हिंसा झाली. मारहाण करण्यात आली. आम्हाला सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांकडे तक्रार केल्यास आमच्याविरोधात बदला घेतला जाईल, असं आम्हाला अजूनही धमकावलं जात आहे."
मध्य प्रदेशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांत वाढ
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या सर्वात ताज्या अहवालात, 2023 पर्यंतच्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. या अहवालानुसार, 2021, 2022 आणि 2023 या वर्षांमध्ये देशभरात अनुसूचित जातींविरोधात झालेल्या गुन्ह्यांमध्ये मध्य प्रदेश सातत्यानं तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. याच्या वरच्या क्रमांकावर फक्त उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये आहेत.
बुंदेलखंडच्या ज्या भागात दमोह येतं, तिथेदेखील ही काही पहिलीच घटना नाही. दलित नवरदेवाला त्यांचे पारंपारिक विधी पार पाडत असताना लक्ष्य करण्यात आल्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
मध्य प्रदेशातील बुंदेलखंड भागातील टीकमगड जिल्ह्यातील मोकहरा गावात, 2025 मध्ये, जितेंद्र अहिरवार हा दलित नवरदेव लग्नातील विधी दरम्यान घोड्यावर चढत असताना त्याच्यावर दगडफेक करण्यात आली होती.
त्याच्या आधी डिसेंबर 2024 मध्ये दमोह जिल्ह्यातीलच चौरई गावात एका दलित नवरदेवाची बग्गीमध्ये बसून वरात काढल्यावरून वाद झाला होता. त्यानंतर गावातील गुंडांनी बग्गीची तोडफोड केली होती. तसंच नवरदेवाला मारहाण केली आणि घोड्याच्या मालकाला देखील मारहाण केली होती.
बुंदेलखंडमधील अनेक ग्रामीण भागांमध्ये आजदेखील दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून वाद झाल्याची प्रकरणं समोर येत आहेत. नवरदेवाला घोड्यावरून उतरण्यास भाग पाडल्याची प्रकरणं स्थानिक पातळीवर आधीदेखील नोंदवली गेली आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)