You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्टायलिश पण जीवावर बेतणारे; 'हिडन डोअर हँडल्स'ला चीनची 'दारं बंद'
आजकाल अनेक आधुनिक आणि इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये दरवाजाच्या आत लपलेले डोअर हँडल्स देण्याची फॅशन आली आहे. मात्र, दिसायला अत्यंत स्टायलिश वाटणारे हे हँडल्स आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव चीनने अशा हँडल्सवर थेट बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ चीनपुरता मर्यादित नसून, याचे पडसाद आता भारतासारख्या मोठ्या कार बाजारपेठेतही उमटू लागले आहेत.
चीनने इलेक्ट्रिक वाहनांमधील दरवाजांच्या लपवलेल्या हँडलवर बंदी घातली आहे.
अशा प्रकारच्या डिझाईनवर बंदी घालणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. इलॉन मस्क यांच्या 'टेस्ला' कारमुळे अशी हँडल्स जगभरात प्रसिद्ध झाली होती.
भारतातही सध्या काही ब्रँड्सच्या वाहनांमध्ये अशी हँडल्स पाहायला मिळतात. जगभरातील सुरक्षासंस्था सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेची कसून तपासणी करत आहेत, त्याच काळात चीनने हा मोठा निर्णय घेतला आहे.
याला कारण म्हणजे चीनमध्ये शाओमीच्या दोन इलेक्ट्रिक वाहनांचे झालेले भीषण अपघात. या दोन्ही अपघातांमध्ये इलेक्ट्रिक बिघाडामुळे कारचे दरवाजे उघडू शकले नव्हते.
अशाच एका अपघाताचा उल्लेख चीनच्या सरकारी माध्यमांमध्ये झाला होता. त्यानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शाओमी SU-7 अल्ट्रा या सिडान गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला होता.
चालकाला वाचवण्यासाठी तिथे असलेल्या लोकांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडलाच नाही. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, शाओमीने त्या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. चीनच्या या नवीन धोरणाबाबतही कंपनीकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
जगभरात परिणाम होण्याची शक्यता
एसअँडपी ग्लोबल मोबिलिटीमध्ये भारत आणि आसियान ऑटोमोटिव्ह मार्केटचे संचालक पुनीत गुप्ता यांनी बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, "जगातील सर्वात मोठा कार उत्पादक देश असलेल्या चीनने हा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. जर त्यांच्यावर फ्लश डोर हँडलवर थेट बंदी घालण्याची वेळ आली असेल, तर याचा अर्थ त्यांना यावर कोणताही व्यावहारिक तोडगा सापडलेला नाही. जर ते हँडल काढून टाकण्यासारखे इतके कठोर पाऊल उचलत असतील, तर भारताने सुद्धा या लपलेल्या डोअर हँडल्समुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करायला हवा."
चीनच्या संबंधित मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की, गाडीच्या प्रत्येक दरवाजावर डिकी सोडून बाहेरच्या बाजूला हँडल पकडण्यासाठी पुरेशी जागा असावी लागेल. ही जागा किमान सहा सेंटीमीटर लांब, दोन सेंटीमीटर रुंद आणि अडीच सेंटीमीटर खोल असणे गरजेचे आहे, जेणेकरून संकटकाळी कोणालाही तो दरवाजा सहज पकडून ओढता येईल.
कारच्या आत किमान 1 सें.मी. x 0.7 सें.मी. आकाराचे चिन्ह असावे लागतील, जे दरवाजा कसा उघडायचा हे दर्शवतील. ज्या 'कार'ना अधिकाऱ्यांनी आधीच मंजुरी दिली आहे आणि ज्या चिनी बाजारपेठेत येण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्यांना त्यांचे डिझाईन बदलण्यासाठी दोन वर्षांचा अतिरिक्त वेळ मिळेल.
लपलेले हँडल चीनच्या 'न्यू एनर्जी व्हेईकल्स' या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, हायब्रिड कारचा समावेश होतो. सरकारी नियंत्रण असलेल्या 'चायना डेली'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, चीनमधील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 100 NEV पैकी सुमारे 60% कारमध्ये असे हँडल आहेत.
नवीन नियम केवळ चिनी बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मॉडेल्सवर लागू होतील. परंतु जागतिक कार उद्योगात चीनचा मोठा वाटा असल्यामुळे, या पावलाचा परिणाम जगभरात होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत टेस्लाच्या दरवाजांच्या हँडलची आधीच तपासणी केली जात आहे. युरोपमध्येही याबाबत नियम बनवण्याची चर्चा सुरू आहे.
अमेरिकेतही तपासणी
नोव्हेंबरमध्ये अमेरिकन 'नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन'ने (NHTSA) टेस्लाच्या इलेक्ट्रिक दरवाजांच्या हँडलवर लक्ष केंद्रित करणारी एक तपासणी सुरू केली. NHTSA ने ही तपासणी अशा तक्रारींनंतर सुरू केली, ज्यात म्हटले होते की हँडल अचानक काम करणे बंद करतात, ज्यामुळे मुले कारमध्ये अडकून पडतात.
NHTSA ने सांगितले की, त्यांना टेस्लाच्या 2021 'मॉडेल वाय' (Model Y) कारमधील हँडलबाबत नऊ तक्रारी मिळाल्या आहेत. 'मॉडेल वाय' हे टेस्लाचे प्रमुख मॉडेल आहे. या तक्रारींपैकी चार प्रकरणांमध्ये कार मालकांना समस्या सोडवण्यासाठी खिडकी फोडावी लागली होती.
भारतातही काही कंपन्या लपविलेल्या डोअर हँडल असलेल्या गाड्या विकत आहेत. टाटा मोटर्सच्या काही कारमध्ये असेच हँडल आहेत. दक्षिण कोरियन कार उत्पादक कंपनी 'किया' देखील भारतात त्यांच्या काही कारमध्ये 'फ्लश-फिटेड' डोअर हँडल देते. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्राच्या काही गाड्यांमध्येही असेच लपवलेले डोअर हँडल आहेत.
पुनीत गुप्ता बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हणतात, "इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणारे हँडल अपघाताच्या वेळी काम करणार नाहीत, असे होऊ शकते. महागड्या कारमध्ये जास्त फीचर्समुळे बॅटरीवर भार जास्त असतो. ज्यामुळे बॅटरी लवकर उतरण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, जर अपघात झाला तर मदत करायला येणाऱ्या लोकांना गाडीचे दरवाजे उघडता येत नाहीत. इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत तर ही जोखीम अधिकच गंभीर आहे.
तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते मानवी जिवापेक्षा मोठे असू शकत नाही. चीनने उचललेले हे पाऊल भविष्यात कार उद्योगासाठी सुरक्षेचे नवे निकष ठरवणारे ठरू शकते. आता भारत आणि इतर देश या गंभीर विषयाकडे कशा प्रकारे पाहतात आणि आपल्या नियमांमध्ये काय बदल करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.