'इथं चांगला पगार मिळतो', जर्मनी भारतीयांना नोकरीसाठी का बोलावतंय?

    • Author, टिम मॅन्सेल
    • Role, बिझनेस रिपोर्टर
    • Reporting from, वेईल आम ऱ्हाईन, नैऋत्य जर्मनी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

जर्मनी कुशल कामगारांच्या तुटवड्याला सामोरा जातो आहे. कारण वयस्कर कर्मचारी निवृत्त होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी तिथे पुरेसे तरुण उमेदवार उपलब्ध नाहीत. या समस्येवर मात करण्यासाठी जर्मनी अधिकाधिक प्रमाणात भारतीय उमेदवारांकडे वळत आहे.

हँडर्क फॉन उंगर्न-स्टर्नबर्ग याच्यासाठी या गोष्टीची सुरुवात फेब्रुवारी 2021 मध्ये झाली. तेव्हा त्याला एक ईमेल आला होता. तो ईमेल भारतातून आला होता.

त्या मेलचा सारांश असा होता : "आमच्याकडे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे अनेक तरुण, उत्साही लोक आहेत. तुम्हाला यात रस आहे का?"

फॉन उंगर्न-स्टर्नबर्ग नैऋत्य जर्मनीतील फ्रायबर्ग चेंबर ऑफ स्किल्ड क्राफ्ट्स या संस्थेसाठी काम करत होता. ही एक व्यापारी संस्था असून ती अगदी गवंडी आणि कारपेंटरपासून ते बुचर आणि बेकर्सपर्यंत कुशल कामगार आणि त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते.

हा ईमेल त्यांना अगदी योग्यवेळी आला होता.

जर्मनीत कामगारांचा तुटवडा

"आमच्याकडे असे अनेक व्यवसाय, कंपन्या होत्या, ज्यांना त्यांच्याकडे काम करण्यासाठी कामगार मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही एक संधी द्यायचं ठरवलं," असं फॉन उंगर्न-स्टर्नबर्ग म्हणाला.

त्यानं पहिला फोन स्थानिक बुचर संघटनेच्या प्रमुखाला केला. संपूर्ण जर्मनीतील मांस विक्रेते अतिशय कठीण परिस्थितीतून जात होते. या क्षेत्रात स्पष्टपणे अधोगती होत होती.

या क्षेत्रात 2002 मध्ये कौटुंबिक मालकीचे 19,000 छोटे व्यवसाय होते. मात्र 2021 पर्यंत त्यांची संख्या 11,000 हून देखील कमी झाली होती. अप्रेंटिसशिप म्हणजे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्यासाठी तरुणांची भरती करणं हे या व्यवसायांच्या मालकांसाठी जवळपास अशक्य झालं होतं.

जोआचिम लेडरर, बुचर संघटनेचे प्रमुख आहेत. ते म्हणाले, "हा व्यवसाय हा अतिशय मेहनतीचा आहे. गेल्या साधारण 25 वर्षांपासून तरुण पिढी इतर क्षेत्रांकडे वळते आहे."

इकडे भारतात 'मॅजिक बिलियन' या नोकरभरती करणाऱ्या एजन्सीनं तो सुरुवातीचा ईमेल पाठवला होता. त्यांना 13 तरुणांची भरती करण्यात यश आलं होतं. हे तरुण 2022 च्या शरद ऋतूत जर्मनीत आले होते. तिथे त्यांनी स्वित्झर्लंडच्या सीमेला लागून असलेल्या छोट्या शहरांमध्ये बुचरिंग कामाचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ते प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीतील काही काळ महाविद्यालयात प्रशिक्षण घेणार होते.

चांगलं आयुष्य जगण्यासाठी तरुण निवडतायेत जर्मनीचा पर्याय

या तरुणांमध्येच 21 वर्षांच्या अनखा मिरियम शाजी हिचा समावेश होता. तिच्याबरोबरच्या इतर तरुणांप्रमाणेच ती पहिल्यांदाच भारताबाहेर आली होती.

तिला तिथे जाण्याबद्दलचा उत्साह आठवतो. ती म्हणाली, "मला जग पाहायचं होतं. मला माझं राहणीमान उंचावायचं होतं. चांगलं आयुष्य जगायचं होतं. मला चांगली सामाजिक सुरक्षा हवी होती."

अनखा लेडररकडे काम करण्यासाठी वेईल आम ऱ्हाईन या शहरात आली होती. हे शहर जर्मनीच्या अगदी नैऋत्य टोकाजवळ आहे. ते स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेजवळ आहे.

आता 3 वर्षांनी बरंच काही बदललं आहे. फॉन उंगर्न-स्टर्नबर्ग आता चेंबरमध्ये काम करत नाही.

त्याऐवजी त्यानं 'इंडिया वर्क्स' नावाची स्वत:चीच नोकरभरती करणारी एजन्सी सुरू केली. मॅजिक बिलियनच्या अदिती बॅनर्जी यांच्याबरोबर भागीदारीत त्यानं ही एजन्सी सुरू केली आहे. जर्मनीत आणखी तरुण भारतीय कामगारांना आणण्यासाठी ही एजन्सी काम करते.

सुरुवातीला आलेल्या त्या 13 जणांच्या संख्येत वाढ होत आता 200 तरुण भारतीय कामगार जर्मनीतील मांस विक्रेत्यांच्या (खाटिक) दुकानात काम करत आहेत.

जन्मदर घटल्यानं जर्मनीसमोर तरुण मनुष्यबळाचं संकट

जर्मनी तरुणांच्या तुटवड्याच्या संकटाला तोंड देतं आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी 2,88,000 परदेशी कामगारांची आवश्यकता आहे, असं 2024 च्या अभ्यासातून समोर आलं आहे. नाहीतर 2040 पर्यंत तिथलं मनुष्यबळ 10 टक्क्यांनी कमी होऊ शकतं, असं 'बर्टेल्समन फाऊंडेशन' या थिंक टँकच्या अहवालात म्हटलं आहे.

बेबी बूमर पिढीतील शेवटचे लोक (1940, 50, 60 च्या दशकात जन्मलेले) आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. या लोकांची जागा घेण्यासाठी जर्मनीत पुरेसे तरुण लोक उपलब्ध नाहीत. कारण तिथला जन्मदर कमी आहे. मात्र त्याउलट भारतात मोठ्या संख्येनं तरुण उपलब्ध आहेत.

"भारतात 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे 60 कोटी लोक आहेत. यापैकी फक्त 1.2 कोटी लोक दरवर्षी मनुष्यबळात दाखल होतात. त्यामुळे भारतात अतिरिक्त कामगारांची प्रचंड संख्या उपलब्ध आहे," असं बॅनर्जी म्हणतात.

यावर्षी अप्रेंटिसशिपसाठी म्हणजे शिकाऊ कामगार म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी 775 तरुण भारतीयांना जर्मनीत आणण्याची तयारी इंडिया वर्क्स करत आहे. या तरुणांना अतिशय विस्तृत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता येणार आहे. वानगीदाखल उदाहरणं द्यायची तर रस्त्याचं बांधकाम करणारे कामगार, मेकॅनिक्स, दगडी काम करणारे म्हणजे पाथरवट आणि बेकरीत काम करणारे अशा विविध कामगारांची आवश्यकता आहे.

जर्मनीबरोबरच्या भारताच्या करारामुळे भारतीयांना मोठ्या संधी

कुशल भारतीय कामगारांना जर्मनीत काम करणं अधिक सोपं झालं आहे. कारण 2022 मध्ये भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांमध्ये स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करार (मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप ॲग्रीमेंट) झाला आहे. त्यानंतर 2024 च्या अखेरीस, जर्मनीनं जाहीर केलं की भारतीय नागरिकांसाठी 'कुशल कामगार व्हिसा'साठीची वार्षिक मर्यादा 20,000 वरून वाढवून 90,000 पर्यंत करण्यात येणार आहे.

जर्मनीतील अधिकृत आकडेवारीनुसार, 2015 मध्ये त्या देशात 23,320 भारतीय कामगार होते. त्यात वाढ होऊन 2024 मध्ये ही संख्या वाढून 1,36,670 वर पोहोचली.

इंडिया वर्क्सद्वारे जर्मनीत काम मिळालेल्या तरुण भारतीयांनी एका नव्या देशात जाऊन नशीब आजमवण्याचा निर्णय घेण्यासाठी जवळपास सारखीच कारणं दिली आहेत. ती म्हणजे भारतात नोकरी मिळण्यास येणाऱ्या अडचणी, युरोपात मिळणारा अधिक पगार आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे ते परदेशात काम करण्यासाठी आले आहेत.

इशू गारिया याचंही उदाहरण असंच आहे. तो 20 वर्षांचा तरुण आहे. भारतात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो विद्यापीठातून पदवी घेण्याचा आणि कॉम्प्युटरच्या क्षेत्रात नोकरी करण्याचा विचार करत होता.

"मात्र मला या पदवीवर माझे पैसे वाया घालवायचे नव्हते आणि नंतर एखाद्या कंपनीत कमी पगाराची नोकरी करायची नव्हती," असं तो म्हणाला.

म्हणून मग त्यानं दिल्लीतील उपनगराऐवजी जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट प्रदेशाचा पर्याय निवडला. तिथे तो एका बेकरीमध्ये अप्रेंटिसशिप करतो आहे. त्याची शिफ्ट पहाटे तीन वाजेपर्यंत चालायची. हिवाळ्यातील थंडीपासून बचाव करण्यासाठी तो हूड असलेलं जॅकेट घालत असे. मात्र तो आनंदी आहे.

"आम्हाला इथे चांगला पगार मिळतो. त्यामुळे मला माझ्या (गावी असलेल्या) कुटुंबाला पैसे पाठवणं शक्य होईल," असं तो म्हणतो.

तसंच तो म्हणतो की त्याला जर्मनीच्या ग्रामीण भागातील स्वच्छ हवा आवडते.

'भारतीयांमुळे माझा व्यवसाय वाचला'

अजय कुमार चंदपका हा 25 वर्षांचा तरुण हैदराबादचा आहे. तो फ्रायबर्ग शहराबाहेर असलेल्या एका गावातील 'स्पेडिशन डोल्ड' या मालवाहतूक करणाऱ्या कंपनीत काम करण्यासाठी आला आहे. तो मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा पदवीधर आहे.

"भारतात नोकरी मिळवणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं. त्यामुळे माझ्यासाठी 'ऑसबिल्डंग' हा पर्याय अधिक योग्य ठरेल असं मला वाटलं," असं तो म्हणाला.

अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षणाला जर्मन भाषेत ऑसबिल्डंग असं म्हणतात.

लेडरर यांनी सुरुवातीच्या गटातील 2 तरुणांना कामावर घेतलं होतं. त्यांच्याकडे आता 7 तरुण भारतीय काम करत आहेत. ते म्हणतात की या नव्या कामगारांनी त्यांचा व्यवसाय वाचवला आहे.

"मी 35 वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या दुकानाची सुरुवात केली होती, तेव्हा 10 किलोमीटर परिघात माझ्या दुकानासारखीच 8 दुकानं होती. आता फक्त माझंच दुकान राहिलं आहे. भारतीयांच्या मदतीशिवाय आज मी या व्यवसायात राहिलो नसतो," असं ते म्हणतात.

याच रस्त्यावर पुढे टाऊन हॉलमध्ये डायना देखील भारतातून नोकरभरती करण्याच्या तयारीत आहेत. डायना स्टोकर, वेईल आम ऱ्हाईन या शहराच्या महापौर असून त्या कॉन्झर्व्हेटिव्ह ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन ऑफ जर्मनी या पक्षाच्या आहेत. महानगरपालिकेनं 2 तरुणांची निवड केली असून ते या वर्षाच्या अखेरीस जर्मनीत येणार आहेत. तिथे ते बालवाडी शिक्षक (किंडरगर्टन टिचर) म्हणून काम करणार आहेत.

"आम्ही संपूर्ण जर्मनीत शिक्षकांचा शोध घेत होतो. मात्र इथे शिक्षक मिळणं खूपच कठीण आहे," असं त्या म्हणतात.

डायना स्टोकर या जर्मन बुंडेस्टॅग म्हणजे संसदेच्या माजी सदस्य आहेत. त्यांची 2024 मध्ये महापौर म्हणून निवड झाली. जर्मनीत विविध क्षेत्रांमध्ये तरुण, कुशल, हुशार मनुष्यबळ मिळण्यास अडचणी येत आहेत, हे त्या मान्य करतात. त्या म्हणतात की, यावर एकच उपाय आहे.

"आम्हाला परदेशातून मनुष्यबळ मिळवावं लागेल. तीच एकमेव शक्यता आहे," असं त्या म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.