You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या निर्णयामागे भाजपची भूमिका आहे का? विश्लेषक काय म्हणतात?
अजित पवार यांच्या धक्कादायक अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींमध्येही नाट्यमय वळणं पाहायला मिळत आहेत.
अजित पवार यांचं बुधवारी (28 जानेवारी) निधन झालं. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे आज (31 जानेवारी) सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला. या शपथविधीवरूनही अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या दृष्टीनं मुंबईत गेल्या 24 तासांत वेगाने हालचाली घडल्या.
पण 3 दिवसांचा राजकीय दुखवटा संपण्याआधीच अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी आणि निर्णयांमुळं या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत 12 जानेवारीला दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती, असं सांगितलं आहे. त्याचवेळी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीविषयी मात्र कुटुंबाला काहीही माहिती नसल्याचंही ते म्हणाले.
4 महिन्यांपासून दोन्ही गटांमध्ये चर्चा सुरू होती, तर आता या सर्वांची एवढी घाई का केली जात आहे?
विलीनीकरण बाजूला सारत शरद पवार यांना या सर्व प्रक्रियेतून अलिप्त ठेवण्यात आलं का? त्यामागं नेमकी कोणाची आणि काय राजकीय खेळी आहे? याबाबतही विश्लेषण केलं जात आहे.
गेल्या 24 तासांत काय घडले?
अजित पवार यांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात झाला आणि त्यात अजित पवारांचं निधन झालं होतं. त्यानंतर बारामतीमध्ये गुरुवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी एकीकडे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनाचा विधी सुरू होता. त्याचवेळी राजकीय घडामोडींनाही वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणजेच कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाच्या पुढील भवितव्याविषयी चर्चा केली.
त्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं जाणार यावर शिक्का मोर्तब झाला. काही नेत्यांनी त्यापूर्वीच याबाबत मागणीही केली होती.
त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी शनिवारचा दिवस ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या विधीमंडळ सदस्यांची बैठकही बोलावली.
शनिवारी 31 जानेवारी दुपारी 2 च्या दरम्यान झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवडही करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी, "जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड केली आहे," असं म्हटलं.
माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केलेल्या विधानांवर सध्या काहीही बोलायचं नाहीये, अशी प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांवर तसेच विलिनीकरणाच्या इतर कोणत्याही प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं आहे.
विलिनीकरणाच्या चर्चेत खंड - शरद पवार
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी मुंबईमध्ये हालचाली सुरू असतानाच बारामतीमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
"सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबद्दलची कोणतीही चर्चा आमच्याशी झालेली नाही. तसा प्रस्तावही नाही आणि विचारणाही झालेली नाही. कदाचित तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असू शकतो. पण मला याबद्दल काहीही माहिती नाही," असं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.
त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर गेले काही महिने चर्चा सुरू होती, असं पवारांनी सांगितलं.
"गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये सकारात्मक चर्चा सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील याबद्दल चर्चा करत होते. 12 फेब्रुवारीला हा निर्णय जाहीर करण्यात येणार होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही दादांची इच्छा होती. ती पूर्ण व्हावी, हीच आमची इच्छा आहे," असंही शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे निर्णय आता त्यांच्या अनुपस्थितीत भाजपकडून घेतले जात आहेत का? या प्रश्नावर शरद पवार यांनी, "मला याबद्दल काहीही माहिती नाही", असं म्हटलं.
विलिनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसतोय, असंही शरद पवार म्हणाले. आमची चर्चा झाली होती, त्यात भाजपसोबत जायचा संबंध नव्हता, असंही एक महत्त्वाचं विधान शरद पवारांनी केलं.
'भाजपच्या हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही'
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या संदर्भात अत्यंत घाईने निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या घाईबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चेलाही सुरुवात झाली. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक दीपक भातुसे यांनीही या घाईबाबत आश्चर्य व्यक्त केलं.
"अजित पवार यांच्या पार्थिवाला अग्नि दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्री करणार आहोत आणि लगेच त्यांचा शपथविधी करायचा आहे असे सांगतात. ही घाई पक्ष शरद पवार यांच्या पुन्हा ताब्यात जाऊ नये यासाठी केल्याचे जाणवते," असं भातुसे म्हणाले.
त्यांच्या मते, "पुढील राजकारणासाठी भाजपलाही हा पक्ष शरद पवार यांच्या ताब्यात जाऊ नये, असेच वाटत असणार. जर लगेच हा निर्णय घेतला नसता, तर पवार कुटुंबात चर्चा होऊन वेगळे नेतृत्व पुढे येईल की काय? अशी भीती राष्ट्रवादीच्या या प्रमुख नेत्यांना वाटत होती."
"सुनेत्रा पवार यांच्या नावावर पक्षात एकमत होण्यात तशी काही अडचण नव्हती. पण पक्षातील इतर मंत्री, आमदार यांची अधिकृत भूमिका जाणून घेण्याआधीच 4 नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा घेतलेला निर्णय आश्चर्यकारक आहे."
"प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची भाजपशी जवळीक असल्याची चर्चा असते. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विलिनीकरण टाळण्यासाठी आणि शरद पवार यांचे यात महत्त्व वाढू नये म्हणून भाजपने पडद्याआडून या हालचाली केल्याची शक्यताही नाकारता येत नाही."
"आपल्या देशात राजकारणात भावनेला फार महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर निश्चितच भावनिकदृष्ट्या एकत्रित राष्ट्रवादीला फायदा झाला असता. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढली असती", असंही दीपक भातुसे म्हणाले.
'भाजपचीच खेळी'
ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान यांनी हे निर्णय घेण्यात आले यामागं नक्कीच भाजपची खेळी असल्याचं म्हटलं.
"शरद पवार यांची जी प्रतिक्रिया आहे यावरून दिसतं की, पवार कुटुंबीयांमध्येच मतभेद आहेत. पवार म्हटले की, शपथविधीबाबत काही माहिती नाही. ही सगळी भाजपची खेळी आहे. त्यांची पूर्वीपासूनची इच्छा आहे की, पक्ष शरद पवार यांच्याकडे जाऊ नये," असं प्रधान यांनी म्हटलं.
संतोष प्रधान यांनी भाजपच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेबाबत विश्लेषण करताना म्हटलं, "2029 च्या दृष्टीने जर शरद पवार सक्रिय राहिले, तर त्यांच्यासाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं. त्यांना तसं करायचं नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने सगळीकडे पानभर जाहीरात दिली होती हे आपण पाहिलं."
"राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पक्षाने विधीमंडळ सदस्यांची लगेच बैठक बोलवली. आता शपथविधी होतोय. ही सगळी सूत्रं भाजपनं हलवली. दिल्लीवरून सर्व सूत्र हलत आहेत," असं मत प्रधान यांनी व्यक्त केलं.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबद्दल विचारलं असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल."
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे मी सध्या एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल," असं फडणवीस म्हणाले होते.
"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही दादांची इच्छा होती. ती पूर्ण व्हावी, हीच आमची इच्छा आहे", असं पवारांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नसल्याचं सांगत विलीनीकरणाची प्रक्रिया रखडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
या सर्वच घटनांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होणार असून त्याचे पडसादही लवकरच दिसतील. त्यातून ही कुणाची खेळी होती? की राजकीय दृष्टीनं घेतलेला निर्णय हेही नक्कीच स्पष्ट होईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)