You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक असं कुटुंब जिथे दोन भावांनी आपल्या दोन भावंडांना दिली किडनी
- Author, मॅट ग्रेव्हलिंग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 2 मिनिटे
जेव्हा लोक मला विचारतात की तू आत्तापर्यंतच्या आयुष्यात काय कमावलंय? तेव्हा माझ्याकडे आवर्जून सांगण्यासारखं एकच उत्तर असतं की, "मी कुणाचे तरी प्राण वाचवले आहेत."
हे शब्द आहेत अशा एका भावाचे ज्याने आपल्या भावासाठी स्वतःची किडनी दान केली.
डिसेंबरमध्ये युकेमधील रीडिंग येथील ख्रिस्तोफर शूमॅन यांनी त्यांचे भाऊ जेरेमी यांना स्वतःची एक किडनी दिली. 'मी मरणाच्या दारात' होतो असं जेरेमींना वाटत होतं.
पण त्यांच्या कुटुंबासाठी ही काही अगदीच अभूतपूर्व नव्हती. कारण, 2011 मध्ये फिलीप यांनी त्यांची बहीण सूझॅन यांना देखील किडनी दिली होती.
शूमॅन कुटुंबात 8 जण आहेत. त्यातील दोन मुलांना पॉलिसिस्टिक किडनी डिसीज या अनुवांशिक आजाराचे निदान झाले. याचा अर्थ असा होता की भविष्यात किडनी निकामी होण्याची शक्यता आहे.
या सर्व शस्त्रक्रिया ऑक्सफर्डमधील चर्चिल हॉस्पिटलमध्ये पार पडल्या होत्या. गेल्या वर्षी या हॉस्पिटलने तब्बल 68 किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केल्या होत्या. ज्या युकेतील कोणत्याही हॉस्पिटलमधील ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेच्या तुलनेत अधिक आहेत.
आता 'जागतिक किडनी दिनानिमित्त' ही सर्व भावंडं पुन्हा एकदा एकत्र आली होती.
या आजाराने आपल्या आयुष्यावर काय परिणाम झाला होता हे सांगताना सुझॅन म्हणतात, "माझ्यावर डायलिसिस होत असे. माझ्या किडनीची कार्यक्षमता केवळ 4% ते 5% उरली होती."
त्या सांगतात की त्यांचं शरीर पूर्णपणे थकून जायचं. हिमोग्लिबन वाढवण्यासाठी औषधांवर अवलंबून राहावं लागायचं. कारण किडनीचा आजार असेल तर त्यासोबत अनेकदा अॅनिमिया देखील होतो.
अमेरिकेत राहत असलेल्या फिलिप यांनी व्हिडिओ कॉलद्वारे हजेरी लावली. ते अभिमानाने सांगतात की, "मी हे अगदी ठामपणे सांगू शकतो की, माझ्या संपूर्ण आयुष्यात मी केलेलं हे सर्वात चांगलं काम आहे."
"जर तुम्ही किडनी दिली तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला नेहमीकरता ख्रिसमसला गिफ्ट मिळण्याची सोय होते," असं ते गमतीत म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)