प्रियकर असल्याचे खोटे सांगून रिसेप्शनहून घेतली हॉटेल रूमची चावी, महिलेवर लैंगिक अत्याचार

    • Author, ॲलेक्स मीकिन आणि ईथन गज
    • Role, दक्षिण इंग्लंड
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

(सूचना : या लेखात विचलित करणारी माहिती आहे, ती काही वाचकांना अस्वस्थ करू शकते)

रात्री पार्टी केल्यानंतर हॉटेलच्या रूममध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याला कोर्टानं साडेसात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कायरन स्मिथ याला या प्रकरणात फेब्रुवारीमध्ये ही शिक्षा ठोठावण्यात आली होती.

ही घटना इंग्लंडमध्ये डिसेंबर महिन्यात ट्रॅव्हलॉज कंपनीच्या हॉटेलमध्ये घडली होती.

या महिलेनं सांगितलं की ती हॉटेलच्या रूममध्ये झोपलेली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिनं सांगितलं की 'ट्रॅव्हेलॉज' या हॉटेल कंपनीला तिचं संरक्षण करण्यात अपयश आलं.

हॉटेलमधीलच एका कर्मचाऱ्यानं एका पुरुषाला तिच्या हॉटेलच्या रूम नंबरची माहिती दिली आणि त्या रूमची चावीदेखील दिली. यामुळे त्या पुरुषाला रूममध्ये शिरून तिच्यावर अत्याचार करता आला.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर ट्रॅव्हलॉज कंपनीने नुकताच त्यांच्या सुरक्षा धोरणात बदल केला आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर रूम बुक आहे त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय आता दुसऱ्या व्यक्तीला चावी दिली जाणार नाही असा बदल कंपनीने केला आहे.

तसेच पीडित महिलेची माफी देखील मागितली आहे.

आमच्याकडून चुकी झाली आणि आम्ही लवकर पावले उचलायला हवी होती. मी याबद्दल मनापासून क्षमा मागते असे ट्रॅव्हलॉजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जो बायडल यांनी आपल्या निवेदनात म्हटले.

नेमकी कशी घडली घटना?

या 29 वर्षांच्या आरोपीचं नाव कायरन स्मिथ आहे. तो इंग्लंडमधील सरेमधील स्टेन्स या शहरातील आहे. डिसेंबर 2022 मध्ये एका रात्री ही महिला ज्या पार्टीत होती तिथे स्मिथदेखील होता. त्यानंतर रात्री 2 वाजेच्या सुमारास ही महिला इतर लोकांबरोबर ट्रॅव्हेलॉज या हॉटेल चेनच्या मेडनहेडमधील हॉटेलमधील त्यांच्या खोल्यांमध्ये गेले होते.

स्मिथ त्या रात्री हॉटेलच्या रिसेप्शनवर गेला. तिथे त्यानं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तो त्या महिलेचा प्रियकर असल्याचं खोटं सांगितलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला त्या महिलेच्या खोलीची चावी दिली.

ही महिला त्यावेळेस झोपलेली होती. रूममध्ये आत शिरल्यावर स्मिथनं या महिलेवर लैंगिक अत्याचार केला होता, अशी माहिती थेम्स व्हॅली पोलिसांनी दिली.

या महिलेला जाग आली आणि तिच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती स्मिथवर ओरडली आणि त्याला खोलीबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर अंगावर कपडे चढवून स्मिथ तिथून निघून गेला. त्यानं रूमची चावी हॉटेलच्या रिसेप्शनला दिली आणि तो हॉटेलमधील त्याच्या खोलीत निघून गेला.

दुसऱ्या दिवसी सकाळी पीडितेनं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल सांगितलं होतं.

'माझं संरक्षण करण्यात हॉटेलला अपयश आलं'

ट्रॅव्हेलॉजनं नंतर त्या महिलेला अपमानास्पदरीत्या 30 पौंडाचा (जवळपास 3695 रुपये) रिफंड देऊ केला होता. ट्रॅव्हेलॉजनं ती रिफंडची बाब ज्याप्रकारे हाताळली गेली त्यासाठी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं आहे की ते त्यांच्या रूमसंदर्भातील सुरक्षा धोरणांचा आढावा घेत आहेत.

ती महिला आता तिशीत आहे. कायदेशीर कारणांमुळे इथे त्यांचं नाव उघड करता येत नाही. त्या महिलेनं सांगितलं की, एखाद्या हॉटेलमध्ये एकट्यानं राहण्याची त्या महिलेची ही पहिलीच वेळ होती.

त्यांनी दावा केला होता की हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की स्मिथनं त्यांचं नाव सांगून हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेला विश्वास दिला आणि त्यातून त्याने हे उल्लंघन केले. ही महिला स्मिथला ओळखत होती.

"मला वाटतं की माझं संरक्षण करण्यात त्यांना अपयश आलं. मात्र या गोष्टीमुळे मला अधिक हताश व्हायला होतं आणि चीड येते की त्यांनी असं म्हटलं नाही की 'हो, आमच्याकडून चूक झाली.' त्याउलट त्यांनी त्याची जबाबदारी न स्वीकारत दोष दुसऱ्यावर ढकलला आहे," असं त्या म्हणाल्या.

"जर मी एकटीनं हॉटेलमध्ये चेक-इन केलं होतं आणि रूमचं बुकिंग फक्त माझ्या एकटीसाठीचं होतं. तर मग, मी झोपलेली असताना मध्यरात्री अशाप्रकारे माझ्या खोलीत कोणालातरी येऊ देणं, तुम्हाला योग्य का वाटलं?"

"किमान मला उठवायचं होतं किंवा रूममध्ये फोन करायचा होता किंवा रूमपर्यंत यायचं होतं. कोणालाही रूमची चावी देण्यापेक्षा यातील काहीही चांगलं ठरलं असतं."

'हॉटेलच्या रिसेप्शनवर काहीही सांगून कोणालाही रूममध्ये कसं शिरता येतं'

त्या म्हणाल्या, "हॉटेलनं सांगितलं की त्यानं त्यांच्या सुरक्षा प्रश्नांची उत्तरं दिली होती."

"माझ्याबद्दल त्याला असणारी माहिती म्हणजे त्याला फक्त माझं नावंच माहीत असणार."

"ते म्हणाले की त्यानं त्यांना टेक्स्ट मेसेज दाखवले. मात्र माझ्याकडे त्याचा फोन नंबर नव्हता आणि त्याच्याकडे माझा नंबर नव्हता."

त्या पुढे म्हणाल्या, "मी दरवाजा नीट बंद केला आहे ना, याची दोनदा खात्री केली होती. तो माझ्या खोलीत कसा शिरला, हे मला समजत नव्हतं. कारण हॉटेलमध्ये राहताना जे करणं योग्य मानलं जातं, ते सर्व मी केलं होतं."

ही महिला ट्रॅव्हेलॉजनं त्यांच्या कार्यपद्धतींमध्ये बदल करण्याची मागणी करते आहे. या महिलेनं सांगितलं, "नंतरच्या काळात म्हणजे या घटनेच्या दोन आठवड्यांनी मला राग आला. कारण ते मला सांगत होते की त्यांच्याकडून काहीही चूक झालेली नाही."

"जर हॉटेलच्या रिसेप्शनवर काहीतरी सांगून कोणालाही रूममध्ये सहज प्रवेश करता येत असेल, तर त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांचं संरक्षण होत नाही. हे अजिबात योग्य नाही."

ट्रॅव्हेलॉजची चूक झाल्याची कबुली आणि मागितली माफी

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे या घटनेची तक्रार केल्यानंतर, हॉटेलनं या महिलेला 30 पौंडांचा (जवळपास 3695 रुपये) रिफंड देऊ केला होता.

"मला ती गोष्ट अत्यंत अपमानास्पद वाटली. जर त्यांनी तो देऊ केला नसतो तर अधिक बरं झालं असतं," असं त्या म्हणाल्या.

ट्रॅव्हेलॉजनं कबूल केलं आहे की त्या परिस्थितीत त्याप्रकारे रिफंड देऊ करणं अयोग्य होतं.

हॉटेलच्या सुरक्षा उपायांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होता, हे बीबीसीला सांगण्यास ट्रॅव्हेलॉजनं नकार दिला. मात्र त्यांनी सांगितलं की त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी याचं योग्यप्रकारे पालन केलं होतं.

कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे, "आमच्या पाहुण्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा याला आम्ही प्राधान्य देतो. या दु:खद घटनेबद्दल ऐकून आम्हाला अतिशय चिंता वाटली. पीडितेसोबत आमच्या संवेदना आहेत."

"ही घटना ज्या प्रकारे हाताळण्यात आली, त्याबद्दल आम्ही पीडितेची माफी मागतो."

"ट्रॅव्हेलॉज हॉटेल उद्योगातील मानकं असलेल्या सुरक्षा कार्यपद्धतींचा अवलंब करतं. या मानकांचं पालन 2022 मध्ये ही घटना घडली तेव्हा करण्यात आलं होतं."

"या घटनेतून धडा घेण्यासाठी आणि आमच्या कार्यपद्धतीत आणखी सुधारणा करण्यासाठी आम्ही आमच्या रूमच्या सुरक्षाविषयक धोरणांचा पूर्ण आढावा घेऊ."

आरोपीला कोर्टानं लगेच सुनावली शिक्षा

तपास अधिकारी, डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल (युकेच्या पोलीस दलातील पद) अर्शिद अली यांनी सांगितलं की स्मिथला झालेल्या शिक्षेतून "या गुन्ह्याचं गांभीर्य आणि आरोपीचा धोकादाक स्वभाव दिसून येतो".

"थेम्स व्हॅली पोलिस सर्व लैंगिक अत्याचारांना अतिशय गांभीर्यानं घेतात. विशेषकरून महिलांच्या विरोधात झालेल्या गुन्ह्यांना," असं ते म्हणाले.

"लैंगिक हिंसाचार करण्यांना अटक करून त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर खटला चालवण्यास आम्ही यापुढेही प्राधान्य देत राहू," असं ते पुढे म्हणाले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्मिथवर 'रीडिंग क्राऊन कोर्टात' 4 दिवस खटला चालला. त्यात स्मिथला लैंगिक अत्याचार आणि लैंगिक स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या हेतूनं अनधिकृत प्रवेश करण्यासाठी दोषी ठरवण्यात आलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.