जिथे जायलाही गांधी टाळत होते, त्याच आंदोलनाने त्यांना 'भारताचे नेते' कसे बनवले?

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

बिहारमधल्या आंदोलनांची चर्चा होते, तेव्हा अशा चर्चांमध्ये महात्मा गांधींसंदर्भात एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं, ते म्हणजे, "देशानं बिहारच्या भूमीवर मोहनदास गांधींना पाठवलं, बिहारनं त्यांना 'महात्मा गांधी' बनवून पाठवलं."

गांधींबाबतचं हे विधान जेव्हा कुणी वापरतो, तेव्हा त्याला संदर्भ असतो चंपारण सत्याग्रहाचा.

चंपारण सत्याग्रह म्हणजे, महात्मा गांधींच्या भारतातील राजकीय जीवनातील पहिलं सर्वात मोठं आंदोलन. सत्याचा आग्रह धरणारी त्यांची राजकीय विचारधारा ज्या आंदोलनातून देशवासीयांना पहिल्यांदा कळली, ते हे सत्याग्रह.

आज, म्हणजे 10 एप्रिलला या चंपारण सत्याग्रहाचा वर्धापन दिन. कारण याच दिवशी 1917 साली हे आंदोलन बिहारच्या चंपारण भागात सुरू झालं.

या निमित्तानं या सत्याग्रहाशी संबंधित एक काहीशी वेगळी गोष्ट जाणून घेऊ.

सत्याग्रह कसा झाला, त्याचा शेवट कसा झाला वगैरे अनेकांना ठाऊक आहे. नसेल, तर तेही शेवटी समजून घेऊ. पण या सत्याग्रहात गांधींचं आगमन काहीसं निराळं होतं. हे निराळेपण काय, हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

कारण चंपारण सत्याग्रह किंवा आंदोलन वगैरे दूर, या चंपारणमध्ये महात्मा गांधी साधं जाऊही इच्छित नव्हते. किंबहुना, ते टाळत होते. पण पुढे ते गेले आणि याच सत्याग्रहानं त्यांना 'भारताचा नेता' बनवलं. त्याचीच ही गोष्ट.

या गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी, एक स्पष्ट करायला हवं की, जेव्हा मी 'भारताचा नेता' म्हणतो, तेव्हा शहरांच्या पलिकडे गांधी पहिल्यांदाच पोहोचल्याचं म्हणणं अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी म्हणत, या देशात एक इंडिया आहे आणि एक भारत. तेव्हा त्यांना इंडिया म्हणजे शहर आणि भारत म्हणजे ग्रामीण भाग. त्यांच्या या व्याख्येला ग्राह्य धरलं, तर गांधी चंपारण सत्यग्रहाच्या निमित्तानं 'भारताचे नेते' बनले, असं म्हणता येतं.

ज्या चंपारण मधून गांधींनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठं पहिलं आंदोलन सुरू केलं, त्या चंपारणमधील शेतकऱ्यांचा प्रश्न नेमका होता तरी काय, हे सर्वात आधी जाणून घेऊ.

चंपारणमधील शेतकऱ्यांचा प्रश्न

चंपारण बिहारमधला भाग. तिथं विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात निळीचं उत्पादन होत असे. कापड उद्योगात निळीला फार महत्त्व होते. कापडाला रंग देण्यासाठी तिचा अतिशय उपयोग होता.

पहिल्या महायुद्धात बदलत्या जागतिक परिस्थितीत निळीचे भाव वाढले. त्या काळात जर्मनी हा निळीचा पुरवठा करणारा जगातील एक प्रमुख देश होता.

या काळात कापड उत्पादन वाढत होते आणि त्याचवेळी निळीचा पुरवठाही कमी पडू लागला. परिणामी निळीचे भाव कमालीचे वाढले.

इकडे भारतात इंग्रजांची सत्ता होती. मग जागतिक बाजारपेठेत निळीचे भाव खूप वाढल्यानं चंपारणमधील जमीनदारांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी निळीचे उत्पादन पुन्हा सुरू करून कारखाने सुरू करण्याचं ठरवलं. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतीवरील तीनविशांस भागावर तिच्या मूळ मालकासाठी निळीच्या लागवडीची सक्ती करण्याचा कायदा केला गेला. त्याचे नव '3 कठिया' असे होते.

चंपारणमध्ये 20 कठांचा 1 एकर होत असे. एकरी 3 कठांची निळीची लागवड करणे म्हणजे '3 कठिया' पद्धती होय.

पण या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे आपल्या मनाप्रमाणे शेतीत पिकाची लागवड करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले.

ते अगतिक होऊन बळजबरीने पिकवत असलेल्या निळीच्या उत्पादनाला जमिनदारांकडून भावही फार मिळत नसे. त्यामुळे महायुद्धाच्या काळात तेथील शेतकऱ्यांच्या वाट्याला पूर्वीपेक्षा अधिक वाईट दिवस आले.

चंपारणमधील शेतकऱ्यांमध्ये रोष होता, पण त्या रोषाला आवाज कुणी द्यायचा? मग त्यांच्यातीलच एक शेतकरी पुढे आला. त्या शेतकऱ्याचं नाव राजकुमार शुक्ल.

हे राजकुमार शुक्ल अत्यंत धाडसी शेतकरी. मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीला 'महात्मा गांधी' बनवण्यासाठी बिहारमध्ये आणण्यात त्यांचा वाटा मोठा. त्याबद्दल पुढे पाहूच.

तर या राजकुमार शुक्ल यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांचं म्हणणं मोठ्या धाडसानं ब्रिटिशांसमोरही मांडलं. पण न्याय मिळण्याऐवजी झालं उलटच.

शुक्ल यांनाच अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं. ते तिथून सुटले. पण या सगळ्यानं ते थांबले नाहीत. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे धाव घेतली.

राजकुमार शुक्ल यांची धडपड

राजकुमार शुक्ला हे निळीचे तसे मोठे शेतकरी होते. त्यांना काँग्रेस ही राष्ट्रीय चळवळ म्हणून माहीत होती. काँग्रेसच्या स्थापनेला एव्हाना 30-32 वर्षे होऊन गेली होती. काँग्रेसचं नेतृत्व उच्चभ्रू असले, तरी ही राष्ट्रीय चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात नावाने तरी पोहोचली होती.

नेमके याच काळात म्हणजे 1916 साली काँग्रेसचे अधिवेशन लखनौमध्ये होते. लोकमान्य टिळक, मदन मोहन मालवीय, डॉ. अ‍ॅनी बेझंट, बॅरिस्टर मोहम्मद अली जीना असे नेते त्यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते होते. गांधी अजून या पहिल्या फळीत पोहोचायचे होते.

त्यामुळे राजकुमार शुक्ल यांनी लखनौमध्ये काँग्रेस अधिवेशनात लोकमान्य टिळक आणि पंडित मदन मोहन मालवीय यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर चंपारणमधील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.

परंतु, त्या दोघांनीही, म्हणजे लोकमान्य टिळक आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी राजकुमार शुक्ल यांना स्पष्टपणे सांगितलं की, "आम्हाला तातडीने राजकीय स्वातंत्र्य मिळवायचे असल्याने आमच्याजवळ चंपारणमधील निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी अजिबात वेळ नाही."

राजकुमार शुक्ल आणि गांधींची पहिली भेट

राजकुमार शुक्ल हे स्वत: शेतकरी असल्याने त्यांनी शेतकऱ्यांची ही दु:खे भोगलेली होती. त्यामुळे त्यांनी हार मानली नाही. पण त्यांनी या राष्ट्रीय नेत्याचा नाद सोडला आणि त्यांनी नवीन नेत्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. ते नवे नेते म्हणजे गांधी.

त्या वेळी काँग्रेसमध्ये गांधी फारच नवखे होते. गांधींचा काँग्रेसशी संबंध फक्त अधिवेशनाला उपस्थित राहण्याइतकाच होता.

गांधी लखनौमध्ये अधिवेशनासाठी आले होतेच. मग राजकुमार शुक्लांनी त्यांना गाठले. त्यांच्या तंबूत जाऊन त्यांना चंपारणमधील शेतकऱ्यांची दुरावस्था ऐकवली.

गांधीही चंपारणमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल फारसे उत्सुक दिसले नाहीत. किंबहुना, ते राजकुमार शुक्ल यांना टाळतानाच दिसून येतात. मात्र, राजकुमार शुक्ल यांनी गांधींची पाठ सोडली नाही. या सगळ्याबद्दल गांधींच्याच शब्दात समजून घेणं रंजक आहे.

गांधी त्यांच्या 'सत्याचे प्रयोग' या आत्मचरित्रपर पुस्तकात लिहितात, "मला कबूल केले पाहिजे की, तिकडे मी प्रत्यक्ष गेलो, त्यापूर्वी चंपारणचे नावही मला माहीत नव्हते. निळीची लागवड होते त्याची कल्पनाही विशेष नव्हती. निळीच्या गोळ्या पाहिल्या होत्या, पण त्या चंपारणमध्ये बनतात किंवा त्या निमित्तानं हजारो शेतकऱ्यांना हाल सोसावे लागतात, याची गंधवार्ताही नव्हती.'

पुढे गांधींनी राजकुमार शुक्ल यांच्याबद्दल लिहिताना म्हटलं, "राजकुमार शुक्ल नावाचे चंपारणमधील एक शेतकरी होते. त्यांनाही हे दु:ख सहन करावे लागले होते. ते दु:ख त्यांना सलत होतेच, पण स्वत:ला भोगाव्या लागलेल्या आपत्तीमुळे सर्वांवरील हा निळीचा डाग धुवून काढण्याची तळमळ त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली होती. लखनौच्या काँग्रेसला मी गेलो होतो. तिथे त्या शेतकऱ्याने माझी पाठ धरली."

इथं गांधी ज्या 'त्या शेतकऱ्यानं' असा उल्लेख करतात, तो राजकुमार शुक्ल यांच्याबद्दलचाच. अशा या राजकुमार शुक्ल यांना सोबत होती ती ब्रजकिशोर यांची.

गांधींची टाळाटाळ आणि अखेरीस तयारी

ब्रजकिशोर प्रसाद हे बिहारमधील नेते. राजकुमार शुक्ल त्यांनाही गांधींकडे घेऊन गेले. मग त्यांनी गांधींना शेतकऱ्यांचे प्रश्न विस्ताराने समजावून सांगितले.

गांधींनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून तर घेतले, पण नंतर स्पष्टपणे सांगितले, "तुम्हाला जर हा प्रश्न इतका महत्त्वाचा वाटतो, तर तुम्ही तो काँग्रेस अधिवेशनात मांडा. त्यासंबंधी मी माझे मत प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय व्यक्त करू शकत नाही."

त्यानंतर गांधींनी चंपारण आणि तेथील शेतकऱ्यांचा विषय डोक्यातून काढून टाकला.

गांधींच्या सूचनेप्रमाणे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यासंबंधी एक ठराव मांडण्यात आला. त्यात मागणी केली की, 'बिहारमधील शेतकऱ्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने एक आयोग नेमावा. त्यात सरकारी आणि बिगरसरकारी व्यक्तींचा समावेश असावा. त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखांचा आणि प्रश्नांच्या पाठीमागे कोणती कारणे आहेत, याची चौकशी करावी.'

यानंतर काँग्रेसकडून सहानुभूतिदर्शक ठराव मंजूर झाला, पण तेवढ्यानं राजकुमार शुक्ल यांचं काही समाधान झालं नाही. कारण काँग्रेसनं ठरावावर फार काही ठोस असं केलं नाही.

मग ते पुन्हा गांधींपुढे उभे राहिले आणि त्यांनी चंपारणतील शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

राजकुमार शुक्ल यांचं म्हणणं होतं की, गांधींनी एकदा चंपारणमध्ये यावं आणि तिथल्या निळीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घ्यावा.

खरंतर तोपर्यंत गांधींना निळ म्हणजे काय आणि त्याचं उत्पादन कसे होते? चंपारण नेमके कुठे आहे? वगैरे काहीच माहीत नव्हते.

त्यात चंपारण हे हिमालयाच्या पायथ्याशी आहे, हे जेव्हा गांधींना समजले, तेव्हा तर इतक्या दूरवर कोण जातो? म्हणून ते राजकुमार शुक्ल यांना अक्षरश: टाळू लागले. तरीही राजकुमार शुक्ल त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हते.

मग अखेरीस गांधी राजकुमार शुक्ल यांना म्हणाले, "माझ्या फिरतीमध्ये मी चंपारणला येईल. तेव्हा 1-2 दिवस देईन." त्यावर शुक्ल म्हणाले, "एक दिवसही पुरेसा होईल."

लखनौ अधिवेशनानंतर गांधी कानपूरला गेले, तर तिथेही राजकुमार शुक्ल पोहोचले आणि म्हणाले, इथून चंपारणजवळ आहे, एकच दिवस या.

मग गांधी काहीसे वैतागूनच म्हणाले, "यावेळी मला माफ करा. पण मी येईन, एवढे वचन देऊन ठेवतो."

पण राजकुमार शुक्ल यांच्यासाठी हे वचन काही पुरेसं ठरलं नाही. त्यांना नेमकी तारीख हवी होती. मग गांधी म्हणाले, "ठीक. मला अमुक तारखेला कलकत्त्याला जायचे आहे. तेथे या आणि मला घेऊन जा."

विशेष म्हणजे, गांधी कलकत्त्याला गेले, तिथेही राजकुमार शुक्ल पोहोचले आणि त्यांना अखेरीस बिहारच्या पाटण्यात घेऊन गेले. हे साल होतं 1917 चं.

यशस्वी सत्याग्रह

गांधींना चंपारणमध्ये असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं. मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना कळल्यावर त्यांच्यासाठी लढण्याचं त्यांनी ठरवलं आणि सुरू झाली एका ऐतिहासिक घटनेची सुरुवात. गांधींच्या भारतातील सर्वात मोठ्या, सर्वात पहिल्या सत्याग्रहाची, अर्थात चंपारण सत्याग्रहाची.

गांधींनी चंपारणमध्ये जाऊन परिस्थितीचा अभ्यास करण्याचे ठरवलं. चंपारणमधील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची साक्ष, निवेदन आणि तक्रारी गोळा केल्या. त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख समजून घेत, त्यांच्या समस्यांना आंदोलनाचं रूप दिलं.

गांधींच्या या सगळ्या हालचालींमुळे ब्रिटिश सरकार सतर्क झालं आणि गांधींना चंपारण सोडण्याचा आदेश दिला. मात्र, गांधींनी हा आदेश शांततेने नाकारला.

त्यांनी न्यायाच्या बाजूने उभे राहून कायद्याचे उल्लंघन केलं, पण त्यामागे अहिंसा आणि सत्य यांचा आधार होता.

गांधींनी न्यायालयात हजर राहून आपल्या कृतीची कबुली दिली. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास वाढला.

हे गांधींच्या सत्याग्रहाच्या तत्त्वांचे पहिले मोठे प्रदर्शन होतं आणि ते त्यांच्या पुढील सर्व आंदोलनांची मुहूर्तमेढच होती.

अखेरीस गांधींच्या सत्याग्रहाच्या दबावामुळे ब्रिटिश सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली. या समितीत गांधींना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आलं.

गांधींनी या समितीत शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस पुरावे आणि साक्षी सादर केल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि नैतिक दबावामुळे सरकारला झुकावं लागलं.

परिणामी, तीनकठिया पद्धत रद्द करण्यात आली आणि शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसानभरपाई देण्यात आली.

'देशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल'

महात्मा गांधींचे चरित्रकार रामचंद्र गुहा म्हणतात, 'जरी चंपारणमधील शेतकऱ्यांचा गांधीजींमुळे फायदा झाला असला, तरी चंपारणमधील शेतकऱ्यांमुळे गांधीजींचा जास्त फायदा झाला. त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे गांधीजींना शेतकरी जीवनातील अडचणी समजण्यास मदत झाली."

"इथेच त्यांच्या सुरुवातीच्या काळातील स्थिर आणि विश्वासू असे सहकारी त्यांना मिळाले. आपापल्या जाती-वर्ग आणि प्रदेश यांच्याविरहित लोकांचे प्रतिनिधित्व करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना आला.'

"चंपारण हा केवळ गांधीजींचा भारतातील पहिला राजकीय अनुभव होता असे नव्हे, तर गांधीजींची राजकीय कारकीर्द घडवण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीनेसुद्धा त्याचे महत्त्व आगळेवेगळे आहे.

चंपारण हे असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग, छोडो भारत आणि अखेरीस देशाचे स्वातंत्र्य या दृष्टीने पडलेले अतिशय महत्त्वाचे असे पहिले पाऊल होते," असंही रामचंद्र गुहा नोंदवतात.

संदर्भ :

  • सत्याचे प्रयोग – महात्मा गांधी
  • सत्याग्रह इन चंपारण – राजेंद्र प्रसाद
  • द लाईफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी – रॉबर्ट पेन
  • गांधी : इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड – रामचंद्र गुहा
  • गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा – डॉ. रावसाहेब कसबे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)