नमिता थापर कोण आहेत, ज्या नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितल्यानं ट्रोल होत आहेत?

वाचन वेळ: 4 मिनिटे

'शार्क टँक इंडिया' या रिॲलिटी टीव्ही शोच्या परीक्षक, 'एमक्योर' या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या भारतातील पूर्णवेळ संचालक आणि 'इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेड'च्या संस्थापक नमिता थापर या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

व्यावसायिक कुटुंबातून आलेल्या 48 वर्षीय नमिता थापर सोशल मीडियावर खूप सक्रिय असून, इन्स्टाग्रामवर त्यांना 15 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

नमिता या सोशल मीडियावर विविध विषयांवर आपली मते मांडतात. तसेच, रील्स तयार करतात. तीन आठवड्यांपूर्वी, त्यांनी नमाज या इस्लामी प्रार्थना पद्धतीच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी एक व्हीडिओ रील शेअर केला होता.

नमिता यांच्या या रीलनंतर अनेक लोकांनी त्यांना ट्रोल केलं आणि त्यांच्याबद्दल नकारात्मक कमेंट्सही केल्या.

आता नमिता यांनी याविषयी आणखी एक रील बनवली आहे. या रीलचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

नमिता थापर यांचा जन्म 21 मार्च 1977 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांचे वडील सतीश मेहता हे आयआयएम अहमदाबादचे पदवीधर आणि 'एमक्योर फार्मा'चे संस्थापक आहेत.

21 व्या वर्षी झाल्या सीए

वयाच्या 21 व्या वर्षी नमिता यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) पदवी मिळवली.

त्यांनी वडिलांच्या कंपनीचं व्यवस्थापन हाती घेण्यापूर्वी अमेरिकेतील गायडंट कॉर्पोरेशनमध्ये सहा वर्षे कामही केलं.

त्यांच्याकडे ड्यूक विद्यापीठाची एमबीए पदवीदेखील आहे.

नमिता 2007 मध्ये एमक्योर फार्मामध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर (CFO) म्हणून रुजू झाल्या. नंतर त्या कंपनीच्या भारतातील संचालक झाल्या.

नमिता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांच्या वडिलांची 'एमक्योर फार्मा' ही कंपनी सुमारे 70 देशांमध्ये व्यवसाय करते आणि या कंपनीमध्ये दहा हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

तीन वर्षांपूर्वी चेतन भगत यांना दिलेल्या एका मुलाखतीत नमिता म्हणाल्या होत्या की, "मी कंपनीचा भारतातील बिझनेस सांभाळते, ज्याची वर्षाला सुमारे 2 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे."

नमिता यांनी सांगितलं होतं की, सीए पदवी मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील चार वर्षे दिली आणि हे केवळ त्यांच्या आवडीमुळेच शक्य झालं.

नमिता सांगतात की, त्यांना 'अकाऊंट्स' फार आवडायचं आणि त्यांचे वडील त्यांना 'मुनीमजी' म्हणायचे.

या मुलाखतीमध्ये नमिता यांनी त्यांच्या कुटुंबाच्या एकूण संपत्तीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण, एमक्योर फार्मा कंपनी वर्षाला 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बिझनेस करते, हे त्यांनी नक्की सांगितलं.

एमक्योर आता 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवल असलेली एक पब्लिक कंपनी आहे.

जेव्हा जुलै 2024 मध्ये एमक्योर फार्माने आपला आयपीओ लाँच केला होता, तेव्हा नमिता यांनी कंपनीमधील त्यांचे 12.68 लाख शेअर्स 127 कोटी रुपयांना विकले होते.

नमिता एक उद्योजिका तर आहेतच. त्याशिवाय, नमिता या एक सक्रिय गुंतवणूकदार असून 'शार्क टँक इंडिया' या बिझनेस रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम करतात.

'फायनान्शिअल एक्सप्रेस'मधील एका वृत्तानुसार, नमिता यांनी शोच्या पहिल्या सीझनदरम्यान 25 कंपन्यांमध्ये 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी आणखीही अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

व्यावसायिक कारकिर्द आणि टीव्ही शो याव्यतिरिक्त, नमिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. कोविड-19 महासाथीच्या काळात, त्यांनी 'अनकंडिशन युवरसेल्फ' या यूट्यूब टॉक शोचं सूत्रसंचालन केलं होतं.

याशिवाय, त्यांनी नीती आयोगाच्या 'डिजिटल हेल्थ टास्क फोर्स'मध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' कार्यक्रमातही सहभाग घेतला आहे.

नमिता मुलाखतींमध्ये आपली मते स्पष्टपणे मांडताना दिसतात. तसेच, त्या वैयक्तिक विकासावरही अधिक भर देतात.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, "आयुष्यातील 80 टक्के भाग हा तुमच्या कामांसाठी असतो. त्यामुळे, तुम्ही जे करत आहात त्यावर तुमचं प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही दुःखी व्हाल."

'बिझनेस टुडे'ला 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, थापर यांनी स्पष्ट केलं होतं की, केवळ एखादी पदवी आपल्याकडे असल्यामुळे आदर मिळवणं एवढंही सोपं नसतं.

त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या संस्थेत सर्वोत्तम कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नेहमीच मतभेद व्यक्त करण्यावर भर दिला आहे.

मात्र, नमिता या स्वतःदेखील अनेक मुद्द्यांवर जाहीरपणे आपली असहमती व्यक्त करताना दिसतात.

2025 मध्ये, योगगुरू आणि उद्योगपती रामदेव बाबा यांनी 'रुह अफझा' या शीतपेयाबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली होती. त्याबद्दल त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला होता.

नमिता थापर यांनी रामदेव बाबा यांच्या या वक्तव्यांना 'हेट मार्केटिंग' असं म्हटलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, "आपल्या मुलांसाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा भारत घडवायचा आहे?"

दुसरीकडे, नमिता यांच्यावर 'नेपो किड' असल्याचा तसेच वडिलांच्या पैशांच्या जोरावर यशस्वी झाल्याची टीकाही केली जाते.

याबाबत त्यांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, त्यांनी त्यांच्या वडिलांची 500 कोटी रूपयांची फार्मा कंपनी आता 8 हजार कोटी रुपयांपर्यंत नेली आहे.

एका मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या होत्या की, "मला माझी कमाई स्वतः खर्च करायची होती. मला माझ्या अटींवर आयुष्य जगायचं होतं."

'इकॉनॉमिक टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नमिता यांनी सांगितलं होतं की, भारताच्या जीडीपीमध्ये कौटुंबिक व्यवसायांचा 87 टक्के वाटा आहे. त्यांनी पुढे असंही सांगितलं की, केवळ पहिलीच पिढी नव्हे, तर प्रत्येक पिढी कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

नमिता यांना 'शार्क टँक इंडिया'मधील सर्वात श्रीमंत परीक्षकांपैकी एक मानलं जातं. त्यांच्या सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे त्यांची आलिशान जीवनशैली देखील चर्चेत असते.

'फायनान्शिअल एक्सप्रेस'मधील एका अहवालानुसार, त्यांच्या आलिशान गाड्यांमध्ये 2 कोटी रुपये किमतीची बीएमडब्ल्यू X7, मर्सिडीज बेंझ जीएलई आणि ऑडी क्यू7 यांचा समावेश आहे.

'शार्क टँक इंडिया'चे सह-परीक्षक असलेले अमित जैन एकदा गंमतीनं म्हणाले होते की, नमिता 20 लाख रुपये किमतीचे शूज घालते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)