मुंबईचा भेंडीबाजार : इतिहास अन् वर्तमानाच्या सीमेवर उभा असलेला उर्दूचा प्रदेश, काय आहे नावाची गोष्ट?

नागपाड्याकडून भायखळ्याकडे जाणारा रस्ता आहे, मिर्झा गालिब रोड. या रस्त्यावर मंटो रहायचा. सआदत हसन मंटो.

मंटो हे ते नाव आहे ज्यानं केवळ उर्दू साहित्यात लाटा उठल्या असं नाही, पण त्याच्या शब्दांनी भाषेपलिकडे जाऊन सत्याची जाणीव करुन दिली. माणसाचं काय होऊ शकतं, त्याची कोरडी जाणीव. फाळणीचा अनुभव सीमेलगत राहणा-यांच्या आयुष्यांना अनेक पिढ्यांनंतरही चिकटला आहे.

मात्र सीमेपासून दूर राहणाऱ्यांच्या मनावर मंटोच्या शब्दांनी तो कोरला गेला. त्याचे शब्द त्या दु;खाचे वाहक बनले, ते आजपर्यंत.

मंटो पाकिस्तानात गेला आणि तिथंच त्याचा शेवटही झाला. पण त्याचं प्रेम मुंबईवर होतं. त्यांनी कधी स्वत:ला 'मी चालती फिरती मुंबई आहे' असं म्हटलं होतं, इतकं ते या शहराशी ते 1948 मध्ये सोडण्याअगोदर तो एकरुप झाला होता.

'अडेल्फी चेंबर्स', मंटोचं मुंबईतलं घर. भेंडीबाजारजवळच्या नागपाड्यातलं. "तो अगोदर कामाठीपु-याजवळ एका इमारतीत रहायचा. नंतर इथं या घरात आला. इथं तो जवळपास आठ वर्षं राहिला.

इस्मत चुगताई, अशोक कुमार सगळी मोठी नावं. इथंच ते मंटोला भेटायला यायचे," भेंडीबाजाराचा सांस्कृतिक इतिहास शोधणारे आणि तो नोंदवून ठेवणारे झुबेर आझमी सांगतात.

आझमींसोबत भेंडीबाजार आणि भोवतालचा नागपाडा, पायधुनी, डोंगरी असा हा सगळा भाग पायाखालून घालतांना इतिहासाचं एकेक पान गल्लोगल्ली उलगडत जातं.

एखाद्या पानावर मंटो असतो, पुढच्या पानावर साहीर. कुठे कैफी आझमी, तर कुठे जान निसार अख्तर.

पेशानं वकील असलेले झुबेर इथं या नागपाड्यातच लहानाचे मोठे झाले. पण कायद्याच्या भाषेपेक्षा उर्दूवर प्रेम अधिक. त्यामुळे अनेक अंगांसोबत उर्दूचाही एक इतिहास असलेल्या या भेंडीबाजारचा सांस्कृतिक इतिहास नोंदवणं हे त्यांचं आवडतं काम. इथं 'उर्दू मरकझ'ही त्यांनी मोठं केलं.

"यह भिंडी बाजार के मेल्टिंग पॉईंट है. यहां सब कम्युनिटीज रहती है. यहां पहले आए थे सूरती और दाऊदी बोहरा. जिन्होने इस एरिया को बनाया. तो फिर खोजा आए, मेमन्स आए. कोंकणी तो यहां के मूलनिवासी थे. नागपाडे मे मलबारी लोक आए. मगनपुरे मे उत्तर प्रदेश से लोक आए. अन्सारी बिरादरी आयी. तो यह सारे लोक आ कर भिंडी बजार मे यह गुलदस्ता सजाएं है. इनकी जुबान तो मुखतलिफ थी, मगर इनका कॉमन लिग्वां फैन्का था, वह उर्दू था," झुबेर आझमी सांगतात.

त्यामुळे अगोदर बहुतांशानं उर्दू आणि नंतर उर्दूमिश्रीत हिंदीचं भेंडीबाजार हे केंद्र बनलं. त्यामुळे अनेक लेखक, कवी, चित्रपटनिर्माते ज्यांनी आधुनिक हिंदी-उर्दू साहित्य आणि चित्रपटासारख्या माध्यमांना घडवलं, त्यातले अनेक या भेंडीबाजार भागात रहायचे त्यासाठीच.

आजही इथं फिरताना, बोलतांना जर कोणी बुजर्ग व्यक्ती भेटली आणि थोडा वेळ तुम्ही त्यांच्याशी बोलत राहिलात तर अनेकदा तुम्हाला जुन्या हिंदी चित्रपटात बोलल्या गेलेल्या भाषेचा लहेजा, शब्द त्यात कानावर पडतील. गुजराती, काठियावाडीही मध्येच कानावर पडेल.

अनेक बाजारांचा भेंडीबाजार

पण सगळ्यांना पहिला प्रश्न हाच पडतो की या भागाला 'भेंडीबाजार' असं का म्हणतात? त्याचा खरंच काही 'भेंडी' या भाजीशी काही संबंध आहे का? की तो कोणत्या शब्दाचा अपभ्रंश आहे? त्यामागे कोणती अख्यायिका आहे का? अजून एक प्रश्न म्हणजे, या सगळ्या गजबजलेल्या बाजारांच्या गल्ल्यांमध्ये नक्की भेंडीबाजार कोणता? त्याचा पसारा नेमका केवढा आहे?

"खरं सांगायचं तर भेंडीबाजार इथून सुरू होऊन इथे संपतो असं सांगता येण्यासारखा कोणता महानगरपालिकेनं आखून दिलेला भाग नाही. भेंडीबाजार एक कल्पना आहे, ती सांस्कृतिक आहे आणि गेल्या शे-दोनशे वर्षांमध्ये ती तयार होत गेली.

पण जर कोणत्या भागाला भेंडीबाजार म्हणता येईल असं जर मला विचारालात तर मी म्हणेन की क्रॉफर्ड मार्केट, इब्राहिम रहमतुल्ला रोड, भेंडीबाजार जंक्शन, जे जे जंक्शन, नागपाडा, मदनपुरा, डोंगरी आणि शेवटी मोमिनपुरा, म्हणजे जिथं बहुतांशी उर्दू बोलणारी मुस्लिम कम्युनिटी राहते, या भागाला भेंडीबाजार म्हणता येईल," झुबेर आझमी सांगतात.

"आता नावाबद्दल विचाराल तर बऱ्यांच वर्षांपूर्वी या भागात ओखरा म्हणजे भेंडीची शेतं होती. असे उल्लेख ब्रिटिशकालिन बॉम्बे गैझेट्समध्येही आहेत. त्यामुळेच याला भेंडीबाजार हे नाव पडलं," आझमी सांगतात.

"पण आम्ही बऱ्याचदा ऐकतो की इथं बाजार भरायचा आणि त्याच्या मागे, म्हणजे 'बिहाईंड द बाजार', वस्ती होत गेली. 'बिहाईंड द बाजार' चं बोलता बोलता अपभ्रंश होत होत 'भेंडीबाजार झालं, असं अनेक जण म्हणतात. ते खरं आहे का?," मी त्यांना विचारतो.

"काहींना तसं वाटत असेल, पण मला ते फारसं पटत नाही. ते केवळ शब्द एकमेकांसारखे वाटतात. अजून एक कारण असू शकतं. ते म्हणजे इथे जुना कुंभारवाडाही आहे. तिथं भांडी बनतात. त्या भांडीबाजाराचं पुढे भेंडीबाजार असंही झालेलं असू शकतं," झुबेर आझमी म्हणतात.

मुंबईची सर्वात दाट मुस्लिमबहुल वस्ती ही भेंडीबाजाराची मुख्य ओळख. गजबजलेले अनेक प्रकारचे बाजार इथं आहेत. एकेक गल्ली ही एकेक प्रकारचा बाजार. उदाहरणार्थ, 'शालिमार' हॉटेलच्या विरुद्ध दिशेला भेंडी बाजार जंक्शनला लागूनच असलेला बांगड्यांचा बाजार.

त्या गल्लीतून पुढे जायला लागलं की पुढे खजूर आणि ड्रायफूटसचा बाजार लागतो. त्यानंतर भांड्यांचा. मध्येच तुम्हाला एक गल्ली सगळी अत्तरांच्या दुकानांची भरलेली दिसेल. गर्दीसोबतच त्यांच्या जुना 'चार्म' हे बाजार अजूनही टिकवून आहेत.

उदाहरणार्थ प्रसिद्ध जुना बाजार. काहींसाठी तो 'चोर बाजार' म्हणूनही ओळखीचा असेल. "याला खरं तर 'शोर बाजार' म्हणायचे कारण शुक्रवारी जो रस्त्यावरचा बाजार भरतो, त्यात खूप आवाज असतो. विकणा-यांचा, विक्रेत्यांच्या.

त्या आवाजामुळे याला इथले लोक 'शोर बाजार' म्हणायला लागले. त्याचं पुढे चोर बाजार झालं. बाकी दुसरं काही कारण नाही," या बाजारात 119 वर्षांपासून सुरू असणारं जुन्या फर्निचरचं दुकान चालवणारे फरहान फर्निचरवाला आम्हाला सांगतात.

मटन रोडवरच्या जुन्या बाजारात फिरतांना जणू एका जुन्या वस्तूंच्या संग्रहालयात फिरतो आहोत असं वाटतं. जादूनगरीच एखादी. इथं चित्रं आहेत, जुने टेलिफोन्स आहेत, रेडिओ-ट्रान्झिस्टर्स आहेत, तबकड्यांच्या रेकॉर्ड्स आहेत, कैसेट प्लेयर्स आहेत, भांडी आहेत, बाटल्या आहेत, दागिने आहेत, काय काय आहे. यादी कधी पूर्ण होणारच नाही.

परदेशातून मुंबई पहायला येणा-या पर्यटकांना बाकी काही माहिती नसलं तरीही हा बाजार माहिती असतोच. इथं फिरतांना अनेक परदेशी पर्यटक दिवसाच्या कोणत्याही काळात दिसतात.

इतिहासाच्या पानांमध्ये

प्रंचड गोंगाट आणि अनेक ठिकाणी उभंही राहण्यासाठी अडचण वाटावी अशी गर्दी, पण अशा भेंडीबाजारात प्रत्येक रस्त्यांवर काही ना काही इतिहासातचं रंजक आहे.

काही ठिकाणी असं वाटतं की इथं काळ जणू पुढे सरकलाच नाही आहे. तो मागे कुठे तरी शंभरएक वर्षांपूर्वीच्या दिवसांमध्ये अडकला आहे.

तुम्ही एखाद्या जुन्या 'बहु मंजिला' इमारतीसमोर उभे असता. असं आर्किटेक्चर आज होत नाही. पण ती इमारत काळाच्या मागे घेऊन जाते.

भेंडी बाजार जंक्शनपासून 'उर्दू मरकझ' चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक अजून चिंचोळी गल्ली आहे. छोटी छोटी दुकानं एकमेकांना लागून उभी आहेत. अत्यंत घाईत असलेली गर्दी रस्त्यांवरुन पाण्याच्या प्रवाहासारखी धावते आहे.

किती आणि कोणत्या प्रकारचे आवाज कुठून येत आहेत याची तर काही मोजदादच नाही. या एका प्रकारे 'फास्ट फॉर्वरर्ड' टेप सुरु असावी अशा प्रकारे चाललेल्या हालचालींमध्येच एक सुरेख इमारत स्थितप्रज्ञासारखी उभी आहे.

डोळ्याला तिच्यावरच्या टाईल्सच्या रंगीबेरंगी डिझाईन्सवरुनच काही वेगळं जाणवतं. मग थोड्या वेळानं अंदाज येतो की ते एका मशिदीचं प्रवेशद्वार आहे. बाजूला दोन उंच मिनार आहेत.

या मशिदीच्या बाजूनं एक छोटा रस्ता तिच्या आत घेऊन जातो. आणि आत गेल्यावर जणू असं होतं की, एक तर काळाचा कोणता तरी पडदा बाजूला सारुन आपण कोणत्या दुस-यात काळात गेलो आहोत किंवा आपण मध्यपूर्वेतल्या कोणत्या तरी इमारतीत गेलो आहोत.

अशा प्रकारची बांधणी या इमारतीची आहे. हिला 'मुघल मस्जिद' असं इथं म्हटलं जातं.

मध्ये एक विस्तीर्ण तलाव आहे. कोणाला बाहेरच्या गर्दीतून कल्पनाही येणार नाही की इथं असंही काही असू शकतं. त्या तलावाच्या दुस-या बाजूला अनेक वर्षं जुनी वाटावी अशी प्रार्थना करण्याची, नमाज अदा करण्याची इमारत आहे. तिची रचना भारतात बहुतांशानं दिसतात अशा स्थळांसारखी नाही. तुम्ही मधपूर्वेत गेलात तर अशा प्रकारच्या इमारती दिसतील.

"बहुतांश लोक आता तिला सामान्यपणे मुघल मस्जिद असं म्हणतात. पण तिचं नाव 'मस्जिद-ए-इरानियान' असंही आहे. जे 19 व्या शतकाच्या सुरुवातीला ईराणमधून मुंबईत आलेले आणि इथं स्थायिक झालेले व्यापारी होते, त्यांनी ही इमारत बांधली आहे.

मोठ्या जहाजांच्या व्यवसायात असणाऱ्या व्यापाऱ्यांनी ही शंभर वर्षांहूनही जास्त काळापूर्वी ही इमारत तयार केली," झुबेर आझमी सांगतात.

बऱ्याचदा जे जे फ्लायोव्हरवरुन भायखळा सोडून आपण थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या जवळ उतरतो. त्याखालून हा भेंडीबाजार मागे पडत असतांना त्यात काय काय दडलं आहे हे लक्षात येत नाही.

याच फ्लायोव्हरच्या खाली भेंडी बाजार जंक्शनजवळ एका जुन्या इमारतीत एक 104 वर्षं जुनं पुस्तकांचं दुकान आहे. नाव आहे 'मकतबा जामिया'.

हे पुस्तकांचं दुकान म्हणजे उर्दू साहित्य परंपरेतलं एक महत्वाचं ठिकाण आहे. आत गेलात की मिझा गालिबपासून, साहिर लुधियानवी, परवीन शाकिर आणि अशा कैक शायरांच्या तसबिरी या पुस्तकांच्या संग्रहात दिसतात. भेंडी बाजार परिसरात राहणाऱ्या या सगळ्या उर्दू साहित्यिकांचा या दुकानात कायम राबता असायचा.

"1922 साली हे पुस्तकाचं दुकान सुरु झालं. अनेक कवी, लेखक, जाणकार हे स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी होते त्यांचा हा अड्डा झाला. 'प्रोग्रसिव्ह रायटर्स असोसिएशन'मधले सगळे पुरोगामी (तरक्कीपसंद) लोकांच्या चळवळीचं हे केंद्र बनलं. त्यात अली सरदार जाफरी होते, मजरुह सुलतानपुरी होते, कैफी आझमी होते.

उर्दूशी संबंधित कोणत्याही चळवळीशी जोडलेले सगळे इथं यायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या आणि त्यातून नवनव्या कल्पना जन्म घ्यायच्या," मुंबईतले ज्येष्ठ उर्दू पत्रकार शकील रशिद या दुकानात बसून आम्हाला सांगतात.

काळानुसार बदलतो आहे भेंडीबाजार

एका बाजूला इतिहासात, त्यातल्या सांस्कृतिक,साहित्यिक आणि व्यावसायिक विविधतेत पाय असणारा असा हा भेंडीबाजार काळानुसार मात्र कात टाकतो आहे.

गजबजाटाचा, गर्दीचा, जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या भेंडीबाजार आता इतर बहुतांश मुंबईसारखाच पुनर्विकासाच्या रस्त्याकडे जाऊ लागला आहे.

भेंडीबाजार पुर्नविकास प्रकल्प हा तसा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. त्याविषयी सरकारी पातळीवरही अनेकदा चर्चा झाल्या. काही विकासकांनी त्यात रसही दाखवला. पण हा एवढा गुंतागुंतीचा विषय आहे की तो गुंता सोडवणं अवघड होतं आणि आजही आहे.

अनेक जुन्या इमारती आहेत. विशेषत: पावसाळ्यात या जुन्या इमारती कोसळतात. अपघात होतात. त्यात असंख्य भाडेकरु आहेत, अनेक कोर्टातले दावे आहेत, मालकीचे वाद आहेत. त्यामुळे भेंडीबाजारात पुनर्विकास हा अवघड प्रश्न होता.

पण 2008 मध्ये महाराष्ट्र सरकारनं क्लस्टर डेव्हलपमेंट धोरण आणलं आणि मग काही बदलू लागलं. सगळा भेंडीबाजार नव्हे, पण इथल्या मध्यभागातल्या साडेसोळा एकर जागेवर एका ट्रस्टनं घेतलेल्या पुढाकारामुळे पहिला पुनर्विकास प्रकल्प सुरु झाला.

या भागात जवळपास 70 टक्क्यांहूनही अधिक लोकसंख्या ही दाऊदी बोहरा समुदायाची आहे. त्यांचे धर्मगुरु 52 वे दाई अल-मुतलक सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी पुढाकार घेतल्यानं 'सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट' स्थापन झाला.

2009 साली सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट -SBUT-ने हा पुनर्विकास प्रकल्प जाहीर केला. जवळपास 3200 कुटुंबांशी संबंधित हा प्रकल्प आहे. मोडकळीस आलेल्या 250 हून अधिक इमारती, अरुंद रस्ते, पार्किंगची शून्य सोय अशा स्थितीतून 16.5 एकर जमिनीवर पसरलेल्या या परिसरात नव्या गगनचुंबी इमारती सध्या उभ्या राहत असलेल्या दिसतात. या सगळ्यात 1250 दुकानदारही होते.

ट्रस्टनं सगळ्यांना या प्रकल्पात सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले. जे वर्षानुवर्षे भाडेकरू म्हणून राहत होते, ते आता मालक होणार होते. किमान 375 चौ. फूट कार्पेट एरियाचं स्वतःचं घर प्रत्येकाला मिळणार होतं.

"इथं जी जुनी घरं होती ती अत्यंत लहान होती. 150-200 स्क्वेअर फुटांची ही घरं होती. समजा एका कुटुंबात पाच जण असतील तर ते एवढ्या घरात राहतील कसे? आणि हे सगळे पागडी पद्धतीतले भाडेकरु होते.

अनेक इमारती मोडकळीला आल्या होत्या. 'म्हाडा'नं त्यांना आधार देऊन कसंबसं उभं ठेवलं होतं कारण भाडेकरुंना बाहेर काढणं मालकांना शक्य होत नव्हतं.

त्यामुळं सय्यदनांची इच्छा होती की हा गुंता सुटून सगळ्यांना उत्तम घरं मिळावीत. आता आमचं काम वेगात पूर्ण होतं आहे," कुतुब मांडवीवला, SBUT प्रकल्पाचे मुख्य आर्किटेक्ट आम्हाला सांगतात.

2019 मध्ये पहिला टप्पा 'अल-सआदह' पूर्ण झाला. त्यानंतर 2025 मध्ये दुसऱ्या टप्प्यात 53 मजली 'अल-एज टॉवर्स'मध्ये 1200 हून अधिक कुटुंबांना नवीन घरे मिळाली. त्या जागी जिथे एकेकाळी 23 धोकादायक इमारती उभ्या होत्या.

त्यातल्या एका गलाबाई चाळीत मंदसौरवाला कुटुंब रहायचं. जेव्हा आम्ही या प्रकल्पाला भेट देतो तेव्हा हे चार जणांचं कुटुंब नवं घर बघायला तिथं आलं होतं. त्यांच्या नव्या घराचं फर्निचरचं काम सुरु होतं.

गजबजाटाच्या, दाटीवाटीच्या या भेंडीबाजारात मधोमध उभ्या असलेले हे नवे टॉवर्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.

अजूनही काही क्लस्टर डेव्हलपमेंट धोरणात इथले पुनर्विकास प्रकल्प होणार आहे अशी चर्चा आहे. या सगळ्या पुनर्विकासाकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत.

"या टॉवर्सकडे बघितल्यावर मला असं वाटतं की भेंडीबाजारच्या मधोमध नवी दुबई राहते आहे. तिथं असे उंच टॉवर्स आहेत," वरिष्ठ पत्रकार आणि लेखक सईद हमीद सांगतात.

"जे होतं आहे ते चांगलं आहे. पण अजून एक दुसरा भेंडी बाजार आहे आणि तो एसबीयूटीच्या (SBUT) बाहेर आहे, जिथे संघटित पुनर्विकास होत नाहीये. इतर प्रत्येक वस्तीत एक बिल्डर उंच इमारत बांधत आहे.

नियोजित पुनर्विकास आणि वैयक्तिक पुनर्विकास यात फरक आहे. त्याचा परिणामही चांगले नाहीत. ज्या अनेक रस्त्यांवर टॉवर्स उभे राहिले आहेत, तिथे पार्किंग नाही. रस्त्यावर चालायला जागा नाही," हमीद सांगतात.

"एक नवा उभा भेंडी बाजार उभा राहिला आहे. जेव्हा आडवा पसरलेला भेंडी बाजार होता, तेव्हा तिथे संस्कृती होती. इथे उर्दू बाजार होता, तिथे संस्कृती होती, पण आता या उभ्या भेंडी बाजारमध्ये ते नाहीसे झाले आहे.

ही प्रक्रिया खरं तर अगोदरच सुरू झाली होती. आता तिला अधिक गती मिळाली आहे," हमीद पुढे सांगतात.

काळाच्या कसोटीवर काय टिकणार आणि काय संपणार, या प्रश्नामध्ये सध्याचा बदलता भेंडीबाजार अडकला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)