गल्लीबोळातली परिस्थिती दाखवल्यानं माझ्यावर FIR, मुक्त पत्रकार मुक्ता कदम यांच्याबाबत काय घडलं?

  • वाचन वेळ: 4 मिनिटे

महाराष्ट्रात जानेवारीत महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्या काळात मुक्त पत्रकार मुक्ता कदम यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून FIR नोंदवण्यात आली.

मुक्ता कदम यांनी नांदेड शहरातील पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता, शिक्षण समस्या या विषयांवर सोशल मीडियच्या माध्यमातून वृत्तांकन केले.

तसंच, निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी फेसबुकवर काही सोशल मीडिया पोस्ट केल्या. त्या पोस्टवर निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करणाऱ्या नोडल अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत मुक्ता कदम यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली.

ही तक्रार नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रशांत लोंढे यांनी बीबीसीशी बोलताना अशी तक्रार नोंद झाल्याचं सांगितलं. तसंच, मुक्ता कदम यांना नोटीस बजावण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

"मुक्ता कदम यांच्याविषयीची तक्रार आम्ही सायबर विभागाकडे पाठवली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. येत्या काळात हा तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल केली जाईल आणि ती न्यायालयात मांडली जाईल," असं लोंढे म्हणाले.

दरम्यान, ही तक्रार केवळ माझा आवाज दाबण्यासाठी आणि भीती दाखवण्यासाठी केली असल्याचं मुक्ता कदम यांनी म्हटलं आहे.

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना कदम म्हणाल्या, "मी कोणत्याही पक्षाची पदाधिकारी नाही किंवा कार्यकर्ती नाही. त्यामुळे मला वाटतं मी कोणतीही चूक केलेली नाही. मी नांदेड शहरातील नागरी समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्या. नांदेडच्या गल्लीबोळातील परिस्थिती मी दाखवली. त्यामुळेच माझ्याविरोधात अशी तक्रार देण्यात आली असावी."

पण माझा देशाच्या संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी यापुढील कायदेशीर लढाई लढायला तयार आहे."

मुक्ता कदम या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक आदिवासी बहुल गावातील आहेत. तर सध्या त्या पुण्यात राहतात. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान, त्यांनी यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. तेव्हापासून त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वतंत्रपणे रिपोर्ट्स आणि भाष्य करत आहेत.

देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे.

यामध्ये मतदानाच्या 48 तास आधी सर्व पक्ष आणि नेत्यांवर प्रचारबंदी घालण्यात येते.

एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे.

पण राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीवर याबाबत काय कारवाई होऊ शकते, याविषयी अधिक स्पष्टता नाहीये.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झालं.

तर 14 आणि 15 जानेवारी रोजी मुक्ता कदम यांनी फेसबुकवरून पक्षाचं नाव घेत सोशल मीडिया पोस्ट केल्या. त्यावर स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याने आक्षेप नोंदवत कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन नोडल अधिकारी दत्ता गायकवाड यांना दिले होते.

त्यानंतर शहरातील वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये कदम यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

यामध्ये BNS 175, BNS 223, BNS 353 (2) ही कलमे लावण्यात आली आहेत.

दरम्यान, नोडल अधिकारी दत्ता गायकवाड यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला असता ते म्हणाले, "मुक्ता कदम यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही ही तक्रार दाखल केली. पण नोडल अधिकारी म्हणून माझी जबाबदारी तात्पुरतीच होती. सध्या याबाबत माझ्याकडे अधिक माहिती नाही."

दुसरीकडे, मुक्ता कदम यांच्या विरोधातील पोलीस तक्रार ही राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या काळात मुक्ता कदम यांनी आपल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून नांदेडमधील सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर टीका केली. त्यामुळेच त्यांना नांदेड जिल्ह्यातील पोलिसांकडून आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांत चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर या आचारसंहितेच्या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

यात राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिली आहे, तसंच प्रचारसभा, मिरवणुका, रॅली काढण्याविषयी नियम आणि अटी दिलेल्या आहेत.

मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा, मतदान केंद्रावर काय करता येतं आणि काय नाही, निवडणुकांदरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी, अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेत समावेश आहे.

परंतु, मुक्ता कदम यांच्या मते, आपण कोणत्याही पक्षासोबत काय करत नाही किंवा कोणत्याही पक्षाची पदाधिकारी नाही. तरीही माझ्यावर ही कारवाई का?

तर दुसरीकडे ही तक्रार कदाचित स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेचा खोलवर अभ्यास न करता करण्यात आली असावी, अशी शंका वकील ॲड. असीम सरोद यांनी व्यक्त केली.

ॲड. सरोदे म्हणाले, "मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष अडथळा निर्माण करणे, निवडणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करणे किंवा बेकायदेशीर गोष्टी करताना रंगेहाथ पकडल्यावर आचारसंहितेचं उल्लंघन समजून पोलीस कारवाई होऊ शकते. पण मुक्ता कदम यांच्या कृत्यातून अशी एकही गोष्ट घडली नाही. त्यामुळे मला ही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे दाखल केली आहे, असं वाटतं."

मुक्ता कदम या निर्भीड पत्रकार आहेत. त्यांनी नांदेडमधील नागरी समस्या जनतेसमोर मांडल्या. त्यामुळे राजकीय हेतूने ही कारवाई झाल्याचं दिसतं. सत्ताधाऱ्यांना बोचणारे प्रश्न विचारल्याने पोलिसांचा गैरवापर करून या गोष्टी झाल्या असल्याचं सरोदे यांना वाटतं.

ही FIR रद्द करण्यासाठी आपण ॲड. मुक्ता कदम यांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही सरोदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)