इराण युद्धाबाबत ट्रम्प यांचा आणखी एक दावा, पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?

फोटो स्रोत, Chip Somodevilla/Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (26 मार्च) रात्री इराणला एक नवीन मुदत दिल्याचा दावा केला. ते म्हणाले की, इराणच्या ऊर्जा केंद्रांवर "आता 10 दिवसांपर्यंत कोणतेही हल्ले होणार नाहीत."
याआधी त्यांनी सोमवारी (23 मार्च) यासंदर्भात 5 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत आज (27 मार्च) संपते आहे.
ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत म्हटलं, "इराणच्या सरकारनं विनंती केल्यानंतर आम्ही त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले 10 दिवसांपर्यंत पुढे ढकलले आहेत. ही सूट 6 एप्रिल 2026 ला रात्री 8 वाजेपर्यंत लागू राहील."
इराणबरोबर चर्चा सुरू आहे, असा दावा त्यांनी केला. ट्रम्प यांनी म्हटलं, "फेक न्यूज मीडियातून केले जात असलेल्या दाव्यांच्या उलट आमची चर्चा खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे."
याआधी सोमवारीदेखील (23 मार्च) ट्रम्प यांनी दावा केला होता की, इराणबरोबर त्यांची चर्चा योग्य दिशेनं सुरू आहे.
अर्थात इराणनं मात्र हा दावा फेटाळला होता. तसेच चर्चा आमच्या अटींवर होईल, असंही म्हटलं.
इराणची 'भेट'
त्याआधी गुरुवारी (26 मार्च) रात्रीच (भारतीय प्रमाणवेळेनुसार) व्हाईट हाऊसमधील कॅबिनेट बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून मिळालेल्या एका 'भेटी'चा उल्लेख केला.
ते म्हणाले, "इराणमध्ये योग्य लोकांबरोबर आमची खूप चांगली चर्चा सुरू आहे. त्यांनी आम्हाला आणखी एक गिफ्ट दिलं आहे. इराणनं सांगितलं आहे की, तुमच्याबरोबरच्या चर्चेबाबत आम्ही गंभीर आहोत, हे दाखवण्यासाठी आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 8 मोठ्या जहाजांना जाण्याची परवानगी देत आहोत."
ट्रम्प म्हणाले की, नंतर त्यांना माहिती मिळाली की खरोखरंच 8 जहाजं, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेले. त्यांच्यावर पाकिस्तानचे झेंडे लावण्यात आलेले होते.
ते म्हणाले की, नंतर इराणनं त्यांना सांगितलं की, ते 'आणखी 2 जहाजांना परवानगी देत आहेत.'

फोटो स्रोत, Getty Images/Getty Images
त्याआधी बुधवारी (25 मार्च) इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, इराण मित्रराष्ट्रांसाठी होर्मझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला करतो आहे.
अराघची म्हणाले, "चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तानसारख्या मित्रराष्ट्रांसाठी आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करत आहोत."
मुंबईतील इराणचे कौन्सुलेट जनरल यांनी अराघची यांच्या या वक्तव्याची माहिती दिली आहे.
अमेरिका आणि इराणमधील चर्चेचा संभाव्य यजमान म्हणून पाकिस्तानचं नाव समोर आलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मंगळवारी (24 मार्च) संध्याकाळी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, "पाकिस्तान मध्य-पूर्वेत सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून करायच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देतो. जेणेकरून या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण होऊ शकेल."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शहबाज शरीफ यांचं वक्तव्यं ट्रूथ सोशलवरही शेअर केलं. त्यातून हा अंदाज बांधला जातो आहे की, कदाचित अमेरिकादेखील पाकिस्तानच्या मध्यस्थीद्वारे चर्चेसाठी तयार आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ घसरण
बीबीसीच्या न्यूयॉर्कमधील बिझनेस रिपोर्टर नॅटिली शेरमन यांच्यानुसार, इराणच्या ऊर्जा केंद्रांवरील हल्ला रोखण्याबाबत ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली.
अमेरिकेतील शेअर बाजार बंद झाल्यावर लगेचच ट्रम्प म्हणाले होते की, ते 6 एप्रिलपर्यंत इराणच्या ऊर्जा केंद्रांवरील हल्ले टाळतील.
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये संभाव्य तुटवड्याच्या चिंतेमुळे गुरुवारी (26 मार्च) कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट टाकल्यानंतर किमतीत पुन्हा घसरण झाली.
'ब्रेंट क्रूड फ्युचर्स' जवळपास 108 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर बंद झाला. मात्र ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जवळपास 1 तासानं त्यात जवळपास 1 डॉलरची घसरण पाहायला मिळाली.
मात्र गुरुवारी (26 मार्च) अमेरिकेतील शेअर बाजार पुन्हा घसरणीसह बंद झाले. कारण प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीनं युद्धाबाबत गुंतवणुकदारांची चिंता आणखी वाढवली.

फोटो स्रोत, Agoes Rudianto/Anadolu via Getty Images
दरम्यान, तंत्रज्ञान कंपन्यांचा मोठा भाग असलेल्या नॅसडॅक निर्देशांकात जवळपास 2.4 टक्क्यांची घसरण झाली. मेटा प्लॅटफॉर्मच्या शेअर्सच्या किमतीत झालेली मोठी घसरण हे या घसरणीमागचं एक कारण होतं. कारण अमेरिकेत ज्युरींचे लागोपाठ 2 निकाल कंपनीच्या विरोधात आले.
लॉस एंजेलिसमधील एका ज्युरींना सोशल मीडियाच्या व्यसनाशी संबंधित एका प्रकरणात मेटा आणि युट्युब दोषी आढळले. त्यामुळे त्यांनी 56.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई याचिका करणाऱ्यांना द्यावी, असा आदेश दिला होता.
अमेरिकेतील शेअर बाजार ऑक्टोबरमधील अलीकडच्या उच्चांकी पातळीवरून 11 टक्के खाली आहेत. बाजार औपचारिकपणे 'करेक्शन'च्या कक्षेत आले आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गुरुवारी (26 मार्च) कामकाजी सत्रात एस अँड पी 500 इंडेक्समध्ये 1.7 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांक 1 टक्का घसरण नोंदवत बंद झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





























