झोपेसाठी गोळ्या नव्हे, चॉकलेट? यामुळं खरंच झोपेचा दर्जा सुधारू शकतो का?

    • Author, मॅरीलू कोस्टा
    • Role, तंत्रज्ञान पत्रकार
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

तुम्ही कधी विचार केलाय का की फक्त एखादं चॉकलेट खाऊन सुद्धा मस्त झोप लागू शकते? ऐकायला थोडं नवल वाटतंय ना?

पण 'ॲलिस मशरूम्स' (Alice Mushrooms) नावाच्या एका ब्रँडने गेल्या 3 वर्षांत हे खरं करून दाखवलंय. त्यांच्या या हटके कल्पनेने सध्या अमेरिकेत चर्चा सुरू झाली आहे.

त्यांचं नाईटकॅप (Nightcap) नावाचं चॉकलेट इतकं लोकप्रिय झालंय की ते आता तिथल्या 2,000 पेक्षा जास्त स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. त्यात झोपेचा दर्जा सुधारतील असे अनेक इनग्रिडेंट्स असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे खास चॉकलेट 'ॲलिस मशरूम्स' च्या सह-संस्थापिका शार्लोट क्रूझ आणि लिंडसे गुडस्टीन यांनी मिळून तयार केलं आहे. त्यांच्या या 'नाईटकॅप' चॉकलेटमध्ये 'रिशी मशरूम्स' आणि 'कॅमोमाइल' चा वापर केला आहे. शांतता देणाऱ्या प्रभावासाठी ते ओळखले जातात.

एवढंच नाही, तर यात मॅग्नेशियम आणि झिंक देखील आहे, जे शरीरातील 'मेलाटोनिन' वाढवायला मदत करतात हे हार्मोन नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत करतात.

यात 'एल-थियनाइन' नावाचं एक विशेष अमिनो ॲसिड सुद्धा आहे, जे साधारणपणे ग्रीन-टी मध्ये आढळतं. शरीराला 'रिलॅक्स' करण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या शार्लोट क्रूझ म्हणतात, "आमच्या सर्व उत्पादनांमध्ये हे 'स्लीप चॉकलेट' बनवायला आम्हाला सर्वात जास्त वेळ लागला, कारण झोपेचा विषय खूप गुंतागुंतीचा असतो. लोकांची झोप का उडते, याची 10 लाख वेगवेगळी कारणं असू शकतात."

त्या पुढे सांगतात, "आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर्स, PhD संशोधक आणि प्रोफेशनल प्रॉडक्ट फॉर्म्युलेटर्स यांच्यासोबत मिळून काम केलं. आमचा उद्देश हाच होता की, झोपेच्या वेळेत कुठेही अडथळा येत असेल तर त्यावर हे चॉकलेट प्रभावी ठरावं."

शार्लोट क्रूझ आणि लिंडसे गुडस्टीन यांचा हा वाढता व्यवसाय सध्याच्या एका मोठ्या गरजेवर आधारलेला आहे ती म्हणजे शांत झोप. आजकाल चांगली झोप मिळावी यासाठी लोक नवनवीन उपाय शोधत आहेत आणि तिथेच या चॉकलेटची मागणी वाढतेय.

'स्लीपोपोलिस' नावाच्या एका कंपनीने 1,003 अमेरिकन लोकांवर एक सर्व्हे केला. त्यात असं दिसलं की, तब्बल 47% लोक झोप येण्यासाठी कशा ना कशाची मदत घेतात. विशेष म्हणजे आता लोक डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधांपेक्षा 'मेलाटोनिन' सारख्या नैसर्गिक पर्यायांना जास्त पसंती देत आहेत.

दुसरीकडे, ब्रिटनमध्ये अजूनही औषधांचा वापर जास्त होत असला, तरी तिथेही आता नैसर्गिक उपचारांची क्रेझ खूप वेगाने वाढतेय.

आयकीया (IKEA) च्या 2025 च्या एका रिपोर्टनुसार, शांत झोप मिळवण्याच्या बाबतीत अमेरिका आणि ब्रिटनची अवस्था सध्या खूपच वाईट आहे. जगातील शेवटच्या 10 देशांमध्ये त्यांचा नंबर लागतो.

अशा वेळी 'ॲलिस मशरूम्स' सारखे ब्रँड्स एक नवीन ट्रेंड घेऊन आले आहेत. हा निव्वळ 'खाऊ' नाही, तर ते औषधी गुणधर्म आणि चविष्ट स्नॅक्स यांचं एक भारी कॉम्बिनेशन आहेत.

शार्लोट क्रूझ खूप छान मुद्दा मांडतात, त्या म्हणतात, "झोप येण्यासाठी एखादी गोळी किंवा कॅप्सूल घेणं म्हणजे आपण आजारी असल्यासारखं वाटतं पण तेच जर एखादं छान चॉकलेट खाऊन झोप येणार असेल तर छान वाटतं.

आता तुम्हाला समजलं असेलच की, या 'स्लीप ट्रीट्स' म्हणजेच झोप देणाऱ्या पदार्थांची एवढी क्रेझ का वाढतेय. म्हणूनच आता मार्केटमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे.

'ॲलिस मशरूम्स' ला टक्कर द्यायला आता इतरही अनेक ब्रँड्स मैदानात उतरले आहेत. जसं की, 'गुडनाईट' चं डार्क चॉकलेट ज्यामध्ये 'एल-थियनाइन' आणि 'मेलाटोनिन' आहे. तसेच 'लगून' चे 'नाईट बाईट्स' आहेत ज्यात 'मॅग्नेशियम' चं कॉम्बिनेशन वापरलंय. तर 'गुड डे चॉकलेट' कडे 'काम' (Calm) नावाची एक अख्खी रेंजच उपलब्ध आहे.

आजकाल फक्त चॉकलेटच नाही तर रबरसारख्या चघळण्याच्या गोळ्या ज्याला आपण गमीज ही म्हणतो आणि पेयांमध्ये सुद्धा 'रिशी मशरूम्स' चा वापर सर्रास होतोय. या सगळ्याचा एकच उद्देश आहे लोकांना रिलॅक्स करणं आणि त्यांना शांत झोप मिळवून देणं.

यामागे काही ठोस विज्ञान आहे का?

मॅग्नेशियम आणि मेलाटोनिन यांचे झोपेसाठी होणारे दीर्घकालीन फायदे विज्ञानाने सिद्ध केले आहेत यात शंका नाही.

पण जेव्हा कॅमोमाइल सारख्या घटकांचा विषय येतो तेव्हा त्याचे फायदे फक्त काही काळापुरतेच मर्यादित असल्याचं दिसतं.

अनेकदा तर हे पदार्थ खाल्ल्यामुळे झोप येईल या केवळ मानसिक विचारानेच (ज्याला 'प्लासिबो इफेक्ट' म्हणतात) लोकांना झोप लागते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटनमध्ये मेलाटोनिन हे सर्रास मिळत नाही, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मिळतात.

तिथे झोपेच्या समस्या दूर करण्यासाठी ठराविक काळापुरतंच कृत्रिम मेलाटोनिन लिहून दिलं जातं.

'रिशी मशरूम्स'

रिशी मशरुम्सचा जरी आशियाई संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून औषधी वापर होत असला तरी आधुनिक विज्ञानाकडे अजूनही याचे खूप ठोस पुरावे नाहीत. यावर झालेले शोध अजूनही खूप मर्यादित आहेत.

'एल-थियनाइन' बद्दल सांगायचं तर तज्ज्ञांमध्ये अजूनही थोडा संभ्रम आहे. जपानमध्ये 1960 पासून याचा वापर अन्नामध्ये केला जातोय कारण तिथे ग्रीन-टी आणि माचा (Matcha) पिण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. यामुळेच लोकांना यावर खूप विश्वास आहे.

अमेरिकेच्या 'एफडीए' ने 2005 मध्ये 'एल-थियनाइन' ला खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यासाठी परवानगी दिली. पण युरोप आणि ब्रिटनमध्ये मात्र याचे नियम थोडे गुंतागुंतीचे आहेत.

एल-थियनाइन' (L-theanine) बद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ते नैसर्गिकरित्या ग्रीन-टी मधून काढलेलं असेल तर त्याला परवानगी आहे. पण ते जर लॅबमध्ये कृत्रिमरित्या बनवलं असेल तर त्याला मात्र बंदी आहे.

आतापर्यंतच्या संशोधनानुसार झोपेवर याचा होणारा परिणाम खूपच कमी दिसून आला आहे. म्हणूनच 'बीबीसी' ने ज्या तज्ज्ञांशी चर्चा केली त्यांनी हे पदार्थ वापरताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

प्रोफेसर स्टर्न्स यावर सांगतात, "चॉकलेट किंवा स्नॅक बार सारख्या गोष्टींतून जेव्हा आपण 'एल-थियनाइन' घेतो तेव्हा झोपेवर त्याचा नेमका काय आणि किती फायदा होतो याचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हे चॉकलेट खाल्ल्यावर लगेच काहीतरी मोठी जादू होईल किंवा झोपेचा कायापालट होईल अशी अपेक्षा करू नका."

प्रोफेसर स्टर्न्स या युनिव्हर्सिटीच्या 'फॅक्ट्स' (FACCTS) लॅबच्या डायरेक्टर आहेत. तिथे प्रामुख्याने झोपेशी संबंधित विषयांवरच सखोल संशोधन केलं जातं.

दुसरीकडे, न्यूयॉर्कमधील बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी (Binghamton University) च्या रिसर्च असिस्टंट प्रोफेसर लिना बेगडाचे आहेत ज्या आहार, मनस्थिती आणि झोप यांच्यातील संबंधावर अभ्यास करतात.

त्यांनी एका महत्त्वाच्या धोक्याबद्दल सावध केलं आहे. तो म्हणजे 'डोस स्टॅकिंग' (Dose Stacking). याचा अर्थ असा की, जेव्हा आपण झोप येण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतो, तेव्हा नकळतपणे त्यातील 'एल-थियनाइन' (L-theanine) सारखे घटक आपल्या शरीरात प्रमाणाबाहेर जाऊ शकतात.

कारण हे घटक आता अनेक प्रकारच्या पदार्थांत वापरले जात आहेत.

प्रोफेसर बेगडाचे सल्ला देतात की, "अशा प्रकारे वाढीव पोषक घटक असलेल्या पदार्थांचं सतत सेवन केल्याने मानवी वागणुकीवर किंवा मेंदूवर दीर्घकाळात काय परिणाम होतात याचे अजून पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. म्हणूनच हे पदार्थ मर्यादित स्वरूपात खाणं, त्यावरील लेबल नीट वाचणं आणि दिवसभरात आपण एकूण किती प्रमाणात हे घटक घेतोय याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे."

झोपेशी संबंधित विषयातील सल्लागार डॉ. कॅट लेडरले यांनी सुद्धा याच गोष्टींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते एक मोठी समस्या म्हणजे यातील वेगवेगळ्या घटकांना शरीरावर परिणाम करण्यासाठी लागणारा वेगळा वेळ.

उदाहरणार्थ, 'मेलाटोनिन' हे झोपण्यापूर्वी साधारण 2 तास आधी घ्यायला हवं. पण 'ॲलिस मशरूम्स' सारखा ब्रँड असा दावा करतो की त्यांच्या 'नाईटकॅप' चॉकलेटचा परिणाम ते खाल्ल्यानंतर फक्त 15 ते 45 मिनिटांतच जाणवू लागतो. हे कसं शक्य आहे असा प्रश्न डॉ. लेडरले विचारतात.

त्यासोबतच, 'एल-थियनाइन' सारखे घटक जेव्हा चॉकलेटसारख्या खाद्यपदार्थात मिसळले जातात तेव्हा त्यातील साखर, फॅट्स (चरबी) आणि प्रोटीनमुळे त्यांच्या मूळ गुणधर्मांवर काय परिणाम होतो याबद्दलही त्यांनी शंका व्यक्त केली आहे.

डॉ. लेडरले म्हणतात, "मला तर वाटतं या चॉकलेट्सबद्दल केले जाणारे दावे थोडे वेळेआधीच केलेले आहेत. हे नेमके किती प्रमाणात घ्यावेत कोणासाठी जास्त फायदेशीर आहेत आणि त्यांचं मिश्रण कसं असावं यावर अजून खूप संशोधनाची गरज आहे."

त्यांनी अजून एक मोलाचा मुद्दा मांडला आहे जेव्हा लोक चॉकलेट, गमीज किंवा ड्रिंक्सच्या रूपात असे 'शॉर्टकट' शोधतात तेव्हा ते झोप न येण्यामागचं खरं कारण शोधणं विसरून जातात. म्हणजे आपण नेमकं का झोपू शकत नाही? या मूळ समस्येकडे आपलं दुर्लक्ष होतं.

'ॲलिस मशरूम्स' च्या शार्लोट क्रूझ सुद्धा या गोष्टीशी सहमत आहेत. त्या सांगतात, "तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये डोकं घालून सोशल मीडिया वर स्क्रोल करत बसलात तर तुम्ही आमची 4 चॉकलेट्स खाल्ली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

आमिर मौसावी हे आधी शेफ होते पण आता ते 'गुड फूड स्टुडिओ' मध्ये फूड कन्सल्टंट म्हणून काम करतात. हा स्टुडिओ नवीन खाद्यपदार्थ विकसित करणाऱ्या उद्योजकांना मदत करतो.

प्रसिद्ध फिटनेस कोच जो विक्स यांच्या 'किलर' प्रोटीन बारमागे आमिर मौसावी यांचीच संकल्पना होती. खरं तर, बाजारात मिळणाऱ्या 'हेल्थ प्रॉडक्ट्स'मध्ये किती मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेली असते याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा एक मार्केटिंग स्टंट म्हणून तयार केला होता.

सध्या मौसावी अनेक नवीन 'फंक्शनल फूड' ब्रँड्सवर काम करत आहेत. जरी त्यांनी या ब्रँड्सची नावं अजून गुपित ठेवली असली तरी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की सध्या लोकांमध्ये 'बायोहॅकिंग' ची क्रेझ खूप वाढतेय. म्हणजे लोक आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता सुधारण्यासाठी नवनवीन वैज्ञानिक मार्गांचा वापर करत आहेत आणि त्यामुळेच अशा उत्पादनांची मागणी वाढत आहे.

मौसावी स्वतः अनेक सप्लिमेंट्स घेतात. स्नायूंच्या मजबुतीसाठी 'क्रिएटीन', एकाग्रता वाढवण्यासाठी 'लायन्स मेन मशरूम्स', ताण कमी करण्यासाठी 'अश्वगंधा' आणि संध्याकाळी रिलॅक्स होण्यासाठी 'रिशी मशरूम्स' याचा त्यात समावेश आहे.

गेल्या वर्षी जेव्हा ते खूप मानसिक तणावात होते, तेव्हा त्यांनी झोप लागण्यासाठी 'एल-थियनाइन' चा आधार घेतला होता.

इतकंच नाही, तर त्यांनी चक्क एका AI वर चालणाऱ्या बेड कव्हरमध्ये पैसे गुंतवले आहेत. हे कव्हर तुमच्या शरीराच्या तापमानानुसार आपोआप गरम किंवा थंड होतं. चांगल्या झोपेसाठी हे कव्हर म्हणजे 'वरदान' आहे, असं ते सांगतात.

मौसावी म्हणतात की, "सध्या आपण सगळेच 'बायोहॅकिंग' करण्याच्या मागे लागलो आहोत. खरं तर मानवी स्वभावच असा आहे आपल्याला नेहमी गोष्टी सोप्या करण्यासाठी 'शॉर्टकट' हवे असतात."

ते पुढे म्हणतात, "लोकांना नवनवीन प्रयोग करायला खूप आवडतं. जरी त्या गोष्टींचे वैज्ञानिक पुरावे अजून सुरुवातीच्या टप्प्यात असले, तरी लोक ते ट्राय करायला एका पायावर तयार असतात."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.