काँग्रेस भवनसमोर भाजपचं आंदोलन, कार्यकर्ते जखमी, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या वक्तव्याचा वाद काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमधील दगडफेकीपर्यंत पोहोचला.
सपकाळांच्या वक्तव्यानंतर रविवारी 15 फेब्रुवारीला पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवन परिसरात आंदोलन केलं. भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही मैदानात उतरले.
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून समोरासमोर दगडफेक झाल्याचा आरोप केला जात आहे.
दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्या असून, एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्याला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाला.
या दगडफेकीत तीन काँग्रेस कार्यकर्ते, 2 भाजप कार्यकर्ते, 2 महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि 2 पत्रकार जखमी झाल्याची माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






