महाराष्ट्र अनलॉक : लॉकडाऊन हटवण्यासाठी राज्य सरकारची पाच स्तरात योजना

वाचन वेळ: 5 मिनिटे

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 'अनलॉक' करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलली आहेत. 'मिशन बिगीन अगेन'साठी सरकारने नियमावली जाहीर केलीय.

जनजीवन सुरळीत करतानाच कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान महाराष्ट्र सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारनं पाच स्तरात (Levels) जिल्ह्यांची विभागणी केलीय आणि या स्तरांनिहाय नियम बनवले आहेत.

हे पाच स्तर काय आहेत, ते बनवण्यासाठी काय नियम वापरलेत आणि कुठल्यात स्तरात राज्यातील कुठेल जिल्हे येतात, या सर्व गोष्टी आपण एक एक करून सविस्तर जाणून घेऊया.

पुण्यात निर्बंध कायम राहतील - दिलीप वळसे पाटील

पुण्यातील शाळा, महाविद्यालयं 15 जुलै 2021 पर्यंत बद राहतील, बाकी आहे तेच निर्बंध कायम राहतील, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.

पुण्यात लसीकरण चांगले सुरू असल्याचेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

"तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. तयारी सुरू आहे. नागरिकांनीही जबाबदारी घेतली पाहिजे. नागरिकांनी अनावश्यकरित्या बाहेर पडू नये," असं वळसे पाटील म्हणाले.

तसंच, "डेल्टा प्लस विषाणू अधिक घातक आहे. म्युकोरमायकोसिस आणि डेल्टा प्लसबाबत नागरिकांनी काळजी घेणं गरजेच आहे. लग्नामध्ये वाढणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. पोलिसांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत," असं ते म्हणाले.

पुणे ग्रामीण भागातही शिथिलता नाही, असंही वळसे पाटलांनी सांगितलं.

पुणे मनपाने 19 जून रोजी केलेले बदल :

पुण्यात विकेंड लॉकडाऊन पुढच्या आठवड्यात देखील असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. परिस्थिती सुधारली तर त्याचा विचार केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बाहेरच्या जिल्ह्यात जास्त लोक गेले तर त्यांना विलगीकरणात ठेवावं लागेल, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

पुणे महापालिकेने 5 जून 2021 रोजी ब्रेक द चेनअंतर्गत लागू केलेल्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. हे नवीन बदल पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत.

1. अत्यावश्यक सेवेतील दुकानं आठवड्यातील सर्व दिवस संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2. अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर सर्व दुकानं, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे सर्व शनिवार आणि रविवारी बंद राहतील.

3. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे शनिवार आणि रविवार फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहतील.

4. कृषी संबंधित दुकानं आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना, तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची विक्री करणारी दुकानं, गाळे आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील.

5. पुणे महापालिकेचे हे आदेश पुणे कटक मंडळ आणि खडकी कटक मंडळ यांनाही लागू होतील.

राज्य सरकारने कोरोना पॅाझिटिव्हिटी दरानुसार पाच स्तर तयार केले आहेत -

  • पहिला स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतील.
  • दुसरा स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांपर्यंत भरलेले असतील.
  • तिसरा स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
  • चौथा स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 10-20 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
  • पाचवा स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असतील आणि ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
  • आता आपण पाहू की, या स्तरानुसार काय नियम आहेत. मग शेवटी कुठल्या स्तरात कुठला जिल्हा येतो, ते पाहू.

पहिल्या स्तरासाठी हे नियम :

  • सर्व प्रकारची (अत्यावश्यक सेवेतील आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली) दुकानं नियमितपणे सुरू राहतील.
  • मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह इत्यादी नियमतपणे सुरू राहतील
  • रेस्टॉरंट नियमितपणे उघडतील
  • लोकल ट्रेन पूर्ववत सुरू होतील. मात्र, स्थानिक DMA याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेईल.
  • सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग नियमित सुरू होईल
  • सर्व खासगी कार्यालयं सुरू करता येतील.
  • सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीस परवानगी. खासगी कार्यलयांमध्ये आवश्यक असल्यास 100 टक्के उपस्थितीस परवानगी.
  • विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल
  • लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.
  • बांधकाम, कृषी, ई-कॉमर्स नियमित सुरू राहतील
  • आंतरजिल्हा प्रवास नियमित. मात्र, लेव्हल-5 जिल्ह्यातून कुणी येत असेल तर ई-पास बंधनकारक असेल.
  • जमावबंदी लागू राहणार नाही.

दुसऱ्या स्तरासाठी हे नियम :

  • सर्व प्रकारची (अत्यावश्यक सेवेतील आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली) दुकानं नियमितपणे सुरू राहतील.
  • मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह इत्यादी 50 टक्के क्षमतेत सुरू होतील
  • लोकल ट्रेन वैद्यकीय सेवा, अत्यवश्यक सेवा, महिलांसाठी सुरू राहतील. DMA आवश्यकतेनुसार निर्णय घेतील.
  • सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग नियमित सुरू होईल
  • सर्व खासगी कार्यालयं सुरू करता येतील.
  • सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीस परवानगी. खासगी कार्यलयांमध्ये आवश्यक असल्यास 100 टक्के उपस्थितीस परवानगी.
  • विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी मर्यादा इनडोअर गेम्सना आहे. तर आऊटडोउर गेम्स पूर्ण दिवस बंद राहतील.
  • चित्रिकरण नियमितपणे सुरू राहील.
  • सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
  • लग्न समारंभांसाठी हॉलच्या 50 क्षमतेइतकी उपस्थितीची मुभा. मात्र, जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी.
  • अंत्यविधीसाठी उपस्थितीची कुठलीही मर्यादा नाही.
  • सभा आणि निवडणुकांसाठी 50 टक्क्यांच्या उपस्थितीच मर्यादा असेल.
  • बांधकाम, कृषी, ई-कॉमर्स हे नियमित सुरू राहतील.
  • सार्वजनिक वाहनं 100 टक्के क्षमतेने चालतील.
  • जमावबंदी लागू राहील.

तिसऱ्या स्तरासाठी हे नियम :

  • अत्यावश्यक सेवेतील दुकानं रोज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत सुरू राहतील.
  • मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह बंद राहतील.
  • रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्क्यांच्या क्षमतेनं उघडीतल. त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहील.
  • लोकल ट्रेन केवळ वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठी सुरु राहील. DMA आवश्यकेतनुसार निर्णय घेतील.
  • सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत रोज सुरु राहतील.
  • खासगी कार्यालयं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत सुरू ठेवता येतील.
  • सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीत, खासगी कार्यलायांनाही हीच अट लागू.
  • विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9, संध्याकाळी 6 ते रात्री 9 ही वेळ असेल.
  • चित्रिकरणासाठी बयो-बबल बंधनकारक. संध्याकाळी 5 नंतर परवानगी नाही.
  • सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
  • लग्न समारंभात 50 लोक जण उपस्थित राहू शकतात.
  • अंत्यविधीला 20 लोक उपस्थित राहू शकतात.
  • सभा आणि निवडणुकांना 50 टक्क्यांची मर्यादा.
  • बांधकाम साईटवर उपस्थित कामगारांद्वारे काम सुरू ठेवता येईल. मात्र दुपारी 4 नंतर बंद करावं लागेल.
  • ई-कॉमर्स नियमित सुरू राहील.
  • कृषी क्षेत्राचं काम रोज संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहील.
  • सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेनं सुरू राहील.
  • जमावबंदी संध्याकाळी 5 पर्यंत, तर संचारबंधी संध्याकी 5 नंतर लागू असेल.

चौथ्या स्तरासाठी हे नियम :

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील
  • सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
  • हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
  • अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील
  • शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
  • विविध खेळ (आऊटडोअर) सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
  • कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही
  • लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक
  • राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील
  • ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील
  • कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
  • ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
  • सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
  • सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
  • संचारबंदीचे नियम लागू राहतील

पाचव्या स्तरात अद्याप एकही जिल्हा नाहीय.

कोणता जिल्हा कोणत्या स्तरात येतो?

आता आपण कोणता जिल्हा कोणत्या स्तरात येतो, ते पाहू. या जिल्ह्यांना स्तरनिहाय वेगवेगळे नियम लागू होतील.

पहिला स्तर -

  • अहमदनगर
  • चंद्रपूर
  • धुळे
  • गोंदिया
  • जळगाव
  • जालना
  • लातूर
  • नागपूर
  • नांदेड
  • यवतमाळ

दुसरा स्तर -

  • हिंगोली
  • नंदुरबार

तिसरा स्तर -

  • मुंबई
  • ठाणे
  • नाशिक
  • औरंगाबाद
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • भंडारा
  • गडचिरोली
  • उस्मानाबाद
  • पालघर
  • परभणी
  • सोलापूर
  • वर्धा
  • वाशिम

चौथा स्तर -

  • पुणे
  • बुलडाणा
  • कोल्हापूर
  • रायगड
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सातारा
  • सिंधुदुर्ग

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)