You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्पेलिंग चुकलं आणि खुनी सापडला; 40 दिवसांनंतर उलगडलं प्राध्यापकाच्या हत्येचं रहस्य
तारीख 3 फेब्रुवारी 2025. विशाल राठोड या तरुणानं गेवराई तांडा या त्याच्या गावात एका जेसीबीवाल्याला बोलावून घेतलं.
इथं आपल्याला गुप्तधन मिळणार आहे, असं आमिष दाखवून त्यानं त्या जेसीबीवाल्याकडून दोन मोठे खड्डे खोदून घेतले.
पण, हे खड्डे गुप्तधनासाठी नव्हते. तर 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका खूनानंतर मयताचा मृतदेह पुरण्यासाठी होते.
मग 5 फेब्रुवारी रोजी नेमकं काय घडलं? त्याचा उलगडा 40 दिवसांनंतर कसा झाला? छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका खूनाची ही चित्तथरारक कहाणी.
यात कहाणीत सध्या तरी 4 लोक आहेत. पहिले आहेत ज्यांचा मृत्यू झाला ते राजाभाऊ लोंढे.
60 वर्षीय राजाभाऊ लोंढे हे निवृत्त प्राध्यापक. अभियांत्रिकी महाविद्यालयात ते विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.
दुसरी व्यक्ती आहे, विशाल राठोड. 24 वर्षांचा विशाल राठोड हा छत्रपती संभाजीनगरजवळील गेवराई तांडा या गावचा. तो रील स्टार असून कॉन्सर्ट आणि इतर कार्यक्रम आयोजित करायचा.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राजाभाऊ लोढेंची विशाल राठोड याच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं.
विशालला स्वत:च्या चॅनेलवर 'खतरों के खिलाडी' सारखा एक गेम सुरू करायचा होता. या शोचे तुम्ही निर्माते व्हा, असं सांगून त्यानं लोंढे यांच्याकडून पैसे घेतले. पण, पैसे देऊन बरेच दिवस झाल्यानंतर आणि शोही सुरू होत नसल्यामुळे लोंढे यांनी विशालकडे पैशांसाठी विचारणा सुरू केली. त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
अशातच 5 फेब्रुवारी रोजी विशालनं राजाभाऊ लोंढे यांना पार्टीच्या निमित्ताने बाहेर नेलं.
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या प्रकरणाची माहिती आणि घटनाक्रम उलगडून सांगितला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावरील दौलताबादमधील एका फार्म हाऊसवर ते पार्टी करायला गेले. पार्टीच्या वेळी विशालसोबत त्याचा भाऊजी आकाश पवार हाही उपस्थित होता. आकाश पवार हे या कहाणीतलं तिसरं पात्र. या पार्टीच्या वेळीही राजाभाऊ आणि विशाल यांच्यात पैशांवरुन वाद झाले.
राजाभाऊ लोंढे यांच्याकडे स्वत:ची बंदूक होती. ती विशालनं हिसकावून घेतली त्या बंदूकीतून राजाभाऊंच्या डोक्यात गोळी घातली. लोंढे यांचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून विशाल आणि आकाश जवळपास 30 किलोमीटर अंतर फिरले.
मृतदेह असलेली कार त्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरवली. यादरम्यान त्यांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवला. अशा रीतीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याचा बनाव रचण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.
6 फेब्रुवारीच्या पहाटे विशाल राजाभाऊंचा मृतदेह पुन्हा गेवराई तांडा इथं घेऊन गेला. ज्या जेसीबी चालकाकडून त्याने खड्डे खोदून घेतले होते, त्यालाच त्यानं परत बोलावलं. आणि एका खड्ड्यात त्यानं राजाभाऊंचा मृतदेह पुरला. यावेळी त्यांनी करण आडे या मित्राची मदत घेत मृतदेह पुरला. करण आडे हे या कहाणीतलं चौथं पात्रं.
'तपासाची दिशा भरकटवण्यासाठी शक्कल'
5 फेब्रुवारीच्या रात्रीपासून राजाभाऊ मिसिंग होते. त्यांचे बंधू उत्तम लोंढे यांनी त्यांची मिसिंग कम्प्लेंट उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
दरम्यान, 8 फेब्रुवारी रोजी विशाल पुण्याला गेला. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होता. मयत राजाभाऊंचा मोबाईल घेऊन तो पुण्याला गेला. तिथं लक्ष्मी रोडला त्यांनी राजाभाऊंचा मोबाईल स्विच ऑन केला आणि व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवलं, "मला संपर्क साधू नका आणि मी 20-25 दिवस बाहेर आहे."
पण हे स्टेटस ठेवताना विशालनं वापरलेली इंग्रजी भाषा चुकीची होती. त्यात स्पेलिंगमध्ये चुका होत्या. मयत राजाभाऊ हे विभागप्रमुख होते, उच्चशिक्षित होते. अशा उच्चशिक्षित माणसाकडून अशाप्रकारची इंग्रजी वापरणं अपेक्षित नव्हतं. त्याठिकाणी पोलिसांना शंका निर्माण झाली. त्यादृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला.
महिना उलटूनही शोध लागत नसल्याने लोंढे कुटुबीयांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. आयुक्तांनी गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी संशयित आरोपी विशाल राठोड, आकाश पवार यांची उलटतपासणी केली. त्यांचे सखोल जबाब घेतले. सोबतच तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दोन्ही आरोपींच्या जबाबात बरीच तफावत दिसून आली. यातून राजाभाऊ यांचे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले.
यावेळी प्रमुख आरोपी विशाल याने राजाभाऊंचा खून केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, 14 मार्च रोजी विशाल आणि आकाश यांनी खून केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 मार्च रोजी पोलिसांनी गेवराई तांडा येथील जंगलात जाऊन कायदेशीर प्रक्रिया करत राजाभाऊ यांचा मृतदेह बाहेर काढला.
या प्रकरणातील विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे, या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. 19 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बीबीसीने आरोपींच्या कुटुंबीयांशी आणि त्यांच्या वकिलांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप ती मिळाली नाही. ती आल्यानंतर अपडेट करण्यात येईल.
पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 5 फेब्रुवारी रोजीच्या पार्टीत राजाभाऊ लोंढे, विशाल राठोड, आकाश पवार यांच्यासोबत आणखी होतं का, तसंच याप्रकरणाला पैशांच्या व्यवहाराव्यतिरिक्त अजून काही किनार आहे का, या बाबी पुढच्या तपासात स्पष्ट होतील. तसंच सध्याच्या 4 जणांव्यतिरिक्त या कहाणीत अजून कोण यात सामील आहे, तेही स्पष्ट होईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.