बारामती, राहुरीतील पोटनिवडणुका जाहीर; 5 राज्यातील विधानसभा निवडणुका या तारखेला

वाचन वेळ: 5 मिनिटे

आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे.

या निवडणुकीचं मतदान वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी होणार असून निकाल 4 मे रोजी लागणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या निवडणुकांची घोषणा केली आहे.

यासंदर्भातील विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन चार वाजता जाहीर करण्यात आलेलं आहे.

महाराष्ट्रात दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. राहुरी मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूनंतर आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर बारामती या ठिकाणच्या जागांवर पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्याच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार या बारामती मतदारसंघातून पोटनिवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभ्या राहणार आहेत.

यासाठी दिल्लीतील विज्ञान भवनात दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या तारखांना होणार मतदान

  • आसाम - 9 एप्रिल 2026
  • केरळ - 9 एप्रिल 2026
  • पुदुच्चेरी - 9 एप्रिल 2026
  • तमिळनाडू - 23 एप्रिल 2026
  • पश्चिम बंगाल - 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान

या पाचही राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर केले जातील.

बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक

महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरीतील पोटनिवडणुकीच्या तारखाही निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत.

अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं.

त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.

त्यानुसार, 23 एप्रिल रोजी या दोन मतदारसंघात निवडणूक होणार असून 4 मे रोजी निकाल लागणार आहे.

या राज्यांमध्ये, निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची स्पेशल इंटेन्स रिव्हिजन (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये 'एसआयआर' प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे.

स्पेशल इंटेन्स रिव्हिजन (एसआयआर) अर्थात 'विशेष सखोल फेरतपासणी' ही मतादरयाद्यांशी संबंधित प्रक्रिया आहे.

या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहेत.

'एसआयआर' प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित आहे.

आसाममध्ये भाजपची सत्ता असून पुदुच्चेरीमध्ये भाजप 'ऑल इंडिया एन. आर काँग्रेस' या पक्षासमवेत सत्तेत आहे.

उर्वरित तीन राज्ये म्हणजेच केरळमध्ये डाव्यांची, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची तर तमिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाची सत्ता आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं आव्हान

पश्चिम बंगालमध्ये 294 मतदारसंघांसाठी विधानसभेची निवडणूक लढवली जाणार आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षासमोर भाजपचं तगडं आव्हान असणार आहे.

या निवडणुकीचं बिगुल खरं तर आधीच वाजलेलं असून मतदार यादीतील बदल हा 2026 च्या निवडणुकीतील सर्वात वादग्रस्त मुद्दा ठरलेला आहे.

एसआयआर प्रक्रियेनुसार, राज्यातील मतदार यादीतून अंदाजे 5.46 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत.

तर अंदाजे 60.6 लाख मतदारांची नावं अद्याप निर्णयासाठी प्रलंबित आहेत.

पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

2021 च्या निवडणुकीत, भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार न दाखवता निवडणूक लढवली होती.

त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच जोरदार प्रचार करण्यात आला होता.

केरळमध्ये डाव्यांची सत्ता

केरळच्या विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. राज्यात 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) प्रणीत लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटनं (एलडीएफ) विजय मिळवला होता.

त्यानंतर पिनरयी विजयन केरळचे मुख्यमंत्री झाले होते. एलडीएफच्या आघाडीनं 99 जागा जिंकल्या होत्या. केरळमध्ये 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा एलडीएफच्या आघाडीनं 9 जागा अधिक जिंकल्या होत्या.

यामुळे 1977 नंतर पहिल्यांदा एलडीएफ सलग दुसऱ्यांदा सत्तेत आली होती. तर 2021 च्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंड (यूडीएफ)च्या आघाडीनं 41 जागा जिंकल्या होत्या.

तसंच भाजपाप्रणीत नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए)नं 2016 च्या निवडणुकीत जिंकलेली एक जागादेखील 2021 च्या निवडणुकीत गमावली होती.

सध्या केरळमध्ये पिनारायी विजयन मुख्यमंत्री आहेत.

मे महिन्यात केरळ विधानसभेचा कार्यकाळ संपतो आहे.

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार का?

126 जागा असलेल्या आसाम विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 20 मे 2026 रोजी संपणार आहे.

2016 मध्ये पहिल्यांदा 60 जागा जिंकून सत्तेत आलेल्या भाजपने 2021 मध्येही अशीच कामगिरी केली.

भाजपने 93 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. सहकारी पक्षाने 15 जागा जिंकल्या म्हणजेच एनडीएने एकूण 126 पैकी 75 जागा जिंकल्या.

मात्र, 2016 च्या तुलनेत गेल्या निवडणुकीत एनडीएने 11 जागा गमावल्या.

दरम्यान, गेल्या दशकापासून विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत 95 जागा लढवल्या आणि फक्त 29 जागा जिंकल्या.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने 50 जागा जिंकल्या. अशा प्रकारे, 2016 च्या तुलनेत, 2021 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला 10 जागा अधिक मिळाल्या.

या निवडणुकीसाठी काँग्रेसने 'आसाम सोनमिलितो मोर्चा' नावाचा विरोधी पक्षांचा गट स्थापन केला आहे.

त्यामध्ये प्रादेशिक पक्ष आसाम राष्ट्रीय परिषदसह इतर सात पक्षांचा समावेश आहे.

तामिळनाडू

तामिळनाडूत 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत 'द्रमुक'प्रणीत आघाडीचा विजय झाला होता आणि त्यांनी सरकार स्थापन केलं होतं. या सरकारचा 5 वर्षांचा कालावधी मे महिन्यात संपतो आहे.

तामिळनाडूच्या माजी मुख्य मुख्यमंत्री जयललिता आणि माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर 2021 मध्ये निवडणुका झाल्या होत्या.

या निवडणुकीत डीएमकेनं काँग्रेस, कम्युनिस्ट ऑफ इंडिया, कम्युनिस्ट ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट), एमडीएमके, लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळनाडू, इंडियन युनियन मुस्लीम लीग आणि कोंगुनाडू पीपल्स नॅशनल पार्टी यांच्यासह आघाडी केली होती.

निवडणुकीत डीएमकेप्रणीत आघाडीनं राज्यातील एकूण 234 पैकी 159 जागांवर विजय मिळवला होता. तर या एआयडीएमकेप्रणीत आघाडीनं 75 जागा जिंकल्या होत्या.

तामिळनाडूतील 2021 च्या निवडणुकीत एआयडीएमकेनं भाजपा, पीएमके आणि तामिळ मानया काँग्रेस यांच्यासह आघाडी केली होती.

पुदुचेरी

पुदुचेरीमध्ये गेल्या निवडणुकीत एनआर काँग्रेस आणि भाजपाच्या आघाडीनं नॅशनल डेमोक्रॅटिक आघाडी निवडणुकीत एकूण 30 पैकी 16 जागा जिंकल्या होत्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)