You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
1857 मध्ये सोन्यानं भरलेलं जहाज समुद्रात बुडालं; सुमारे सव्वाशे वर्षाने तो खजिना शोधणाऱ्या व्यक्तीला का घडला तुरुंगवास?
- Author, ग्रेस एलिझा गूडविन
- Role, बीबीसी न्यूज
- वाचन वेळ: 3 मिनिटे
सोन्याचा खजिना घेऊन समुद्रात बुडालेल्या एका जहाजातून एका साहसी व्यक्तीनं सोनं शोधून काढलं, पण त्यातील नाण्यांचं काय झालं, याची माहिती मात्र त्यानं दिली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला तब्बल एक दशक तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
अखेर त्याची सुटका करण्यात आली आहे. मात्र जहाजातून गायब झालेल्या 500 सोन्याच्या नाण्यांचा अजूनही काहीच पत्ता लागलेला नाही.
टॉमी थॉम्पसन नावाची ही व्यक्ती सध्या 73 वर्षांची आहे.
थॉम्पसन खोल समुद्रातून खजिना शोधण्याचे काम करत होता. त्याने 1857 मध्ये साउथ कॅरोलिनाजवळ बुडालेल्या 'एसएस सेंट्रल अमेरिका' नावाच्या जहाजातून 1988 मध्ये कोट्यवधी डॉलर किमतीचा खजिना शोधून काढला होता. हे जहाज 'शिप ऑफ गोल्ड' म्हणूनही ओळखले जात होते.
थॉम्पसनच्या मोहिमेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांचा आरोप आहे की, थॉम्पसनने त्यांची फसवणूक केली आणि आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांना पैसे दिले नाहीत.
अनेक वर्षे फरार राहिल्यानंतर 2015 मध्ये थॉम्पसनला अटक करण्यात आली होती.
गुंतवणूकदारांची फसवणूक
1857 मध्ये जहाज बुडालं, तेव्हा त्यामध्ये त्यावेळच्या किमतीनुसार 30 हजार पाउंडांचं सोनं होतं, जे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नुकतेच तयार करण्यात आले होते.
हे सोनं बँकांच्या राखीव निधीसाठी ईस्ट कोस्टकडे पाठवलं जात होतं. मात्र, जहाज समुद्रात बुडालं आणि सुमारे 7000 फूट खोल समुद्रतळाशी पोहोचलं. या दुर्घटनेत जहाजावरील 425 प्रवासी आणि कर्मचारीही बुडाले होते, ज्यामुळे 1857 मध्ये आर्थिक संकट निर्माण झाले होते.
एकूण 161 गुंतवणूकदारांनी जहाजाचा खजिना शोधण्यासाठी थॉम्पसनला 12.7 मिलियन डॉलर ( सुमारे 117.58 कोटी रुपये ) दिले होते. त्यांना या गुंतवणुकीवर परतावा मिळेल अशी अपेक्षा होती.
त्या वेळी थॉम्पसन ओहायो येथील 'बॅटल मेमोरियल इन्स्टिट्यूट'मध्ये महासागरीय अभियंता होता. त्याने आपल्या टीमसह 1988 मध्ये शेकडो सोन्याच्या विटा (गोल्ड बार) आणि नाणी शोधून काढली. त्यापैकी मोठा हिस्सा त्याने 2000 साली एका गोल्ड मार्केटिंग कंपनीला 5 कोटी डॉलरमध्ये विकला.
समुद्रतळातून सापडलेला खजिना
बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी संस्था 'सीबीएस न्यूज'नुसार, थॉम्पसनचे म्हणणे होते की त्याला मिळालेले नाणे त्याने बेलिझमधील एका ट्रस्टला दिले होते आणि सोन्याच्या पहिल्या साठ्याच्या विक्रीतून मिळालेला नफा बँकेचे कर्ज आणि कायदेशीर खर्च भागवण्यासाठी वापरला गेला.
नाराज गुंतवणूकदारांनी 2005 मध्ये थॉम्पसनविरोधात खटला दाखल केला. त्यांचा आरोप होता की, खजिना विक्रीतून त्यांना काहीच मिळाले नाही.
त्यानंतर दाखल झालेल्या फौजदारी तक्रारीत असे म्हटले गेले की, समुद्राच्या तळातून मिळालेल्या गोल्ड बारची आणि नाण्यांची किंमत सुमारे 40 कोटी डॉलर होती.
कोर्टात हजर राहण्याचा आदेश असूनही 2012 मध्ये थॉम्पसन गायब झाला काही वर्षे फरार राहिल्यानंतर 2015 मध्ये त्याला आणि त्याच्या एका सहकाऱ्याला फ्लोरिडातील बोका रॅटन येथे अटक करण्यात आली.
एक दशकाचा तुरुंगवास
थॉम्पसन त्याचं नाव बदलून दोन वर्षे एका हॉटेलमध्ये राहत होता आणि भाडे रोख रकमेने देत होता.
पोलिसांपासून वाचण्यासाठी ते टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत होते. मात्र, शेवटी त्याला पकडण्यात आले आणि हरवलेल्या 500 नाण्यांचे ठिकाण सांगण्यास नकार दिल्यामुळे डिसेंबर 2015 मध्ये त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.
सिव्हिल कंटेम्प्ट प्रकरणातली शिक्षा सामान्यतः अनिश्चित काळासाठी असते, म्हणजे जोपर्यंत संबंधित व्यक्ती न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही.
या प्रकरणात हरवलेल्या नाण्यांचे ठिकाण सांगण्याचा आदेश देण्यात आला होता. पण गेल्या वर्षी न्यायाधीशांनी थॉम्पसनची सिव्हिल कंटेम्प्टची शिक्षा संपवण्यास सहमती दर्शवली.
सीबीएस न्यूजनुसार, न्यायाधीशांनी म्हटले की आता थॉम्पसनकडून काही उत्तर मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)