रिलायन्स आणि ट्रम्प यांच्यात ऐतिहासिक करार, 300 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा कोणाला फायदा होणार? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपक मंडल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
इराण युद्धामुळे तेलाचे भाव वाढत असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प (ऑइल रिफायनरी) उभारण्याची घोषणा केली आहे.
ट्रम्प म्हणाले की, "अमेरिका फर्स्ट रिफायनिंगद्वारे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला भारतीय कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज सहकार्य करेल."
अमेरिकेच्या ऊर्जा क्षेत्रासाठी (एनर्जी सेक्टर) हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 120 डॉलरवर पोहोचली होती.
परंतु, ट्रम्प यांनी मंगळवारी 'इराण युद्ध संपलं' असं सांगितलं.
त्यानंतर कच्च्या तेलाची किंमत घसरुन प्रति बॅलर 90 डॉलरवर आली.
तरीही, कच्च्या तेलाची किंमत 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धापूर्वीच्या किंमतींपेक्षाही जास्त आहे. फेब्रुवारीमध्ये इंडियन बास्केटमध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅलर 69 डॉलर इतकी होती. (इंडियन बास्केट हा शब्द प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या किमतींच्या निर्देशांकासाठी वापरला जातो.)
बीबीसी व्हेरिफायच्या माहितीप्रमाणे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक थांबवली गेली तर त्यांच्यावर 20 पट अधिक ताकदीने हल्ला केला जाईल, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.
जगातील 20 टक्के तेलाचा पुरवठा याच मार्गावरून होतो.
ट्रम्प यांनी काय म्हटलं?
टेक्सासमध्ये रिफायनरी प्लांट उभारण्याची योजना जाहीर करताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं की, "अमेरिका पुन्हा एकदा ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व निर्माण करत आहे. आज मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, अमेरिका फर्स्ट रिफायनिंग टेक्सासच्या ब्राउन्सव्हिले येथे रिफायनरी उघडत आहे."
"गेल्या 50 वर्षांत येथे सुरू होणारी ही पहिलीच रिफायनरी असेल. 300 अब्ज डॉलर्सचा हा ऐतिहासिक करार आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा करार आहे. अमेरिकन कामगार, ऊर्जा क्षेत्र आणि दक्षिण टेक्सासमधील लोकांसाठी हा एक मोठा विजय आहे."
"मी भारतातील आमच्या भागीदारांना आणि तेथील सर्वात मोठी खासगी ऊर्जा कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे या मोठ्या गुंतवणुकीसाठी आभार मानतो."

फोटो स्रोत, Roberto Schmidt/Getty Images
ट्रम्प यांच्या या घोषणेला आंतरराष्ट्रीय तेल बाजारात पुरवठा सुनिश्चित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांशी जोडले जात आहे.
यापूर्वी अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची सूट दिली होती.
भारतातील तेल शुद्धीकरण उद्योगाची क्षमता खूप जास्त असल्याने ट्रम्प यांचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
तेल शुद्धीकरण क्षमतेच्या बाबतीत भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचा पुरवठा कायम ठेवण्यात भारताच्या रिफायनिंग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे.
भारताला कच्चे तेल मिळत राहिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचा पुरवठा चांगला राहील, असं विश्लेषकांचे मत आहे.
कोणाला होईल फायदा?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रिफायनरी अमेरिकेच्या-मेक्सिको सीमेवर असलेल्या ब्राउन्सव्हिले पोर्टमध्ये उभारली जाणार आहे. या रिफायनरीची दररोजची रिफायनिंग क्षमता 1.68 लाख बॅरल असेल.
मागील 50 वर्षांत अमेरिकेत ही पहिली नवीन रिफायनरी उभारली जात आहे, असं अमेरिका फर्स्टचे अध्यक्ष जॉन व्ही. केल्स म्हणाले.
यामध्ये अमेरिकेतील शेल ऑइलचे रिफायनिंग केले जाईल.
अमेरिकेच्या गल्फ कोस्टवरील अनेक रिफायनरीज फ्रॅकिंगमधून मिळणाऱ्या हलक्या आणि कमी सल्फर असलेल्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करू शकत नाहीत.

मागील सुमारे 40 वर्षांपासून या रिफायनरीज स्वस्त, जड आणि जास्त सल्फर असलेले कच्चे तेल प्रक्रिया करण्यासाठी तयार केले गेले होते. या तेलाचे घनत्व जास्त असते आणि त्यात सल्फरचे प्रमाणही जास्त असते.
या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे रिफायनिंग कौशल्य आणि क्षमता अमेरिकेस उपयुक्त ठरू शकते, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
ऊर्जा धोरण तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, अमेरिकेकडे आधुनिक रिफायनरी नाहीत, तर रिलायन्सकडे आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या रिफायनरीज आहेत.
ते म्हणतात की रिलायन्स इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल आणि टर्बाइन इंधन (विमानाचे इंधन) निर्यात करते.
रिलायन्ससाठी हा करार फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यांची रिफायनरी टेक्सास आणि मेक्सिकोच्या आखाताजवळ उभारली जाणार आहे, तिथे मोठ्या प्रमाणात कच्चे तेल उपलब्ध आहे.
अमेरिका हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक आणि त्याचा सर्वात मोठा ग्राहक देखील आहे.
तनेजा म्हणतात की, "अमेरिकेला मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल आणि टर्बाइन इंधन (विमानाचे इंधन) आयात करावे लागते. मेक्सिको खाडी आणि टेक्सासजवळील जड कच्च्या तेलाची रिफायनिंगची क्षमता अमेरिकेच्या रिफायनरींमध्ये नाही. या बाबतीत रिलायन्सचे रिफायनिंग (शुद्धीकरण) कौशल्य खूप उपयुक्त ठरेल."
"अमेरिकेला याचा मोठा फायदा होईल, कारण त्यांना पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन यांसारख्या रिफाइंड तेलावर जास्त प्रमाणात अवलंबून राहावं लागणार नाही."
"त्याचा वापर तो देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठ्यासाठी आणि युरोप व इतर देशांना निर्यातीसाठी करू शकेल."
या प्रकल्पावर प्रश्न का उपस्थित होत आहेत?
डोनाल्ड ट्रम्प यांनी रिफायनरी उभारण्याची घोषणा केली असली तरी, अजूनपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून याबाबत कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.
नरेंद्र तनेजा म्हणतात, "ट्रम्प यांच्या या वक्तव्याच्या आधारे काहीही बोलणं घाईचं ठरेल. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून याबाबत अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही."
ते म्हणतात, "यासाठी पैसे कुठून येणार, हे अद्याप स्पष्ट नाही. जर हे जॉइंट व्हेंचर असेल, तर त्यात जास्त हिस्सा कोणाचा असेल? रिफायनरी किती मोठी असेल आणि तिची क्षमता किती असेल? कोणते तंत्रज्ञान वापरले जाईल? रिलायन्स जे पैसे गुंतवेल, ते अमेरिकन बँकांचे कर्ज असेल की स्वतःचे पैसे?"

फोटो स्रोत, Rajan Chaughule/Bloomberg via Getty Image
नरेंद्र तनेजा म्हणतात, "जर रिलायन्स यात पैसा गुंतवत असेल, तर हा भारताबाहेरील त्यांचा पहिला रिफायनिंग प्रकल्प असेल. तरीही, अजून याबाबत काहीही निश्चित सांगता येणार नाही."
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विश्लेषकांना अमेरिकेच्या गल्फ कोस्टवर नवीन रिफायनरीची खरोखरच गरज आहे की नाही, याबाबत शंका आहे.
कारण अमेरिकेच्या 10 सर्वात मोठ्या रिफायनरीजपैकी 8 इथे आधीपासूनच आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या पाच रिफायनरीज टेक्सासमध्ये आहेत.
रिफाइंड फ्युएल ॲनालिटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक जॉन आयर्स यांनी रॉयटर्सला सांगितलं की, "ट्रम्प प्रशासनाकडून अशा प्रकारच्या सुरुवातीच्या घोषणा अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण असतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











