You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'देवांगु शास्त्रम' विधीसाठी डांबून ठेवलेला 'वनमानव', का आहे हा प्राणी नामशेष होण्याची भीती?
- Author, के. शुभगुणम
- Role, बीबीसी तामिळ
- वाचन वेळ: 7 मिनिटे
(इशारा: या लेखात तुम्हाला अस्वस्थ करणारी माहिती असू शकते.)
तामिळनाडूतील मेट्टुपालयम भागातील एका वृद्ध माणसाच्या घरातून वन अधिकाऱ्यांनी 23 जानेवारीला वनमानव प्राण्याच्या (स्लेंडर लॉरिस किंवा देवांग) दोन पिल्लांची सुटका केली.
तामिळनाडूच्या वन विभागातील वन्यजीव गुन्हे प्रतिबंध युनिटच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, या पिल्लांना 'देवांगु शास्त्रम' नावाच्या एका विधीसाठी ताब्यात ठेवण्यात आलं होतं. हा विधी केल्यामुळे चांगलं नशीब होईल, समृद्धी येईल ही अंधश्रद्धा यामागे आहे.
त्या वृद्ध माणसाला अटक करण्यात आली.
तसंच, वन्यजीव डॉक्टरांच्या तपासाअंती ही पिल्लं निरोगी असल्याचं कळल्यानंतर त्यांना 28 जानेवारीला अप्पर अलियार भागातील जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आलं, अशी माहिती बचावकार्यात सहभागी झालेल्या, मात्र नाव उघड न करण्याची इच्छा असलेल्या एका अधिकाऱ्यानं बीबीसीला दिली.
बीबीसीशी बोलताना तामिळनाडूच्या पर्यावरण आणि वन सचिव सुप्रिया साहू यांनी सांगितलं की, तामिळनाडूच्या वन विभागाच्या वन्यजीव गुन्हे प्रतिबंध युनिटनं वनमानव प्राण्याच्या (स्लेंडर लॉरिस) बेकायदेशीर शिकारीला प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तसंच, हे युनिट लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जगजागृती मोहिमदेखील सक्रियपणे चालवत आहे.
वनमानवाचा जादूटोण्यात होणारा वापर
योग्य देखरेख नसल्यामुळे, पारंपारिक पद्धतीनं केला जाणारा औषधोपचार आणि जादूटोण्याच्या विधींसाठी विविध वन्य प्राण्यांची बेकायदेशीरपणे शिकार केली जाते.
वन्यजीव कार्यकर्ते सी. विमल राज यांनी बीबीसीला सांगितलं की, यामुळे वन्यजीवांच्या प्रजातींची संख्या कमी होत गेल्यानं यातून जैवविविधतेला धोका निर्माण होतो.
ते असंही म्हणाले की, छोटे सस्तन प्राणी, जे निशाचर प्राणी आहेत, त्यांच्यावर याचा सर्वाधिक परिणाम होतो आहे.
ते पुढे म्हणाले, "फक्त उत्तरेकडे तोंड करून बसणं आणि त्यांच्यात दुष्ट आत्मे किंवा शक्तींना दूर करण्याची ताकद असते, अशा अंधश्रद्धांमुळे या वनमानव (स्लेंडर लॉरिस) या छोट्या प्राण्यांना धोका निर्माण होतो."
वनमानवासारख्या छोट्या प्राण्यांचा वापर औषधोपचारांसाठी आणि जादूटोण्यातील विधी करण्यासाठी केला जातो, असं 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात सूचित करण्यात आलं आहे.
केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधील 12 वेगवेगळ्या अधिवासांमध्ये 7 वर्षे हा अभ्यास करण्यात आला. भारतात राखाडी बगळे सर्वाधिक याच भागात आढळतात. या अभ्यासात जिवंत बगळे आणि त्यांच्या शरीराच्या अवयवांचा जादूटोणा आणि इतर विधींसाठी वापर होत असल्याचं नोंदवण्यात आलं.
हा अभ्यास करणाऱ्या संशोधन टीमनं, अशा कृतींमुळे प्रभावित झालेल्या आणि नंतर त्यातून बरे झालेल्या 139 जिवंत प्राण्यांची तपासणी केली. त्यांना आढळून आलं की, त्यातील 116 प्राण्यांमध्ये जादूटोण्यासाठी छळ केल्याच्या खुणा आढळल्या.
जादूटोण्यासाठी केल्या जाणाऱ्या विधींमधील क्रौर्य
ज्या अधिकाऱ्यांनी वनमानवच्या पिल्लांची सुटका केली, त्यांनी बीबीसीला सांगितलं की, मेट्टुपालयममध्ये घडलेल्या घटनेत 'देवांगु शास्त्रम' नावाचा विधी केला जात होता.
त्याचबरोबर, अंधश्रद्धांमुळे या छोट्या सस्तन प्राण्यांना धोका उद्भवण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसीनं वन्यजीव गुन्हे प्रतिबंधक युनिटला गुप्त माहिती पुरवणाऱ्या नेटवर्कचा भाग असलेल्या लोकांशी संवाद साधला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जादूटोण्यामध्ये या वनमानव म्हणजे छोट्या प्राण्यांवर अनेक अत्याचार केले जातात.
त्या म्हणाल्या, "जादूटोण्यामध्ये ज्याप्रकारे बाहुल्यांचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे जादूटोणा करणारे जिवंत वनमानव प्राण्यांचा वापर करतात. नंतर ते या प्राण्यांना सुया भोसकून किंवा टोचून त्यांचा छळ करतात."
जो अभ्यास 2022 मध्ये करण्यात आला, त्यात यालाही दुजोरा मिळाला की, या प्राण्यांवर जादूटोणा केला जातो.
संशोधकांनी ज्या प्राण्यांची तपासणी केली, त्यातून त्यांना आढळलं की, या प्राण्यांच्या डोळे, पाय आणि ह्रदयासह शरीराच्या इतर अवयवांमध्ये लहान सुया टोचण्यात आल्या होत्या.
रूपा सतीश, बंगळुरूमधील बन्नेरघट्टा येथील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्रात वरिष्ठ पशुवैद्य आहेत आणि संशोधन टीमच्या सदस्य आहेत. त्या म्हणतात, हे विधी बहुतांशवेळा अमावस्येच्या दिवशी केले जातात.
या प्राण्यांचा (स्लेंडर लॉरिस किंवा वनमानव) वापर करून केल्या जाणाऱ्या जादूटोण्याच्या विधींबद्दल त्या म्हणाल्या, "या प्राण्याचं शरीर मानवी आकृतीप्रमाणं दिसतं. त्यामुळे त्याचा वापर चेटकिणीची बाहुली म्हणून केला जातो. या विधीमुळे वनमानवच्या (स्लेंडर लॉरिस) शरीरात सुई टोचली जाते. अशा कृती झालेल्या वनमानवावर मी उपचार केले आहेत."
त्या म्हणतात, "सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की या जखमी एखाद्या अपघातामुळे किंवा इतर प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे झाल्या असतील. मात्र, आमच्या लक्षात आलं की वाचवण्यात आलेल्या अनेक प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट भागांमध्ये आढळलेल्या जखमांमध्ये एक सातत्य होतं. त्या एका निश्चित पॅटर्ननुसार झालेल्या होत्या."
त्यांनी पुढे सांगितलं की, काही लोक बेकायदेशीरपणे वनमानव प्राण्यांचा वापर जादूटोण्याच्या विधीसाठी करत आहेत.
ज्या लोकांनी वन्यजीव गुन्हे प्रतिबंधक युनिटला गुप्त माहिती दिली, त्यांनी बीबीसीला सांगितलं की "या प्राण्यांच्या शरीराचे काही भाग औषधं तयार करण्यासाठी वापरले जातात. यामध्ये डोळ्यांचे आजार आणि सांधेदुखीवर उपचार करण्याचे औषधी गुणधर्म असल्याचं मानलं जातं.
"काही ज्योतिषी भविष्य सांगण्यासाठी, दुष्ट शक्तींचं निवारण करण्यासाठी आणि आजार बरे करण्यासाठी जिवंत वनमानव प्राण्याचा वापर करतात."
'त्यांना जगणं अशक्य होईल'
"जे लोक हे सर्व विधी करतात, ते विधी पूर्ण झाल्यानंतर या प्राण्यांना सोडून देतात. मात्र या विधीमध्ये या प्राण्यांना जखमा झालेल्या असतात. या जखमांसह हे छोटे सस्तन प्राणी स्वत:हून जगू शकत नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवसांत त्यांचा मृत्यू होतो."
हे सांगताना, डॉक्टर रूपा या भावनिक झाल्या होत्या आणि त्यांचा आवाज जड झाला होता. त्या म्हणाल्या की, या विधींमुळे या प्राण्याच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचं नुकसान होतं. त्यामळे ते जगणं अशक्य होतं.
त्याचप्रमाणे, शरीराचे अवयव पूर्णपणे वेगळे केलेले आणि प्रक्रिया केलेले, असे छिन्नविछिन्न झालेले मृतदेहांचे अवशेष किंवा शरीराचे भाग देखील सापडले आहेत.
त्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, "त्यांनी कदाचित पारंपारिक औषधांच्या नावाखाली, औषधं तयार करण्यासाठी किंवा जादूटोणा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू बनवण्यासाठी, या प्राण्यांच्या अवयवांचा वापर केला असावा."
मात्र, प्रक्रिया केलेल्या मृतदेहांचा वापर कसा केला जातो, हे स्पष्ट नाही. त्यांनी नमूद केलं की या कृती अतिशय गुप्तपणे केल्या जातात. त्यामुळे त्या कुठे, कशा आणि कोणाद्वारे केल्या जातात, हे शोधण्यात अनेक आव्हानं आहेत.
भाजलेल्या पायांसह वाचवण्यात आलेला वनमानव प्राणी
डॉ. रूपा म्हणतात की, या काळातही अशा गोष्टींकडे दुर्मिळ घटना म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांनी आम्हाला अलीकडेच डिसेंबर महिन्यात त्यांच्याकडे आणण्यात आलेल्या एका प्राण्याबद्दल सांगितलं.
"डिसेंबरच्या अखेरीस जखमा झालेल्या एका प्राण्याची सुटका करून त्याला उपचारासाठी माझ्याकडे आणण्यात आलं. आम्ही त्याला पाहताच, माझ्या हे स्पष्टपणे लक्षात आलं की त्याच्यावर जादूटोण्याच्या विधीमध्ये अत्याचार करण्यात आले होते," असं त्या म्हणाल्या.
त्यांनी या गोष्टीला देखील दुजोरा दिला की, या प्राण्याची सुटका होण्याच्या एक आठवडा आधीच अमावस्या झाली होती.
त्या म्हणाल्या, "त्यातून या प्राण्यानं किती भयंकर यातना सहन केल्या असतील याची मला जाणीव झाली. हे अतिशय अमानवीय कृत्य होतं. आम्ही या छोट्या सस्तन प्राण्यावर उपचार केले आणि त्याला बरं करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला झालेल्या जखमांनी त्रस्त राहिल्यानंतर, काही दिवसांनी, जानेवारीच्या अखेरीस त्याचा मृत्यू झाला."
डॉ. रूपा म्हणाल्या, "अशा कृतींमुळे या सस्तन प्राण्यांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होतो. या प्राण्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. आधीच ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी गंभीर उपाययोजना केल्या पाहिजेत."
वनमानव प्राण्यांना वाचवण्यासाठी वन विभाग काय करतंय?
वनमानव प्राण्याच्या अधिवासाचं रक्षण करण्यासाठी, 2022 मध्ये कडवूर वनमानव प्राण्यांसाठी अभयारण्य स्थापन करण्यात आलं. तामिळनाडूच्या पर्यावरण आणि वन सचिव सुप्रिया साहू या प्रयत्नांचं नेतृत्व करत आहेत.
त्या म्हणाल्या, "अलीकडच्या काळात वन्यजीवांच्या बाबतीतील गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ म्हणजे गुन्हेगारीत वाढ झाली आहे असं नाही. मजबूत करण्यात आलेलं गुप्तचर जाळं आणि सामूहिक सहभागातील सुधारणा त्याचं हे सकारात्मक लक्षण आहे."
त्यांच्या मते, सध्या ज्या सक्षमपणे गुप्तचर माहितीचं संकलन होतं आहे, त्यामुळे तामिळनाडू वन्यजीव गुन्हे प्रतिबंधक युनिटला पूर्वी उघडकीस न येणारे गुन्हे शोधण्यास मदत झाली आहे.
त्या पुढे म्हणाल्या, "अतिशय व्यवस्थित तयार करण्यात आलेली गुप्तचर व्यवस्था, तामिळनाडूच्या वन विभागाद्वारे वन्यजीवांशी संबंधित गुन्हे शोधण्यात आणि त्यांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे."
"या नेटवर्कद्वारे गोळा करण्यात आलेल्या गुप्तचर माहितीमुळे राज्यभरात वन्यजीवांशी संबंधित गुन्हे शोधण्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. यात देवांगू आणि अलांगू सारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या बाबतीतील गुन्ह्यांचाही समावेश आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "यामुळे नियोजनबद्धपणे लक्ष्य निश्चित करून धाडी टाकणं आणि गुन्हेगारांना अटक करणं सोपं झालं आहे. वाचवण्यात आलेल्या प्रत्येक वनमानव प्राण्याची वैद्यकीय तपासणी होते आणि त्यानंतर त्याला जंगलात सोडलं जातं."
त्यांनी पुढे सांगितलं, "कडवूर वनमानव अभयारण्याच्या संदर्भात, वर्षभर विविध उपक्रम सातत्यानं राबवले जातात. यात संवर्धनाचे उपक्रम, पर्यावरणपूरक पर्यटन, पर्यावरणीय विकास उपक्रम, संशोधन आणि वन्यजीवांची सुटका करणं यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे."
याशिवाय, "वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि स्थानिक समुदायांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, वन्यजीव संवर्धन शिक्षण कार्यक्रम आणि देखरेखीचे उपक्रम राबवले जात आहेत."
"याव्यतिरिक्त, अंधश्रद्धा कमी करण्यासाठी, वनमानव प्राण्याचं पर्यावरणात जे महत्त्व आहे, त्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसंच संवर्धनाच्या त्यांच्या उद्दिष्टांना सामाजिक-आर्थिक कल्याणाशी जोडून वन्यजीव संवर्धनावर केंद्रित स्थानिक अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत," असं त्यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)