इराणनं हिंदी महासागरातील दिएगो गार्सियावर डागली क्षेपणास्त्रं; भारतासाठी हे किती चिंताजनक?

वाचन वेळ: 5 मिनिटे

इराणनं हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावर असलेल्या ब्रिटिश लष्करी तळाच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे डागली. मात्र, त्यापैकी एकही क्षेपणास्त्र तळापर्यंत पोहोचू शकले नाही.

शुक्रवारी (21 मार्च) युकेनं सांगितलं होतं की, दिएगो गार्सियावरील लष्करी तळाचा वापर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणी हल्ले रोखण्यासाठी केला जाऊ शकतो.

यानंतर प्रत्युत्तरात इराणनं युकेला इशारा दिला होता की, अमेरिकेकडून या लष्करी तळाचा वापर 'तणाव वाढवणारा' म्हणून पाहिला जाईल.

शनिवारी (22 मार्च) इराणचा 'अयशस्वी' क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

त्यापैकी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, इराण आणि पश्चिम आशियातील युद्ध भारताच्या क्षेत्रात म्हणजे हिंदी महासागरापर्यंत पोहोचले आहे का आणि या घडामोडींचा भारताच्या दृष्टीने नेमका अर्थ काय आहे?

दुसरा प्रश्न असा आहे की, 'नाही, नाही' म्हणत युके या युद्धा सहभागी झाला आहे का? आणि त्यामुळे या संघर्षाचा विस्तार आणखी वाढेल का?

या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितले की, या घडामोडींमुळे भारतासाठी निश्चितच काळजीचं कारण आहे.

तसंच, दिएगो गार्सियावरील हल्ल्यामुळे या युद्धाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

इराणचा हल्ला

दिएगो गार्सियाच्या दिशेनं डागलेल्या क्षेपणास्त्रांची बातमी सर्वप्रथम 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिली होती.

अमेरिकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांचा हवाला ही बातमी देताना दिला गेला होता. यानंतर बीबीसीने विविध स्रोतांशी संवाद साधून या बातमीला दुजोरा दिला.

युकेच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र इराणने दिएगो गार्सिया तळाच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे डागल्याची ना पुष्टी केली आहे, ना खंडन केले आहे.

मात्र, मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण प्रदेशात इराणचे बेजबाबदार हल्ले 'ब्रिटिश हितसंबंध आणि युकेच्या सहयोगींसाठी धोका' आहेत.

युकेनं अमेरिकन सैन्याला दिएगो गार्सियावरून, ज्याला ते 'संरक्षणात्मक बॉम्बहल्ला मोहीम' म्हणतात, अशा कारवाया करण्याची परवानगी दिली आहे.

सध्या तरी अशी कोणतीही माहिती नाही की, अमेरिकेने हिंदी महासागरातील या युकेच्या तळावरून बॉम्बहल्ल्यांच्या मोहिमा चालवल्या आहेत.

इराणकडे हिंदी महासागरातील दिएगो गार्सियापर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे आहेत की नाहीत, याबाबत अजूनही शंका आहे.

प्रत्यक्षात हा युकेचा लष्करी तळ असून, त्याचा वापर अमेरिकन वायुसेनेकडून लांब पल्ल्याचे बॉम्बहल्ले करण्यासाठी वारंवार केला जातो. हे तळ इराणपासून सुमारे 3 हजार 800 मैल दूर आहे.

आतापर्यंत असे मानले जात होते की, इराणकडे मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत, ज्यांची मारक क्षमता सुमारे दोन हजार किलोमीटरपर्यंत आहे.

मात्र, काही लष्करी विश्लेषकांच्या मते, इराणची 'खोर्रमशहर' क्षेपणास्त्राची रेंज यापेक्षा अधिक असू शकते.

इस्रायलच्या 'अल्मा रिसर्च अँड एज्युकेशन सेंटर'नुसार, इराणच्या खोर्रमशहर क्षेपणास्त्राची मारक क्षमता तीन हजार किलोमीटरपर्यंत असू शकते.

असंही मानलं जातं की, उत्तर कोरियाच्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या आधारे हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलंय.

भारतापुढील आव्हान

हिंद महासागरात इराणनं केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्याचा भारताच्या भूमिकेवर काही परिणाम होईल का?

बीबीसी हिंदीच्या या प्रश्नाला उत्तर देताना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक प्रेमानंद मिश्रा म्हणाले की, "दिएगो गार्सिया हा सर्वात सुरक्षित परिसर मानला जातो. जर इराणने तिथे हल्ला केला असेल आणि त्यांना लक्ष्य साधता आले नसेल तरी, ती कारवाई यशस्वी झाली असेल तर तो भविष्यासाठी धोका आहे. भारताच्या इंडो-पॅसिफिक धोरणासाठी ही चिंतेची बाब आहे."

यामुळं भारताच्या सामरिक स्वातंत्र्याच्या धोरणावर आणि विशेषतः सागरी सुरक्षेवर तसेच या क्षेत्रातील जहाजांच्या मुक्त संचारावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

प्राध्यापक मिश्रा यांच्या मते, "उद्या या युद्धाची तीव्रता वाढली आणि चीन-अमेरिका यांच्यात युद्ध झालं तर भारत काय करेल, किंवा काय करू शकेल? खरं तर, इंडो-पॅसिफिक आणि हिंद महासागराच्या संदर्भात भारताच्या सामरिक स्वातंत्र्यासाठी दिएगो गार्सिया खूप महत्त्वाचे आहे."

दिएगो गार्सियाच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांच्यात विशिष्ट संबंध राहिले आहेत. त्यामुळे जर असा धोका वाढला, तर भारताचे अमेरिकेवरील अवलंबित्व वाढेल, कारण अमेरिकेशिवाय चीनच्या विस्तारवादावर किंवा चीनच्या पाळत ठेवण्यावर प्रश्न उपस्थित करण्याच्या स्थितीत भारत नाही.

मिडल ईस्ट इनसाइट्स प्लॅटफॉर्मच्या संस्थापिका डॉ. शुभदा चौधरी यांच्या मते, इराणने दिएगो गार्सियावर केलेला क्षेपणास्त्र हल्ला भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक असून, अशा प्रकारच्या कारवायांमधून भारताच्या क्षमतेबाबतच्या मर्यादा समोर येतात.

"दिएगो गार्सिया भारताच्या दक्षिण टोकापासून सुमारे 4000 किलोमीटर अंतरावर आहे. भारताच्या बहुतांश लढाऊ विमानांच्या पल्ल्याच्या ते खूप लांब आहे. अनेकदा हवेतच इंधन भरल्याशिवाय ते शक्य नाही, तसंच या प्रदेशात भारताची क्षमता अत्यंत मर्यादित आहे," असं त्यांनी सांगितलं.

शिवाय, दिएगो गार्सियापर्यंत पोहोचण्यास सक्षम असलेली अग्नी-III/IV/V सारखी लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं ही आण्विक प्रतिबंधासाठी तयार करण्यात आली आहेत. तटबंदी असलेल्या लष्करी पायाभूत सुविधांवर अचूक पारंपरिक हल्ल्यांसाठी ती नाहीत.

शुभदा चौधरी यांनी हिंद महासागरात भारताला भेडसावणाऱ्या आव्हानांकडंही लक्ष वेधलं आहे.

"दिएगो गार्सिया हे अमेरिकेच्या लष्करी मालमत्तेचे केंद्र आहे. त्यात कॅरियर स्ट्राइक ग्रुप्स, पॅट्रियट/थाड-श्रेणीतील हवाई संरक्षण प्रणाली आणि बहुतेक पारंपरिक हल्ले निष्प्रभ करू शकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांचा समावेश आहे," असं त्या म्हणाल्या.

याशिवाय अमेरिकन आणि ब्रिटिश अण्विक-पाणबुड्या या परिसरात नियमितपणे कार्यरत असतात.

कोणत्याही भारतीय नौदल टास्क फोर्सला हल्ला करण्याचा टप्प्या गाठण्यापूर्वी पाणबुडीविरोधी युद्धाच्या गंभीर धोक्याचा सामना करावा लागेल.

'युद्धाची तीव्रता वाढेल'

ब्रिटन आणि युरोप दोघंही इराणसोबतच्या या संघर्षात थेट सहभागी होण्यास कचरत राहिले आहेत. पण इराणच्या दिएगो गार्सियावरील क्षेपणास्त्र हल्ल्यामुळं त्यात बदल होईल का?

प्राध्यापक प्रेमानंद यांच्या मते, "या हल्ल्यामुळं ब्रिटनचा संकोच संपुष्टात येईल. तुम्ही दिएगो गार्सियावर आयआरबीएम (IRBMs) वापरत असाल, तर याचा अर्थ जगभरातील ब्रिटनचं नौदल किंवा लष्करी तळं धोक्यात येतील. त्यामुळं युरोपच्या आणि किमान ब्रिटनच्या बाबतीत, हा संकोच संपेल आणि त्यांना अमेरिकेच्या छत्राखाली यावं लागेल."

त्यांच्या मते, "हा युरोपलाही एक संकेत आहे की, त्यांचे लष्करी तळदेखील सुरक्षित नाही आणि इराणच्या या हल्ल्यामुळं या युद्धाची तीव्रता आणखी वाढेल."

शुभदा चौधरी म्हणतात, अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील 'विशेष संबंध' इतके घनिष्ठ आहेत की अमेरिकेच्या कोणत्याही मोठ्या लष्करी कारवाईत ब्रिटनची तटस्थता जवळपास अशक्य आहे.

नाटोच्या चौकटीत गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि लष्करी समन्वय या प्रक्रिया आपोआप कार्यान्वित होतात.

त्या म्हणतात की, "ब्रिटन हा 'फाइव्ह आय' आघाडीचा एक अविभाज्य भाग आहे. इराणचा समावेश असलेल्या कोणत्याही संघर्षात, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांना ते आवडले किंवा नाही आवडले तरी अमेरिकेला गुप्त माहिती देणं ब्रिटनवर करारानुसार बंधनकारक आहे."

याशिवाय दिएगो गार्सिया हा हिंद महासागरातील एक ब्रिटिश प्रदेश (BIOT) आहे, जो अमेरिकेला भाडेतत्त्वावर दिला आहे. मध्य पूर्वेतील कोणत्याही अमेरिकी हवाई कारवाईमध्ये या तळाचा वापर केला जातो, त्यामुळं युनायटेड किंगडम (यूके) आपोआपच यात सहभागी होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)