You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलचे 'रागातून हिंसक प्रत्युत्तर' असं ट्रम्प का म्हणाले? इराण मुद्द्यावर अमेरिका–इस्रायल एकसंध आहेत का?
- Author, पॉल ॲडम्स
- Role, डिप्लोमॅटिक करस्पाँडंट
- वाचन वेळ: 3 मिनिटे
इराण आणि कतार यांच्या संयुक्त मालकीच्या साऊथ पार्स या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने कतारमधील ऊर्जा संकुलावर प्रतिहल्ला केला. परिणामी तेल-वायूच्या किमती वाढल्या आणि यामुळे ट्रम्प संतापले.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले की अमेरिकेला इस्रायलच्या या हल्ल्याबद्दल काहीही माहिती नव्हती. मात्र इस्रायलमधील अनेक वृत्तपत्रांनी याला विरोध करणारे दावे केले आहेत.
येदीओथ अहरोनोथ या मध्यममार्गी लोकप्रिय वृत्तपत्राने लिहिले की, हा हल्ला आधीच अमेरिकेसोबत समन्वयाने ठरवण्यात आला होता.
इस्रायल हायोम या उजव्या विचारसरणीच्या वृत्तपत्राने तर ट्रम्प यांनी आखातातील तीन देशांच्या नेत्यांसोबतही या हल्ल्याबद्दल चर्चा केल्याचा दावा केला.
ट्रम्प यांनी हल्ल्याचे वर्णन करताना वापरलेली भाषा देखील लक्षवेधी आहे. इस्रायलने 'रागातून हिंसक प्रत्युत्तर दिले' असे त्यांनी म्हटले, ही भाषा सहसा इराणच्या अनियंत्रित प्रतिक्रियांसाठी वापरली जाते. त्यामुळे ट्रम्प इस्रायलच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत का? याबद्दल चर्चा निर्माण झाली.
ट्रम्प यांनी पुढे सर्व कॅपिटल अक्षरांत लिहून ठामपणे सांगितले की जोपर्यंत इराण कतारवर पुन्हा 'अविवेकी हल्ला' करणार नाही, तोपर्यंत इस्रायल आता साउथ पार्स क्षेत्रावर आणखी हल्ले करणार नाही.
कदाचित इस्रायलनं आधीच हा शब्द दिला असेल, किंवा ट्रम्प यांनी नेतन्याहूना अप्रत्यक्ष इशारा दिला असावा, असं या भाषेतून सुचित होतं.
या पोस्टमध्ये ट्रम्प स्पष्ट करतात की कतारचा या हल्ल्यांशी काहीही संबंध नव्हता आणि त्यांना या हल्ल्यांची आधीपासून माहितीही नव्हती.
पण पुढे ते लिहितात की 'दुर्दैवाने इराणला हे माहिती नव्हते' आणि म्हणूनच इराणने केलेला प्रतिहल्ला त्यांच्या मते 'अन्याय्य आणि अनुचित' होता.
इस्रायलने 'एकट्याने' केला हल्ला-नेतन्याहू
या विधानांमधून ट्रम्प इराणला सूट देत नाहीत, पण ते असे सुचवितात की, इराणने प्रतिक्रिया देताना संपूर्ण चित्र नीट न समजल्यामुळे, कदाचित कतारचाही सहभाग असल्याचा चुकीचा अंदाज बांधला असेल.
या सर्वानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की इस्रायलने हा हल्ला 'एकट्याने' केला आणि ट्रम्प यांनी पुढील हल्ले टाळण्याचा सल्ला दिला. त्यांनी ट्रम्प आणि स्वतःमध्ये अतिशय निकटचा असाा समन्वय असल्याचा दावा केला.
एकूणच, एका रात्रीच्या सोशल मीडिया पोस्टवरून अमेरिका–इस्रायल नात्यांतील मोठा बदल गृहीत धरणे योग्य ठरणार नाही, तरीही दोघांच्या रणनीतीमध्ये सूक्ष्म मतभेद असल्याचे संकेत नक्कीच जाणवतात.
गुरुवारी सकाळी लंडनमधील इस्रायली दूतावासाचे प्रवक्ते अॅलेक्स गँडलर यांनी बीबीसीला सांगितले की, अमेरिका आणि इस्रायल इराणबाबतच्या बहुतांश उद्दिष्टांवर पूर्ण सहमत आहेत.
त्यांच्या मते, "इराणमधील इस्लामिक शासन, IRGC, तसेच त्यांच्या क्षेपणास्त्र आणि अणु कार्यक्रमांबद्दल अमेरिकेने उचललेल्या या पावलांबाबत आमची बहुतांश किंवा सर्व उद्दिष्टांवर पूर्ण सहमती आहे," आणि पुढे ते म्हणाले, "आम्हालाही त्याच गोष्टी हव्या आहेत." (थोडक्यात अमेरिका करत असलेल्या सर्व गोष्टींबद्दल आमचं तेच मत आहे)
मात्र, या सहमतीच्या वातावरणातही एक महत्त्वाचा फरक स्पष्ट दिसतो. इस्रायल इराणमध्ये शासनबदल साध्य करण्याच्या भूमिकेत अधिक ठाम आहे, तर अमेरिका त्याबाबत अधिक मोजून मापून पावले टाकत आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांनी साउथ पार्सवरील हल्ला हा इराणी शासनाची सत्ता ढासळवण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सांगितले.
येदीओथ अहरोनोथमधील एका अधिकाऱ्याचे स्पष्ट विधान होते: "नागरिकांना केला जाणारा गॅसपुरवठा बंद केला जात आहे, आणि त्यामुळे उठावाची वेळ अधिक जवळ येईल."
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इराणचे इस्लामिक शासन उलथवण्याची इच्छा दशकांपासून उघड आहे.
त्यांना आणि मोठ्या प्रमाणावर इस्रायली लोकांना, इराणचे हे शासन यहूदी राष्ट्राचा नाश करण्याच्या उद्देशाने प्रेरित वाटते. त्यामुळे इस्रायलने इराणी नेते, बासीज पॅरामिलिटरी युनिट्स आणि राज्य नियंत्रणाच्या घटकांवर लक्ष्य साधून अनेक गुप्त आणि थेट कारवाया केल्या आहेत.
त्याच्या तुलनेत, अमेरिकेचा लष्करी भर मुख्यतः इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमतेला कमकुवत करणे, त्यांचे नौदल निष्प्रभ करणे आणि अलीकडील दिवसांत गल्फ किनाऱ्यालगतचे लक्ष्य उद्ध्वस्त करणे यावर आहे म्हणजे राज्ययंत्रणेऐवजी लष्करी सामर्थ्य कमी करणे.
माजी अमेरिकन दूत डेविड सॅटरफील्ड यांनी सांगितले की दोन्ही देशांची उद्दिष्टे अत्यंत जवळची आहेत, पण फरक कधी थांबायचे यावर आहे.
त्यांच्या मते, "ते (ट्रम्प) असा मार्ग शोधण्याची इच्छा व्यक्त करतात, की ज्यामधून ते विश्वासार्ह पद्धतीने 'विजय' जाहीर करू शकतील… ते अवास्तव आणि अव्यवहार्य अशा शासनबदलाच्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करत नाहीत."
तर नेतन्याहूंच्या दृष्टीने, सॅटरफील्ड म्हणतात, इराणचा गोंधळात कोसळणारा ढाचा हे 'एक अपेक्षित उद्दिष्ट' आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)