आदित्य धर : क्रिकेटच्या पिचवर हुकलेली संधी ते फवाद खानमुळे भंगलेलं स्वप्न; 'धुरंधर' दिग्दर्शकाचा प्रवास

    • Author, यासिर उस्मान
    • Role, चित्रपट अभ्यासक
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

क्रिकेटच्या खेळपट्टीवर त्याच्या फिरकीची जादू चालली नाही पण प्रत्यक्षातल्या घटनांना 'फिल्मी स्पिन' देऊन तिकीट खिडकीवर यश मिळवण्याची त्याची जादू चालली. हा स्पिनर म्हणजे आदित्य धर.

आपण बोलतोय दिग्दर्शक आदित्य धरबद्दल. ज्याच्या 'धुरंधर द रिवेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचत आहे.

लंडनच्या एका थिएटरमध्ये मी हा सिनेमा पाहिला जे 'हाउसफुल' होतं. परदेशात हिंदी सिनेमासाठी अशी तुफान गर्दी आणि वेड आजही नेहमीचं नाहीये.

पण त्यापेक्षाही आणखी एक गोष्ट वेगळीच होती, ती म्हणजे जेव्हा सिनेमा संपला आणि पडद्यावर लेखक-दिग्दर्शक आदित्य धर यांचं नाव झळकलं, तेव्हा अख्खं थिएटर टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेलं.

हा क्षण यासाठी ही खास होता कारण आपल्याकडे व्यावसायिक सिनेमासाठी सहसा टाळ्या फक्त मोठ्या कलाकारांसाठीच वाजतात, लेखक किंवा दिग्दर्शकासाठी नाही. पण या बदलाच्या केंद्रस्थानी आहे आदित्य धर, ज्याने धुरंधरचं हे जग पडद्यावर जिवंत उभं केलं.

धुरंधरची गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे पण हा चित्रपट बनवणाऱ्या आदित्य धरची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का?

ही कहाणी आहे अशा एका मुलाची ज्याचं स्वप्न होतं क्रिकेटच्या खेळपट्टीवर आपल्या फिरकीने बॅट्समनला चकवायचे.

1983 मध्ये दिल्लीत एका काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या आदित्यची आई दिल्ली विद्यापीठात कार्यरत होती. दिल्लीतच आदित्यचं शिक्षण झालं आणि इथेच त्याला क्रिकेटचं वेड लागलं.

एक 'स्पिनर' म्हणून भारतीय क्रिकेट टीमची जर्सी अंगावर चढवण्याचं स्वप्न त्याने वर्षानुवर्षे उराशी बाळगलं. पण जेव्हा अंडर-19 वर्ल्ड कपच्या टीममध्ये त्याची निवड होऊ शकली नाही तेव्हा मात्र क्रिकेटच्या या स्वप्नाला त्याने निरोप दिला.

आव्हानं फक्त क्रिकेटच्या मैदानापुरती मर्यादित नव्हती. डिस्लेक्सियामुळे अभ्यास करणे त्याच्यासाठी नेहमीच कठीण होते. 150 पानांची स्क्रिप्ट वाचणे कठीण होते तेव्हा ती लिहिणं ही लांबची गोष्ट होती.

पण पडद्यावर गोष्ट सांगायचं स्वप्न घेऊन, बरोब्बर 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये आदित्य धर मुंबईत दाखल झाला. सुरुवातीची 10 ते 12 वर्षे मात्र प्रचंड संघर्षात आणि अज्ञातवासात गेली.

गीतकार म्हणून पहिलं पाऊल आणि पहिलं यश

आदित्य धरचं पहिलं काम एक गीतकार म्हणून समोर आलं. 'यशराज फिल्म्स'च्या 'काबुल एक्सप्रेस' या सिनेमासाठी त्याने लिहिलेलं 'काबुल फिजा' हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं. याच काळात त्याने 'बूंद' या शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट आणि संवादही लिहिले ज्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.

त्यानंतर आदित्य यांनी अनेक सिनेमांच्या स्क्रिप्ट्स आणि आयडियाजवर काम केलं ज्यावर सुपरहिट सिनेमेही बनले. पण दुर्दैवानं त्या कामाचं क्रेडिट मात्र त्यांना कधीच मिळालं नाही. या कटू अनुभवांनी त्यांना पूर्णपणे हतबल आणि निराश केलं होतं.

2010 मध्ये आदित्य यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रियदर्शन यांच्यासोबत कामाला सुरुवात केली आणि व्यावसायिक फिल्ममेकिंगसह स्क्रीन रायटिंगचे बारकावे शिकून घेतले. त्यांनी प्रियदर्शन दिग्दर्शित अजय देवगन-अक्षय खन्ना यांच्या 'आक्रोश' (2010) सिनेमाचे संवादही लिहिले ज्यासाठी त्यांना रीतसर क्रेडिट ही मिळालं.

प्रियदर्शन सांगतात, "भाषेवरची आदित्यची पकड जबरदस्त होती आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे."

प्रियदर्शन यांच्या हाताखाली जवळपास 3 वर्षं काम केल्यानंतर आदित्यला स्वतःचा चित्रपट बनवायचा होता. मग सुरू झाला अनेक वर्षांचा संघर्ष. अनेक प्रोजेक्ट्स सुरू झाले पण एकही सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. अखेर 2016 मध्ये एक चांगली बातमी मिळाली. करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन'मध्ये आदित्य यांना दिग्दर्शनाची पहिली मोठी संधी मिळाली.

सिनेमाचं नाव होतं 'रात बाकी'. यामध्ये कटरिना कैफ आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांची जोडी होती. शूटिंगची तयारी झाली होती, आदित्यही तयारीत होता. तयारीला लागले होते, पण पुन्हा नशीबाने पदरी निराशा टाकली.

18 सप्टेंबर 2016 जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि यात 17 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला.

राजकीय वातावरण तापलं आणि त्याचे पडसाद थेट बॉलिवूडमध्येही उमटले. निर्णय घेण्यात आला की आता भारतीय सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना साइन केले जाणार नाही.

आदित्य धर आणि करण जोहर यांच्या 'रात बाकी'तून फवाद खानला वगळण्यात आलं. त्याच्या जागी दुसरा हिरो घेण्यात येईल अशा बातम्या येऊ लागल्या. काही महिन्यानंतर शेवटी चित्रपटाचे काम बंद करण्यात आले.

आदित्यच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला फळ आलं नाही.

चित्रपट अर्धवट राहिला पण त्याच अपयशातून जन्माला आली पुढची सुपरहिट कथा

ज्या उरी हल्ल्यामुळे आदित्यचा पहिला सिनेमा थांबला होता त्याच घटनेने आणि नंतरच्या सर्जिकल स्ट्राइकने त्याला नवी कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

आदित्यने एका मुलाखतीत सांगितलं होतं, 'रात बाकी' हा सिनेमा जेव्हा बंद झाला तेव्हा मी खचलो नाही. उलट उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने मला नवी कहाणी सुचली. मला वाटलं की यावर चित्रपट यायला हवा. माझ्या जवळ जे होतं नव्हतं ते लावून रिसर्च सुरू केला. पत्रकार, लष्करी अधिकारी आणि संरक्षण तज्ज्ञांच्या गाठीभेटी घेतल्या. अपयशाची भीती तर मनात होतीच पण स्वतःला सिद्ध करण्याचा ध्यास त्याहून अधिक होता."

जवळपास सहा महिन्यांच्या तयारीनंतर आदित्य धरने अवघ्या 12 दिवसांत 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'ची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली.

2019 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या या वर्षातला सरप्राईज ब्लॉकबस्टर बनला आणि आदित्यचं नाव मोठ्या दिग्दर्शकांच्या यादीत आलं.

सिनेमातला 'हाऊज द जोश?' हा संवाद फक्त थिएटरपुरता मर्यादित राहिला नाही तर तो थेट राजकीय सभांमध्ये देखील ऐकू येऊ लागला.

सिनेमाच्या दिग्दर्शनाचं कौतुक झालं. पण दुसरीकडे काही समीक्षकांनी याला सरकारी प्रोपगंडा म्हटलं. या सिनेमाला 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील सामील होता.

फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श म्हणतात, "आदित्य धरने वास्तविक जीवनातून प्रेरणा घेतलेले प्रसंग आणि मनोरंजन करणारा चित्रपट यात कमालीचे संतुलन साधले आहे. हे संतुलन मिळवणे मोठी गोष्ट आहे कारण मुख्य प्रवाहातील सिनेमात सर्व काही वास्तववादी आणि डार्क असेल तर तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं कठीण आहे.

"उरी आणि विशेषतः 'धुरंधर 1 आणि 2' ची कामगिरी पाहिली तर केवळ भारतच नाही, तर अमेरिका, कॅनडा आणि युकेमधील प्रेक्षकही या चित्रपटाशी रिलेट करत आहे आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला जातोय."

याच चित्रपटामुळे आदित्य धरला स्वतःच्या वेगळ्या शैलीतील सिनेमा बनवण्यासाठी यशस्वी फॉर्म्युला मिळाला तो म्हणजे खऱ्या घटनांवर आधारित पॉलिटिकल थ्रिलर बनवणे. आदित्यने आपल्या बी-62 स्टुडिओज या प्रोडक्शन कंपनीची सुरुवात केली.

'आर्टिकल 370' आणि 'बारामूला' या चित्रपटाचे लेखन आदित्यने केले आहे. यामध्येही भारतातील वास्तविक घटनांची झलक पाहायला मिळते.

हे दोन्ही चित्रपट देखील प्रोपगंडा असल्याचे आरोप झाले, पण भावनात्मक बाजू आणि फिल्ममेकिंगचं कौशल्य या दोन गोष्टींचं प्रेक्षकांनी कौतुक केलं.

पण दिग्दर्शक म्हणून पुन्हा मैदानात उतरताना आदित्य धरने जो विषय निवडला तो मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी होता. पाकिस्तानातील गँगवार, तिथलं राजकारण, दहशतवाद आणि या सर्वांत भारताचा एक गुप्तहेर.

धुरंधरमध्ये हिरो म्हणून त्याने रणवीर सिंहला साइन केले. त्यावेळी रणवीर त्याच्या करिअरमधील खडतर काळातून जात होता. '83', 'जयेशभाई जोरदार' आणि 'सर्कस' सारखे सिनेमे फ्लॉप ठरले होते. फिल्मचं बजेट आणि इतर आव्हाने असून आदित्य आणि रणवीर आपल्या ध्यासाने धुरंधर बनवत गेले.

'धुरंधर' एकाच चित्रपटाप्रमाणे शूट झाला होता, पण रिसर्च आणि कथा एवढी मोठी होती की त्यांना वाटलं हे दोन चित्रपट आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यात आला की दोन पार्ट्स वेगवेगळे रिलीज होतील. हा धाडसी निर्णय होता, पण आदित्य धरचा आत्मविश्वास कामी आला आणि चित्रपटाच्या यशाने इतिहास रचला. धुरंधर-2 हा हिंदी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या वाटेवर आहे.

चित्रपट समीक्षक मयंक शेखर म्हणतात, "असं वाटतं की आदित्य धरकडे सरकारी यंत्रणांच्या गुपितांपर्यंत पोहोचण्याचा एक थेट अॅक्सेस आहे. अशा काही गोष्टी ज्यांच्याबद्दल मोठे नेते, सनदी अधिकारी किंवा अनुभवी पत्रकारांनाही पूर्णपणे ठाऊक नसतं, त्या देखील त्याला माहित असतात. या गोष्टींच्या सहायाने तो भारताच्या मोठ्या गुप्त मोहिमांच्या पडद्यामागच्या कथा विणतात. 'उरी' असो, 'आर्टिकल 370' असो वा आताचे धुरंधरचे दोन्ही भाग, प्रत्येक वेळी त्यांच्या कामात हाच खास पॅटर्न दिसून येतो."

"फिक्शनची सर्वात मोठी ताकद हीच असते की ते सुरुवातीला सत्य वाटलं पाहिजे. आणि याबाबत ते सुरुवातच तगडी करतात. कराचीच्या 'ल्यारी'सारख्या अंडरवर्ल्ड भागांपासून ते दाऊद इब्राहिम, नवाझ शरीफ किंवा 'मिस्टर 10 परसेंट' यांसारख्या संदर्भांपर्यंत, ही सर्व ओळखीची नावं आणि ठिकाणं कथेला वास्तवाच्या अगदी जवळ घेऊन जातात."

"हेच ते समीकरण आहे जिथे कल्पना आणि वास्तव यांच्यातील सीमा धूसर होतात आणि चित्रपटाला वजन देतात."

आदित्य धरचे चित्रपट प्रोपगंडा असतात का?

मोठ्या यशानंतरही धुरंधर-2 वर प्रोपगंडा चित्रपट असल्याचे आरोप होतो. देशभरातील चित्रपट समीक्षक, संस्कृती आणि राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या मतांमध्ये विभागलेले दिसत आहेत.

दशकांपासून जेम्स बॉन्ड किंवा मिशन इम्पॉसिबलसारख्या चित्रपटांमधून अमेरिकन किंवा ब्रिटिश गुप्तहेर धुरंधरप्रमाणेच अ‍ॅक्शनने भरलेली गुप्तहेरगिरी करत आले आहेत, पण त्यावर अशी चर्चा झालेली नाही.

प्रत्यक्षात मुख्य प्रवाहातील स्पाय थ्रिलर चित्रपट नेहमी त्या-त्या काळातील मोठे मुद्दे जसे राष्ट्रवाद, सुरक्षा आणि सीमेपलीकडील तणाव यांना आपल्या कथेत सामावून घेतात.

चित्रपट केवळ मनोरंजन नसतात, तर ते आपल्या काळाची कथा आणि लोकांच्या विचारांचे प्रतिबिंबही असतात. त्यामुळे 'भारतीय प्रेक्षक काय पाहू इच्छितो' आणि 'प्रोपगंडा' यावरील चर्चा सतत सुरू आहे. ही चर्चा आणि वादविवाद गरजेचे आहेत. यातून हे समजतं की देशातील लोकांनी विचार करणे, प्रश्न विचारणे आणि स्वतःची मतं बनवणे सोडलेले नाही.

चित्रपट समीक्षक मयंक शेखर म्हणतात, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, चित्रपटांच्या संदर्भात 'प्रोपगंडा' हा शब्द मी स्वतःमध्ये नकारात्मक किंवा अपमानास्पद मानत नाही, जोपर्यंत अगदी उघडपणे आक्षेपार्ह नाही, जसं की 'द केरला स्टोरी'च्या बाबतीत दिसलं. धुरंधरमध्ये 2016 च्या नोटबंदीनंतरच्या राजकारणाशी संबंधित काही संदर्भ आहेत, जे सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनाशी जवळचे वाटतात."

" लक्षवेधक गोष्ट म्हणजे चित्रपटात आयएसआयचा प्रभाव भारतात बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात दाखवला आहे. पण शेवटी कथा पूर्णपणे द्वेषावर आधारलेली नाही. हमझा आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्पष्टपणे सांगतो की त्याला पाकिस्तान्यांशी नाही, तर दहशतवाद्यांशी समस्या आहे, आणि कदाचित हीच ओळ संपूर्ण कथेला मानवी संतुलन देते."

स्वतः आदित्य धरने एका पत्रकार परिषदेत या आरोपांना उत्तर देताना म्हटले होते, "जे लोक याला प्रोपगंडा म्हणतात, त्यांची मला काहीही पर्वा नाही. खरं सांगायचं तर मला त्यांची चिंता नाही. कारण मला माहित आहे हे कुठून येत आहे, आणि भारतीय प्रेक्षक खूप समजदार आहेत. जेव्हा ते चित्रपट पाहतात, तेव्हा त्यांना सहज समजते की कोणता चित्रपट प्रोपगंडा आहे आणि कोणत्या चित्रपटाचा हेतू योग्य आहे."

"आणि माझ्या चित्रपटाबाबत, जोपर्यंत मी निर्माता किंवा दिग्दर्शक आहे, तोपर्यंत त्याचा हेतू नेहमी योग्य राहील. ज्या दिवशी माझी हेतू योग्य राहणार नाही, त्या दिवशी मी चित्रपट बनवणे थांबवेन."

आदित्य धरने देशातील वातावरणानुसार एक यशस्वी फॉर्म्युला तयार करत तांत्रिक भव्यतेसह आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. पण हेही खरे आहे की धुरंधरमध्ये त्याने अनेक दृश्यांमध्ये तथ्यांमध्ये बदल केले आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली एक नवे वास्तव उभे करण्याचा प्रयत्न केला.

यशासोबत जबाबदारी देखील येते. कॅमेऱ्याचे तथ्य आणि कल्पना यात एक सूक्ष्म रेषा आहे. त्या रेषेचा आदर करण्याची जबाबदारी ही चित्रपट दिग्दर्शकावर असते. जी व्यक्ती ही रेषा ओलांडेल ती व्यक्ती इतिहासाला प्रश्नांचे उत्तर देण्यास जबाबदार ठरते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.