गुप्तहेर मंत्री इस्माईल खातिब यांच्या मृत्यूला इराणचा दुजोरा, काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान?

इराणने गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांच्या मृत्यूची अद्याप पुष्टी केलेली नाही (फाइल फोटो)

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock

फोटो कॅप्शन, इस्माईल खातिब
वाचन वेळ: 4 मिनिटे

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी त्यांचे गुप्तहेर मंत्री इस्माईल खातिब मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

याआधी इस्रायलनं, काल रात्री करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात खातिब मारले गेल्याची माहिती दिली होती.

एक्स या सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे, "माझे प्रिय सहकारी इस्माईल खातिब, अली लारिजानी आणि अजीज नासिरजादेह यांची भ्याड हत्या करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे आम्हाला तीव्र दु:ख झालं आहे."

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "मंत्रिमंडळातील दोन सदस्य, शूराचे सचिव, लष्करी आणि बासिज कमांडरांच्या हौतात्म्याबद्दल मी इराणच्या जनतेप्रति माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो."

इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी लारिजानी आणि देशाचे संरक्षण मंत्री नासिरजादेह यांच्या मृत्यूची पुष्टी आधीच करण्यात आलेली आहे.

याआधी, इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब मारले गेल्याचा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी केला होता.

काट्झ म्हणाले की, "काल रात्री इराणचे गुप्तचर मंत्री खातिब यांनादेखील मारण्यात आलं आहे."

इस्रायलमधील प्रसारमाध्यमांनी संरक्षण मंत्रालयातील सूत्रांचा संदर्भ देत आधीच सांगितलं होतं की इस्माईल खातिब यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.

इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी 2021 मध्ये गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब यांची नियुक्ती केली होती.

खातिब यांनी अनेक मोठ्या धर्मगुरूंकडून इस्लामिक कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. यात इराणचं दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही समावेश होता.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयानं 2022 मध्ये खातिब यांच्यावर 'अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या विरोधातील सायबर कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या' कारणावरून निर्बंध घातले होते.

जगातल्या सर्वांत मोठ्या गॅस फील्डवर हवाई हल्ला; इराणच्या माध्यमांचा दावा

इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर असलेल्या पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सवर हवाई हल्ला झाला आहे. 'तस्नीम' वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. ही वृत्तसंस्था इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी)शी संबंधित आहे.

साऊथ पार्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, साऊथ पार्स

साऊथ पार्स हे जगातील नैसर्गिक वायूचं सर्वात मोठं फील्ड म्हणजे साठा असलेलं क्षेत्र आहे. त्यावर इराण आणि कतार आपापले प्रकल्प चालवतात. तस्नीमनं दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला बुधवारी (18 मार्च) झाला आहे.

फार्स न्यूज एजन्सीनं वृत्त दिलं की तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील काही गॅस रिझर्व्हायर (वायूचे साठे) आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं.

बीबीसी फारसीनुसार, असालूयेहचे गव्हर्नर इस्कंदर पासालार म्हणाले की "शत्रूच्या हल्ल्यांमुळे साऊथ पार्सचे अनेक भाग प्रभावित झाले आहेत."

वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. बचाव पथक आणि अग्निशमन दल आग विझवण्याचं काम करत आहेत.

सुरक्षा प्रमुख लारिजानी यांचा मृत्यू

याआधी, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी मारले गेले. इराणने एका अत्यंत अनुभवी आणि प्रभावशाली नेत्याला गमावलं आहे. ते देशाच्या मोठ्या निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. अशा गंभीर काळात त्यांचा मृत्यू इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लारिजानी हे लष्करी कमांडर नव्हते, परंतु इराणचे धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते देशाची धोरणं आणि योजना ठरवणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक होते.

सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव म्हणून ते युद्ध, परराष्ट्र संबंध (मुत्सद्देगिरी) आणि देशाच्या सुरक्षेसंबंधी मोठ्या निर्णयांच्या केंद्रस्थानी होते.

त्याचं मत सरकारमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जायचं. विशेषतः अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेला तणाव आणि संघर्ष हाताळताना त्यांचा मोठा प्रभाव होता.

अमेरिकेनं इराणवर टाकला बंकर बस्टर बॉम्ब, किती धोकादायक आहे असतं हे शस्त्र?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची म्हणाले की इराणला शस्त्रसंधी नको आहे. तर त्यांना 'युद्धाचा कायमस्वरुपी शेवट' हवा आहे.

बीबीसी फारसीनुसार, अरागची अल जजीरा या अरब टेलीव्हिजन नेटवर्कवरून तेहरानमध्ये म्हणाले, "आम्हाला शस्त्रसंधी नको आहे. कारण काही काळानं याच परिस्थितीची पुनरावृत्ती व्हावी असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला युद्ध पूर्णपणे आणि कायमस्वरुपीपणे संपायला हवं आहे."

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्या तब्येतीबद्दल अरागची म्हणाले, "माझ्या माहितीनुसार, सर्वोच्च नेत्यांना फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. ते पूर्णपणे व्यवस्थित आहेत. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे."

ते असंही म्हणाले की अमेरिका या युद्धात 'इस्रायलच्या सांगण्यावरून' आणि 'चुकीचा अंदाज' बांधत सहभागी झाली.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या किनाऱ्यालगतच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील क्षेपणास्त्र तळांवर बंकर बस्टरचा वापर करण्यात आला (फाइल फोटो).

फोटो स्रोत, USAF

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या किनाऱ्यालगतच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील क्षेपणास्त्र तळांवर बंकर बस्टरचा वापर करण्यात आला (फाइल फोटो).

अरागची म्हणाले, "जे लोक आम्हाला विनाअट पराभव स्वीकारण्यास सांगत होते, त्याच लोकांना आता होर्मुझची सामुद्रदुनी खुली व्हावी म्हणून त्यांच्या शत्रूंकडून मदत मागावी लागते आहे."

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी युरोपियन देशांसह इतर देशांना युद्धनौका पाठवण्याचं आवाहन केलं होतं. अर्थात मंगळवारी (17 मार्च) ते युरोपियन देशांवर टीका करत म्हणाले होते की आम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.