झोपेत बोलणं किंवा चालणं, हा खरंच काही आजार आहे का?

    • Author, इफ्तिखार अली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

तुमच्यासोबत कधी असं झालंय का की, शेजारी झोपलेली व्यक्ती अचानक झोपेतच बडबडायला लागली किंवा चक्क उठून चालायला लागली?

अशा लोकांना इंग्रजीमध्ये 'स्लीप टॉकर' म्हणतात.

कधीकधी ही झोपेतली बडबड इतकी विचित्र किंवा काही वेळा वैयक्तिक असते की, ऐकणाऱ्याचा उगाच गैरसमज होतो आणि नात्यात कटकटीही सुरू होतात.

वैद्यकीय भाषेत याला 'सोम्निलोकी' (Somniloquy) असं म्हणतात.

खरंतर झोपेत असं बडबडणं फक्त दुसऱ्याची झोपमोड करत नाही, तर ते बोलणाऱ्याच्या आरोग्याबद्दलही बरंच काही सांगून जातं.

काही लोक तर फक्त बोलत नाहीत, तर बोलता बोलता झोपेतच हातपाय हलवायला लागतात किंवा जोरात ओरडतात किंचाळतात.

झोपेत बोलण्यासोबतच काहींना झोपेत चालण्याचीही सवय असते. खरं सांगायचं तर झोपेत बोलण्यापेक्षा झोपेत चालणं हे जास्त धोकादायक ठरू शकतं. कारण अशा वेळी इजा होण्याची भीती जास्त असते.

आता प्रश्न पडतो की नक्की असं का होतं? आणि यावर काय उपाय करता येतील?

चला तर मग यामागची कारणं आणि काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

झोपेत बडबडणं

खरं तर जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारची सुरक्षा यंत्रणा सक्रिय असते.

स्वप्नात तुम्ही कोणाशी तरी भांडत असाल, तर प्रत्यक्षात तुमचे हात-पाय चालू नयेत किंवा तुम्ही ओरडू नये यासाठी हा मेंदूचा 'कंट्रोल' असतो.

पण ही सिस्टीम काही प्रत्येक वेळी 100 टक्के परफेक्ट नसते. मेंदूचा स्वतःच्या यंत्रणेवरचा ताबा काही क्षणांसाठी सुटतो.

याच कारणामुळे झोपेत बडबडणं, विव्हळणं किंवा कन्हणं, स्पष्टपणे बोलणं आणि कधीकधी झोपेत चालण्याचे प्रकारही घडू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, झोपेत बोलणे किंवा हातवाऱ्याचा संबंध अनेक शारीरिक आणि मानसिक कारणांशी असू शकतो.

तणाव, नैराश्य, अपुरी झोप, दारूचं सेवन आणि ताप यांसारख्या स्थितींमुळे झोपेत बोलण्याची शक्यता वाढू शकते.

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे डॉक्टर मोहसिन वली म्हणतात की, झोपेत बोलणं हे सामान्यतः कोणत्याही मोठ्या आजाराचं लक्षण नसतं. पण याचा संबंध मानसिक तणावाशी असू शकतो.

ते सांगतात, "जे लोक खूप टेन्शन घेतात किंवा दिवसभराच्या कामाचा खूप जास्त विचार करतात त्यांच्यात झोपेत बोलण्याचे प्रकार जास्त दिसतात. असे लोक मग दिवसभर डोक्यात असलेल्या गोष्टीच झोपेत बोलायला लागतात."

यात झोपलेली व्यक्ती काहीही बडबड करू शकते आणि कधी कधी स्वप्नात भीती वाटली तरीही ती बोलायला लागते.

डॉक्टरांच्या मते, यावर वेगळं असं कोणतंही औषध नसतं. हे नक्की कोणत्या कारणामुळे होतं हे समजून घेणं जास्त गरजेचं असतं.

झोपेत बोलताना आपण जी वाक्यं बोलतो ती व्याकरणाच्या बाबतीत बऱ्याचदा अगदी बरोबर असतात. जणू काही ती व्यक्ती जागीच आहे.

कधी कधी आपल्यासोबत नुकत्याच घडलेल्या गोष्टी किंवा अनुभव झोपेत बाहेर येतात, तर कधी कधी ही बडबड इतकी विचित्र असते की त्याचा काही अर्थच लागत नाही.

बहुतेक वेळा झोपेत बोलणं हा काही आजार नसतो. पण मनावर खूप ताण असेल, टेन्शन आलं असेल किंवा काही मानसिक दडपण असेल तर असं बोलण्याचं प्रमाण वाढू शकतं.

मेट्रो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. सोनिया लाल गुप्ता सांगतात की, रात्री झोपेत बोलणं ही एक कॉमन गोष्ट आहे. हे खास करून लहान मुलांमध्ये जास्त दिसते. पण जर हे खूपच जास्त वाढलं, तर मात्र त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

झोपेत चालणं

झोपेत चालणं खूपच धोकादायक ठरू शकतं. अमेरिकेच्या लुईझियाना राज्यात राहणारी 10 वर्षांची पेटन नावाची मुलगी 14 सप्टेंबर 2024 च्या रात्री झोपेतच घराबाहेर पडली आणि चालत-चालत थेट जंगलात जाऊन पोहोचली.

मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच घरच्यांनी पोलिसांना कळवलं आणि तिचा शोध सुरू झाला. जेव्हा ती आसपास कुठेच सापडली नाही, तेव्हा तिला शोधण्यासाठी चक्क 'ड्रोन' कॅमेऱ्याची मदत घ्यावी लागली.

डॉक्टर मोहसिन वली सुद्धा हेच मानतात की, झोपेत बोलणं ही तशी सामान्य गोष्ट आहे, पण झोपेत चालण्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची भीती मात्र नक्कीच असते.

त्यांच्या मते, यात माणूस खरंच झोपेतून उठून चालायला लागतो आणि त्याला स्वतःला ते कळतही नसते. अशा वेळी पडण्याचा मोठा धोका असतो. त्यात जर कोणी गच्चीवर झोपलं असेल, तर तिथून खाली पडण्याची भीतीही असते.

डॉक्टर वली यांनी ते स्वतः जेव्हा विद्यार्थी होते तेव्हाचा एक किस्साही सांगितला. 1968 मध्ये हायस्कूलमध्ये असताना त्यांना परीक्षेत सायन्सचा पेपर द्यायचा होता. त्या टेन्शनमुळे ते रात्रभर खूप दडपणाखाली होते. झोपेतच पहाटे 4 च्या सुमारास ते उठून चालायला लागले होते, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना वेळेत रोखलं.

तज्ज्ञांच्या मते, आपली रात्रीची झोप ही वेगवेगळ्या टप्प्यांतून पूर्ण होत असते.

जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा सुरुवातीला आपल्याला हलकी झोप लागते. साधारण 20 मिनिटांनंतर ही झोप हळूहळू गाढ होऊ लागते.

त्यानंतर काही वेळासाठी झोप पुन्हा थोडी हलकी होते आणि मग माणूस अतिशय गाढ झोपेत जातो ज्याला 'रॅपिड आय मूव्हमेंट' (REM) असं म्हणतात.

झोपेचे हे सर्व टप्पे रात्रभरात अनेक वेळा फिरत राहतात. प्रत्येक वेळेला या 'आरईएम' म्हणजेच अतिशय गाढ झोपेचा काळ वाढत जातो आणि सकाळी जाग येईपर्यंत हेच चक्र सुरू राहतं.

आपण सगळ्यात जास्त स्वप्नं याच 'आरईएम' झोपेत पाहतो. या वेळी आपलं शरीर एकदम सैल पडलेलं असतं जेणेकरून स्वप्नात आपण जी हालचाल करतोय ती प्रत्यक्षात होऊ नये.

पण जेव्हा मेंदू आणि शरीराचा ताळमेळ बिघडतो तेव्हा झोपेत चालण्याचे प्रकार घडतात.

ही अवस्था म्हणजे एकप्रकारचा गोंधळच असतो. कारण यात मेंदू शरीराला 'चाल' असे सिग्नल देण्याइतका जागा असतो, पण त्या व्यक्तीची झोप उडेल इतका तो पूर्ण जागा नसतो.

इटलीतल्या मिलानमधील निगुआर्डा हॉस्पिटलमध्ये यावर एक संशोधन झाले.

त्यात असं दिसून आलं की, झोपेत चालणाऱ्या लोकांच्या मेंदूचे काही भाग चक्क जागे असतात, तर उरलेला मेंदू मात्र गाढ झोपलेला असतो.

नेमकी काळजी कधी करायची?

डॉ. सोनिया लाल गुप्ता यांच्या मते, झोपेत बोलण्यामुळे फारसं टेन्शन घेण्याची गरज नसते.

त्या सांगतात, "झोपेत बडबडणाऱ्या लोकांना सकाळी उठल्यावर आपण रात्री काय बोललो हे सहसा आठवतच नाही. विशेषतः मुलांच्या बाबतीत कोणत्याही उपचारांची गरज पडत नाही. कारण वय वाढतं तसं हे आपोआप बंद होतं."

पण मोठ्या माणसांच्या बाबतीत मात्र झोपेत बोलण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतोय का हे पाहणं जास्त गरजेचं असल्याचं डॉक्टर गुप्ता सांगतात.

"जर एखाद्या व्यक्तीला वारंवार झोपेत बोलण्याचा, ओरडण्याचा किंवा हिंसक हालचाली करण्याचा त्रास होत असेल आणि त्यामुळे त्याची झोप मोड होत असेल, तर यामागचं नेमकं कारण शोधणं गरजेचं आहे," असंही त्या नमूद करतात.

डॉक्टर वली यांच्या मते, आजकाल समाजात अनेक लोक अपुऱ्या झोपेच्या समस्येला तोंड देत आहेत. काही लोकांमध्ये 'ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया' (Obstructive Sleep Apnea) नावाचा आजारही आढळतो.

यात झोपेत असताना मेंदूपर्यंत ऑक्सिजन नीट पोहोचत नाही. त्यामुळे मेंदूवर ताण येतो.

त्यांचं असंही म्हणणं आहे की, झोपेत चालणं किंवा बोलणं हे अति विचार, अपुरी झोप, चिंता किंवा एखाद्या आजारपणानंतरही सुरू होऊ शकतं.

उपाय आणि उपचार

झोपण्याची वेळ नक्की नसणं किंवा सततचं टेन्शन यामुळेही तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.

डॉक्टरांच्या मते, फक्त काही गोष्टींत सुधारणा केली, तरी ही समस्या दूर होऊ शकते.

झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी डॉ. सोनिया लाल गुप्ता काही खास टिप्स देतात.

त्या सांगतात, "तुमच्या झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ अगदी फिक्स असली पाहिजे. दुपारी 3 वाजेनंतर चहा किंवा कॉफी घेणं टाळा आणि रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल फोनचा वापर अजिबात करू नका."

"जर एखादी व्यक्ती खूप जास्त मानसिक दडपण घेऊन झोपत असेल आणि हा त्रास दिवसेंदिवस वाढतच असेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे," असं नमूद करतात.

डॉ. गुप्ता पुढे असंही सांगतात की, जर एखादी व्यक्ती झोपेतच जोडीदाराला लाथ मारण्यासारखी हिंसक हालचाली करत असेल, तर हे एखाद्या मज्जासंस्थेशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं.

त्यांच्या मते, "लहान मुलांमध्ये झोपेशी संबंधित अशा तक्रारी जास्त प्रमाणात दिसतात. कारण त्यांचा मेंदू अजून पूर्णपणे विकसित झालेला नसतो. पण जर मूल दिवसा खूप जास्त झोपत असेल किंवा शाळेत त्याला वारंवार डुलक्या येत असतील, तर मात्र ही चिंतेची बाब आहे आणि त्याची तपासणी करणं गरजेचं आहे."

डॉक्टर वली म्हणतात की, यावर कोणताही थेट औषधोपचार नाही. अशा वेळी सहसा मानसोपचार तज्ज्ञांशी बोलणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

ते पुढे सांगतात की, रात्रीच्या वेळी आपल्या शरीरात 'मेलेटोनिन' नावाचं संप्रेरक तयार होतं. जर खूपच गरज भासली, तर डॉक्टर स्वतःच्या देखरेखीखाली मेलेटोनिनची औषधं देऊ शकतात.

विशेष म्हणजे या सर्व प्रकारांमुळे स्मरणशक्तीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)