You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेचा 'यू व्हिसा' मिळवण्यासाठी 11 गुजरातींनी घडवून आणला खोटा दरोडा; काय आहे प्रकरण?
अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI ) 11 गुजराती लोकांना अटक केली आहे. 'यू व्हिसा' मिळवण्याचा कथित कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागानं म्हटलं आहे की, अमेरिकेचं नागरिकत्व मिळावं यासाठी या लोकांनी स्टोअर्समध्ये 'बनावट दरोड्यां'चा कट केला होता.
न्याय विभागाचं म्हणणं आहे की, हे सर्वजण अमेरिकेत 'बेकायदेशीरपणे' राहत होते.
इथे ही बाब लक्षात घेतली पाहिजे की, अमेरिकेत जर गुन्ह्यातील पीडितांनी त्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना मदत केली, तर त्यांना यू व्हिसा मिळतो. यामुळे मग त्या लोकांना नंतर ग्रीन कार्ड म्हणजे अमेरिकेचं नागरिकत्व मिळवणं सोपं होतं.
न्याय विभागानं असंही म्हटलं आहे की, गुन्ह्यातील पीडित, ज्यांना शारीरिक किंवा मानसिक छळाला सामोरं जावं लागतं. तसंच जे गुन्हे किंवा गुन्हेगारी कारवायांचा तपास करण्यामध्ये किंवा त्यावर खटला चालवण्यात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना मदत करतात, त्यांना विशेषकरून हे यू व्हिसा दिले जातात.
अमेरिकेतील यू व्हिसा काय आहे, तो मिळवण्याची प्रक्रिया काय आहे, त्यासाठी काय अटी आहेत आणि तो कोणाला मिळू शकतो, याबद्दल जाणून घेऊयात.
अमेरिकेतील यू व्हिसा काय आहे?
यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस)च्या वेबसाईटवर यू व्हिसाबद्दलची पूर्ण माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार, अमेरिकेत घडलेल्या गुन्ह्याच्या पीडितांना यू नॉन इमिग्रंट स्टेटससाठी अर्ज करता येतो. त्याला 'यू व्हिसा' असंही म्हणतात.
अमेरिकेत विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांमधील शारीरिक किंवा मानसिक छळाला सामोरं जावं लागलेल्या पीडितांना त्या गुन्ह्यांचा तपास करण्यात सरकारी अधिकाऱ्यांना मदत करता यावी यासाठी अमेरिकेत विशेष यू व्हिसा तयार करण्यात आला आहे.
हा व्हिसा एका विशेष कायद्याअंतर्गत तयार करण्यात आला आहे. त्याचा उद्देश कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना घरगुती हिंसाचार, लैंगिक हिंसाचार, परदेशी लोकांची तस्करी आणि इतर गुन्ह्यांचा तपास करण्यात मदत करण्याचा आहे.
अमेरिकेतील यंत्रणांना गुन्ह्याच्या पीडितांची मदत अधिक प्रभावीपणे करता यावी यासाठी यू व्हिसा तयार करण्यात आला आहे. मात्र कधीकधी त्याचा 'गैरवापर' केला जातो. 'हिंसेच्या बनावट किंवा खोट्या प्रकरणांद्वारे यू व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.'
यू व्हिसा कोणाला मिळू शकतो?
यूएससीआयएस वेबसाईटनुसार, पुढील व्यक्तींना यू व्हिसा मिळू शकतो -
- तुम्ही एखाद्या गुन्ह्याचे पीडित असू शकता.
- एखाद्या गुन्हेगारी कृत्यामुळे तुम्हाला लक्षणीयरित्या शारीरिक आणि मानसिक छळाला तोंड द्यावं लागलं असेल.
- तुमच्याकडे एखाद्या गुन्ह्याविषयी माहिती असेल. जर तुमचं वय 16 वर्षांखालील असेल किंवा जर तुम्ही एखाद्या अपंगत्वामुळे गुन्ह्याविषयी माहिती देऊ शकत नसाल, तुमचे आईवडील, पालक किंवा संरक्षक किंवा एखादा जवळचा मित्र जर तुमच्या वतीनं गुन्ह्याविषयी माहिती देऊ शकत असेल.
- गुन्ह्यांचा तपास करण्यास जर तुम्ही अमेरिकेतील तपास यंत्रणांना मदत केली असेल.
- हा गुन्हा अमेरिकेच्या हद्दीत घडलेला असला पाहिजे किंवा त्या गुन्ह्याद्वारे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन झालेलं असलं पाहिजे.
या व्हिसाअंतर्गत कोणत्या गुन्ह्यांचा समावेश होतो?
यू व्हिसा अंतर्गत समावेश करण्यात आलेले गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत.
अपहरण, चुकीच्या हेतूनं करण्यात आलेला स्पर्श किंवा लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेल, घरगुती हिंसाचार, खंडणी, बेकायदेशीर स्थानबद्धता किंवा ताब्यात ठेवणं, कोणत्याही वैद्यकीय कारणांशिवाय महिलांचं बाह्य जननेंद्रिय अंशत: कापणं किंवा काढून टाकणं किंवा शिवणं (एफजीएम), परदेशी कामगारांच्या कंत्राटात फसवणूक, ओलीस ठेवणं, विवाहबाह्य संबंध ठेवणं, हत्या, सदोष मनुष्यवध, न्यायप्रक्रियेत अडथळा आणणं, बलात्कार, वेश्याव्यवसाय, पाठलाग करणं, मानवी तस्करी आणि पुराव्यांशी छेडछाड करणं - यासारख्या गुन्ह्यांच्या पीडितांना यू व्हिसा मिळू शकतो.
यू व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 'फॉर्म I-918' भरावा लागतो.
यू व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या मुख्य व्यक्तीचं वय जर 21 वर्षांपेक्षा कमी असेल, तर ती व्यक्ती त्याच्या जोडीदाराच्या, मुलांच्या, पालकांच्या आणि 18 वर्षांखालील भावंडांच्या वतीनं देखील अर्ज करू शकते.
जर यू व्हिसासाठीचा मुख्य अर्जदार 21 वर्षांहून अधिक वयाचा असेल, तर त्याच्या जोडीदाराच्या आणि मुलांच्या वतीनं डेरिव्हेटिव्ह यू व्हिसासाठी अर्ज करता येतो. मुख्य अर्जदाराचा यू व्हिसासाठीचा अर्ज मंजूर झाल्यावरच, त्याचे कुटुंबीय डेरिव्हेटिव्ह यू व्हिसासाठी पात्र ठरतात.
यू व्हिसाचा कालावधी
यू व्हिसा मंजूर झाल्यानंतर, यू नॉन इमिग्रंट स्टेटस म्हणजे तात्पुरत्या स्वरुपाच्या वास्तव्यासाठीचा दर्जा 4 वर्षांपर्यत वैध असतो.
मात्र, विशिष्ट परिस्थितीत, यू व्हिसा धारकाला मुदतवाढ दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी विनंती केली तर, जर काही असामान्य परिस्थिती उद्भवली तर, जर दूतावासातील व्हिसासाठीच्या प्रक्रियेला विलंब होत असेल तर, किंवा जर ग्रीन कार्डसाठी केलेला अर्ज दाखल केल्यानंतर आपोआपच मुदतवाढीस पात्र ठरत असेल तर.
किती लोकांना यू व्हिसा मिळू शकतो?
यूएससीआयएस च्या वेबसाईटनुसार, यू व्हिसासाठीची वार्षिक मर्यादा, 10,000 आहे. म्हणजे वर्षभरात 10,000 यू व्हिसा देता येतात. ही मर्यादा मुख्य अर्जदारांसाठी आहे. त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी (जोडीदार, मुलं किंवा इतर अवलंबून व्यक्ती) मात्र कोणतीही मर्यादा नाही.
जर व्हिसासाठीची मर्यादा आधीच पूर्ण झाली असेल, तर अर्जदारांचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये केला जातो.
ग्रीन कार्डसाठी अर्ज
ज्या लोकांना यू व्हिसा मिळतो, ते काही विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकतात.
यासाठी, यू व्हिसाचा दर्जा मिळाल्यानंतर तुम्ही सलग किमान 3 वर्षे अमेरिकेत वास्तव्य करणं आवश्यक आहे.
तसंच यू व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही कायद्या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना मदत करण्यास नकार दिलेला नसावा.
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे जेव्हा मुख्य यू व्हिसाधारकाला ग्रीन कार्ड मिळतं. तेव्हा त्याचे कुटुंबीय ज्यांच्याकडे यू व्हिसा नाही, ते यू व्हिसा मिळण्यास पात्र ठरत नाहीत. मात्र, ते कायमस्वरुपी कायदेशीर वास्तव्यासाठी अर्ज करू शकतात.
अमेरिकेतील ताजी घटना काय आहे?
अलीकडेच, 11 भारतीयांवर (ते सर्व मूळचे गुजराती आहेत) अमेरिकेत 'फसवणूक करून यू व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा' आरोप ठेवण्यात आला आहे. या लोकांनी हेतूपूर्वक एका दुकानात 'सशस्त्र दरोडा' घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 'खोटा किंवा बनावट दरोडेखोर' दुकानात शिरला. त्यानं तिथला कर्मचारी आणि इतरांना बंदूक दाखवून 'धमकावलं'. त्यानंतर तो पैसे घेऊन दुकानातून पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली होती.
मात्र, पोलिसांच्या तपासातून समोर आलं की 'हा खरा दरोडा नव्हता, तर पूर्वनियोजित खोटा दरोडा होता.' हे लोक मॅसेच्युसेट्स, केंटकी आणि ओहायो या अमेरिकेतील राज्यांमध्ये 'बेकायदेशीरपणे' राहत होते.
अमेरिकेतील तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की, 'या लोकांच्या एका गटानं मॅसेच्युसेट्समधील दारूच्या दुकानांवर नाट्यमय दरोडे टाकले. यासाठी त्यांनी धमक्या आणि सीसीटीव्हीचा वापर केला. जेणेकरून दुकानातील कर्मचारी आणि दुकान मालकाला गुन्ह्याचे पीडित म्हणून व्हिसासाठी अर्ज करता येईल.'
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, संशयितांनी बनावट दरोडा टाकला किंवा दरोड्याचा बनाव तयार केला. जेणेकरून त्या दुकानात काम करणाऱ्यांना इमिग्रेशन अर्जावर ते गुन्ह्याचे पीडित असल्याचे 'खोटे दावे' करता येतील.
अमेरिकेत, 'व्हिसाच्या संदर्भातील फसवणुकी'बाबत कडक कायदे आहेत. अमेरिकेतील फेडरल किंवा केंद्रीय कायद्यानुसार, व्हिसाच्या फसवणुकीसाठी 5 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा, 3 वर्षांपर्यंत देखरेखीखालील सुटका (म्हणजे सुटकेनंतर समाजात अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं) आणि अडीच लाख डॉलर्सपर्यंतचा (जवळपास 2 कोटी 30 लाख 94 हजार रुपये) दंड होऊ शकतो.
ज्या गुजराती लोकांवर हे आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर त्यांच्या बाजूचा इथे समावेश केला जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)