You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ही मरणाच्या दिशेनं वाटचाल आहे', 8.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 697 झाडं तोडण्याचं प्रकरण काय?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"याच्याकडे बघितलं तर हे माणसाच्या आवाक्याच्या बाहेर असलेलं झाड आहे. आज आपण अशाप्रकारची झाडं लावून जगवू शकू, याची शक्यता नाहीये. झाडांचं हे जे मोठेपण आहे, ते माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे."
पर्यावरणप्रेमी रुपेश कलंत्री छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद रस्त्यावरील भलंमोठं वडाचं झाड दाखवत बोलत होते. या झाडासहित एकूण 697 झाडं तोडली जाणार आहेत. कारण सध्या दुपदरी असलेल्या या रस्त्याचं चौपदरीकरण केलं जाणार आहे.
नगर नाक्यापासून दौलताबादकडे निघाल्यावर रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू झालेलं दिसून येतं.
रस्ता रुंदीकरणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला शहरातील पर्यावरणप्रेमींनी विरोध केलाय.
रुपेश कलंत्री म्हणतात, "आपण विचार करतानाचा असा करायला लागलो की तुम्हाला रस्ता पाहिजे की झाड? तुम्हाला विकास पाहिजे की पर्यावरण? हे पाहिजे का ते, असं का असावं? हे आणि ते, याच्यासह ते, असं का असू नये?
"प्राथमिकता याला दिली पाहिजे की सगळी झाडं वाचतील आणि मग आम्ही रस्ता करण्याचं नियोजन करू."
'697 झाडे तोडणं म्हणजे मरणाच्या दिशेनं वाटचाल'
छत्रपती संभाजीनगरमधील नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट या साडेआठ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जी झाडं तोडली जाणार आहेत, त्यांच्यावर नंबरिंग करण्यात आलीय. पहिल्या एक किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय.
रस्त्यावर काही झाडं तोडलेली दिसून येतात. यात काही झाडे छोटी, तर काही मोठी आहेत.
अशाच एका तोडलेलया झाडाविषयी बोलताना महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य डॉ. किशोर पाठक म्हणतात, "आता हे एक झाड तोडलेलं आहे. तुमच्यासमोर आहे. हे झाड 35 वर्षाचं आहे. हे कमीतकमी दीड-दोन हजार लोकांना ऑक्सिजन देणारं झाड आहे. याच्यावर जैवविविधता राहते वेगवेगळी.
"सरडे, पाली, किटक, फुलपाखरांपासून, पक्ष्यांपर्यंत. हे सरडे तुमच्या शेतातले कीडे खातात. याच्यावर रात्री मुक्कामाला असलेले बगळे हे दिवसभर तुमच्या कचराकुंड्या साफ करतात. त्याच्यातले किडे खातात, खरकटं अन्न खातात."
रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 200 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालीय. एकूण 697 झाडं तोडली जाणार असून त्याच्या दहापट झाडं लावली जाणार आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी 70 वडाच्या झाडांचं पुनर्रोपन (रिप्लांट) करण्यात येणार आहे.
प्रमुख डॉ. बी.एल.चव्हाण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.
ते सांगतात, "जे साधारणत: 10 वर्षांपेक्षा अधिक वयाचं झाड आहे, त्या प्रत्येक झाडामागे वर्षाकाठी किमान एक-दोन माणसाला पुरेल इतका ऑक्सिजनची मात्रा पूर्ण होते. म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी झाडांचं अस्तित्व हे अतिशय पूरक आहे. त्यांचं नष्ट होणं म्हणजे ऑक्सिजनची कमतरता, जसं रुग्णांच्या बाबतीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ते मरणाकडं जातात, त्या धर्तीवर बोलायचं झाल्यास आपण त्याच दिशेनं वाटचाल करतो आहोत."
'हा भाग भकास होईल'
रस्त्याच्या कामाविषयी बोलताना छत्रपती संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय. वनविभाग आणि महापालिका अशा दोन विभागांच्या हद्दीत ही झाडं येतात. त्यातल्या वनविभागाअंतर्गत येणाऱ्या झाडांच्या वृक्षतोडीची परवानगी मिळालीय, तिथं वृक्षतोडीचं काम सुरू आहे.
"महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या झाडांबाबत हरकती होत्या. आयुक्तांनी त्यावर सुनावणी घेतलीय. अंतिम आदेश आल्यानंतर आमच्याकडून पुढची कार्यवाही केली जाईल. झाडं वाचवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. काही झाडं आम्ही रिप्लांट करणार आहोत, तर छोटी झाडं तोडणार आहोत."
सध्या या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्याप्रमाणावर झाडं आहेत, त्यांची सावली पडते आणि मग इथं अनेक छोटेछोटे विक्रेते फळांची विक्री करताना, कुणी ज्यूसची विक्री करताना दिसतं. यातल्या काही विक्रेत्यांशी आम्ही बोललो.
तर त्यांचं म्हणणं होतं की, जर का ही झाडं तोडल्या गेली तर आमच्या पोटावर पाय दिल्यासारखं होईल, यामुळे आमचं मरणच होईल. तर काहींचं म्हणणं होतं की, ही झाडं तोडली तर हा भाग एकदम भकास होऊन जाईल.
रुपेश कलंत्री पुढे म्हणतात, "एकीकडे पालिकेच्या सुनावणीमध्ये आम्हाला गुंतवून ठेवलं. वनविभागाची परवानगी घेऊन झाडं साफ करणं सुरू केलंय. असा कोणता विकास आहे की तुम्हाला लपूनलपून करावा लागतो?
"रस्ता नकोय असं कुणीही पर्यावरणप्रेमी म्हणणार नाही. त्याची जी काही गरज आहे ती पाहत असताना किती झाडं तुम्ही वाचवू शकता, हे बघणं गरजेचं आहे. आणि इथं वारसा झाडं आहेत. 300-300 वर्षं वय असावं."
प्रकरण NGT मध्ये दाखल
रस्ता चौपदरीकरणाच्या या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालीय की नाही, ते जाणून घेण्यासाठी अॅडव्होकेट निरंजन देशपांडे यांनी NGT म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर 18 मार्च रोजी सुनावणी पार पडणार आहे.
अॅड. निरंजन देशपांडे सांगतात, "जेव्हा कोणतीही प्लॅनिंग ऑथॅरिटी परमिशनसाठी अप्लाय करते तेव्हा त्यांना आधी इन्स्पेक्शन घ्यायला लागतं. ऑब्जेक्शन मागवायला लागतात. पब्लिक नोटीस द्यायला लागते. त्या अॅप्लिकेशन सोबत अल्टरनेट प्लॅन द्यायला लागतो. या सगळ्यांची पूर्तता झाली का, त्याबद्दल आम्हाला शंका आहे, त्यामुळे आम्ही वेळोवेळी आक्षेप घेतलाय."
सध्या अस्तित्वात असलेला दुपदरी रस्ता अरुंद असून त्यावर अपघात होतात, ट्रॅफिकही जाम होते. त्यामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाची गरज अधोरेखित केली जातेय.
तर, रस्त्याला विरोध नाही, पण वृक्ष पुनर्रोपणाचे प्रयोग यशस्वी होत नसल्याची पर्यावरणप्रेमींची तक्रार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)