You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहित पवारांनी 'ब्लॅक बॉक्स'बद्दल काय शंका उपस्थित केली? ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकतो का?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत अपघात झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. बारामतीतल्या या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला.
पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले, "अजितदादांचा अपघात आहे की घातपात हा प्रश्न अजूनही कायम आहे?"
"गरजेपेक्षा अधिक एवढं फ्युएल घेऊन बारामतीला जाण्याचं कारण काय? पुन्हा विमान इथे तिथे लँड करण्यापेक्षा आदळण्यात आलं असं आमचं म्हणणं आहे. फोन टिकले पण ब्लॅक बॉक्स नाही हे हास्यास्पद आहे. स्फोट झाल्यानंतर कागद जळले नाहीत अन् ब्लॅक बॉक्सला जळला."
"काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी करोडो रुपये खर्च करून एक लॅब ओपन केली. मग ब्लॅक बॉक्स बाहेर पाठवण्याचा काय कारण?" असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे.
रोहित पवार यांनी आजवर ब्लॅकबॉक्सवरुन केलेल्या आरोपांबद्दल डीजीसीए तसेच इतर सरकारी यंत्रणांनी माहिती दिल्यावर ती येथे अपडेट केली जाईल.
ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकतो का?
डिजीटल फ्लाईट डेटा रिकॉर्डर (DFDR) आणि वैमानिकांचा कॉकपिटमधील आवाज (CVR) रेकॉर्ड करणारं उपकरण याला सामान्य भाषेत 'ब्लॅक बॉक्स' म्हटलं जातं.
विमानाच्या उड्डाणापासून ते लॅंड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या 'ब्लॅक बॉक्स' मध्ये स्टोअर केला जातो.
विमानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला हा 'ब्लॅक बॉक्स' खरंतर काळ्या रंगाचा नसतो.
हा 'ब्लॅक बॉक्स' केशरी रंगाचा असतो. जेणेकरून विमान अपघातानंतर सहजतेने तपास अधिकाऱ्यांना ओळखता यावा.
म्हणूनच फार मोठा अपघात झाला तरी सहन करण्याची त्यात ताकद असते. गुरुत्वाकर्षणशक्तीच्या 3400 पट क्षमता असते. 11100 अंश सेल्सियस तापमान तासाभरापर्यंत सहन करू शकेल असे निकष ठरवण्यात आले आहेत.
समुद्र किंवा नदीत पडला तरी तो सुरक्षित राहावा यासाठी काळजी घेतलेली असते. तो समुद्रात किंवा कोणत्याही जलाशयात 6000 मीटर खोलीपर्यंत टिकू शकतो. समुद्रात सापडता यावा यासाठी त्यावर बिकन सिग्नल असतो तो पुढे तीस ते नव्वद दिवसांपर्यंत लोकेशन सिग्नल देऊ शकतो.
याचा अर्थ ब्लॅकबॉक्सला कधीच काही होत नाही का? तर ते तसं नाही. अतिशय तीव्र स्थितीत तो खराब होऊ शकतो किंवा तो नष्टही होऊ शकतो. मात्र तरिही जगात काही प्रयोगशाळांमध्ये तरीही त्यातील माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
दिल्लीमध्ये 'डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर लॅब' नावाची संस्था तयार करण्यात आली आहे. अशा संस्थांमध्ये क्षतिग्रस्त ब्लॅकबॉक्समधला डेटा मिळवला जाण्याचा प्रयत्न करतात.
अजित पवारांच्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला
नागरी उड्डाण मंत्रालयाने माहिती दिली आहे की, अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या अपघाताचा तपास वेगाने केला जात आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर आवश्यक बचाव आणि तपास यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. परिपूर्ण, पारदर्शक आणि वेळेवर तपास करणं ही आमची प्राथमिकता आहे."
"एएआयबी (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिग्नेशन ब्युरो), दिल्लीच्या तीन अधिकाऱ्यांची एक टीम आणि डीजीसीए, मुंबई प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांची एक टीम 28 जानेवारीला अपघातस्थळी पोहोचली. एएआयबीचे डायरेक्टर जनरलही त्याच दिवशी घटनास्थळी पोहोचले."
नागरी उड्डाण मंत्रालय निर्धारित वेळेत आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार तपास पूर्ण करायला कटीबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं.
हा तपास एएआयबी नियम, 2025 च्या नियम 5 आणि 11 अन्वये होईल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (28 जानेवारी) विमान अपघातात मृत्यू झाला. बारामतीच्या विमानतळावर लँडिंग करताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला होता.
विमानातील कॉकपिटमध्ये होणारी चर्चा ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होत असते. त्यामुळे कोणत्याही विमान दुर्घटनेबाबत जेव्हा तपास केला जातो, तेव्हा ब्लॅक बॉक्सची भूमिका महत्त्वाची असते.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
डिजीटल फ्लाईट डेटा रिकॉर्डर (DFDR) आणि वैमानिकांचा कॉकपिटमधील आवाज (CVR) रेकॉर्ड करणारं उपकरण याला सामान्य भाषेत 'ब्लॅक बॉक्स' म्हटलं जातं.
विमानाच्या उड्डाणापासून ते लॅंड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या 'ब्लॅक बॉक्स' मध्ये स्टोअर केला जातो.
मुंबईतील पायलट अमोल यादव बीबीसीशी बोलताना सांगतात, "डिजीटल फ्लाईट डेटा रिकॉर्डरमध्ये विमानातील प्रत्येक साधनाची माहिती डिजीटल पद्धतीने रेकॉर्ड करण्यात येते."
विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. तर, ब्लॅक बॉक्स च्या मदतीने तपास अधिकाऱ्यांना विमानाचा प्रवास, अपघातासाठी काही तांत्रिक कारण जबाबदार आहेत का? नक्की काय घडलं होतं याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ब्लॅक बॉक्स एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. विमान दुर्घटनेनंतर शेपटीला कमी मार लागतो, म्हणून ब्लॅक बॉक्स शेपटीच्या बाजूला बसवण्यात येतो.
अमोल यादव पुढे म्हणतात, "विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होऊ नये यासाठी विमानाच्या शेपटीत ब्लॅक बॉक्सला ठेवण्यात येतो."
ब्लॅक बॉक्स खरंच काळ्या रंगाचा असतो?
विमानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला हा ब्लॅक बॉक्स खरंतर काळ्या रंगाचा नसतो.
हा ब्लॅक बॉक्स केशरी रंगाचा असतो. जेणेकरून विमान अपघातानंतर सहजतेने तपास अधिकाऱ्यांना ओळखता यावा.
निवृत्त फायटर पायलट आणि एव्हिएशन तज्ज्ञ विपूल सक्सेना सांगतात, "ऑरेंज किंवा केशरी रंग खराब हवामान किंवा इतर परिस्थितीत डोळ्यांनी सहजतेने ओळखता येतो. त्यामुळे ब्लॅक बॉक्स रंग ऑरेंज ठेवण्यात आलेला असतो."
तज्ज्ञ सांगतात, बूट ठेवण्याच्या बॉक्सच्या आकाराचा ब्लॅक बॉक्स असतो.
ब्लॅक बॉक्सच्या आतील भागात थर्मल ब्लॉक असतो. यात मेमरी बोर्ड ठेवण्यात आलेले असतात.
ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाचा का आहे?
विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये विमानाची संपूर्ण माहिती स्टोअर केली जाते.
याचे दोन महत्त्वाचे भाग असतात -
1) फ्लाईट डेटा रिकॉर्डर
2) कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर
तज्ज्ञांच्या मते, फ्लाईट डेटा रिकॉर्डरमध्ये विमानाची तांत्रिक माहिती स्टोर केली जाते. उदाहरणार्थ हवामान, विमानाचा वेग, इंधनसाठा, ऑटो-पायलट स्टेटस, विमानाची उंची आणि दिशा याची माहिती यात स्टोअर करण्यात येते.
ब्लॅक बॉक्सची रेकॉर्डिंग क्षमता 25 तासांची असते.
विपूल सक्सेना सांगतात, "फ्लाईट रेकॉर्डरमध्ये हवामान काय होतं, प्रेशर काय होतं, विमानाचा स्पीड काय होता, एखादं उपकरण अचानक बंद झालं तर त्याची माहितीदेखील यात रेकॉर्ड होते."
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये विमानातील आवाज रेकॉर्ड होतो. यात विमानातील पायलटचं संभाषण आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत होणारं संभाषण रेकॉर्ड होतं. यात दोन तासांचं रेकॉर्डिंग केलं जातं.
तज्ज्ञांच्या मते, विमानाला अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला, मानवीय चुकीमुळे झाला किंवा इतर कारणांमुळे याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळू शकते.
विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो?
ब्लॅक बॉक्सची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. विमान अपघातानंतर याच्या मदतीनेच दुर्घटनेची माहिती मिळू शकते.
पायलट अमोल यादव याबाबत माहिती देताना सांगतात, "ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग टेपला इजा होऊ नये किंवा त्या जळू नयेत यासाठी याचं आवरण अत्यंत मजबूत बनवण्यात आलेलं असतं."
ब्लॅक बॉक्स सुरक्षित रहावा यासाठी तो स्टिल किंवा टायटेनियमचा बनवण्यात आलेला असतो.
एक तासापर्यंत 1000 अंश सेल्सियस पेक्षाही जास्त तापमानात ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो.
समुद्राचं खारं पाणी किंवा इतर ठिकाणी 6000 मीटर्स खोलपर्यंत हा सुरक्षित राहतो.
विमान समुद्रात क्रॅश झालं असेल तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी यावर एक बिकन किंवा सिग्नल असतो.
हा अल्ट्रासाउंड सिग्नल अपघातानंतर 30 ते 90 दिवसापर्यंत सिग्नल पाठवतो
सुरक्षा चाचणीसाठी याला 750 किलोमीटर प्रतितास या वेगाने कॉक्रिटच्या भिंतीवर आपटलं जातं. पाच मिनिटांकरिता 2.5 टन वजन यावर ठेवण्यात येतं.
तपासात ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा दुवा कसा?
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर तो सर्वप्रथम प्रयोगशाळेत पाठवला जातो.
विमानाच्या स्टोअर डेटामधून आणि पायलटमधील संभाषणातून दुर्घटनेआधी शेवटच्या क्षणी विमानात नेमकं काय झालं होतं, काय सरू होतं याची माहिती तपास अधिकाऱ्य़ांना मिळते. ज्यावरून तपासाची पुढील दिशा निश्चित होते.
निवृत्त फायटर पायलट आणि एव्हिएशन तज्ज्ञ विपूल सक्सेना म्हणतात, "अपघातानंतर टेक्निकल आणि ऑपरेशन टीम याचा अभ्यास करते. रिडरच्या माध्यमातून ब्लॅक बॉक्सचा डेटा तपासासाठी ट्रान्सलेट करण्यात येतो. याचा अभ्यास केल्यानंतर विमानाला नक्की काय झालं याची माहिती मिळू शकते."
तज्ज्ञ म्हणतात, ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास अधिकारी विमान दुर्घटनेच्या आधीचे काही तास रिडिझाइन करतात. याच्या माध्यमातून काही गडबड दिसून आली तर त्याची तपासणी केली जाते.
ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला?
ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, संशोधक डेव्हिड वॉरेन यांनी सर्वप्रथम ब्लॅक बॉक्सचा शोध लावला.
वॉरेन ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या एरोनॉटीकल रिसर्च लॅबमध्ये संधोधक होते. साल 1950 च्या मध्यात एका विमान अपघाताचा डेव्हिड वॉरेन तपास करत होते. त्यावेळी विमानात दुर्घटनेआधी नक्की काय झालं होतं याची माहिती मिळाली तर अधिक चांगलं होईल अशी कल्पना सुचल्यानंतर त्यांनी संशोधन सुरू केलं.
1960 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला ब्लॅक बॉक्स विमानात बसवण्यात आला. भारतात 2005 पासून सर्व विमानांमध्ये ब्लॅकबॉस्क अनिवार्य करण्यात आलेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)