महिला आयपीएस अधिकाऱ्याला 'बॉडी शेमिंग' करत आक्षेपार्ह कॉमेंट्स; सोशल मीडियावर चर्चेत असलेलं हे प्रकरण नेमकं काय?

    • Author, सैय्यद मोझिझ इमाम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हीडिओ खूप व्हायरल होतोय. यात उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील एसपी अपर्णा रजत कौशिक एक पत्रकार परिषद घेताना दिसतायत.

पण लोकांनी त्या ज्या प्रकरणाबद्दल पत्रकार परिषद घेत होते त्यावर चर्चा करण्याऐवजी त्यांच्या अंगकाठीवर आणि दिसण्यावर आक्षेपार्ह कमेंट्स करायला सुरुवात केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत असा प्रकार घडल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

मिर्झापूर पोलिसांनी एका गुन्हेगाराच्या अटकेची माहिती देण्यासाठी एसपी अपर्णा कौशिक यांचा पत्रकार परिषदेचा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हीडिओ अवघ्या 5 दिवसांत 47 लाख वेळा पाहिला गेला आणि त्यावर तब्बल 65 हजार लोकांनी कमेंट्स केल्या.

वाईट गोष्ट म्हणजे लोकांनी पोलिसांच्या कामाचं कौतुक करण्याऐवजी महिला आयपीएस अधिकारी कशा दिसतात आणि त्यांची अंगकाठी कशी आहे यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कमेंट्स केल्या.

हा प्रकार वाढल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी अखेर त्या पोस्टचे कमेंट सेक्शन बंद केले.

बीबीसीने या संपूर्ण प्रकरणावर अपर्णा रजत कौशिक यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. पोलिसांकडून सांगण्यात आले की, त्या सध्या कार्यालयीन कामात खूप व्यग्र आहेत.

या घटनेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा 'बॉडी शेमिंग' आणि महिलांच्या कामापेक्षा त्यांच्या लूकवर होणाऱ्या टीकेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

समाज किती 'कुसंस्कृत' झाला आहे?

अमेठीतील काँग्रेसचे माजी आमदार दीपक सिंह यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या या कमेंट्सचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कोणासोबतही असे वर्तन करणं चुकीचं असल्याचं ते स्पष्टपणे म्हणाले.

त्यांनी आठवण करून दिली, "अपर्णाजी जेव्हा अमेठीत होत्या तेव्हा आमची अनेकदा भेट झालेली. त्या अतिशय समजूतदार आणि व्यवहारकुशल महिला आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याच्या कामाबद्दल चर्चा व्हायला हवी. त्यांच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल किंवा दिसण्याबद्दल नाही. ज्या कमेंट्स केल्या गेल्या आहेत त्या अजिबात योग्य नाहीत."

लखनौ विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्या रूपरेखा वर्मा यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केलाय. त्या म्हणाल्या की, आपला समाज किती 'कुसंस्कृत' झाला आहे हे यावरून स्पष्ट होते.

त्यांनी म्हटले, "जी महिला एका जबाबदार पदावर बसली आहे आणि जिच्यावर हजारो लोकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आहे तिच्याबद्दल जर लोक इतकी घाणेरडी भाषा वापरत असतील आणि तिचा अपमान केला जात असेल तर विचार करा आपला समाज किती खालच्या थराला गेलाय आणि लोक किती क्रूर झाले आहेत."

रूप रेखा वर्मा म्हणतात, "हे सर्व माणसाच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं की, तो समोरच्या व्यक्तीला कसं बघतो."

हे प्रकरण फक्त आयपीएस अधिकारी अपर्णा रजत कौशिक यांच्यापुरतं मर्यादित नाही. असंही नाहीये की फक्त महिलांनाच अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. सोशल मीडिया असो किंवा आपलं रोजचं आयुष्य, आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी स्वतःच्या उंचीबद्दल, रंगाबद्दल किंवा शरीराच्या ठेवणीबद्दल काही ना काही ऐकलंच असेल.

दैनंदिन जीवनातील समस्या

फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य विभागाने 2019 मध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यातून असे दिसून आले की 'बॉडी शेमिंग' ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे.

ही समस्या फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नसून शाळा, कॉलेजेस आणि कामाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर आढळते.

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, अशा अपमानजनक कमेंट्स फक्त अनोळखी लोकांकडूनच येतात असे नाही तर मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनही केल्या जातात.

या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार 47.5 टक्के महिलांनी शाळा किंवा ऑफिसमध्ये बॉडी शेमिंगचा सामना केला आहे.

या सर्व्हेतून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, शाळा किंवा कामाची ठिकाणे जिथे आपल्याला सुरक्षित वाटायला हवे आणि एकमेकांना मदत मिळायला हवी तीच ठिकाणे अनेकदा अस्वस्थ करणारी आणि मानसिक त्रास देणारी ठरतात.

सर्वेक्षणातील एक धक्कादायक बाब म्हणजे, 32.5 टक्के प्रकरणांमध्ये या नकारात्मक कमेंट्स कोणत्याही अनोळखी व्यक्तीने केलेल्या नसून अगदी जवळच्या मित्रांनी केल्या होत्या. यावरून असे लक्षात येते की, बॉडी शेमिंग हे फक्त बाहेरच्या जगापुरतं उरलेलं नाही, तर ते आपल्या रोजच्या व्यवहाराचा एक भाग बनले आहे.

मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोणाच्या वजनावर, शरीरावर, काळ्या-गोऱ्या रंगावर किंवा केसांवर केलेल्या कमेंट्समुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासावर खूप खोलवर आणि वाईट परिणाम होतो.

लखनौतील युनिटी पीजी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका शम्सी अकबर म्हणतात, "बॉडी शेमिंग ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित गोष्ट नसून ती एक मोठी सामाजिक समस्या आहे. यासाठी समाजात जागरूकता, संवेदनशीलता आणि जबाबदार वर्तनाची नितांत गरज आहे."

त्यांच्या मते, "जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या शरीराबद्दल वारंवार अपमानजनक गोष्टी ऐकाव्या लागतात तेव्हा त्या व्यक्तीचा स्वाभिमान हळूहळू संपू लागतो. ती व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागते आणि तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो."

सायमा खान म्हणतात, "जर अपर्णा रजत कौशिक यांच्यासारख्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारच्या कमेंट्सचा सामना करावा लागत असेल तर यावरून हे स्पष्ट होते की, सर्वसामान्यांसाठी, विशेषतः महिलांसाठी ऑनलाइन जग किती असुरक्षित आहे."

वकील सायमा खान यांनी या कायदेशीर बाबी अधिक स्पष्ट केल्या आहेत.

त्यांच्या मते, कोणत्याही महिलेच्या शारीरिक ठेवणीवर अशा प्रकारच्या अश्लील, अपमानजनक किंवा चुकीच्या कमेंट्स करणे हे तिच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.

भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 79 म्हणजेच महिलेच्या मर्यादेचा अपमान करणे, कलम 294 म्हणजेच अश्लील शब्द वापरणे आणि कलम 356 म्हणजेच मानहानी करणे या कलमांनुसार हा एक गंभीर गुन्हा ठरू शकतो. यासोबतच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act 2000) कलम 66 ई आणि कलम 67 नुसार गोपनीयतेचा भंग आणि अश्लील मजकूर पसरवण्याबाबत देखील कडक कारवाई केली जाऊ शकते.

सायमा खान यांच्या मते, या प्रकारच्या ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंग विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करणे खूप गरजेचे आहे. यामुळे केवळ एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचाच नाही, तर समाजातील प्रत्येक महिलेचा सन्मान आणि सुरक्षितता जपली जाईल.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, बॉडी शेमिंगचा एखाद्या व्यक्तीवर खूप दीर्घकाळ टिकणारा आणि खोलवर परिणाम होऊ शकतो.

प्रोफेसर शम्सी अकबर सांगतात की, ज्यांना बॉडी शेमिंगचा त्रास सहन करावा लागतो त्यांच्यामध्ये भीती वाटणं, नैराश्य येणं आणि स्वतःवरचा विश्वास कमी होणं अशा समस्या दिसू शकतात. काही वेळा तर हे प्रकरण 'बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर'पर्यंत जातं. या टप्प्यावर त्या माणसाला स्वतःचं शरीरच आवडेनासं होतं आणि तो सतत नकारात्मक विचार करायला लागतो.

अशी माणसं सारखं आरशात स्वतःला बघत बसतात, स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतात आणि त्यांना स्वतःबद्दल कधीच चांगलं वाटत नाही. एवढंच नाही तर यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा बिघडू शकतात. त्याला 'ईटिंग डिसऑर्डर' म्हणतात. स्वतःचं शरीर बदलण्याच्या नादात ही माणसं अशा गोष्टी करायला लागतात ज्या त्यांच्या तब्येतीसाठी अजिबात चांगल्या नसतात.

कोण आहेत अपर्णा रजत कौशिक

अपर्णा रजत कौशिक मूळच्या उत्तर प्रदेशातील रामपूरच्या असून त्या 2015 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांविरुद्ध कडक भूमिका घेण्यासाठी त्या ओळखल्या जातात.

आयपीएस होण्यापूर्वी त्या गुरुग्राममध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. आयपीएस झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले आहे.

त्या अमेठीमध्ये पोलीस अधीक्षक होत्या तसेच त्यांनी कासगंज आणि औरैया या जिल्ह्यांची जबाबदारीही सांभाळली आहे.

लखनौमध्ये त्यांनी डीसीपी पदावर काम केले असून त्यांनी एनआयटी प्रयागराजमधून बी.टेक पूर्ण केले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)