लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला HIV बाधित रक्ताचं इंजेक्शन दिलं; पुढे काय घडलं?

    • Author, अमरेंद्र यारलागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)

तेलंगणात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तरुणीस स्वतःचं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन दिल्याची घटना घडली आहे.

तेलंगणा पोलिसांनी ही माहिती दिली आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हैदराबादच्या उपनगरातील पोचारम आयटी कॉरिडॉर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी हैदराबादच्या उपनगरातील अन्नोजीगुडा भागात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीच्या कुटुंबाने आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय मुलाच्या कुटुंबाने दोघांच्या विवाहाला होकार दिला होता.

दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक होते.

वडिलांचे निधन झाल्यानंतर संशयित आरोपी आईसह राहत होता. त्याचं कुटुंब सुमारे 25 वर्षांपूर्वी जनगाव भागातून हैदराबादमध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले होते. संशयित आरोपी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो.

"संशयित आरोपीच्या पालकांना एड्स असल्यामुळे, लग्नाचा प्रस्ताव आल्यानंतर साधारण सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या पालकांनी संशयित आरोपी म्हणजे त्या तरुणाचीही तपासणी करून घेतली होती."

"उप्पलमधील एका लॅबमध्ये केलेल्या तपासणीत तो एचआयव्ही-पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यामुळे नंतर हे लग्न रद्द करण्यात आलं," असं तरुणीच्या पालकांनी आपल्या पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

"लग्न रद्द झाल्यामुळे तो तरूण संतापला होता", असं पोचारम आयटी कॉरिडॉर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय भास्कर रेड्डी यांनी सांगितलं.

"आमच्या तपासात समोर आलं की, ती तरुणी केवळ आपलीच असावी या उद्देशाने त्या तरुणाने तिला इंजेक्शनने आपलं रक्त दिले. एचआयव्ही बाधित रक्त इंजेक्ट केल्याने ती दुसऱ्या कोणाशीही लग्न करू शकणार नाही, असा त्याने विचार केला", अशी माहिती विजय भास्कर रेड्डी यांनी दिली.

'त्याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला...'

ही घटना 11 मार्च रोजी घडल्याचे तरुणीच्या पालकांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

त्यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटलं की, घटनेच्या सायंकाळी ते बाजारात फुले विकायला गेले होते.

"आमची मुलगी घरात एकटी असल्याचं त्याला माहीत होतं. त्याने घरात प्रवेश केला आणि पुन्हा माझ्या मुलीला लग्नाची मागणी घातली. माझ्या मुलीने नकार दिला, तेव्हा त्याने आपल्याबरोबर आणलेल्या लाल रंगाचं द्रव असलेल्या सुईने जबरदस्तीने तिच्या हाताला इंजेक्शन दिलं."

ती तरुणी या प्रकारामुळे घाबरली होती. त्यामुळे तिने लगेचच हा प्रकार तिच्या कुटुंबाला सांगितला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोन दिवसांनंतर तिला ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवू लागला, तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तिची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला, असं तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं.

"त्या तरुणाने आमच्या मुलीला एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी तरुणीच्या पालकांनी तक्रारीत केली आहे.

'एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं त्याला माहीत होतं...'

13 मार्च रोजी सायंकाळी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. त्यानुसार संशयित तरुणाला अटक केली आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं, असं तपास अधिकारी विजय भास्कर रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.

"त्याला एचआयव्हीची लागण कशी झाली, याचा तपास आम्ही करत आहोत. कधी तो म्हणतो की, त्याला जन्मापासूनच एचआयव्ही आहे तर तर कधी कधी म्हणतो की नंतर त्याला याची लागण झाली. आम्ही याचा तपास करत आहोत," असं पोलिसांनी सांगितलं.

रेड्डी म्हणाले की, त्या तरुणाला माहिती होतं की तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, तरीही तो लग्न करायला तयार होता.

संबंधित तरुणीवर हैदराबाद येथील गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या तरुणीच्या ताज्या रक्त चाचणीचे अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आहेत. परंतु, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील दोन महिन्यांनी टेस्ट केल्यानंतर आणखी स्पष्टता येईल.

बीबीसीने तरुणीच्या वडिलांशी फोनवर संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. संशयित आरोपीच्या आईशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही अयशस्वी झाला.

'परिणाम लगेच दिसणार नाहीत'

केआयएमएस सिकंदराबाद येथील संसर्गजन्य रोग आणि संसर्ग नियंत्रण तज्ज्ञ डॉ. प्रतीक पाटील यशवंत यांनी बीबीसीला सांगितलं की, सध्या संबंधित तरूणीची तपासणी निगेटिव्ह आली असली तरी तिला पुढे वेगवेगळ्या टप्प्यात तपासण्या कराव्या लागतील.

डॉ. प्रतीक पाटील म्हणाले की, "जर एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीचे रक्त थेट दुसऱ्या व्यक्तीत इंजेक्ट केले गेले, तर विषाणू पसरण्याची शक्यता 90 टक्क्यांपेक्षा जास्त असते. सुरुवातीच्या टप्प्यात पीसीआर आणि सिरीयोलॉजिकल चाचण्या संक्रमण दाखवू शकत नाहीत. या चाचण्या नंतर पुन्हा काही अंतराने कराव्या लागतात."

डॉ. पाटील यांनी स्पष्ट केलं की, "कधी कधी, एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती उपचार घेत असतील, तर त्यांच्यात विषाणूंचे प्रमाण कमी असू शकते. पण याचा अर्थ विषाणू नाही, असा नाही. अशा व्यक्ती संसर्गाची शक्यता थोडी कमी असली तरी अजूनही दुसऱ्याला विषाणू संक्रमित करू शकतात."

"कधी कधी विषाणू रक्तातील पेशींमध्ये लपलेला असतो. त्यामुळे तपासण्या लगेच पॉझिटिव्ह दाखवत नाहीत. यासाठी सतत निरीक्षण आणि ठराविक वेळाने तपासण्या करणे आवश्यक आहे," असंही डॉ. पाटील यांनी सांगितलं.

अशा वर्तनाला विचलित वर्तन समजले जातं, असं हैदराबाद विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील प्राध्यापिका मीना हरिहरन यांनी म्हटलं.

"जर मी तिला मिळवू शकत नसेल, तर ती इतर कोणाचीही नसावी असा मानसिक दृष्टिकोन या प्रकरणात दिसून येतो. अशा वर्तनामागे अत्यंत स्वार्थी आणि अधिकारवृत्ती असते," असं त्या म्हणाल्या.

यापूर्वी कर्नूलमध्येही अशीच घटना समोर आली होती. एका महिलेनं, ती प्रेम करत असलेल्या पुरुषाच्या पत्नीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)