अशोक खरात प्रकरणात न्यायालयात सुनावणी, कोर्टात नेमकं काय घडलं?

    • Author, प्रविण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, नाशिकहून
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

राज्यभर गाजत असलेल्या, धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करण्याच्या अशोक खरात प्रकरणात आज (24 मार्च) न्यायालयात सुनावणी झाली.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार होती. जिल्हा सत्र न्यायाधीश के. एच. पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

सरकारकडून सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला. तर अशोक खरातकडून सचिन भाटेंनी युक्तिवाद केला.

सरकारी वकील युक्तिवाद करताना म्हणाले, "पोलिसांनी अशोक खरातकडून 6 लाख रुपये, ॲपलचा लॅपटॉप, डीव्हीआर जप्त केले आहेत. तसंच एक काळ्या रंगाचं रिव्हॉल्व्हरदेखील जप्त करण्यात आलं आहे. त्यावर भारत सरकारचं चिन्ह आहे. त्यातील 5 गोळ्या वापरण्यात आल्या आहेत. त्या कशासाठी वापरण्यात आल्या याचा शोध घ्यायचा आहे."

सरकारी वकील म्हणाले, "खरातची मानसिक विकृती त्याच्या वागण्यातून दिसून येते. त्यानं 5 गोळ्या बळीसाठी वापरल्या का याचा शोध घ्यायचा आहे. तसंच शिवानिका संस्थानची मालमत्ता आणि तिथे होत असलेल्या अघोरी कृत्यांचा शोध घ्यायचा आहे."

"यात मोठ्या व्यक्तीचा सहभाग आहे. साप, वाघ खरे आहेत की खोटे आहेत हे तपासायचं आहे. तसंच हरणाचं कस्तुरी कुठून आलं आणि हरणाची शिकार केला की याचाही शोध घेणं आवश्यक आहे. माननीय न्यायालयानं यापूर्वी मोठी पोलीस कोठडी (पीसी) दिली होती. मात्र पुढील तपासाठी पुन्हा 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे."

सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, "खरातकडून जे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, त्याचा वापर करून 5 जणांचा बळी दिल्याचा संशय आहे. याआधी 7 दिवसांचा पीसीआर दिला होता.

"खरातच्या तपासातून अघोरी कृत्य समोर आलं आहे. त्याचबरोबर साप कुठून येत होता याचाही तपास करायचा आहे. हरणाची शिकार केल्याचाही संशय आहे. खरातनं अनेकांना कस्तुरी दिली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात डिजिटल पुरावे जमा करायचे आहेत. त्यासाठी आणखी 7 दिवसांचा पीसीआर द्यावा."

आरोपीच्या वतीनं सचिन भाटेंनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, "या 7 दिवसांच्या तपासाबाबत मला शंका आहे. यासंदर्भातील व्हीडिओ प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियात गेले आहेत. लॅपटॉप, डिव्हीआरचा यात उल्लेख होतो आहे. मात्र पेनड्राईव्हचा उल्लेख का होत नाहीये. खरातकडे पिस्तूलचा परवाना होता. या प्रकरणात सर्व तपास झालेला आहे. त्यामुळे आणखी कोठडी कशासाठी हवी आहे."

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणी सविस्तर निवेदन दिले. त्यांनी सांगितलं की, "या प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने कारवाई केली आहे. अशोक खरातला 17 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली. नाशिक गुन्हे शाखा 1 ने याचा तपास केला. आरोपीकडून 6 लाख 53 हजार 611 रुपये रोख जप्त करण्यात आले. यासह रिव्हॉल्वर, काडतूस, मुद्देमालही तपासात जप्त करण्यात आला आहे."

"आरोपीचा मोबाईल फोन तपासात जप्त करण्यात आला असून मोबाईल डेटा हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. बळी पडलेल्या महिलांना संपर्क करायचे काम सुरू आहे. या प्रकरणातील पीडित महिला समाजात नाव खराब होण्याच्या भीतीने तक्रारीसाठी पुढे येत नव्हत्या. त्या महिलांना धीर देऊन समोर आणलं जात आहे."

"आरोपीवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलांना सुरक्षेची हमी देऊन, समुपदेशन करून त्यांना तक्रारी देण्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. व्हीडिओ बंद होण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे. पीडितेची ओळख समोर येईल अशा न्यूज चॅनेल्सना बीएनएसअंतर्गत नोटीस पाठवली आहे."

जप्त पेन ड्राईव्हमधील आरोपीने केलेल्या कृत्याचा तपास सुरू आहे. अजून काही महिला आणि आर्थिक फसवणूक केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.

"या भोंदूगिरीमध्ये कोणी शासकीय अधिकारी सहभागी आहे का? याचा तपासही सुरू आहे. ज्या अधिकाऱ्यांचा या भोंदूगिरीमध्ये सहभाग दिसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

"या प्रकरणात आणखी माहिती समोर येते आहे. जे पुरावे समोर येत आहेत, त्यातून जे कनेक्शन समोर येत आहेत, त्याचा तपास सुरू आहे. यापुढे जो तपास होईल त्याचीही माहिती सभागृहाला देण्यात येईल", असं मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले.

खरातबरोबरच्या भेटीबाबत बच्चू कडू काय म्हणाले?

याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, "भोंदू बाबाचा आम्ही निषेधच करतो. कार्यकर्त्यांनी मला आग्रहानं महादेवाच्या मंदिरात नेलं. ते भोंदू बाबा तिथे होते. त्यांनी माझा सत्कार केला आणि मला फेटा बांधला.

"कोणताही माणूस वयानं मोठा असल्यास आपण वाकून पाया पडतो. ती आपली संस्कृती आहे. तसं मी केलं. ती साधारण चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हा बाबा थोतांड आहे हे माहित असतानाही कधीकधी समाजमन राखण्यासाठी आम्हाला हे करावं लागतं. मात्र यापुढे आम्ही याबाबत काळजी घेऊ. त्यांचा आम्ही निषेधच करतो."

इतर अनेक मोठे नेते त्या संस्थानात जाऊन आले पण त्यांच्याबाबत कुणी अद्याप प्रश्न विचारले नाहीत, असे देखील बच्चू कडूंनी म्हटले.

फिर्यादीचे वकील ॲड. मधुकर यशवंत काळे काय म्हणाले?

सुनावणी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फिर्यादीचे वकील ॲड. मधुकर यशवंत काळे म्हणाले, "सरकारी वकिलांनी सांगितलं की तपास केला असता खरातकडे कॉस्मोलॉजीसंदर्भात कोणतीही पात्रता दिसून येत नाही. त्यामुळे त्याबाबतही पोलिसांना तपास करायचा आहे. कारण खरातनं असा आभास निर्माण केला आहे की त्याला बऱ्याचशा गोष्टी येतात. या आभासातून त्यानं जनतेची फसवणूक केली आहे."

फिर्यादी महिलांचे व्हीडिओ, फोटो व्हायरल होत आहेत, त्याचा या प्रकरणात आणि विशेषकरून त्या महिलांवर काही परिणाम होईल का असं वाटतं का?

या प्रश्नावर फिर्यादीचे वकील, ॲड. मधुकर यशवंत काळे म्हणाले, "या प्रकरणातील जे पीडित लोक आहेत, विशेषकरून तरुण महिला आहेत, त्यांचे जर व्हीडिओ व्हायरल झाले, तर त्यांच्यासाठी ती एक बदनामीची बाब ठरेलच. त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या त्यांची एक मोठी कुचंबणा होणार आहे. आपण समजू शकतो की कुटुंबातील त्यांचं जे स्थान आहे, त्यालाही धक्का बसेल. समाजातही त्यांची बदनामी होईल. एकंदरित सामाजिकदृष्ट्या त्यांच्याबाबत वाईट प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाप्रकारचे व्हीडिओ सोशल मीडियावर अजिबात प्रसारित होऊ नयेत आणि याबाबत कडक सूचना पोलिसांकडून दिल्या गेल्या पाहिजेत. जो कोणी हे व्हीडिओ प्रसिद्ध करेल त्याच्याविरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे."

ॲड. काळे पुढे म्हणाले, "पोलीस कोठडी किती दिवसांची द्यायची हे न्यायालय ठरवतं. न्यायालयानं यावेळेस 7 ऐवजी 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. न्यायालयासमोर पोलिसांनी रिमांड रिपोर्ट दाखल केला. या रिपोर्टचं वाचन करून न्यायालयानं असं ठरवलं की 7 दिवसांऐवजी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. कारण आधी 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.

"तपासाकरता जास्तीत जास्त 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात येते. त्यामुळे आधीचे 7 आणि आता 5 असे 12 दिवस झाले. कदाचित त्याला पुन्हा हजर केल्यावर राहिलेले 2 दिवसदेखील न्यायालय वाढवून देऊ शकेल. पोलिसांनी जर त्यांची बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडली की अजूनही आमचा तपास पूर्ण झालेला नाही. काही विशिष्ट मुद्द्यांबाबत अजूनही तपास करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा राहिलेले 2 दिवस कोठडी वाढवून देण्यात यावी. तर अशा परिस्थितीत न्यायालय ते देऊ शकतं."

"मी न्यायालयाला सांगितलं की, या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आरोपीनं खूप वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. प्रत्येक गुन्ह्याची तीव्रता ही वेगळ्या स्वरुपाची आहे. आर्थिक आहेच, तसंच लैंगिक गुन्हेदेखील आहेत. याव्यतिरिक्त अनेक स्वरुपाचे गुन्हे आहेत, जे अजूनही उघड झालेले नाहीत. या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी आरोपीला पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा माझा युक्तिवाद होता. जर पोलीस कोठडी वाढवून दिली नाही, तर त्याचा विपरित परिणाम तपासावर होईल. तपासावर परिणाम झाल्यास सामाजिक न्याय होऊ शकणार नाही," असं ॲड. काळे म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.