काही राजकारणी बाबा-बुवांच्या नादी का लागतात?

    • Author, डॉ. हमीद दाभोलकर
    • Role, कार्यकर्ते, अंनिस, महाराष्ट्र
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

अशोक खरात प्रकरणात समोर आलेल्या गोष्टी कुठल्याही संवेदनशील माणसाला धक्कादायक वाटाव्या अशा आहेत!

ज्योतिष सांगण्याच्या नावाने एक व्यक्ती एका राज्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना भजनी लावतो, राज्य महिला आयोगाच्या प्रमुख त्याचे पाय धुवून त्याची पूजा करतात.

काही वर्षांत हा व्यक्ती कोट्यवधी रुपयांची माया गोळा करतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील ह्याच्या सल्ल्याने होतात, असे ऐकावे ते नवल अशा स्वरूपाचे हे प्रकरण आहे.

या खरातने मोठ्या प्रमाणात महिलांचे शोषण केल्याची आणि लैंगिक विकृती म्हणता येईल अशा स्वरूपाची अनेक कृत्ये समोर आली आहेत.

पण, भोंदू बाबा-बुवा आणि काही राजकारणी यांचे संबंध ही काही आजची गोष्ट नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात भोंदू बाबा आणि बुवांच्या भजनी लागलेल्या राजकारण्यांची खूप मोठी यादी आहे.

'धर्मसत्ता आणि राजसत्ता'

धीरेंद्र ब्रह्मचारी नावाचे इंदिरा गांधी यांचे एक गुरू होते. इंदिरा गांधी त्यांच्या आयुष्यातील अनेक निर्णय या धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या सल्ल्याने घेत असत, असे म्हटले जाते. केंद्रातील काही मंत्र्यांच्या बदल्याही त्यांच्या इच्छेने होत असत असंही म्हटलं जातं.

पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कालखंडात चंद्रास्वामी या तांत्रिकाचा मोठा बोलबाला होता. सत्यसाईबाबा या हातचलाखीने हवेतून सोन्याची चेन काढण्याचा तथाकथित चमत्कार करणाऱ्या बाबाच्या भक्तांची यादी देखील खूप मोठी आहे.

शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांच्यापासून ते अगदी सचिन तेंडूलकर, सुनील गावस्करपर्यंत त्यांच्या भक्तांची मोठी यादी आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तर त्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी पूजा करण्यासाठी बोलावले होते, त्यावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला होता.

आसाराम बापू आणि राम रहीम या न्यायालयाने दोषी ठरवलेल्या भोंदू बाबांचेही अनेक राजकारणी भक्त आहेत.

या सगळ्या राजकारण्यांना आणि सेलिब्रिटींना मानणारा आणि त्यांच्या वागण्याचे अनुकरण करणारा एक मोठा वर्ग असतो.

त्यामुळे यांच्या बुवाधार्जिण्या मानसिकतेचा समाजावर दुष्परिणाम होत राहतो म्हणून राजकारणी आणि सेलिब्रिटी भोंदू बुवांच्या मागे का लागतात? हे समजून घेणे आवश्यक आहे.

यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असते अशा ठिकाणी आपली उपस्थिती राखणे ही बहुतांश राजकारण्यांसाठी आवश्यक बाब असते. भारतासारख्या देशात बुवा बाबांकडे गर्दीला कधीच तोटा नसतो.

एखाद्या बाबाचे आपण भक्त आहोत हे दाखवल्यानं त्या बाबाचे भक्त आपोआप आपल्यासोबत जोडले जातील ही अटकळ बांधून अनेक राजकारणी हे बाबा-बुवांच्याकडे उठबस वाढवतात. हा झाला थेट फायद्याचा भाग, पण बाबा-बुवा आणि राजकारणी यांचे सख्य केवळ तेवढ्या पुरतेच मर्यादित नाही.

बाबा-बुवांचे ग्लॅमर?

राजकारण हे अत्यंत स्पर्धात्मक आणि निष्ठुर म्हणावं अशा स्वरूपाचे करिअर आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इथे सातत्याने कटकारस्थाने घडत असतात. मैत्री, निष्ठा या गोष्टी घडीघडीला बदलत असतात आणि राजकारण्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी या त्यांच्या हातात नसतात. अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये स्वतःचे भावनिक स्वास्थ्य टिकवणे हे मोठे आव्हान असते.

जे मिळाले नाही ते मिळवणे आणि जे आहे ते टिकवणे अशी साधारण या सर्व राजकारण्यांची आणि सेलिब्रिटींची मानसिकता असते. अशा वेळी आपल्या प्रश्नांच्या वर चुटकीसरशी उत्तरे सांगणारा बाबा हा राजकारण्यांना जवळचा वाटला नाही तरच नवल!

याच्याशी संबंधित दुसरी महत्त्वाची गोष्ट बहुतांश राजकारणी आणि सेलिब्रिटी यांची पब्लिक इमेज ही प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा स्वरूपाची असते.

अनेकवेळा हे राजकारणी आणि सेलिब्रिटी या प्रतिमेच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाहीत. चुटकीसरशी समाजातील सगळे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन जनतेला देणाऱ्या व्यक्तीला ताण येतो हे स्वीकारणे स्वाभाविकपणे अवघड वाटत राहते.

आपल्याला ताण येतो आणि तो तज्ज्ञांशी सल्लामसलत करून सोडवता येऊ शकतो, हा सामान्य माणसांसाठी असलेला मार्ग राजकारणी आणि सेलिब्रिटी यांना त्यांच्या प्रश्नांसाठी अगदीच दुय्यम वाटू लागतो. त्यामुळे आपला प्रश्न जर जबरी असेल तर त्याला उत्तर देणारा पण तितकाच जबरी असला पाहिजे अशी मानसिकता त्यातून निर्माण होते.

समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञ अशा एकदम मानवी भासणाऱ्या पर्यायांकडे जाणे हे राजकारणी आणि सेलिब्रिटी यांच्या स्वप्रतिमेच्या आड येणारे असते. बाबा-बुवांकडे जाण्यात आपल्याकडे एक ग्लॅमर आहे, डॉक्टर किंवा समुपदेशक यांच्याकडे जाण्यात ते नाही हे लक्षात घेतले तर राजकारणी आणि सेलिब्रिटी यांचे बाबा बुवांकडे जाणे समजून येऊ शकते.

खरात बाबाच्या प्रकरणात लैंगिक शक्ती कमजोर पडत असल्याची भावना असलेले राजकारणी कशा प्रकारे गुंतले होते ते बघितले तर वरील मुद्दा लक्षात येऊ शकतो.

विवेकी भूमिकेला तिलांजली?

तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारणामध्ये एकूणच विधी निषेध कमी होणे आणि राजकारणी आणि बुवा-बाबा यांचे सख्य वाढणे याचा देखील जवळून संबंध आहे.

बहुतांश राजकारण्यांना त्यांच्या आयुष्यात स्वार्थ, फायदा-तोट्याची गणिते, सत्ता यांचाच विचार करून प्रश्न सोडवण्याची सवय झालेली असते. या प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीचा बुद्धिवाद आणि विवेक यांच्याशी दूरूनही संबंध नसतो. त्यामुळे बाकीच्या आयुष्यात बेबंद स्वार्थ आणि अविवेक अशा पद्धतीने निर्णय प्रक्रिया राबवली जात असताना केवळ काही ठराविक गोष्टींच्या मध्येच राजकारणी बुद्धिवादी आणि विवेकी भूमिका ठेवतील अशी अपेक्षा ठेवणे देखील अवघड आहे.

खरात प्रकरणात समोर आल्याप्रमाणे राजकारण्यांसाठी बेनामी संपत्ती हाताळणे, सत्ता, प्रशासकीय बदल्या अशा गोष्टींसाठी मध्यस्थ म्हणून भूमिका पार पडणे अशा अनेक भूमिका हे भोंदू बाबा बुवा करत असतात. त्याच्या बदल्यात राजकारणी त्या भोंदू बाबा बुवांना राजकीय वरदहस्त देतात, इतका साधा सोपा रोकडा व्यवहार याच्यात आहे.

चित्रपटसृष्टीमधील कलाकारांचा विचार केला तर महाराष्ट्रात श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर अशा अत्यंत कठोर बुद्धिवादी भूमिका घेणाऱ्या कलाकारांची मोठी परंपरा आहे. काही मोजके अपवाद सोडता अनेक मराठी आणि बहुतांश हिंदी कलाकार हे त्यांच्या बाबा बुवा आणि स्वामींच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे चमत्काराचे किस्से सांगत असतात. पॉडकास्ट या मुलाखतीच्या कोणताही धरबंध नसलेल्या प्रकारातून देखील या गोष्टींना चालना मिळते.

अशा स्वरूपाच्या चमत्कारिक गोष्टी सांगितल्या की भरपूर लाईक्स आणि प्रसिद्धी मिळते असा अनुभव असल्याने कोणताही धरबंध न ठेवता अशा स्वरूपाच्या गोष्टी जाहीरपणे पसरवल्या जातात. या सगळ्यांचे मिळून जे मार्केट तयार झाले आहे त्याच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या पर्यंत ही भोंदुगिरी पसरत असते.

जशी राजकारणी आणि सेलिब्रिटी यांना बाबा बुवांची गरज असते तशीच बाबा बुवांना देखील या राजकारणी आणि सेलिब्रिटी यांची गरज असते. राजकारणी आणि सेलिब्रिटी या बाबा बुवांच्या कडे जातात तर आपण जायला काय हरकत आहे? अशी सामान्य माणसांची धारणा होते. त्याचा या बुवांना फायदाच होत असतो. राजकारण्यांचा वरदहस्त लाभल्याने त्यांच्या बेकायदा गोष्टींना संरक्षण मिळते ते वेगळेच!

'बुवा तेथे राजकारणी'

'बुवा तेथे बाया' हे आचार्य अत्रेंचे प्रसिद्ध नाटक आहे त्यासारखेच 'बुवा तेथे राजकारणी' अशा स्वरूपाची सध्याची परिस्थिती आहे. बुवा आणि राजकारणी ही त्या दोघांनाही फायद्यात पडणारी युती आहे हे आपण समजून घ्यायला हवे. यामध्ये जर नुकसान होत असेल तर ते सामान्य लोकांचे आणि लोकशाहीचे आहे.

सामान्यपणे अत्यंत निर्विकारपणे आपले व्यवहार करणारे आणि राजकारणात कोणताही विधीनिषेध न बाळगणारे राजकारणी भोंदू बाबा बुवांना मात्र कसे फसतात? हे मात्र सामान्य माणसाला गंमतशीर वाटावे असे वास्तव आहे.

ठकास महाठक मिळाल्याने जशी भावना होते तशा प्रकारची ही भावना आहे. आजूबाजूला होणारे सामाजिक अध:पतन आणि त्यामधला राजकारणाचा वाटा लक्षात घेतल्याने असे तात्पुरते समाधान वाटू शकते पण त्यामधून प्रश्न सुटण्यासाठी काहीच फायदा नाही.

आपल्याला जर खरंच ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण आपले राजकारणी, सेलिब्रिटी आणि बाबा बुवा यांची सगळ्यांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. राजकारणी आणि सेलिब्रिटी यांना देवाच्या पंगतीत बसवण्याची घाई लागलेल्या आपल्या समाजात ही मोठी अपेक्षा आहे पण अशक्य नक्कीच नाही.

केवळ काही दशकांच्या पूर्वी या देशाने जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे प्रखर बुद्धिवादी नेतृत्व अत्यंत प्रेमाने वर्षानुवर्षे निवडून दिले होते त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी बाबा बुवांच्या आधाराची काहीही गरज नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे.

कठोर धर्मचिकित्सा करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि 'ईश्वर हाच सत्य आहे' इथपासून ते 'सत्य हेच ईश्वर आहे' असा प्रवास करणारे महात्मा गांधीजी हेदेखील याच देशातील राजकारणी राहिले आहेत.

प्रत्येक लोकनियुक्त प्रतिनिधी ज्या संविधानाची शपथ घेतो त्या संविधानानुसार वैज्ञानिक दृष्टीकोन आणि चिकित्सक दृष्टी बाळगणे हे प्रत्येक नागरिकांप्रमाणे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे देखील कर्तव्य आहे.

राजकारण आणि बुवाबाजी यांचे तयार झालेले जाळे लक्षात घेता राजकीय पक्षांनी देखील या विषयी जाहीर भूमिका घेणे आवश्यक आहे असे वाटते. जिथे जिथे आपले राजकारणी ह्या मध्ये पळवाटा शोधतील तिथे तिथे त्यांना जाब विचारण्याचे काम आता आपण सर्वांनीच करायला हवे अन्यथा आपले राजकारणी बुवाशरण आहेत हे बोलणे हा केवळ तोंडाची वाफ दवडणे होईल असे वाटते!

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.