You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या 12 खुर्च्या; या फोटोंमधून काय समजतं?
- Author, शेरिलन मोलान
- Reporting from, मुंबई
- वाचन वेळ: 8 मिनिटे
मुंबईत नुकतंच एक आगळंवेगळं प्रदर्शन भरलं होतं. 'अ हिस्टरी ऑफ इंडिया थ्रू चेअर्स' म्हणजे 'खुर्च्यांमधून भारताचा इतिहास' असे शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात तब्बल 200 हून अधिक खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या.
या केवळ खुर्च्या नव्हत्या तर कोरीव काम आणि त्यांच्या खास आकारातील भारताचा शेकडो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास होता.
'हाऊस ऑफ महेंद्र दोशी' या संस्थेने हे प्रदर्शन भरवलं होतं. आनंद गांधी आणि चिकी दोशी या दोन तज्ज्ञांनी गेल्या कित्येक वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यातून या खास खुर्च्या शोधून आणल्या आणि त्यांना पुन्हा मूळ वैभव मिळवून दिलं. त्यांच्या या संग्रहातून भारताचा इतिहास एका वेगळ्या रूपात समोर आला.
या खुर्च्यांची मांडणी अगदी जुन्या काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत असा पट मांडणाऱ्या क्रमाने करण्यात आली होती. यामुळे पूर्वीच्या काळी लोक कसे बसायचे आणि काळानुसार ही पद्धत कशी बदलत गेली हे सहज समजून घेता येत होतं.
या प्रवासात जगभरातील विविध कलाप्रवाह भारतात कसे रुजले याची झलकही पाहायला मिळाली.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खुर्च्यांच्या रचनेतून 16 व्या ते 19 व्या शतकातील भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांचा इतिहास समोर येतो.
डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी केवळ भौगोलिक प्रदेशच जिंकले नाहीत, तर त्यासोबतच त्यांनी त्यांच्या स्वत:च्या देशातील फर्निचरच्या पद्धती आणि नक्षीकामही आणले.
या खुर्च्यांच्या डिझाईनकडे पाहिलं की, त्या त्या देशांच्या संस्कृतीचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो.
थोडक्यात सांगायचं तर या प्रदर्शनाने दाखवून दिलं की, एखादी साधी खुर्ची सुद्धा आपल्या देशातील सत्तासंघर्ष आणि सामाजिक बदलांची साक्षीदार असू शकते.
या प्रदर्शनाचे सह-क्यूरेटर विवेक गांधी सांगतात, "जेव्हा डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश भारतात आले, तेव्हा त्यांनी केवळ स्वतःचं फर्निचरच सोबत आणलं नाही, तर भारतीय कारागिरांना त्यांच्या आवडीच्या पाश्चात्य पद्धतीच्या खुर्च्या बनवण्याची कामंही दिली. त्यांना सवयीच्या युरोपीय डिझाईन्सच्या खुर्च्या इथं भारतीय कारागिरांच्या हातून तयार होऊ लागल्या."
याचाच परिणाम असा झाला की, भारतात आज अशा खुर्च्यांचा असा खजिना पाहायला मिळतो, ज्या पूर्णपणे पाश्चात्य धाटणीच्या आहेत किंवा ज्यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य कलाकुसरीचा एक सुंदर मिलाफ झाला आहे.
'हाऊस ऑफ महेंद्र दोशी' या संस्थेने आणि आनंद गांधी व चिकी दोशी या तज्ज्ञांनी गेल्या अनेक दशकांपासून हा मौल्यवान वारसा जतन करून जगासमोर मांडला आहे.
पण हा इतिहास जपणं सोपं नव्हतं. गेल्या अनेक दशकांपासून या खुर्च्या अडगळीत, जुन्या फर्निचरच्या दुकानांत किंवा खासगी संग्रहात धूळ खात पडल्या होत्या.
जेव्हा या खुर्च्या आनंद गांधी आणि विवेक गांधी यांच्याकडे येतात तेव्हा त्यांची अवस्था अतिशय बिकट असते. कधी पाय तुटलेले असतात तर कधी गाद्या फाटलेल्या.
कसबी कारागिरांच्या मदतीने एका एका खुर्चीवर महिनोमहिने काम करून तिला तिचं जुनं वैभव मिळवून दिलं जातं.
या संग्रहातील एक अतिशय खास खुर्ची म्हणजे गुजरातच्या एका जुन्या लिलावातून मिळालेली सिरामिकच्या मण्यांनी सजवलेली खुर्ची. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त या एका खुर्चीला तिचं मूळ रूप देण्यासाठी तब्बल 8 महिने लागले होते.
या संग्रहातील आणखी एक आकर्षणाचं केंद्र म्हणजे ले कॉर्ब्युझियर (Le Corbusier) या जगप्रसिद्ध स्विस-फ्रेंच वास्तुविशारदाने डिझाइन केलेली एक दुर्मिळ 'लाउंज चेअर'.
1950 च्या दशकात भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चंदीगड शहराच्या रचनेसाठी ले कॉर्ब्युझियर यांना निमंत्रित केले होते तेव्हाचा हा वारसा आहे.
यासोबतच एकेकाळी पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या गोव्यातून आणलेल्या 19 व्या शतकातील 'अँग्लो-पोर्तुगीज' शैलीतील खुर्च्यांनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले.
हे प्रदर्शन केवळ डिझाइन्सपुरते मर्यादित नव्हते, तर त्यात भारताच्या समृद्ध वनसंपत्तीचे दर्शनही घडले. सागवान, शिसम (Rosewood) आणि एबोनी यांसारख्या उच्च दर्जाच्या भारतीय लाकडांचा वापर आणि त्यावर स्थानिक कारागिरांनी हाताने केलेले अत्यंत बारीक कोरीव काम या प्रदर्शनामुळे जगासमोर आले.
पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही हस्तकलेची परंपरा पाहून आजचे प्रेक्षकही थक्क झाले.
प्रदर्शनातील काही खास खुर्च्यांची ही झलक:
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)