You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात इफ्तारसाठी गेलेल्यांवर हल्ला, 100 ते 150 अज्ञातांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 2 मिनिटे
इफ्तारसाठी गेलेल्या मुस्लीम लोकांवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना पुण्याच्या सासवडमधील ऑस्करवाडी इथं घडली. शुक्रवारी (13 मार्च) संध्याकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
सासवड पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत, घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींच्या जबाबावरून गुन्हा नोंद केलाय.
आतापर्यंत 100 ते 150 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय, संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीही केली जात आहे.
या अज्ञातांवर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 189(2) आणि 351(2), तसंच शस्त्रास्र कायद्यातील कलम 4(25) आणि बॉम्बे पोलीस कायद्याच्या कलम 125 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकी घटना काय घडली?
इफ्तार पार्टीसाठी आलेल्या 10 ते 15 जणांना मारहाण झाल्याची घटना पुण्यातील सासवडच्या ऑस्करवाडीत घडली.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (13 मार्च) संध्याकाळी 06.30-7 च्या दरम्यान पुण्यातील कोंढवा भागातील 10 ते 15 जण इफ्तार पार्टी करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी गावामध्ये आले होते.
ते पार्टी करत असताना त्यांना तिथल्या लोकांनी मारहाण केली असल्याची तक्रार सासवड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
या मारहाणीत 4 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमींच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तसेच, पोलिसांनी 100 ते 150 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे.
संशयितांना ताब्यात घेऊन सासवड पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी काय माहिती दिली?
सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी या घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार, "हे मुस्लीम बांधव कोंढवा परिसरात राहणारे होते. इफ्तार पार्टीसाठी इथं आले होते. त्यांना मारहाण झाली आहे. चौघेजण जखमी होते. त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यांच्या स्टेटमेंटच्या आधारे आम्ही तपास करत आहोत."
"अद्याप आरोपी निष्पन्न झाले नाहीत, मात्र ते गावातीलच असावेत अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)