नूंह हिंसा : 'मरण डोळ्यांसमोर असताना भीती वाटतेच, पण मशीद सोडून कुठे जाणार?'

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

31 जुलै 2023 रोजी बजरंग दलाने हरियाणातील नूह येथे धार्मिक यात्रेचं आयोजन केलं होतं. यात्रेत बजरंग दलाचे हजारो कार्यकर्ते आणि भाविक सहभागी झाले होते.

ही यात्रा नूह येथील मंदिरातून निघाल्यावर काही वेळातच दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. जमावाने शहरातील रस्त्यावर आणि मंदिराबाहेर गोळीबार केला.

मंदिरात मोठ्या प्रमाणात लोक अडकले होते, त्यांना प्रशासनाच्या मदतीने संध्याकाळी बाहेर काढण्यात आलं.

नूहमध्ये सुरू झालेल्या या हिंसाचाराचं लोण सायंकाळपर्यंत हरियाणातील सोहना आणि गुरुग्रामपर्यंत पोहोचलं.

या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन होमगार्डचाही समावेश आहे.

नूहमधील हिंसाचारानंतर मुस्लिमबहुल ठिकाणांवर आणि मशिदींवर हल्ले झाले आहेत.

पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू केलं असून नूह परिसरातील शेकडो इमारती बुलडोझरने पाडल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इथली इंटरनेट सेवा 8 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली होती.

31 जुलै रोजी हरियाणातील नूह येथे झालेल्या जातीय हिंसाचारानंतर आजूबाजूच्या परिसरातही तणाव निर्माण झाला होता.

नूंहपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोहना भागातही तणावपूर्ण परिस्थिती होती.

शहरातील सर्वात मोठ्या आणि जुन्या मशिदींपैकी एक असलेल्या शाही जामा मशिदीचे इमाम कलीम काशफी यांना काहीतरी वाईट घडणार असल्याचा अंदाज आधीच आला होता.

पण ज्या भागात त्याचं कुटुंब अनेक दशकांपासून राहतंय, त्या परिसरात असं काही वाईट घडेल हे मानायला त्यांचं मन तयारच होत नव्हतं.

पण तरीही नूहच्या घटननेनंतर कलीम काशफी सावध झाले होते. आजूबाजूच्या लोकांनीही त्यांना काही दिवस सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला होता.

मात्र 1 ऑगस्टला सोहना येथील शांतता समितीची (विविध धर्माचे नेते आणि पोलीस प्रशासन) बैठक झाली. या बैठकीत असं ठरलं की शहरात बंधुभाव निर्माण करण्यासाठी एकत्र काम करावं लागेल

या बैठकीत सहभागी झालेल्या महापौरांचे पती गुरवचन सिंह यांनी इमाम कलीम काशफी यांनी बैठकीपूर्वीच कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी नेण्याचा इशारा दिला होता.

पण बैठकी नंतर त्यांनी कलीम काशफी यांना सांगितलं की, "आता परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्ह आहेत "

आणि जमावाने मशिदीवर हल्ला केला

शाही मशिदीच्या आवारात इमाम आणि त्यांच्या भावंडांची कुटुंब राहतात.

नूह येथील घटनेनंतर मशिदीच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कलीम काशफी सांगतात, "प्रशासन आणि आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला सुरक्षेचं आश्वासन दिलं होतं. पोलीसही हजर होते, त्यामुळे भीती असूनही आम्ही कुटुंबासह इथेच थांबलो."

सोहना मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या कमी आहे. शाही जामा मशिदीच्या आसपास मुस्लिमांची मोजकीच घरं आहेत.

मशिदीच्या इमामच्या संयुक्त कुटुंबातील सुमारे 40 लोक सोडले तर इथे मोजकेच मुस्लिम राहतात.

शाही जामा मशिदीचा मूळ इतिहास उपलब्ध नाही. पण मशीद पाहिल्यानंतर ती खूप जुनी असल्याचा अंदाज येतो.

इमाम कलीम काशफी यांच्या मते, ही मशीद अलाउद्दीन खिलजीच्या आदेशानुसार बांधण्यात आली होती.

तीन मोठे घुमट असलेली ही मशीद एका उंचीवर बांधण्यात आलीय.

त्याच्या एका बाजूला बारा खांब असलेला एक प्रचंड मोठा घुमट आहे आणि त्याला लागून एक समाधीसारखी इमारत आहे. तिथेच इमाम आणि त्यांचे कुटुंबीय राहतात.

मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास इमाम काशफी यांना मशिदीवर हल्ला होऊ शकतो अशी माहिती मिळायला सुरुवात झाली. त्यांनी कुटुंबीयांना खोल्यांमध्ये कोंडून ठेवलं.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना हाकलून लावलं.

कलीम काशफी सांगतात, "जेव्हा दोन-तीन तरुण मशिदीची भिंत चढून आत आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना हाकलून लावलं. याबाबत आम्ही तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. एसएचओ तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मशिदीवर हल्ला करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या त्या टोळक्याचा पाठलाग केला."

काशफी सांगतात, "पण काही मिनिटांनंतर एका मोठ्या जमावाने दुसऱ्या बाजूने मशिदीवर हल्ला केला. पोलिसही त्यांच्यासमोर हतबल झाले."

तरुणांचा जमाव पुढे सरकत होता. इकडे काशफीचा पुतण्या सादिक हा मशिदीच्या आवारातच थांबला होता.

गर्दी पाहून त्याने घराचा दरवाजा बंद केला. स्वयंपाकघराच्या खिडकीतून तो जमाव करत असलेला हल्ला पाहत होता.

सादिक सांगतो, "आम्हाला घरातील महिला आणि मुलांची काळजी होती. आतून दरवाजा बंद करून, हल्लेखोरांना दिसू नये अशा पद्धतीने आम्ही त्यांना घुमटाच्या वर बंद केलं होतं. आम्ही बाहेरूनही कुलूप लावलं होतं जेणेकरून जमावाला वाटेल की आत कोणी नाहीये."

सादिकने घरातील जाळीतून मशिदीवरील हल्ल्याचा एक छोटासा व्हीडिओही बनवला. या व्हीडिओमध्ये हातात शस्त्र घेऊन हल्लेखोर मशिदीची तोडफोड करताना दिसत आहेत.

यादरम्यान इमाम आणि त्यांचे कुटुंबीय मशिदीत अडकल्याची बातमी स्थानिक नगरसेवक गुरवचन सिंह यांच्या निदर्शनास आली.

त्यांनी लगेच आजूबाजूच्या शीख तरुणांना गोळा केलं आणि मशिदीच्या दिशेने निघाले.

जीव वाचवणं हे आपलं सर्वात मोठं कर्तव्य

गुरवचन सांगतात, "स्थानिक पोलीस दंगलखोरांना हाकलण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांची संख्या कमी होती. आम्हाला पुढे जाताना पाहून पोलिसांनाही बळ मिळालं. आम्ही मशिदीच्या आवारात प्रवेश केला तोपर्यंत दंगलखोर पळून गेले होते."

गुरवचन सिंग सांगतात, "आम्ही आणि पोलिसांनी मिळून इमाम आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. आम्ही इमामसाहेबांना सांगितलं की त्यांना आमच्यासोबत राहायचं असेल तर ते राहू शकतात."

यावेळी गुरवचन सिंग यांना देखील भीती वाटत होती का?

या प्रश्नावर ते म्हणतात, "आम्हाला एवढंच माहीत होतं की जीव वाचवणं हे आमचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. इमाम आणि त्यांच्या कुटुंबाला आपण लहानपणापासून ओळखतो. आम्ही फक्त आमचा धर्म पाळला."

मशिदीपासून सुमारे 200 मीटर अंतरावर शिखांची मोठी वस्ती आहे. या भागात सुमारे 300 शीख कुटुंबं राहतात. आणि इथे मोठं गुरुद्वारा देखील आहे.

एका शीख व्यक्तीने आपलं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "येथील शीख लोक मुस्लिम बांधवांना मदत करण्यासाठी आले कारण ते अडकले होते. त्यांचा धर्म कोणता आहे याने काही फरक पडत नाही, त्यांचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं."

या घटनाक्रमाविषयी सादिक सांगतो, "पोलीस दंगलखोरांचा पाठलाग करत असताना शेजारी राहणारे शीख इथे पोहोचले आणि त्यांनी आमची विचारपूस केली. आम्हाला कुठे जायचं असेल तर आमची वाहनं आहे असंही त्यांनी सांगितलं. पण त्यानंतर प्रशासनाने बसची व्यवस्था केली, त्यामुळे आम्हाला सोडण्यासाठी पोलिसांसह आले होते."

इमाम कलीम काशफी सांगतात, "आम्हाला खात्री होती की आमचे शेजारी आमच्यासोबत आहेत. हल्ल्यावेळी शीख बांधव इथे आले होते, शेजारी सैनी रुग्णालय आहे. तिथल्या लोकांनीही आमची विचारपूस केली."

कलीम काशफी सांगतात, "आमचं कुटुंब गेल्या 50 वर्षांपासून इथे राहतंय. 1947 च्या फाळणीनंतर ही मशीद बंद पडली होती. आमच्या आजोबांनी येऊन ती सुरू की. 1992 मध्ये दंगल झाली पण त्याचा परिणाम इथे झाला नाही. कित्येक वेळा परिस्थिती बिघडली पण मशिदीवर कधी हल्ला झाला नाही."

या हल्ल्यादरम्यान दंगलखोरांनी मशिदीजवळ उभ्या असलेल्या कार आणि इतर वाहनांच्या काचा फोडल्या.

मशिदीत ठेवलेले वॉटर कुलर, खुर्च्या, पंखेही तोडले. हल्ल्यानंतर मशिदीची स्वच्छता करण्यात आली. मात्र येथे सर्वत्र हल्ल्याच्या खुणा दिसत आहेत.

मिंबर (जिथे इमाम उभे राहून ख़ुत्बा वाचतात) देखील पाडण्यात आलं.

इलेक्ट्रिक बोर्ड तोडलेत. भक्कम दरवाजांनाही तडे गेलेत. काठी मारल्याने मशिदीतील घड्याळही बंद पडलंय. त्या घड्याळात अजूनही दुपारचे दीड वाजलेत.

पोलिसांनी गोळीबार केला नसता तर...

सादिक सांगतो, "हल्लेखोरांनी त्यांना जे शक्य होतं ते सर्व केलं. आमच्या घरच्या स्त्रिया अडकल्या होत्या. सगळ्यांचेच श्वास रोखले होते. आम्ही आत आहोत हे जर त्यांना कळलं असतं तर त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्नही केला असता."

सादिक एका खाजगी कंपनीत काम करतो. पण हल्ला झाल्यापासून तो कामावर गेलेला नाही.

तो आता घरून काम करतोय.

सादिक विचारतो, "या हल्ल्यामुळे झालेलं आर्थिक नुकसान भरून निघेल, पण मनावर जे घाव झालेत ते कसे पुसायचे?"

सादिकच्या आत्याचा मुलगा सुहेलही त्याच परिसरात राहतो. तो गुरुग्राममध्ये कामाला जातो.

हल्ल्याच्या वेळी सुहेलही तिथेच होता. तो ही आता घरून काम करतोय.

सुहेल सांगतो, "ही घटना विसरण सोपं नाही. पोलिसांनी गोळीबार केला नसता तर इथे काहीही घडलं असतं."

सुहेल पुढे सांगतो, "माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत जे आता गुरुग्राममधून परत आलेत."

जामा मशिदीत सध्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. इथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

इमामच्या कुटुंबातील महिलांनी इथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात आश्रय घेतलाय. त्या एका शैक्षणिक संस्थेच्या आवारात राहत आहेत.

कलीम काशफी सांगतात, "आम्हाला लवकरच आमच्या कुटुंबांकडे जायचं आहे."

पण त्यांच्या मनातून भीती जाईल का?

कलीम सांगतात, "हा हल्ला आमच्या विचारांच्या पलीकडचा आहे. मरण डोळ्यांसमोर जर दिसत असेल तर मनात भीती राहते. पण आम्ही मशीद सोडून कुठे जाणार?"

या हल्ल्याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

सोहनाचे एसीपी नवीन सिंधू म्हणतात, "सध्या आमचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर रीतसर कारवाई केली जाईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)