You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका इराणवर 'मर्यादित लष्करी हल्ला' करणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं...
- Author, बर्न्ड डेबसमन ज्युनियर
- Role, व्हाईट हाऊस रिपोर्टर
- Author, कॅशेला स्मिथ
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
इराणवर 'मर्यादित लष्करी हल्ल्या'चा विचार करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. हा हल्ला इराणच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी असेल, जेणेकरून ते त्यांचा अणु कार्यक्रम रोखण्यासंबंधीचा करार करण्यास तयार होतील.
राष्ट्राध्यक्षांनी हे विधान एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना केले. काही तासांपूर्वी अधिकाऱ्यांनी अशा हल्ल्याची शक्यता असल्याचे म्हटलं होतं.
गुरुवारी (19 फेब्रुवारी) ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, 'करार होईल की अमेरिका लष्करी कारवाई करेल हे येत्या 10 दिवसांत' जगाला कळेल.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका या भागात आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहे.
'कराराचा मसुदा तयार आणि अमेरिकेकडून लष्करही तैनात'
अमेरिका आणि त्याच्या युरोपमधील मित्र देशांना इराण अण्वस्त्रं विकसित करत असल्याचा संशय आहे. परंतु, इराणने नेहमीच हे नाकारले आहे.
अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांनी स्वित्झर्लंडमध्ये या विषयावर भेट घेतली आणि त्यांनी चर्चा पुढे जात असल्याचं सांगितलं.
शुक्रवारी (20 फेब्रुवारी) बोलताना इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलं की, इराण 'संभाव्य कराराचा मसुदा' तयार करत आहे आणि तो येत्या काही दिवसांत अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव विटकॉफ यांना दिला जाईल.
जिनीव्हा इथे चर्चा झाली तेव्हा अमेरिका इराणच्या आसपासच्या भागात आपली लष्करी उपस्थिती वाढवत होतं.
या लष्करी तैनातीमध्ये जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकेपैकी एक असलेल्या यूएसए जेराल्ड आर फोर्डचा समावेश आहे,
यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौका देखील तैनात केली जात आहे, ज्यात युद्धनौका आणि फायटर जेट्सची संख्या वाढवण्यात आली आहे.
सॅटेलाईट चित्रांमधून दिसतं की, इराणनेही आपली लष्करी व्यवस्था मजबूत केली आहे आणि देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोशल मीडियावर अमेरिकेच्या लष्कराला धमकी दिली आहे.
खामेनी यांनी आपल्या एका पोस्टमध्ये लिहिलं की,"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सतत सांगतात की, त्यांनी इराणच्या दिशेने युद्धनौका पाठवली आहे. अर्थातच, युद्धनौका हे एक धोकादायक लष्करी उपकरण आहे."
'ट्रम्प यांची परस्परविरोधी वक्तव्यं'
ट्रम्प आठवड्यातून अनेकवेळा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतात, बहुतेकदा ओव्हल ऑफिस किंवा एअर फोर्स वनवरच्या लांबलचक सत्रांमध्ये. पण त्यांची वक्तव्यं नेहमीच कृतीत बदलत नाही आणि बर्याच वेळा ती परस्परविरोधी असतात.
विरोधकांना पुढची हालचाल समजू नये म्हणून आपली योजना ते फक्त स्वतः आणि काही जवळच्या लोकांनाच सांगतात, असं ट्रम्प नेहमी पत्रकारांच्या लक्षात आणून देतात.
गुरुवारी एका पत्रकाराने संभाव्य लष्करी कारवाईबद्दल त्यांना विचारलं, तेव्हा ते रागाने म्हणाले की, "मी तुम्हाला याबद्दल काही सांगणार नाही. आम्ही करार करणार आहोत किंवा काही ना काही मार्गाने तो करुच."
जरी एखादी कारवाई केली तरी, ट्रम्प यांनी अद्याप नेमकं कोणतं लष्करी उद्दिष्ट असेल ते स्पष्ट केलेलं नाही. आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आठवड्यांपर्यंत चालू शकणाऱ्या मोहिमेसाठीचे अनेक पर्याय सादर केले आहेत.
भूतकाळात, ट्रम्प यांनी लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी वेळेच्या मर्यादा देखील वापरल्या आहेत.
'...तर ट्रम्प प्रशासनासाठी देशांतर्गत आव्हान'
मागील वर्षी जुलैमध्ये झालेल्या 'ऑपरेशन मिडनाइट हॅमर'वेळी अमेरिकेच्या सैन्याने इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला केला, पण व्हाइट हाऊसचे अधिकारी अजूनही चर्चेचा मार्ग खुला आहे, असं सांगत होते.
अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी आणि बॉम्बनी इराणच्या केंद्रावर हल्ला करण्याच्या आदल्या दिवशी, व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लिव्हिट यांनी ट्रम्प यांचं विधान वाचलं.
त्यात ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, "नजीकच्या काळात इराणशी वाटाघाटी होऊ शकतात किंवा होऊ शकत नाहीत, मी पुढील दोन आठवड्यांत जायचं की नाही याचा निर्णय घेईन."
नजीकच्या भविष्यात कोणताही स्ट्राइक (हल्ला) झाला तर तो ट्रम्प प्रशासनासाठी देशांतर्गत आव्हान ठरेल, कारण सर्वेक्षणांमध्ये असं दिसून आलं आहे की, वाढत्या संख्येने अमेरिकन लोक ट्रम्प यांच्या इमिग्रेशन (स्थलांतर) आणि अर्थव्यवस्था हाताळण्याच्या पद्धतीवर नाराज आहेत.
गेल्या वर्षी इराणवर एक दिवसाचा हल्ला झाला होता. जानेवारीत मादुरोंना पकडण्याची जलद कारवाई झाली.
पण इराणसह अनेक आठवडे चालणारा संघर्ष ट्रम्प यांच्या मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन) समर्थकांना नाराज करू शकतो. कारण आपल्या प्रचार मोहिमेत ट्रम्प यांनी विदेशी समस्या टाळण्याचे आश्वासन दिले होते. या मोहिमेमुळेच त्यांचे समर्थक त्यांच्याकडे आकर्षित झाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)