सोशल मीडियावर जातिवाचक स्टेटस टाकलं की होणार कारवाई; सौंदाळा गावचा ग्राउंड रिपोर्ट

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"पहिले कसे म्हणायचे, हे मांग, हे महार. हा महारवाडा. तसं आता होणार नाही. आपण सगळे संगच चालणार आता."

सौंदाळा गावच्या सारिका बोधक बोलत होत्या.

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव 'जातमुक्त गाव' म्हणून घोषित करण्यात आलं.

तसा ठराव 5 फेब्रुवारी रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. रक्तदान शिबीर घेऊन त्यानंतर जातमुक्तीचा ठराव घेण्यात आला.

गावचे सरपंच शरद आरगडे सांगतात, "या ठरावामध्ये आम्ही प्रामुख्याने असा उल्लेख केलाय की, सार्वजनिक ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार नाही किंवा जातीचा उल्लेख होणार नाही, असं काही कुणीही वागायचं नाही. दुसरी गोष्ट या ठरावात आपण समता, बंधुता ही जी संविधानाने दिलेली तत्त्व आहेत, त्याचं कसं पालन होईल, हे बघितलंय."

"आपण बघतोय सोशल मीडियावर जो तो ज्याच्या त्याच्या जातीचाच फंडा राबवताना दिसतोय. आणि दुसऱ्याच्या जातीला कमी कसं लेखता येईल, ते आपल्यापेक्षा कमी कसे आहेत, आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कसे आहोत, हेच दाखवण्याचा उद्देश असतो. तर तशा कुठल्याही पोस्ट सोशल मीडियावर आपल्या गावातल्या लोकांनी टाकायच्या नाही, असं ग्रामसभेत ठराव घेऊन सांगितलंय. शिवाय, तसं कुणी केलं तर ग्रामसभेच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख या ठरावामध्ये केलाय," शरद पुढे सांगतात.

'दैनंदिन जीवनात जातीची गरज भासत नाही'

सौंदाळा गावची लोकसंख्या 2500 एवढी आहे. शेती हा इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत. जातमुक्तीचा ठराव इथल्या ग्रामपंचायतीला का करावा वाटला?

याविषयी सरपंच शरद आरगडे सांगतात, "आम्ही नेहमी बघतो की, दैनंदिन जीवन जगत असताना जातीचा कुठेही उल्लेख होत नाही किंवा गरजही भासत नाही. ग्रामीण भागातले लोक दररोज एकमेकांच्यावर अवलंबून असलेले लोक आहेत. म्हणजे मला उद्या आर्थिक अडचण भासली तर मी शेजाऱ्याकडे पैसे मागतो, तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हे बघत नाही. कारण गावात आमचे कौटुंबिक संबंध आहे."

गावकऱ्यांना या निर्णयाच्या निमित्ताने माणुसकीला जास्त महत्त्व द्यायचंय.

ग्रामस्थ अमीन सय्यद सांगतात, "हा जो ठराव झालाय, तो चांगलाय. कारण माणूस जन्माला आला, तर त्याची निवड नसते की कोणत्या जातीत जन्माला यायचं, कोणत्या धर्मात जन्माला यायचं. तो फक्त माणूस म्हणून जन्माला आला आणि त्याने माणूस म्हणूनच वागायला पाहिजे. माणसानं माणसाशी माणसासारखंच वागावं."

ग्रामस्थ बाबासाहेब बोधक यांच्या मते, "या ठरावामुळे गावातील जात-पातीचा विषय पूर्णत: नष्ट होईल. दुसरं म्हणजे, राजकारणी लोक जे जातीपातीच्या नावाखाली राजकारण करतात. काही ठिकाणी धर्म खतरे मे है, असं म्हटलं जातं. तर तसं काही नाहीये. ते नष्ट होईल."

'शिवाजी महाराजांसंग सगळ्या जातीचेच मावळे होते'

जी जात नाही, तिला जात असं म्हणतात, ही धारणा आपल्याला बहुतेकदा सगळीकडे ऐकायला मिळते.

तुमच्या आडनावावरुन तुमची नेमकी जात काय आहे, तेसुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मलाही अनेकदा असे अनुभव आले.

तुम्हालाही कदाचित असे अनुभव आले असतील. पण, जातीबद्दलच्या या धारणेला बदलण्याचे काम सौंदाळा ग्रामपंचायतीनं केलंय.

पुढच्या पिढ्यांसाठी हे असे निर्णय महत्त्वाचे असल्याचं इथल्या महिला सांगतात.

सारिका बोधक म्हणतात, "आता पुढच्या पीढीनं जात-पात केली नाही पाहिजे. कारण मुले शाळेत जाताना उच्च -नीच असं समजतात. तसं पाहायला गेलं, तर शिवाजी महाराजांसंग मावळे हे सगळ्या जातीचेच होते. होते का नव्हते?"

सौंदाळा गावात चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. यामुळे जातमुक्तीच्या ठरावाची अंमलबजावणी करणं सोपं जाईल, असं सरपंच सांगतात.

शरद आरगडे म्हणतात, "गावामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही आहेत, सीसीटीव्हीला माईक आहेत. त्याच्यामुळे कुणी काय उल्लेख केला, कोण काय बोललं हे तर आम्हाला कळणारच आहे. परंतु, हे होऊच नये याच्यासाठी आम्ही चांगल्याप्रकारे प्रबोधन करणार आहोत."

'माणूस हीच एकमेव जात'

जातीचा अभिमान बाळगण्याची आणि त्यादृष्टीने कृत्ये केल्याची उदाहरणे अनेकदा समोर येतात. यात ऑनर किलिंग, सामाजिक बहिष्काराच्या घटनाही घडतात.

सरपंच सांगतात, "अभिमान कशाचा असावा, की मी किती चांगला माणूस आहे आणि मी कुणाला किती मदत करू शकतो? माझं औदार्य किती असेल? समाजासाठी माझं योगदान काय असेल? हे महत्त्वाचं आहे, त्याचा अभिमान बाळगावा."

जात, धर्म, पंथ याच्यापलीकडे जाऊन आपल्याला फक्त माणूस म्हणून एकत्र येण्याची गरज आहे, असं इथले गावकरी ठासून सांगतात. आपण जातमुक्त होऊ, तेव्हाच खऱ्या अर्थानं महापुरुषांना समजून घेऊ, असं गावकऱ्यांचं ठाम मत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.