You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'धुरंधर: द रिव्हेंज': रंजक अनुभव पण 'प्रपोगंडा'च्या स्वसुखात रमणारा 'पोकळ' गाभ्याचा सिनेमा - ब्लॉग
- Author, अक्षय शेलार
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
या शतकातील हिंदी चित्रपटांचा विचार केला, तर 'धुरंधर' वगळता इतर व्यावसायिक चित्रपटांनी सांस्कृतिक लाट निर्माण केल्याची उदाहरणं अपवादात्मकच (उदा. 'अॅनिमल', २०२३) असावीत.
'बाहुबली' (२०१५) किंवा 'आरआरआर'सारखे (२०२२) 'पॅन-इंडियन' सिनेमे या चर्चेत येत नाहीत.
16 : 9 रेशोच्या मोबाइल स्क्रीनवर सतत रील्स पाहून अटेन्शन स्पॅन कमी झालेल्या प्रेक्षकाला चित्रपटगृहाकडे नेण्याचं, शिवाय जवळपास चार तास खिळवून ठेवण्याचं काम आदित्य धरच्या चित्रपटाने केलं.
अशात या चित्रपटाचा पुढचा भाग, 'धुरंधर: द रिव्हेंज' प्रदर्शित झाला असताना या सांस्कृतिक लाटेचा पुन्हा एकदा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
जसकीरत सिंगचा हमजा अली मझारी कसा झाला, खुनासाठी तुरुंगात असलेला एक गुन्हेगार पाकिस्तानात एक भारतीय गुप्तहेर कसा पोचला याविषयीच्या तपशीलवार प्रकरणाने चित्रपटाची सुरुवात होते.
पंजाबमधील जमिनीचा वाद, त्यावरून झालेले खून यापासून सुरू झालेली ही कथा लवकरच पाकिस्तानात जाऊन पोचते.
पहिल्या चित्रपटात वापरलेली वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विभागलेली रचना, अरेषीय पद्धतीची रचना, प्रत्येक विभागाची ठसठशीत शीर्षकं ही टॅरेन्टिनो-प्रेरित पद्धत इथेही वापरली जाते. पण, ही शैली जसजशी पुढे सरकते, तसतसा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो: या साऱ्याचा गाभा नेमका काय?
कारण, चित्रपट पुन्हा एकदा पाकिस्तानातील अंडरवर्ल्ड, लष्करी सत्ताकेंद्रं आणि त्यांच्यातील साटेलोटे यांच्यात रमतो. या वेळी मात्र तो केवळ निरीक्षक न राहता या जगाला जवळपास मिथकात्मक स्वरूप देऊ लागतो. पात्रं त्यांची हिंसा यांचं अधिकाधिक उदात्तीकरण केलं जातं.
त्यांची नावं, त्यांची एंट्री, त्यांचे संवाद सगळंच 'मोठं' आणि भपकेबाज होत जातं. मात्र, या मोठेपणात तपशील हरवतो. कारण, स्थानिक वास्तव, राजकीय गुंतागुंत, सामाजिक संदर्भ या साऱ्याचं पुन्हा एकदा अतिसुलभीकरण केलेलं आहे.
इंटेलिजन्स ऑपरेशन्स, गुप्त बैठका आणि राष्ट्रवादाने भारलेले संवाद या साऱ्या गोष्टी कथानकात ठिकठिकाणी पेरलेल्या आहेत. पण, हे प्रसंग कथेला पुढे नेण्याऐवजी तिच्यात व्यत्यय आणण्याचं काम करतात.
जणू, दोन वेगवेगळे सिनेमे एकमेकांत घुसखोरी करत आहेत: एक आहे स्टायलाइज्ड गँगस्टर गाथा; आणि दुसरा आहे स्पष्ट राजकीय अजेंड्याने चालवला जाणारा स्पाय-ड्रामा. साहजिकच, या दोन प्रवाहांमध्ये सुसंगती निर्माण होत नाही.
असे का घडते, तर धर असेल किंवा इतरही हिंदी चित्रपट व त्यांचे दिग्दर्शक असतील, त्यांना 'दुश्मन मुल्क'विषयी तीव्र मनोगंड आहे. त्यामुळेच पाकिस्तानवर तोंडसुख घ्यायचे असतानाही तिथल्या पात्रांचे, जगण्याचे ऑब्सेशन सुटत नाही.
पहिल्या चित्रपटातील रहमान बलोच (अक्षय खन्ना) असेल किंवा एसपी अस्लम चौधरी (संजय दत्त) असेल, त्यांचं उदात्तीकरण केल्यावाचून राहवत नाही.
त्यामुळे सत्या (1998), कंपनी (2002) या चित्रपटांची आठवण येईल असे गँग वॉर आणि गँगस्टर्सचे स्टायलिस्टिक चित्रण अनेकांना मोहवून टाकते.
त्यांची हिंसादेखील टाळ्या नि शिट्ट्या वाजवून दाद द्यावी अशी बनते. असे का घडते, याचे कारण या चित्रणात वापरलेल्या दृश्य भाषेत सापडते.
हिंसा ही अपवादात्मक घटना की सार्वत्रिक, नैसर्गिक अनुभव?
हिंसेच्या मांडणीबाबत बोलायचं, तर पहिल्या भागात दिसलेली 'कोरिओग्राफ्ड व्हायोलन्स'ची शैली इथेही अस्तित्त्वात आहे.
कॅमेऱ्याची हालचाल, वेग आणि पार्श्वसंगीत यांचं गणित दिसतं. 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये हिंसा ही केवळ घटित म्हणून समोर येत नाही.
चित्रपट हळूहळू अशी दृष्टी घडवतो की, हिंसा ही 'नैसर्गिक', 'अपेक्षित' आणि कधीकधी 'अपरिहार्य' वाटू लागते. म्हणजे, स्त्रीवरील अत्याचार किंवा देशप्रेम या गोष्टीच अशा आहेत की, कुठल्याही खऱ्या मर्दाने हिंसक पावलं उचलून त्याविषयी काहीतरी करायला हवे, असे स्वाभाविक चित्र उभे केले जाते.
जसकीरतने भारतात घेतलेल्या सूडाचे प्रकरण, पाकिस्तानातल्या घरातील चकचकीत बाथरूममध्ये झालेली मारामारी, रस्त्यांवरील गोळीबार आणि एन्काऊंटर्स, इत्यादी दृश्यांमध्ये स्टायलिश फ्रेमिंग, वेगवान संकलन आणि दृश्यरचना या सगळ्यांमधून प्रेक्षकाला एका विशिष्ट पद्धतीने पाहायला शिकवलं जातं.
या पाहण्यात संशय, पूर्वानुमान आणि नियंत्रण यांना मध्यवर्ती स्थान मिळतं. प्रेक्षक दूरचा निरीक्षक नसतो. नायकाची नजर प्रेक्षकाला भारावून, मोहवून टाकते. नायक जे पाहतो तेच आपणही पाहतो.
त्यामुळे जगाकडे पाहण्याची आपली दृष्टीही हळूहळू 'धोका ओळखा आणि त्यावर काहीतरी कृती करा' या पद्धतीच्या टॅक्टिकल तर्कावर उभी राहते.
प्रत्येक चित्रपटाचं एक अवकाश असतं आणि हे चित्रपटीय अवकाश आपण चित्रपटकर्त्याच्या, त्यातल्या पात्रांच्या माध्यमातून अनुभवत असतो. हा भवताल घडवण्यासाठी सिनेमाचा सेट, पात्रांची वेशभूषा, त्यांची भाषा, इ. साधने वापरली जातात.
या साऱ्याचा परिणाम प्रेक्षक हे अवकाश कसे अनुभवतो त्या अनुभवावर होतो. दोन्ही 'धुरंधर'पटांमध्ये शहरं, त्यांतल्या गल्ल्या-दुकानं, भवताल हे सगळं जगलेला, सांस्कृतिक अवकाश म्हणून नव्हे, तर जोखीम आणि लक्ष्य अशा विभागांमध्ये विखुरलं जातं.
पाकिस्तानातील ल्यारी हे पहिल्या चित्रपटात दिसलेलं शहर या भागात अधिक हिंसक आणि धोकादायक बनल्याचं दिसतं. स्थानिक गुंडांचे वर्चस्व, धर्मांध टोळ्यांनी केलेली जाळपोळ आणि अत्याचार दिसतात.
भाषा, वेशभूषा, वास्तुरचना या सांस्कृतिक खुणा 'अर्थ' किंवा माणसांसारख्या माणसांचं अस्तित्त्व व्यक्त करत नाहीत. त्याऐवजी त्यांना सांकेतिक स्वरूप मिळतं.
ओळख आणि आपलेपणा दर्शवणाऱ्या गोष्टी संभाव्य धोक्याच्या रूपात मांडल्या जातात. अशा प्रकारे, चित्रपट संपूर्ण जगालाच एका 'टॅक्टिकल मॅप'मध्ये रूपांतरित करतो. परिणामी, हिंसा ही केवळ कथानकात घडणारी गोष्ट उरत नाही.
हिंसा थेट पाहण्याच्या प्रक्रियेतच अंतर्भूत होते. संभाव्य धोका आणि त्यावरील कृती हा संबंध इतका सहज बनतो की, तो नैसर्गिक वाटू लागतो. प्रेक्षकाच्या नकळत, हिंसा ही 'अपवाद' नसून जगाच्या तर्कसंगत प्रतिसाद आहे, अशी सवय लावली जाते.
या दोन्ही सिनेमांमध्ये दिसणारी सततची हालचाल, कॅमेऱ्याचे झपाट्याने बदलणारे अँगल्स, वेगवान संकलन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्षणार्धात पोहोचणारी कथानकाची रचना ही केवळ शैली न राहता ती सत्तेची दृश्य अभिव्यक्ती बनते.
माहिती, हिंसा आणि प्रतिमा यांचा वेग इतका वाढतो की, प्रेक्षकाला थांबून विचार करण्याची मुभाच राहत नाही. परिणामी, राजकीय विधानं ही तपासून पाहण्याऐवजी 'अनुभवली' जातात. मात्र, यात अलिप्तपणा उरत नाही, हेही तितकंच खरं.
जणू वेगच सत्याला वैधता मिळवून देतो. याच वेगामुळे चित्रपटातील आशयाची पोकळी अधिक ठळक होते. वेग इथे अन्वयार्थ पुसून टाकतो. परिणामी, संपूर्ण सिनेमा एक प्रकारचे 'दृश्य-आक्रमण' बनतो. यामध्ये प्रतिमा आपल्यावर एकापाठोपाठ एक आदळत राहतात, पण त्यामागचं वास्तव अस्पष्टच (किंवा संशयास्पदच) राहतं.
दिठीचं युद्ध आणि सत्योत्तर जग
पॉल विरिलिओ हा एक फ्रेंच तत्वज्ञ आहे. 'वॉर अँड सिनेमा' नावाच्या त्याच्या पुस्तकात तो 'लॉजिस्टिक्स ऑफ पर्सेप्शन' नावाची एक संकल्पना मांडतो. दृष्टी आणि माहिती यावरील तंत्रप्रगत नियंत्रणाच्या माध्यमातून आधुनिक युद्ध आणि सिनेमा एकमेकांत खोलवर मिसळलेले आहेत.
'धुरंधर: द रिव्हेंज'कडे विरिलिओच्या मांडणीच्या चौकटीतून पाहिलं, तर हा सिनेमा केवळ युद्ध, हेरगिरी किंवा गँगवॉर दाखवत नसून तो 'दिसण्याच्या पद्धती'वर नियंत्रण ठेवतो, हे स्पष्टपणे दिसते. विरिलिओ म्हणतो तसं, आधुनिक युद्ध शस्त्रांनी जितकं लढलं जातं, तितकंच ते प्रतिमा, दृष्टी आणि दृश्य तंत्रज्ञानाद्वारे लढलं जातं.
या चित्रपटात ड्रोनसदृश कॅमेरा मूव्हमेंट्स, कुणीतरी कुणावर तरी पाळत ठेवत असल्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या फ्रेम्स आणि वेगवान संकलन या साऱ्याच्या एकत्रीकरणातून एक अत्यंत विशिष्ट अशी 'पाहण्याची शिस्त' निर्माण केली जाते.
प्रेक्षकाने काय, कसं आणि किती वेळ पाहायचं आहे, हे चित्रपट ठरवतो. परिणामी, युद्ध हा अनुभव स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रतिमांमधून प्रत्यक्ष हिंसेइतकाच 'मध्यस्थित' (mediated) होतो. (इथे प्रत्यक्ष युद्ध असा अर्थ अपेक्षित नाही.)
या प्रक्रियेत सिनेमा आणि युद्ध यांच्यातील सीमारेषा धूसर होतात. ज्या तंत्रज्ञानातून युद्धातील निरीक्षण आणि नियंत्रण शक्य होतं, त्याच तंत्रज्ञानाच्या सौंदर्यशास्त्रातून हा सिनेमा स्वतःची भाषा तयार करतो. त्यामुळे सिनेमातील प्रत्येक हिंसक प्रसंग हा केवळ कथानकाचा भाग न राहता एक 'ऑप्टिकल इव्हेंट' बनतो.
यामध्ये प्रेक्षक हा सहभागी नसूनही निरीक्षक बनतो, आणि निरीक्षण हेच सत्तेचं साधन ठरतं. अशा वेळी, चित्रपट केवळ कथा सांगत बसत नाही. चित्रपट प्रेक्षकाच्या आकलनावर कब्जा मिळवतो. आणि हेच विरिलिओच्या मते आधुनिक युद्धाचं खऱ्या अर्थाने रणांगण आहे. ही लढाई प्रतिमांमध्ये आणि प्रतिमांद्वारे सतत चालू असते.
ही आदित्य धर या लेखक-दिग्दर्शकाच्या एकूणच कामातील महत्त्वाची उणीव आहे. कारण, त्याला चित्रपटनिर्मिती आणि रंजक अनुभव निर्माण करणं जरूर जमतं. त्यातून आभास निर्माण होतो, पण गाभा मात्र पोकळच असतो. आणि त्यासोबत येणाऱ्या दृश्य आणि ध्वनीमध्ये दिग्दर्शकाचे (आणि पर्यायाने त्याच्या सिनेमाचे) राजकारण उघडे पडते. 2014 ला शपथ घेणारे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नोटबंदीची घोषणा करणारे आणि महत्त्व पटवून देणारे मा. मोदी, इ. रूपे वारंवार स्क्रीन व्यापतात.
आपण सारेच जाणतो की, आपण सत्योत्तर जगात जगत आहोत. सिंथेटिक आणि एआय निर्मित मजकूर आपली मतं ठरवण्यात, वर्तमानच नव्हे, तर इतिहास 'रचण्या'त सर्रास वापरला जातो. सिनेमा आणि त्यातील दृश्येदेखील जनमत ठरवण्याच्या जागा म्हणून वापरल्या जाण्याचा हा काळ आहे.
अशांत 'धुरंधर: द रिव्हेंज' राजकीय पातळीवर अधिकच स्पष्ट, अधिक उघड भूमिका घेतो. पहिल्या भागातील विचार इथे अधिक भडक होतात. संवाद अधिक थेट, अधिक आक्रमक (व म्हणूनच बोथट) बनतात.
काही प्रसंग तर जणू सोशल मीडियावरील राजकीय भाष्याचं विस्ताररूप वाटतात ('नया हिंदुस्थान', 'घर में घुसकर मारना', इ.). मात्र, या थेटपणामुळे गुंतागुंत कमी होते; प्रश्न विचारण्याऐवजी चित्रपट अतिसुलभ उत्तरं देऊ लागतो. आणि ही उत्तरं अनेकदा उथळ, एकरेषीय ठरतात.
नोटबंदीचा मुद्दा विचारात घेतला, तर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही तो निर्णय अपकारक असल्याचं वेळोवेळी म्हटलं आहे. अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनीही या निर्णयामुळे देशाच्या अर्थकारणावर कसे वाईट परिणाम झाले, याविषयी भाष्य केलं आहे. अशात दिग्दर्शक धर नोटबंदी हा निर्णय कसा 'मास्टरस्ट्रोक' होता, अशी फोल मांडणी करतो.
म्हणजे, गेल्या वेळीप्रमाणेच याहीवेळी वास्तव आणि कल्पित यांच्यातील सीमारेषा इथे अधिक धूसर केली जाते. वेळोवेळी वापरलेलं अर्कायव्हल फुटेज, वास्तविक घटनांचे संदर्भ आणि तारखांचा उल्लेख आणि त्यावर उभं केलेलं काल्पनिक कथानक या मिश्रणामुळे एक प्रकारची 'विश्वसनीयता' निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही सिनेमात केलेला.
पण, यात कूटयुक्ति अधिक आहे. अशावेळी प्रेक्षकाला काय दाखवलं जातंय आणि का, याविषयीचा प्रश्न अधिक तीव्र होतो. कारण, इथे केवळ दिग्दर्शकाच्या राजकीय कलाविषयी आक्षेप असण्याचा मुद्दा नसून आपलंच घोडं पुढे दामटण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यम कशा रीतीने वापरलं जातं, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे.
उदाहरणार्थ, अजित डोवालवर बेतलेलं अजय सन्यालचं पात्र पहिल्या चित्रपटात सरकारच्या प्रत्येक चुकीविषयी तोंडसुख घेत असतं. इथे मात्र 2014 नंतर खरोखर 'अच्छे दिन' आले आहेत, असं त्या पात्राला वाटत असणार. टीव्हीवरील अर्कायव्हल फुटेजमध्ये एटीएमसमोरील रांगा दिसत असताना सिनेमातून नोटबंदीचा निर्णय देशहितासाठी घेतल्याचं कितीही बिंबवलं तरी आजही अर्थतज्ज्ञ त्या निर्णयाला झोडतात, हे वास्तव कसं विसरणार?
त्यामुळेच 'धुरंधर: द रिव्हेंज' हा एक रंजक, नेत्रदीपक अनुभव द्यायचा निष्फळ प्रयत्न आहे. थरार निर्माण करून प्रेक्षकाला भारावून टाकण्याचाही तो एक फोल प्रयत्न आहे. कारण, तुम्ही डोळे आणि कान उघडे ठेवून विवेकाने विचार करणारे असाल, तर या सगळ्याच्या पाठीमागे असलेली पोकळी तितकीच स्पष्टपणे जाणवते.
'धुरंधर: द रिव्हेंज' मात्र शैलीच्या मोहात अडकलेला आणि प्रपोगंडाच्या स्वसुखात रमणारा सिनेमा आहे. प्रपोगंडा बाजूला ठेवून या सिनेमाकडे पाहता येणं शक्य नाही, कारण त्याच पायावर व हेतूनिशी हा सिनेमा निर्मिलेला आहे.
मार्शल मॅकलुहन वेगवेगळ्या माध्यमांची ताकद सांगताना म्हणतो की, 'द मीडियम इज द मेसेज.' 'धुरंधर'च्या बाबतीत, 'द प्रपोगंडा इज द मेसेज' हेच तथ्य आहे!
(अक्षय शेलार हे चित्रपट समीक्षक आहेत. लेखात मांडलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)