'हा आमचा शेवटचा नवरोज नसावा', युद्धाच्या छायेतील इराणी नागरिकांना असं का वाटतंय?

    • Author, घोंचेह हबीबियाझाद
    • Role, बीबीसी पर्शियन
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

(सुरक्षेच्या कारणास्तव यातील लोकांची नावे बदलण्यात आली आहेत.)

पर्शियन नवीन वर्ष नवरोजच्या पूर्वसंध्येला, इराणी लोक नेहमी उत्साहात तयारी करत असतात.

"आम्ही सगळे तयारी करण्यात व्यस्त असायचो. घराची स्वच्छता करायचो, नवीन कपडे, खाण्याचं साहित्य म्हणजे मिठाई, स्नॅक्स खरेदी करायचो."

तेहरानच्या ईशान्येकडील दमावंद इथं राहणाऱ्या आणि वयाची पन्नाशी गाठलेल्या मीना त्यांच्या आठवणी सांगत होत्या.

"पण हे वर्ष खूप वेगळं असेल," अश्रू आवरत त्या आपल्या भावना व्यक्त करत होत्या.

त्या म्हणतात की, "या वर्षी? प्रत्येक दिवस खूप मोठा वाटतो. काळ, वेळ याचा काही अंदाजही राहिलेला नाही."

लोकांमध्ये भीती

"नवरोज म्हणजे 'नवीन दिवस'. हा पारंपरिक सण आहे. वसंत ऋतू सुरू होण्याच्या दिवशी हा साजरा केला जातो. हा सण निसर्गाचा पुनर्जन्म आणि नवीन वर्ष सुरू होण्याचं प्रतीक मानला जातो. 3 हजार वर्षांहून अधिक जुना हा सण आहे. इराणसह अनेक देशांमध्ये तो साजरा केला जातो."

या वर्षी हा सण 20 मार्च रोजी आहे. दुसऱ्या दिवशी इराणी नववर्षाची सुरुवात होते.

परंतु, या वर्षीचा नवरोज देशातील अनेक लोकांनी युद्धात अनुभवलेला पहिला नवरोज ठरणार आहे.

28 फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इराणला सतत हवेतून होणाऱ्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे.

इराणमध्ये आतापर्यंत किमान 3,114 लोकांचे प्राण गेले आहेत. ज्यात 1,354 सामान्य नागरिक आहेत आणि त्यापैकी किमान 207 ही लहान मुलं आहेत, असं इराणमध्ये काम करणारी अमेरिकेतील मानवाधिकार संस्था 'ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स इन इराण'ने म्हटलं आहे.

तेहरानने प्रत्युत्तर देत इस्रायल आणि आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या सहयोगी देशांवर हल्ले सुरू केले आहेत.

तेहरानहून दमावंदला कुटुंबासह स्थलांतर केलेल्या मीना यांचा मुलगा अमीर म्हणतो की, या वेळी नवरोज साजरा करणं खूप वेगळं आणि बदलल्यासारखं वाटत आहे.

"युद्धामुळे लोकांचा रोजगार जात आहे. मला सर्वात मोठी चिंता ही माझ्या देशातील पायाभूत सुविधांची आहे," असं तो म्हणतो.

"या गतीने जात राहिलो तर कदाचित इराणमध्ये काहीच शिल्लक राहणार नाही. नवरोज पुन्हा कधी साजरा करता येईल का, याची भीती वाटते," असंही त्यानं म्हटलं.

80 च्या दशकातही होती अशीच परिस्थिती

इराणी लोकांसाठी नवरोज म्हणजे त्यांचा इतिहास, राष्ट्रीय ओळख आणि परंपरा याचं प्रतीक आहे.

पर्शियन, पारसी, कुर्द, आर्मेनियन, अझरबैजानी, ताजिक, कझाक, उझबेक आणि इतर संस्कृतीही हा सण साजरा करतात आणि त्यांच्याकडे याबाबत त्यांच्या स्वतःच्या खास परंपरा आहेत.

याआधी इराणमध्ये युद्धाच्या काळात नवरोज 1980च्या दशकात साजरा झाला होता. तेव्हा इराकसोबत 8 वर्ष युद्ध सुरू होतं.

या सणात अनेक परंपरा आहेत. त्यात एक म्हणजे जुन्या वर्षातील वाईट गोष्टी दूर जाव्यात आणि नवीन वर्षाचे स्वागत करता येईल, या उद्देशाने आधी घराची नीट साफसफाई केली जाते.

मीना म्हणतात की, "नवीन वर्ष सुरू होताना टीव्हीवर सणाची घोषणा ऐकू येईल की त्यात क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे आवाज मिसळलेले असतील, हे मला माहिती नाही. पण तसं होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे."

नवरोजच्या दोन आठवड्यांच्या सुट्टीच्या काळात कुटुंबातील लोक एकमेकांच्या घरी जातात. परंतु, काही लोकांना परत तेहरानला जायचं नाही, कारण तिथे सर्वाधिक हल्ले झाले आहेत.

"या वर्षी भेटीगाठी खूप कमी झाल्या आहेत. आम्हालाही घर सोडावं लागलं आणि आम्ही तेहरान सोडून थोडं सुरक्षित ठिकाणी आलो आहोत," असं मीना म्हणाल्या.

"मला असं वाटतं की, हे सगळं आमच्या आठवणीतून पुसलं जावं, जणू आम्ही एखाद्या वाईट स्वप्नातून आत्ताच जागे झालो आहोत."

रस्ते ओस, बाजारपेठा शांत

नवरोजच्या आधी, इराणमधील बाजारपेठा, मॉल आणि रस्ते नेहमीच खरेदीसाठी आलेल्या लोकांनी गजबजलेले असतात.

पण या वर्षी तशी गडबड आणि उत्साहही दिसत नाही.

"पूर्वी नवरोजसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू सहज मिळायच्या. पण आता कुठेही गेलो तरी हवाई हल्ला होईल का, याची सतत भीती असते," असं तेहरानमध्ये राहणारी 20 वर्षीय पारमीस सांगते.

पारमीस 17 मार्चला पार्लरमध्ये गेली होती. नवरोजच्या आधी चांगलं दिसाव यासाठी लोक तयारी करत असतात, त्यामुळे या काळात पार्लरमध्ये नेहमीच खूप गर्दी असते.

ती पुढे म्हणाली, "मला वाटतं काही लोक अशा परिस्थितीतही आपलं काम सुरू ठेवत आहेत, माझ्यासारखं. मी पार्लरमध्ये असताना मोठा स्फोट झाला, पण कुणीही घाबरलं नाही की जागचे हलले नाहीत."

'इस्लामिक रिपब्लिकची सत्ताच जायला हवी'

मरियम नावाच्या आणखी एका महिलेनं सांगितलं की, काही लोक या उत्सवाची आणि त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या हॅफ्ट सिन मांडणीची तयारी करत आहेत.

"हॅफ्ट सीनसाठी काही लोक खरेदी करताना दिसले. फुलं आणि काही रस्त्यावरील विक्रेतेही दिसले. पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं," असं त्या म्हणतात.

"हा वर्षातून एकदाच येणारा सण आहे, त्यामुळे तो साजरा करायलाच हवा. मी काही सामान घेतलं आहे आणि काही आधीपासूनच घरात होतं. उद्या मी हॅफ्ट सीन मांडणार आहे."

दरम्यान, देशात असेही काही लोक आहेत, जे युद्धाचं समर्थन करतात.

"नवरोजचा उपयोग काय? जर इस्लामिक रिपब्लिकच सत्तेत राहिली तर? मग आपल्याला सतत अडचणींमध्येच जगावं लागेल.

नवरोज तर दरवर्षी येतो आणि जातो, पण यावेळी ही सत्ता जायलाच हवी," असं तेहरानमधील 30 वर्षीय रामटिन म्हणतात.

तेहरानचा कियान सांगतो की, त्याची आई म्हणते "जर धर्मगुरू सत्ता सोडणार असतील, तर त्यासाठी माझ्यावर घर कोसळलं तरी चालेल."

"मलाही तसंच वाटतं. सगळं काही उद्ध्वस्त झालं तरी चालेल, पण इस्लामिक रिपब्लिक जाण्याची गरज आहे. आम्हाला नवरोजची काहीच पर्वा नाही, आमच्या टेबलावर हॅफ्ट सीनही नाही," असं तो म्हणतो.

नवरोज म्हणजे हिवाळ्याची थंडी कमी होऊन वसंत ऋतूचं आगमन होण्याचा काळ. साधारणपणे या वेळी लोक इच्छा व्यक्त करतात.

स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलं आरोग्य, आनंद आणि नवीन वर्षात नवीन सुरुवात मिळावी, अशी इच्छा व्यक्त करतात.

तेहरानमधील 20 वर्षीय शिरीन म्हणते, नवरोजच्या वेळीच युद्ध सुरू असल्यामुळे "मला आणखी वाईट वाटतं."

"काही दुकाने उघडी आहेत, पण हवेत नवरोजचा उत्साह जाणवत नाही, सुगंध दरवळत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.