You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साडीतील 'डाकतरिन' ते ब्रिटनच्या पहिल्या महिला फेलो; जेमिनी सेन यांच्या जिद्दीची गोष्ट
- Author, सुधा जी टिळक
- वाचन वेळ: 5 मिनिटे
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वैद्यकशास्त्रात प्रामुख्याने पुरुषांचेच वर्चस्व होते. युरोपमधील बहुतांश संस्थांमध्ये महिलांना स्थान नव्हतं, त्यांना या संस्थांचे दरवाजे बंदच होते.
त्यावेळी भारतातील बंगालमधील एक तरुण डॉक्टर या कठीण बंधनातून मार्ग काढणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
1912 मध्ये, जेमिनी सेन यांची ग्लासगोच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्समध्ये फेलो म्हणून निवड झाली.
अशी निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. ही संस्था 1599 मध्ये स्थापन झाली होती आणि बराच काळ येथे महिलांना प्रवेश नव्हता.
पण आधुनिक वैद्यकशास्त्राच्या अनेक पायोनियर्स किंवा अग्रेसर महिलांप्रमाणेच, त्यांचीही कहाणी बहुतेक लोकांना माहिती नव्हती.
आता साधारण एका शतकानंतर सेन यांचं असामान्य जीवन समोर आलं आहे.
नेपाळमधील राजवाड्यांच्या रुग्णालयांपासून (पॅलेस वॉर्ड) ब्रिटनमधील परीक्षा कक्षांपर्यंत आणि इंग्रजांचं शासन असलेल्या (वसाहती) भारतातील महामारीग्रस्त गावांचा अनुभव त्यांनी घेतला होता.
या सर्व अनुभवाची पुनर्बांधणी सेन यांच्या नात्यातील दीप्ता रॉय चक्रवर्ती यांनी लिहिलेल्या नवीन चरित्रग्रंथ 'डाकतरिन जेमिनी सेन' मध्ये करण्यात आली आहे.
('डाकतरिन' हा उत्तर भारतातील अनेक भाषांमध्ये महिला डॉक्टरसाठी वापरला जाणारा शब्द आहे).
हे चरित्र सेन यांनी लिहिलेली पत्रं, डायरी, त्यांचं स्वतःचं छोटंसं जर्नल, 'महिला परिषद' नावाच्या जर्नलमधील त्यांचा लेख, आणि त्यांच्या मोठ्या बहीण कामिनी यांनी लिहिलेली संक्षिप्त माहिती यावर आधारित आहे.
बंगालमध्ये शिक्षण
या पुस्तकामुळे स्वातंत्र्यपूर्व बंगालमधील एक बुद्धिमान आणि ठाम विचारांची महिला पुन्हा इतिहासात समोर येते.
1871 मध्ये बंगाल प्रेसिडेन्सीतील बारिसाल येथे एका प्रगतीशील विचारांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
सात भावंडांपैकी त्या एक होत्या. युरोपमधील वैद्यकीय संस्थापर्यंतच्या त्यांच्या मोठ्या प्रवासाची इथूनच सुरुवात झाली होती.
कलकत्ता (आताचं कोलकाता) येथील बेथून कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनंतर त्यांनी 1897 मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतली.
त्या काळात वैद्यक क्षेत्रात बहुतांश पुरुषच होते आणि वंशाच्या आधारावरही भेदभाव केला जात होता.
नेपाळच्या राजघराण्याच्या डॉक्टर
पदवी मिळाल्यानंतर लवकरच त्यांनी एक महत्त्वाची नोकरी स्वीकारली. त्या नेपाळमध्ये राजघराण्याच्या डॉक्टर म्हणून काम करू लागल्या आणि काठमांडूच्या झेनाना रुग्णालयाच्या प्रमुख बनल्या.
सुमारे दहा वर्षे त्यांनी उच्च स्तरावर डॉक्टर म्हणून काम केलं. त्यांनी राजा पृथ्वी बीर बिक्रम शाह यांचा विश्वास संपादन केला आणि पारंपरिक वातावरणात आधुनिक उपचारपद्धती सुरू केल्या.
नेपाळमधील त्यांच्या काळात काही नाट्यमय घडामोडीही घडल्या.
राजवाड्यातील अस्थिरता आणि बंडाच्या अफवांमुळे, सेन शेवटी देश सोडून गेल्या.
ज्या राजाने त्यांना सन्मान म्हणून आपलं चिन्ह असलेलं सोन्याचं घड्याळ दिलं होतं, त्यांचा लवकरच मृत्यू झाला. त्यामागे विषबाधा असल्याचा संशय व्यक्त केला गेला.
पण त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांना पुढे नेत राहिली.
पहिल्या महिला फेलो
1911 मध्ये, लेडी डफरिन फंडच्या मदतीने त्या ब्रिटनला गेल्या. तिथे त्यांनी डब्लिनमध्ये वैद्यकीय परवाना घेतला, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये शिक्षण घेतले आणि पुढे ग्लासगोमध्ये फेलोशिपची परीक्षा दिली.
त्या काळात रॉयल कॉलेजने नुकतीच महिलांसाठी परीक्षा सुरू केली होती. 1912 मध्ये त्या ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि 1599 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेतील त्या पहिल्या महिला फेलो बनल्या.
पण हा विजय पूर्ण नव्हता. कॉलेजच्या नोंदींनुसार, सेन यांना "पद धारण करता आलं नाही. म्हणजेच महिला फेलो म्हणून त्यांना पुरुषांपेक्षा कमी अधिकार मिळाले होते."
दुसऱ्या महिला, मार्गारेट हॉग ग्रँट, यांना प्रवेश मिळायला आणखी 11 वर्षे लागली आणि त्या 1923 मध्ये तिथे दाखल झाल्या.
यानंतर 1912 मध्ये त्या आपलं वैद्यकीय ज्ञान वाढवण्यासाठी बर्लिनला गेल्या. त्या वेळी युरोपमध्ये उष्णकटिबंधीय आजारांवरील संशोधन खूप पुढे होतं. सतत काहीतरी नवीन शिकण्याची हीच ओढ त्यांच्या कामाची खास ओळख बनली.
"माझ्या देशातील माझ्या बहिणींची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे," असं सेन यांनी म्हटलं होतं, असं ग्लासगोच्या रॉयल कॉलेजच्या नोंदींमध्ये नमूद केलेलं आहे.
साडीवाली 'डाकतरिन'
भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी महिला वैद्यकीय सेवेमध्ये काम सुरू केलं आणि आग्रा, शिमला आणि पुरीसारख्या शहरांमध्ये सेवा दिली.
आगऱ्यात ब्रिटिश डॉक्टरांविरोधात स्थानिक तणाव वाढला होता. तो कमी करण्यासाठी जेमिनी सेन यांना बोलावण्यात आलं आणि भारतीय महिला डॉक्टर म्हणून त्यांची उपस्थिती खूप महत्त्वपूर्ण ठरली.
महिला खास त्यांच्याकडेच येत असत, कारण त्यांना त्यांच्यावर विश्वास होता. रुग्ण त्यांना प्रेमाने 'साडीवाली डाकतरिन साहेब' किंवा साडी नेसलेली लेडी डॉक्टर असं म्हणत.
शिमला आणि पुरीमध्येही त्या साथीच्या म्हणजेच महामारीच्या काळात आणि कठीण परिस्थितीत काम करत राहिल्या. त्यावेळी काही ब्रिटिश डॉक्टरांनी काम करणं टाळलं होतं.
अनेक तरुण मातांना बाळंतपणानंतर संसर्ग होत होता (सेप्सिस). हा मोठा प्रश्न होता आणि सेन याला थेट सामोरे गेल्या. "मातृत्त्वाच्या उपचारांमध्ये सर्वात मोठी सुधारणा झाली आहे," असं त्यांनी आपल्या डायरीत अभिमानाने लिहिलं.
त्यांचा ज्या प्रकारे पेहराव होता, त्यातूनही त्यांची साधी पण आधुनिक विचारसरणी दिसून येत असत.
त्यांनी कामासाठी सोपी आणि उपयोगी अशी वेशभूषा स्वीकारली होती.
नीट खोचलेली साडी आणि पूर्ण बाह्यांचा ब्लाउज, ज्याला लेसची कॉलर होती. ही पद्धत पारंपरिक साडीपेक्षा वेगळी होती आणि रुग्णालयात काम करण्यासाठी अधिक सोयीस्कर होती.
वैयक्तिक आयुष्यातही अडचणी
सेन यांच्या वैयक्तिक आयुष्यातही काही अडचणी होत्या.
नेपाळमध्ये असताना त्यांनी 'भुटू' नावाच्या एका लहान मुलीला दत्तक घेतलं होतं. तिची आई बाळंतपणातच मरण पावली होती.
त्या काळात एकल मातेसाठी (सिंगल मदर) आयुष्य खूप कठीण होतं, तरीही सेन यांनी आपल्या कामासोबत मुलीची जबाबदारी सांभाळली.
पण नंतर कलकत्ता येथे त्या मुलीचा गंभीर आजाराने मृत्यू झाला, जो त्यांना एक मोठा धक्का होता.
सेन यांच्या आयुष्यातील काही वस्तू आजही जतन करून ठेवलेल्या आहेत, त्या त्यांच्या चरित्रलेखिकेने सांभाळल्या आहेत.
यामध्ये नेपाळच्या राजाने दिलेलं घड्याळ आहे, जे त्या साडीला खोचून घालत असत. त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मिळालेला तिबेटी 'त्सोग' चमचा आणि लंडनमध्ये घेतलेला निळ्या पंखांचा नाजूक ब्रोचही यात आहे.
त्यांचे फक्त दोनच जुने ब्लॅक अँड व्हाइट फोटो आज उपलब्ध आहेत, जे आता ग्लासगो कॉलेजच्या नोंदीत (आर्काइव्ह) ठेवले आहेत.
ठाम, दृढनिश्चयी बंगाली महिला
चक्रवर्ती यांनी मांडलेली त्यांची प्रतिमा अशी आहे की, त्या महत्त्वाकांक्षा आणि दुःख या दोन्ही गोष्टींनी घडलेल्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व भारतात वंशभेद आणि ब्रिटनमध्ये लिंगभेदाचा सामना करूनही त्या आपल्या कामाप्रती ठाम राहिल्या.
"आज आपण डॉ. जेमिनी सेन यांचा सन्मान करतो, तेव्हा आपण फक्त एका डॉक्टरचा नाही, तर अशा धाडसी पायोनियरचा (मार्गदर्शक) गौरव करतो, ज्यांच्या धैर्यामुळे भारतात, ब्रिटनमध्ये आणि जगभरातील अनेक महिलांना वैद्यकीय क्षेत्रात पुढे जाण्याचा मार्ग मिळाला," असं चक्रवर्ती लिहितात.
सेन यांचं 1932 मध्ये निधन झालं. त्यानंतर अनेक वर्षे त्यांचं नाव विस्मरणात गेलं. 2024 मध्ये, त्यांच्या ऐतिहासिक फेलोशिपनंतर 100 वर्षांहून अधिक काळानंतर, ग्लासगोमध्ये त्यांच्या फोटोचं अनावरण करण्यात आलं. त्यांच्या आयुष्याला उशिरा मिळालेला हा एक सन्मानच आहे.
त्यांची कथा आपल्याला सांगते की, आधुनिक वैद्यकशास्त्राचा इतिहास फक्त युरोपपुरता मर्यादित किंवा फक्त पुरुषांचा नव्हता.
ही कथा साडी नेसलेल्या, राजवाड्यांतील रुग्णालयांत, महामारीच्या ठिकाणी आणि परीक्षा कक्षांमध्येही लिहिली गेली, जिथे एक ठाम, दृढनिश्चयी बंगाली महिला कधीही मागे हटली नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)