You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
92,700 टन LPG घेऊन येणारी भारतीय जहाजं सुरक्षित; होर्मुजमधून पडली बाहेर
स्ट्रेट ऑफ होर्मुज़मधून एलपीजी घेऊन येणारी दोन जहाजं शिवालिक आणि नंदा देवी तिथून सुरक्षितपणे पुढे गेली आहेत.
ही दोन्ही जहाजं 16 आणि 17 मार्चला भारतातील बंदरांवर पोहोचणार आहेत, असं भारत सरकारनं सांगितलं आहे.
जहाज वाहतूक मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, "पर्शियन गल्फ प्रदेशातील सर्व भारतीय नाविक सुरक्षित आहेत आणि गेल्या 24 तासांत त्यांच्याशी संबंधित कोणतीही नकारात्मक घटना घडलेली नाही. पर्शियन गल्फमधील होर्मुज़ सामुद्रधुनीत 24 भारतीय ध्वजवाहक जहाजं होती."
ते पुढे म्हणाले, "यापैकी दोन जहाजं शिवालिक आणि नंदा देवी आज सकाळी होर्मुज़ सामुद्रधुनी पार करून भारताच्या दिशेनं निघाली आहेत. या जहाजांमध्ये सुमारे 92,700 मेट्रिक टन एलपीजी आहे."
सिन्हा यांनी सांगितलं, "ही जहाजं अनुक्रमे मुंद्रा आणि कांडला बंदरांवर पोहोचतील. मुंद्राला 16 मार्चला आणि कांडला बंदरावर 17 मार्चला त्यांचे आगमन अपेक्षित आहे."
ते म्हणाले, "या दोन जहाजांनंतर आता पर्शियन गल्फमध्ये अजून 22 भारतीय ध्वजवाहक जहाजं उरली आहेत. त्यावर एकूण 611 नाविक आहेत. त्यांच्या परिस्थितीवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत."
आयआरजीसीच्या प्रमुख नेत्यांची माहिती देणाऱ्याला 1 कोटी डॉलरचं बक्षिस
अमेरिकेने इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोरच्या (आयआरजीसी) प्रमुख नेत्यांची माहिती देणाऱ्याला 1 कोटी डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून याबाबत एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून या पत्रकात एकूण 10 जणांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या यादीतील केवळ 6 जणांची नावं आणि फोटो सार्वजनिक करण्यात आली आहेत.
या यादीत इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांच्या नावाचाही समावेश आहे.
अली रालीजानी यांना यापूर्वी इराणमध्ये आयोजित सरकार समर्थक रॅलीमध्ये पाहिलं गेलं होतं. अमेरिकेच्या मते, हे लोक आयआरजीसीच्या लष्करी तुकड्यांच्या विविध विभागाचे नेतृत्व आणि संचलन करतात.
इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात 58 जण जखमी, इस्रायल सैन्यानं काय सांगितलं?
इस्रायली आपत्कालीन सेवांनुसार शुक्रवारी (13 ) पहाटे उत्तर इस्रायलमधील एका गावात क्षेपणास्त्र कोसळल्याने अनेक जण जखमी झाले.
रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या मॅगेन डेव्हिड अॅडोमने (एमडीए) दिलेल्या माहितीनुसार, नाझरेथजवळील झरझिर गावात झालेल्या हल्ल्यानंतर 58 जणांवर उपचार करून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
इस्रायली माध्यमांनुसार, छर्रे लागून जखमी झालेल्या एका महिलेची प्रकृती गंभीर आहे, तर इतर 57 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
इस्रायली सैन्याने सांगितले की, होम फ्रंट कमांडचे सैनिक घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.
इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले, "सैनिक आपत्कालीन आणि बचाव पथकांसोबत मिळून परिसर सुरक्षित करण्यासाठी घटनास्थळवरील परिस्थितीचे मूल्यांकन करत आहे."
"या घटनेच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे," असंही निवेदनात म्हटलं आहे.
तेहरानसह इराणच्या अनेक भागात इस्रायलकडून हल्ले
इस्रायलने इराणमध्ये नव्याने हल्ल्यांची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी (13 मार्च) सकाळी राजधानी तेहरानसह अनेक भागांमध्ये स्फोट आणि हल्ल्यांच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
बीबीसी पर्शियनने दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले शुक्रवारी पहाटे सुमारे 5 वाजेपर्यंत सुरू होते. हल्ल्यानंतर अराक परिसरातून हल्ल्याची अनेक छायाचित्रं समोर आली आहेत.
तसेच कराज परिसरातही हल्ले झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावरून समोर आल्या आहेत.
तेहरानमधील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यांची तीव्रता इतकी जास्त होती की, स्फोटाचे धक्के घटनास्थळापासून बर्याच दूरपर्यंत जाणवले.
इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सशी (रिव्होल्युशनरी गार्ड्स) संबंधित तसनीम न्यूज एजन्सीने दक्षिण तेहरानमध्ये स्फोट झाल्याची माहिती दिली आहे.
एतमाद न्यूज़ पेपरने शुक्रवारी सकाळी हल्ले झालेल्या भागांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार पूंक, मरझदारन, इस्लाम शहर, शहर रे, लवासान, परदिस, झफ़रानीह, दौलत, सुहरावर्दी, नाझी आबाद आणि तेहरान पार्स या भागांचा समावेश आहे.
इराणचे नवे सर्वोच्च नेते खामेनी यांची पहिली प्रतिक्रिया, शेजारी देशांना काय सल्ला दिला?
इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी देशाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या संघर्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
इराणे होर्मुझच्या सामुद्रधुनीला लक्ष्य करण्याची रणनीती सुरू ठेवायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचे हे वक्तव्य इराणच्या सरकारी टीव्हीवरून वाचून दाखविण्यात आले.
ही त्यांनी केलेले पहिले सार्वजनिक वक्तव्य आहे.
बीबीसी पर्शियनच्या वृत्तानुसार खामेनी यांनी म्हटलं आहे की, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा पर्याय वापरणे सुरू ठेवले पाहिजे.
त्यांनी असेही म्हटले की, शेजारी देशांबरोबर इराणची धोरणं मैत्रीपूर्ण आहेत. मात्र त्याचवेळी त्यांनी या देशांना अमेरिकेचे लष्करी तळ बंद करण्याचा सल्ला दिला.
इराण या तळांना लक्ष्य करणं सुरूच ठेवेल, असं खामेनींनी म्हटलंय.
इराण आपल्या नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, विशेषतः मिनाबची घटना विसरणार नाही, असं खामेनींनी म्हटलं.
मिनाब इथे झालेल्या हल्ल्यात 168 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 110 शाळकरी विद्यार्थिनी होत्या.
अमेरिकेने या शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप इराणने केला आहे. पण अमेरिकेने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
'काही लोक भीती निर्माण करत आहेत'; एलपीजी तुटवड्यावर पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
दिल्लीत झालेल्या एका परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एलपीजी गॅसची परिस्थिती आणि इराण युद्धावर भाष्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपल्या अगदी जवळ एक मोठे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे."
"एक देश म्हणून आपण याचा सामना कसा करतो हे खूप महत्वाचे आहे," असं मत मोदींनी व्यक्त केलं.
मोदी पुढे म्हणाले, "आजकाल एलपीजीबद्दल खूप चर्चा होत आहे. काही लोक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांचा स्वतःचा अजेंडा पुढे चालवू इच्छितात."
"मी सध्या त्यांच्यावर राजकीयदृष्ट्या भाष्य करू इच्छित नाही. परंतु मी निश्चितपणे म्हणेन की, असे करून ते केवळ स्वतः जनतेसमोर उघडे पडत करत नाहीत, तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान करत आहेत."
"या जागतिक संकटाच्या परिणामापासून कोणताही देश दूर नाही. प्रत्येकजण कमी-अधिक प्रमाणात या संकटाला बळी पडला आहे. भारत या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही," असंही त्यांनी नमूद केलं.
'इराणविरोधात आम्ही विजय मिळवला', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात सुरू असलेल्या लष्करी कारवाईचं कौतुक केलं आहे. इराणचं नौदल आणि हवाई दल अमेरिकेच्या लष्कराने काही तासांतच उद्धवस्त केल्याचे त्यांनी सांगितलं.
ट्रम्प म्हणाले, 'आम्ही जिंकलो. पहिल्या तासांतच सर्व काही संपुष्टात आलं होतं.'
अमेरिकेने दोन दिवसांत इराणची 54 जहाजं नष्ट केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र काही क्षणांनंतर त्यांनी ही संख्या 58 असल्याचं सांगितलं.
हा आकडा यापूर्वी समोर आलेला नव्हता आणि बीबीसीनेही त्याची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
'ऑपरेशन एपिक फ्युरी' तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करेल आणि यामुळे जगाला असलेला धोका देखील कमी होईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं.
रशिया-पाकिस्तानशी चर्चेनंतर इराणने युद्ध थांबवण्यासाठी कोणती अट ठेवली?
अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी युद्ध थांबवण्यासाठी एक अट ठेवली आहे.
रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेत या भागात शांतता राखण्याबाबत इराणच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केल्याचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांनी सांगितलं.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेलं युद्ध थांबवायचं असेल तर इराणचे वैध (कायदेशीर) हक्क मान्य करावे लागतील, युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई करावी लागेल आणि भविष्यात असे हल्ले होऊ नये यासाठी मजबूत आंतरराष्ट्रीय हमी द्यावी लागेल."
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या भागात तणाव वाढलेला असताना पेजेश्कियान यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.
दरम्यान, मध्य पूर्व देशांमधील अमेरिका आणि इस्रायलच्या तळांना ते लक्ष्य करत आहेत, असं मंगळवारी (10 मार्च) इराणने म्हटलं होतं.
रशियन तेल खरेदीसाठी भारताला दिलेल्या 'परवानगी'वर अमेरिकेने काय म्हटलं?
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठा कायम राहावा म्हणून अमेरिकेने भारताला रशियन तेल तात्पुरतं स्वीकारण्याची परवानगी दिली आहे, असं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे.
प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मंगळवारी (10 मार्च) व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषेदत ही माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि राष्ट्रीय सुरक्षा टीमने हा निर्णय घेतला आहे. भारताने जबाबदार भूमिका घेतली आणि याआधीही बंदी असलेलं रशियन तेल खरेदी करणं थांबवलं होतं, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
लेविट म्हणाल्या, "इराण संकटामुळे जगभरात तेलाच्या पुरवठ्यात तात्पुरती कमतरता निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी आम्ही भारताला तात्पुरत्या स्वरूपात रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे."
त्यांनी असंही म्हटलं की, हे रशियन तेल आधीच समुद्रात, म्हणजे जहाजांवर भरून मार्गावर होतं. त्यामुळे ही फक्त तात्पुरती व्यवस्था आहे आणि यामुळे रशियन सरकारला विशेष आर्थिक फायदा होणार नाही, असं आम्हाला वाटतं.
मोज्तबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते बनल्यानंतर भारताने प्रथमच इराणशी संवाद साधला
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी (10 मार्च) इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मध्यपूर्वेत संघर्ष सुरू झाल्यापासून दोन्ही नेत्यांमधील हे तिसरं संभाषण आहे.
दोन्ही देशांतील ही चर्चा अशा वेळी झाली आहे, जेव्हा होर्मुज समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलपुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे.
इराणव्यतिरिक्त एस. जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वादेफुए आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्याशीही चर्चा संवाद साधला. या चर्चेत मध्यपूर्वेतील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीवर चर्चा केली.
जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं की, "सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित नवीनतम घडामोडींवर इराणी परराष्ट्र मंत्री अराघची यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. संपर्कात राहण्याबाबत आम्ही सहमती दर्शवली."
इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून मोज्तबा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील ही पहिलीच चर्चा होती.
मोज्तबा खामेनी वडील आयतुल्ला अली खामेनी यांचा काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
इराणमधील आपल्या वाणिज्यदूतावासावर झालेल्या हल्ल्याबाबत रशियाने काय म्हटलं?
इराणमधील इस्फहान येथे असलेले त्यांचे वाणिज्य दूतावास आठवड्याच्या शेवटी झालेल्या हल्ल्यांमुळे नुकसानग्रस्त झाल्याचं रशियाने म्हटलं आहे.
रशियाच्या मते, वाणिज्य दूतावासाजवळ असलेल्या स्थानिक राज्यपालांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यांमुळे हे नुकसान झाले.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या घटनेचं वर्णन आंतरराष्ट्रीय कायद्याचे "स्पष्ट उल्लंघन" म्हणून केलं आहे. मात्र या हल्ल्यासाठी त्यांनी कोणत्याही विशिष्ट देशावर आरोप केलेले नाहीत.
त्या म्हणाल्या, "मध्यपूर्वेतील संघर्ष सतत वाढत आहे आणि त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम आता अधिक देशांवर आणि त्यांच्या नागरिकांच्या हितांवर होत आहे."
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही, असेही झाखारोवा यांनी सांगितलं.
पाण्याखाली स्फोटक सुरुंग पेरणारी इराणची 16 जहाजे नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा
11 मार्च :
इराणची स्फोटक सुरुंग पेरणारी 16 जहाजे होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेनी केला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांड ( सेंटकॉम) ने एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात जहाजांवर हल्ला होताना दिसत आहे.
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की अमेरिकन सैन्याने होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणच्या 10 जहाजांवर हल्ला केला आहे.
इराणच्या अमेरिका आणि इस्रायल सोबत होत असलेल्या युद्धामुळे समुद्री मार्गातील वाहतूक प्रभावित झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे.
तेलाच्या वाहतुकीसाठी होर्मुजची सामुद्रधुनी ही जगातील महत्त्वपूर्ण मार्गांपैकी एक मानली जाते.
सीबीएस न्यूजने सांगितले की अमेरिकन गुप्तहेर एजन्सीना अशी शंका वाटत होती की होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराण पाण्याखाली स्फोटक सुरुंग पेरण्याची तयारी करत आहे.
'तेल वाहतूक रोखली तर आग आणि कहर', ट्रम्प यांचा इराणला इशारा
10 मार्च :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलाच्या वाहतुकीत अडथळा आणला, तर अमेरिका कडक कारवाई करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपेक्षा 20 पट अधिक ताकदीने प्रत्युत्तर देईल."
जगातील सुमारे 20 टक्के तेलाची वाहतूक याच सागरी मार्गाने होते.
सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे या सागरी मार्गावरील वाहतूक खूप कमी झाली आहे. त्यामुळे जगभरात तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
ट्रम्प म्हणाले, "याशिवाय आम्ही इराणमधील अशा ठिकाणांवर हल्ला करू, ज्यांना सहज उद्ध्वस्त करता येईल. त्यामुळे इराणला पुन्हा देश म्हणून उभं राहणं जवळजवळ अशक्य होईल. त्यांच्यावर मृत्यू, आग आणि कहर कोसळेल. पण अशी वेळ येऊ नये, अशी मी आशा आणि प्रार्थना करतो."
इराणमधील युद्ध कधी संपणार? डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
इराणमधील युद्ध संपवण्याच्या प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणमधील अमेरिकेची लष्करी कारवाई लवकरच संपू शकते, परंतु या आठवड्यात ती संपणार नाही.
ट्रम्प म्हणाले, "इराणकडे जे काही होते ते जवळजवळ संपले आहे, अगदी त्यांचे नेतृत्व देखील."
इराणचे नवे नेते म्हणून ज्या नावाची चर्चा होत आहे ते फारसे लोकांना माहीत देखील नाही असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं.
अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडीबद्दल नाराज असल्याचे म्हटले आहे, हे देखील उल्लेखनीय आहे.
ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचेही सांगितले. संभाषणादरम्यान युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरही चर्चा झाली, असं त्यांनी म्हटलं.
ट्रम्प म्हणाले, "युक्रेनमधील युद्ध हा एक संघर्ष आहे जो संपताना दिसत नाही. राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात कट्टर वैर आहे आणि ते अद्याप कोणत्याही करारावर पोहोचू शकलेले नाहीत. पण मला वाटते की, त्या मुद्द्यावरील चर्चा सकारात्मक होती."
चर्चेदरम्यान मध्य पूर्वेतील परिस्थितीवरही चर्चा झाली आणि पुतिन यांनी मदत करण्याची तयारी दर्शविली, असंही त्यांनी नमूद केलं.
ट्रम्प यांच्या मते, त्यांनी पुतिन यांना सांगितले, "जर तुम्ही युक्रेनमधील युद्ध संपवण्यास मदत केली, तर ते आणखी उपयुक्त ठरेल."
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी (9 मार्च) इराणचे नवे सर्वोच्च नेते झाल्याबद्दल मोज्तबा खामेनी यांचे अभिनंदन केले.
रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "रशिया इराणला असलेला पाठिंबा आणि त्यांच्यासोबतची एकजुटता पुन्हा अधोरेखित करतो. आम्ही एक विश्वासार्ह भागीदार राहण्याचे वचन देतो."
गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यामुळे मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणाव वाढला आहे.
मोज्तबा खामेनींच्या इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्तीवर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
इराणची राजधानी तेहरानमधील तेल डेपोवर झालेल्या हल्ल्यानंतर मोठी आग लागली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बघायला मिळत आहेत.
दुसरीकडे, इराणी माध्यमांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्या जागी पुढील सर्वोच्च नेते निवडण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त दिले आहे. अयातुल्ला अली खामेनींचे पुत्र मोज्तबा खामेनी हे सर्वोच्च नेते म्हणून निवडण्यात आल्याचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे.
इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांच्या निवडीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
फॉक्स न्यूजच्या एका कार्यक्रमात दिलेल्या माहितीनुसार, इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांच्या नियुक्तीवर डोनाल्ड ट्रम्प 'खुश नाहीत'.
फॉक्स न्यूजचे समालोचक ब्रायन किल्मेडे म्हणाले की नवीन सर्वोच्च नेत्याच्या घोषणेनंतर त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, ट्रम्प यांनी त्यांना सांगितले, "मी खूश नाही."
किल्मेडे यांनी संभाषणाबद्दल अधिक तपशील दिले नाहीत. ट्रम्प यांनी अद्याप या विषयावर सार्वजनिकपणे भाष्य केलेलं नाही.
बीबीसी पर्शियनने मेहर न्यूज एजन्सीचा हवाला देत वृत्त दिले आहे की, इराणच्या 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्सट'चे सदस्य अहमद अलामोलहोदा यांनी सांगितले की, पुढील सर्वोच्च नेत्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि नवीन नेता निवडला गेला आहे.
अलामोलहोदा पुढे म्हणाले की, आता सर्व काही 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्सट'चे सचिवालय प्रमुख होसेनी बुशेरी यांच्यावर अवलंबून आहे. तेच हा निर्णय जाहीर करतील.
इराण सरकारचं समर्थन असलेल्या मेहर न्यूज एजन्सीने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये, एक वरिष्ठ धर्मगुरू असे म्हणत आहेत की, इराणच्या 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्सट'ने दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या जागी कोण येईल यावर जवळजवळ निर्णय झाला आहे.
मेहर न्यूज एजन्सीच्या मते, अयातुल्ला मोहम्मद मेहदी मीरबाघेरी म्हणाले की, 'बहुमताने निर्णय' झाला आहे, परंतु काही प्रक्रियात्मक अडथळे दूर व्हायचे आहेत. लवकरच 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्सट'ची बैठक होणं अपेक्षित आहे.
सर्वोच्च नेत्याचं नाव जाहीर झालेलं नसलं, तरी रॉयटर्सने 2 इराणी सूत्रांचा हवाला देऊन वृत्त दिले आहे की, अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. असं असलं तरी, अशा दाव्यांची पुष्टी करणे कठीण आहे.
इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे (SNSC) प्रमुख अली लारिजानी यांनी अनेक अमेरिकन सैनिक इराणच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं, "माझ्याकडे अशी माहिती आली आहे की, अनेक अमेरिकन सैनिकांना कैद करण्यात आलं आहे. मात्र, अमेरिकेचा दावा आहे की, ते युद्धात मारले गेले."
ते पुढे म्हणाले, "त्यांच्या निष्फळ प्रयत्नांनंतरही ते सत्य फार काळ लपवू शकणार नाहीत."
मात्र, या दाव्याबाबत अमेरिकेकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (7 मार्च) डोव्हर एअर फोर्स बेसवर इराणसोबतच्या युद्धात मृत्यू झालेल्या 6 अमेरिकन सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. त्यानंतरपासून मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे.
लेबनॉनची राजधानी बेरुत येथील हॉटेलवर इस्रायली हल्ला, 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
लेबनॉनची राजधानी बेरूतमधील एका हॉटेलवर इस्लायलने रविवारी (8 मार्च) केलेल्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, दक्षिण लेबनॉन आणि बेरूतच्या दक्षिण उपनगरांमध्ये सुरू असलेल्या युद्धात बेघर झालेल्या लोकांच्या आश्रयासाठी हे हॉटेल वापरलं जात होतं.
दरम्यान, आणखी हल्ले होतील या भीतीने काही लोक इमारतीबाहेर पडताना दिसले.
दुसरीकडे इस्रायल डिफेंस फोर्सेसनी टेलिग्रामवर एका पोस्टद्वारे म्हटलं आहे की, त्यांनी लक्ष्य कुद्स फोर्सच्या 'मुख्य कमांडर'ना लक्ष्य करून अचूक निशाणा साधला.
आयडीएफने या आठवड्याच्या सुरुवातीला असा दावा केला होता की त्यांनी लेबनॉन कॉर्प्सचे तात्पुरते कमांडर दाऊद अलिजादेह यांना ठार मारलं आहे.
ट्रम्प यांनी ब्रिटनला म्हटलं, 'आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं , "युनायटेड किंगडम, जो कधीकाळी आमचा महान मित्र होता, कदाचित सर्वात महान.. तो अखेर मध्य पूर्वेत 2 विमानवाहू युद्धनौका पाठवण्याचा गंभीर्याने विचार करत आहे."
त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांना उद्देशून म्हटलं, "ठीक आहे, पंतप्रधान स्टार्मर, आता आम्हाला त्यांची गरज नाही, पण आम्ही हे लक्षात ठेवू."
ट्रम्प पुढे म्हणाले, "आम्हाला अशा लोकांची गरज नाही. ते युद्धात तेव्हा सामील होतात, जेव्हा आम्ही ते आधीच जिंकलेलं असतं."
दरम्यान, इराणविरोधात ब्रिटनच्या सरकारने आतापर्यंत कोणत्याही लष्करी कारवाईत सहभागी होण्याची किंवा तसे करण्याची कोणतीही बांधिलकी व्यक्त केलेली नाही.
मात्र ब्रिटनने अमेरिकेला संरक्षणासाठी त्यांच्या लष्करी तळांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.
मला वाटतं इराणनेच शाळेवर हल्ला केला आहे - ट्रम्प
इराणमधील मिनाब येथील शाळेवरील हल्ल्यामागे इराणचा हात असू शकतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
इराणी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं होतं. बीबीसी न्यूजने या आकड्याची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
शनिवारी रात्री एअर फोर्स वन विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांना विचारण्यात आलं की, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) एका ठिकाणाजवळ झालेल्या या हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार आहे का?
यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "नाही! माझ्या मते आणि मी जे पाहिलं त्यावरून हा हल्ला इराणनेच केला आहे."
यावेळी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, "आम्ही याची चौकशी करत आहोत, परंतु, नागरिकांना लक्ष्य करण्याची पद्धत साधारणपणे इराणचीच राहिली आहे."
यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा म्हटलं, "आम्हाला वाटते हा हल्ला इराणनेच केला आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांची शस्त्रं फारशी अचूक नाहीत. त्यांच्याकडे अचूकता नाही."
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही म्हटलं होतं की, अमेरिका जाणीवपूर्वक कोणत्याही शाळेला लक्ष्य करणार नाही आणि नागरिकांच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचे अमेरिकन सैन्याकडे कोणतेही कारण नाही.
मात्र, त्याचवेळी अमेरिका आणि इस्रायल इराणच्या लष्करी तळांवर आणि नेत्यांवर मोठे हल्ले करत होते.
दरम्यान, इराणी अधिकाऱ्यांनी शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार ठरवलं आहे. तर इस्रायली सैन्याने म्हटलं आहे की, त्या भागात कोणतीही कारवाई केल्याची माहिती त्यांच्याकडे नाही, मात्र ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
बीबीसी व्हेरिफायच्या उपग्रह विश्लेषणात अनेक स्फोटांच्या खुणा आणि जळालेल्या जागा दिसून आल्या, ज्यावरून असे दिसून येते की, शाळेवर एकापेक्षा जास्त वेळा हल्ला झाला होता.
मात्र, वापरलेल्या शस्त्रांचे अवशेष स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे हा हल्ला नेमका कोणी केला हे निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे.
अडकलेले किती भारतीय देशात परतले? परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
मध्य पूर्वेतील वेगाने विकसित होणाऱ्या परिस्थितीवर, विशेषतः तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत, बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं भारताने शनिवारी (7 मार्च) म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने उशिरा रात्री जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या भागात काही प्रमाणात हवाई क्षेत्र खुले झाल्यानंतर आतापर्यंत 52,000 हून अधिक भारतीय नागरिक देशात परतले आहेत.
मंत्रालयाने त्या प्रदेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे आणि भारतीय दूतावासांनी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावे.
गेल्या शनिवारी (7 मार्च) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. त्यानंतरपासून मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
इराणच्या तेल साठा केंद्रांवर इस्रायलचा मोठा हल्ला
इस्रायल सुरक्षा दलाने इराणची राजधानी तेहरानमधील 'अनेक फ्युल स्टोरेज कॉम्प्लेक्स'वर हल्ला केल्याची पुष्टी केली आहे.
आयडीएफच्या मते, फ्युल टँक्सविरोधात केलेला हा एक आवश्यक हल्ला होता.
सैन्याने असा दावा केला की, इराणी शासन "सैन्याला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी या फ्युल टँक्सचा वापर" करत होते.
याआधी इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेनंदेखील तेहरानमधील एका तेल साठ्याला लक्ष्य करण्यात आल्याचं वृत्त दिलं होतं.
दरम्यान, बीबीसी व्हेरिफायने सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका व्हीडिओची पुष्टी केली आहे. या व्हीडिओमध्ये तेहरानच्या आकाशात आग आणि धुराचे मोठे लोळ उठल्याचे दिसून येत आहे.
मात्र, या हल्ल्यात आतापर्यंत कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही.
'इराणचं सैन्य 'पूर्णपणे उद्ध्वस्त' झालं, त्यांची सर्व 32 जहाजं समुद्रात बुडाली'; ट्रम्प यांनी काय दावे केले?
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (6 मार्च) म्हटलं की, अमेरिका इराणविरोधात चांगलं काम करत आहे. इराणचं सैन्य 'पूर्णपणे उद्ध्वस्त' झाल्याचाही दावा त्यांनी केला.
व्हाईट हाऊसमध्ये कॉलेज स्पोर्टसवर आयोजित राउंडटेबल दरम्यान ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "आमचं सैन्य अतिशय चांगली कामगिरी करत आहेत"
ट्रम्प म्हणाले, "त्यांचं (इराण) सैन्य संपलं आहे, त्यांचं नौदलही संपुष्टात आलं असून हवाईदलही पूर्णपणे नष्ट झालं आहे. त्यांचं कम्युनिकेशन बंद पडलं असून पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेतृत्व संपलं आहे. त्यांच्याकडे आता तिसऱ्या फळीतील नेतृत्व उरलं आहे."
"त्यांच्याकडे 32 जहाजं होती, ती सर्व जहाजं समुद्रात बुडाली आहेत", असाही दावा त्यांनी केला.
इराणच्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
इराणच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडिओ फुटेजमध्ये मेहराबाद विमानतळावर जळणारी विमाने आणि त्यातून निघणारा धूर दिसत आहे.
शुक्रवारी (6 मार्च) घेतलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये विमानतळावर अनेक विमान असल्याचं दिसून येत आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनीही विमानतळाच्या काही भागांना लक्ष्य करण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.
हे अशा वेळी घडलं, जेव्हा इस्रायली लष्कराने इराणमध्ये 'मोठ्या प्रमाणावर नवे हल्ले' सुरू करत असल्याचे सांगितलं.
यापूर्वी इस्रायली लष्कराने 4 मार्च रोजीही या विमानतळाला लक्ष्य केले होते. त्यावेळी त्यांच्या हल्ल्यांमुळे इस्रायली हवाई दलासाठी धोका निर्माण करणाऱ्या संरक्षण आणि शोध यंत्रणा नष्ट केल्याचा दावा करण्यात आला होता.
या विमानतळाच्या नेमक्या कोणत्या भागांना लक्ष्य करण्यात आलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, यावेळी बॉम्बस्फोट अतिशय तीव्र होता, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.
इराणमध्ये आतापर्यंत किती जणांचा मृत्यू?
संयुक्त राष्ट्रांमधील (युएन) इराणचे स्थायी प्रतिनिधी अमीर सईद इरवानी यांनी सांगितलं की, 28 फेब्रुवारीपासून देशावर झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत 1,332 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्कमधील युएन मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना इरवानी यांनी सांगितलं की, इराणी रेड क्रिसेंट सोसायटीच्या मते मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
ते म्हणाले, "हजारो लोक जखमी झाले आहेत आणि ही संख्या सतत वाढत आहे."
शाळा, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांना 'जाणूनबुजून' लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप इरवानी यांनी केला.
मात्र, अमेरिकेने नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले केल्याचा आरोप नाकारला आहे. इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात अमेरिकेने 'चौकशी केली जाईल' असे म्हटले. या हल्ल्यात 150 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुतेक मुली आहेत.
दरम्यान, इस्रायलनेही इराणवर त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)