'जहाज भारतीय नौदलाचे पाहुणे होते, अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागेल'; युद्धनौका बुडाल्यावर इराणने काय म्हटलं?

वाचन वेळ: 6 मिनिटे

अमेरिकेने हिंदी महासागरात एक इराणी युद्धनौका बुडवली असल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केला.

अशाप्रकारे जहाज उद्ध्वस्त करण्यासाठी पाडबुडीद्वारे टॉर्पिडोचा हल्ला करण्यात येतो. मात्र, हेगसेथ यांनी बुडालेल्या इराणी जहाजाचं नाव सांगितलं नाही.

याआधी, श्रीलंकेच्या नौदलाने 'आयआरआयएस डेना'(IRIS Dena) नावाची युद्धनौका हिंदी महासागरात बुडाल्याचं म्हटलं होतं.

जहाजातून प्रवास करणारे 140 प्रवासी बेपत्ता असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

श्रीलंका सरकारने दावा केला होता की, 'आयआरआयएस डेना' या इराणी युद्धनौकेकडून त्यांना एक डिस्ट्रेस कॉल (आपत्कालीन संदेश) मिळाला होता, ज्यामध्ये मदत मागण्यात आली होती.

या हल्ल्यावर आता इराणने प्रतिक्रिया दिली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी या हल्ल्यावरून अमेरिकेवर टीका केली आहे.

त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, "इराणच्या किनाऱ्यापासून 2 हजार मैल अंतरावर अमेरिकेने समुद्रात एक गुन्हा केला आहे. 'फ्रिगेट डेना' नावाचे जहाज, जे भारतीय नौदलाचे पाहुणे होते आणि ज्यावर 130 नौसौनिक होते, त्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता आंतरराष्ट्रीय सीमेत हल्ला करण्यात आला. अमेरिकेने जो पायंडा पाडला आहे, त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागेल."

इराणच्या या युद्धनौकेने अलीकडेच एका लष्करी सरावात भाग घेतला होता. हा सराव इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू-2026 म्हणून ओळखला जातो आणि याचे आयोजन भारताने केले होते.

विरोधकांनी काय म्हटलं?

या हल्ल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिलं, "हे इराणी नौसैनिक भारतातील एका कार्यक्रमासाठी आले होते. आपण त्यांना आमंत्रित केले होते आणि ते आपले पाहुणे होते. ते परत जात असताना अमेरिकन पाणबुडीने त्यांच्या जहाजावर हल्ला करून त्यांना मारले."

त्यांनी पुढे लिहिलं, "पण पंतप्रधान मोदी यांनी याबद्दल काहीच वक्तव्यं केलं नाहीये. ही भ्याडपणाची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदींचे मौन भारतासाठी लाजिरवाणे आहे."

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही इराणी जहाजाचा एक व्हीडिओ शेअर करत 'एक्स'वर प्रतिक्रिया दिली.

त्यांनी लिहिले, "हा व्हिडिओ मोदीजींच्या भ्याडपणाची कायमस्वरुपी नोंद असेल. भारताच्या निमंत्रणावर 'मिलन युद्धाभ्यास 2026' साठी इराणने आपले जहाज पाठवले होते. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत या जहाजाच्या क्षमतांची माहिती देण्यात आली होती."

संजय सिंह यांनी पुढे लिहिलं, "अमेरिकेने हे जहाज नष्ट केले. यात 100 हून अधिक नाविक मारले गेले. आपले पाहुणे मारले गेले आणि मोदी शांत आहेत."

महाराष्ट्रातील भिवंडी (पूर्व) मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी लिहिले आहे की, "श्रीलंकेजवळ 'IRIS डेना' बुडाल्याचे ऐकून खूप दुःख झाले. काही दिवसांपूर्वीच या जहाजावरील नाविकांनी विशाखापट्टणममध्ये 'मिलन' सरावादरम्यान मार्च केला होता. 80 हून अधिक नाविकांच्या कुटुंबीयांप्रती माझी मनःपूर्वक संवेदना."

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) च्या प्रवक्त्या प्रियंका भारती यांनीही या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारले.

त्यांनी एक्सवर लिहिले, "इराणी जहाज भारताच्या निमंत्रणावर नौदलाच्या सरावासाठी भारतात आले होते आणि सरावावेळी आपल्या राष्ट्रपतीही उपस्थित होत्या. ते जहाज परत जात असताना हिंदी महासागरात अमेरिकेने त्यावर हल्ला करून ते बुडवले."

त्यांनी पुढं म्हटलं, "अमेरिकन पाणबुडी अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होती. तिने युद्धात सहभागी नसलेल्या आणि सरावातून परतणाऱ्या जहाजावर हल्ला केला. भारताने यावर कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही?"

अमेरिकन संरक्षण सचिव म्हणाले, "इराणच्या युद्धनौकेला आंतरराष्ट्रीय समुद्रात सुरक्षित असतील, असं वाटत होतं पण अमेरिकेने हिंदी महासागरात ते जहाज बुडवलं आहे."

ते म्हणाले, "ते जहाज टॉर्पेडो (पाणबुडीतून हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारं क्षेपणास्त्र)ने बुडवण्यात आलं आहे."

दरम्यान, हे जहाज विशाखापट्टणममधील एका कार्यक्रमानंतर परत निघालं होतं, तेव्हा रस्त्यात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

मोदी सरकारच्या मौनाची चर्चा का?

या घटनेबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या काही बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे.

सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या फॅक्ट-चेक टीमने 'एक्स'वर पोस्ट करताना म्हटलं आहे की, "अमेरिकेतील एका चॅनेलवरून अमेरिकन लष्करातील माजी अधिकारी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी दावा केला की, अमेरिका इराणवर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदलाच्या तळाचा वापर करत आहे. हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे."

मात्र अनेक तज्ज्ञ आणि माजी राजनयिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर भारत सरकारच्या मौनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

माजी राजनयिक के. सी. सिंह यांनी अराघची यांची पोस्ट शेअर करत 'एक्स'वर लिहिले, "शांत राहणे म्हणजे कूटनीती नाही. भारताला सातत्याने कोपऱ्यात ढकललं जात आहे. जर भाजपला वाटत असेल की अमेरिका भारताच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याला महत्त्व देईल, तर अध्यक्ष ट्रम्प यांचं विधान आठवावं. नाटोने कधीच अमेरिकेची मदत केली नाही, असं त्यांनी नाटोला सुनावलं होतं. ज्यावेळी नाटोचे अनेक सैनिक अफगाणिस्तानमध्ये लढले होते आणि आपले सैनिक गमावले होते, तेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं.

माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी एक्सवर लिहिले, "जर आपण इराणी जहाजाला आपल्या 'सरावात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले नसते, तर ते तिथे उपस्थित नसते. या सरावाचे आपण यजमान होतो.

माझ्या माहितीप्रमाणे या सरावाच्या प्रोटोकॉलनुसार जहाज कोणत्याही प्रकारचे दारुगोळा घेऊन येऊ शकत नाहीत. म्हणजेच इराणचे ते जहाज निःशस्त्र होते. इराणी नौदल कर्मचाऱ्यांनी आपल्या राष्ट्रपतींसमोर परेडही केली होती. अमेरिकन पाणबुडीचा हा हल्ला आधीपासून आखलेला होता, कारण अमेरिकेला माहिती होते की इराणी जहाज या सरावात सहभागी आहे."

कंवल सिब्बल यांनी अमेरिकेवर आरोप केला की त्यांनी भारताच्या संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष केले आहे.

त्यांनी हेही म्हटले की भारत या हल्ल्यासाठी राजकीय किंवा लष्करीदृष्ट्या जबाबदार नसला, तरी भारताची 'नैतिक जबाबदारी आहे.

जहाज बुडाल्याबाबत श्रीलंकेनं काय म्हटलं?

बुधवारी (4 मार्च) सकाळी इराणच्या नौदलाच्या 'आयआरआयएस डेना' जहाजावरून संकटाची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलानं 32 जणांना वाचवल्याची पुष्टी केली होती.

श्रीलंकेच्या नौदलाचे प्रवक्ते बुद्धिका संपत यांनी बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांच्याशी बोलताना म्हटलं की, "ही घटना आमच्या सागरी सीमेच्या बाहेरची होती. पण आमच्या शोध आणि बचाव क्षेत्राच्या सीमेत होती. त्यामुळं आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांनुसार आम्हाला पावलं उचलावी लागली."

ते म्हणाले, "आम्हाला पाण्यात तरंगणारे लोक आढळले, त्यांना वाचवण्यात आलं. नंतर हे लोक इराणी जहाजातील असल्याचं तपासात आढळून आलं."

प्रवक्त्याच्या मते, कागदपत्रांवरून जहाजावर सुमारे 180 लोक होते अशी माहिती मिळाली. पण बेपत्ता लोकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.

बचावकार्य सुरू करण्यात आलं तेव्हा नौदलाला जहाज दिसलं नाही, परंतु समुद्रात तेलाचे डाग आणि तरंगणारे लाईफ राफ्ट आढळल्याचंही त्यांनी सांगितलं.

बीबीसीबरोबर बोलताना जहाजाला पाणबुडीनं लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. जहाज बुडण्याचं कारण अद्याप अज्ञात असल्याचं ते म्हणाले.

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव एअर व्हाइस मार्शल संपत थुईयाकोंथा यांनी बीबीसी सिंहलाशी बोलताना सुमारे 140 लोक बेपत्ता असल्याची माहिती असल्याचं सांगितलं.

श्रीलंकेच्या लष्कराला अद्याप जहाज बुडण्याचे कारण काय याबाबत माहिती देता आलेली नाही.

दरम्यान, नौदलाने जहाजाच्या मदतीच्या विनंतीला प्रतिसाद देत स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता बचाव कार्य सुरू केलं होतं, असं श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत सांगितलं.

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ संसदेत म्हणाले, "आयआरआयएस डेना" नावाच्या जहाजातून पहाटे आपत्कालीन संकटाबाबत सिग्नल मिळाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात नेण्यात आलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

श्रीलंकेच्या एका विरोधी खासदाराने इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांचा भाग म्हणून जहाजावर बॉम्बस्फोट झाला का? असा प्रश्न उपस्थित केला होता.

विशाखापट्टणमहून परत जात होते जहाज?

दरम्यान, आयआरआयएस डेना नावचं इराणचं हे जहाज काही दिवसांपूर्वी म्हणजे 20 फ्रेब्रुवारीदरम्यान विशाखापट्टणममध्ये होतं.

इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026 साठी हे जहाज विशाखापट्टणमला आलेलं होतं. यादरम्यान इराणच्या नौदलाचे प्रमुख शाहरम इराणी हेही भारताच्या दौऱ्यावर या कार्यक्रमासाठी आले होते.

त्यामुळं हे जहाज विशाखापट्टणमहून परत जात असताना ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ले वाढवले

दरम्यान, कतारच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की, इराणनं कतारवर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.

त्यापैकी एक क्षेपणास्त्र कतारच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं पाडलं, तर दुसरं क्षेपणास्त्र या प्रदेशातील सर्वात मोठ्या अमेरिकन लष्करी तळ असलेल्या अल उदेद येथील अमेरिकन हवाई दलाच्या तळावर आदळले.

या हल्ल्यात कोणीही ठार झाले नसल्याचं कतारचं म्हणणं आहे.

दरम्यान, इस्रायलने तेहरानमधील डझनभर लष्करी तळांवर हल्ला केल्याचं, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या अरबी भाषेतील प्रवक्ते अविचाय अदरई यांनी म्हटलं.

इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सशी संलग्न असलेल्या बसीज या निमलष्करी दलाच्या मुख्यालयाला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. याशिवाय, क्षेपणास्त्र लाँच पॅड आणि संरक्षण प्रणालींनाही लक्ष्य करण्यात आलं.

आयडीएफ इराणी राजवटीच्या पायाभूत सुविधांवर हल्ले तीव्र करत राहणार असल्याचं, ते म्हणाले.

शनिवारी अमेरिका-इस्रायलचे हल्ले सुरू झाल्यापासून, इराणनं या प्रदेशातील अमेरिकन तळांवर आणि त्यांच्या सहयोगी देशांवर अनेक हल्ले केले आहेत.

मंगळवारी सायंकाळी ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या इमारतीला आग लागल्याचे व्हीडिओ फुटेज बीबीसी व्हेरिफायनं सत्यापित केले आहे.

वाणिज्य दूतावासापासून काही मीटर अंतरावर एका चौकातून चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये एक ड्रोन इमारतीवर आदळताना दिसत आहे.

मंगळवारी रात्री पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी वाणिज्य दूतावासाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळील पार्किंग लॉटमध्ये एक ड्रोन उतरल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

"आम्ही खूप भाग्यवान आहोत, परंतु आमचे दूतावास आणि राजनैतिक सुविधांवर दहशतवादी राजवटीकडून थेट हल्ला होत आहे," असं रुबियो म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.