You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रघु राय : 'तो एक फोटो ज्यामुळे देशाच्या गृहमंत्र्यांना संसदेत माफी मागावी लागली होती'
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी हिंदी
- वाचन वेळ: 9 मिनिटे
ख्यातनाम फोटोग्राफर रघु राय यांचं शनिवारी (25 एप्रिल) वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं.
फोटोग्राफीच्या क्षेत्रात रघु राय यांनी इतकं प्रभावीपणे आणि कौशल्यानं काम केलं आहे की ते फोटोग्राफीच्या विश्वातील 'कल्ट फिगर' मानले जातात.
फोटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांचा इतका प्रभाव होता की, वाढत्या वयातदेखील ते कोणत्याही तरुण व्यावसायिक फोटोग्राफरपेक्षा अधिक व्यग्र होते.
जगभरातील वृत्तपत्रं-मासिकांकडून फोटो काढण्यासाठी विनंती केली जात असूनही, ते त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्येही फोटोग्राफीचा इतिहास जतन करण्याच्या कामात व्यग्र होते.
काही वर्षांपूर्वी एका संभाषणात रघु राय यांनी त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून सांगितला होता.
संभाषणादरम्यान त्यांनी जणू त्यांच्या आयुष्याच्या कॅमेऱ्याचा रोल मागे नेला.
"आमच्या वेळेस लोक लहानपणी कुठे काय ठरवायचे. घरातील वातावरण असं होतं की, मी अभ्यास करायचो आणि शेजार-पाजारच्या मुलांबरोबर उन्हात खेळायचो. संध्याकाळ झाल्यानंतर घराबाहेर राहण्याची परवानगी नसायची," असं ते म्हणाले होते.
वडिलांची आठवण काढत ते क्षणभर थांबले आणि मग म्हणाले, "वडिलांची शिस्त अशी होती की, ते सांगतील तेच मी करायचो. त्यावेळेस तशीच पद्धत होती. मी इंजिनीअर व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार वयाच्या 22 व्या वर्षी मी सिव्हिल इंजिनीअर झालेलो होतो."
"त्यानंतर फिरोजपूरच्या जाट रेजिमेंटमध्ये ड्रॉईंग इन्स्ट्रक्टर म्हणून मी 1 वर्ष कामदेखील केलं. मात्र त्या कामात माझं मन रमत नव्हतं. त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या कामाबद्दल देखील रस निर्माण होत नव्हता."
पहिलाच फोटो लंडन टाइम्समध्ये अर्ध्या पानभर छापला गेला
अर्थात तोपर्यंत रघु राय यांचे मोठे भाऊ एस पॉल फोटोग्राफीच्या विश्वात प्रस्थापित झाले होते. योगायोगानं 1966 मध्ये रघु राय दिल्लीत त्यांच्याकडे आले.
ते त्यावेळेस 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये चीफ फोटोग्राफर होते. एक योगायोग असा झाला की, त्यांचे एक सहकारी त्यांच्या गावी जात होते.
रघु राय यांनी त्यांच्या भावाकडे हट्ट केला की, त्यांना त्या व्यक्तीबरोबर जाऊ द्यावं. रघु राय यांनी भावाची परवानगी घेण्याबरोबरच त्यांचा कॅमेरादेखील घेतला. त्यांनी गावात काही फोटो काढावेत, असा विचार केला होता.
त्या दिवसांची आठवण काढत रघु राय यांनी सांगितलं होतं, "असं झालं की रस्त्यात एक गाढव दिसलं. मी त्याचा फोटो काढायचा ठरवलं. मात्र ते गाढव पळू लागलं. मी त्याच्या मागे पळू लागलो."
"जोपर्यंत ते गाढव थकून थांबलं नाही तोपर्यंत हा खेळ सुरू राहिला. मग अखेरीस मी त्याचा फोटो काढला. नंतर मोठ्या भावानं तो फोटो पाहिला आणि त्याची प्रिंट तयार करून त्याला परदेशातील काही वृत्तपत्रांसाठी पाठवला."
या फोटोने त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवला. त्यांचा पहिलाच फोटो लंडन टाइम्समध्ये अर्ध्या पानावर छापून आला.
त्यावेळेस त्यांना याचे इतके पैसे मिळाले की, ते महिनाभराच्या पगाराइतके होते. रघु राय यांना वाटलं की, तेदेखील हे करू शकतात. याच आत्मविश्वासानं त्यांना कॅमेऱ्यामागे उभं केलं आणि ते कॅमेऱ्याशी जोडले गेले.
त्या काळची आठवण करत ते बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, "तुम्ही याला योगायोग, नशीब किंवा इतर काही म्हणा, माझा मोठा भाऊ फोटोग्राफर नसता, माझा पहिला फोटो 'लंडन टाइम्स'मध्ये छापला गेला नसता, तर कदाचित मी फोटोग्राफर झालो नसतो."
'द स्टेट्समन'चा आयुष्यावरील प्रभाव
रघु राय यांनी मान्य केलं होतं की, त्यांना नोकरी मिळण्यास कोणतीही अडचण आली नाही. त्यांचे मोठे भाऊ होतेच, मग पहिलाच फोटो लंडन टाइम्समध्ये छापून आल्यानंतर त्यांच्यात देखील फोटोग्राफीबद्दल पॅशन, आवड निर्माण झाली.
"मोठ्या भावाची एक प्रतिष्ठा, स्टेटस होतं. त्याच्या ओळखीमुळेच मला हिंदुस्तान टाइम्समध्ये नोकरीदेखील मिळाली. त्यानं मला पहिला कॅमेरा विकत घेऊन दिला. सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्याच्याबरोबरच राहिलो. माझा मोठा भाऊ नसता, तर जग ज्या रघु रायला ओळखतं, तो रघु राय झाला नसता," असं ते म्हणाले होते.
रघु राय त्यांच्या मोठ्या भावाची स्कूटर घेऊन दिल्लीतील रस्त्यावर फिरायचे. तासनतास इकडे तिकडे चक्कर मारायचे. फोटो काढण्याची संधी शोधायचे.
रघु राय यांना 1966 मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'मध्ये नोकरी मिळाली. तिथे ते फार दिवस राहिले नाहीत. कारण 'द स्टेट्समन'ची त्यावेळेस मोठी प्रतिष्ठा होती, नाव होतं. रघु राय 1967 मध्ये तिथे गेले.
'जेपींसोबतची आठवण'
करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दल ते म्हणाले होते, "फोटोग्राफीच्या माझ्या सुरुवातीच्या काळात एका बाजूला पॉलसाहेब होते, तर दुसऱ्या बाजूला किशोर पारीखसारखे जीनियसदेखील आले होते. त्यांच्याबरोबर मी हिंदुस्तान टाइम्समध्ये माझ्या करिअरची सुरुवात केली होती."
"2 जीनियसमध्ये मी दबून जाण्याचा धोका होता. सँडविच होण्याची भीतीदेखील होती. मात्र माझ्या दोन्ही बाजूंना इतके कठोर, निर्दयी लोक होते की, त्यांच्यासमोर मला नेहमी सर्वोत्तम काम करत राहण्याची प्रेरणा मिळत राहायची."
रघु राय यांनी त्यांच्या आयुष्यातील स्टेट्समनच्या भूमिकेला नेहमीच महत्त्व दिलं.
त्यांच्या मते, "खरं सांगायचं तर याच वृत्तपत्रानं मला ख्यातनाम फोटोग्राफर बनवलं. तिथे एक वृत्त संपादक होते, त्यांचं नाव आर. एन. शर्मा. ते पारंपारिक पद्धतीचे पत्रकार होते. मात्र खूप चांगले माणूस होते."
"ते माझ्या फोटोंना बारकाईनं पाहायचे. फोटो तर सर्वच जण पाहतात, मात्र तो वाचणं, त्यातील बारकावे समजणं सर्वांना शक्य होत नाही."
रघु राय म्हणाले होते, "योगायोगानं ते माझ्या फोटोंमधील बारकावे लक्षात घेऊन अपेक्षेपेक्षा अधिक जागा देऊ लागले होते. त्यामुळे माझा विश्वास वाढत गेला. माझी मेहनतदेखील वाढली. मात्र मी फोटो जास्तीत जास्त चांगले असावेत यासाठी प्रयत्नशील असायचो."
"ते सांगायचे की, 2 कॉलमचा फोटो दे, मात्र मी 4 कॉलमचा फोटो द्यायचो. फोटो पाहिल्यानंतर ते त्याच्यासाठी जागा शोधून काढत असत. त्यामुळे मी घडण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं," असंही त्यांनी नमूद केलं होतं.
या वृत्तपत्रात त्यांच्या कामाचा असा प्रभाव पडला की, 4 वर्षांच्या आतच जागतिक फोटोग्राफीचे 'लीजंड' हेनरी कार्टियर ब्रेस्सन यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं.
पॅरिसमध्ये एका प्रदर्शनात त्यांचा फोटो पाहून हेनरी यांनी त्यांना मॅग्नम फोटोजशी जोडून घेतलं. त्यामुळे ते जगातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकारांच्या कोऑपरेटिव्ह समूहाशी जोडले जाणारे भारतातील पहिले फोटोग्राफर बनले. तसंच ते शेवटपर्यंत सर्वात सेलिब्रेटेड फोटोग्राफरदेखील राहिले.
मात्र 'द स्टेट्समन'मध्ये काम करतानाच्या एका प्रसंगाचा उल्लेख करायला ते कधीच विसरत नसत.
ते म्हणाले होते, "जे पी आंदोलनाच्या वेळची ती गोष्ट आहे. बिहारमध्ये आंदोलन शिगेला पोहोचलं होतं. मी जेपींबरोबर बिहार फिरत होतो. आंदोलनाच्या वेळेस त्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता. मात्र तत्कालीन गृहमंत्र्यांनी ते नाकारलं होतं."
"दुसऱ्याच दिवशी 'स्टेट्समन'च्या पहिल्या पानावर लाठीचार्जचा फोटो आल्यावर गृहमंत्र्यांना संसदेत माफी मागावी लागली होती."
मदर तेरेसा आणि इंदिरा गांधींबरोबरची जवळीक
सर्वसामान्य माणूस आणि त्याचे हावभाव, शहरातील चमक, भव्यता आणि गल्ल्या, रस्त्यांवरील वर्दळ इत्यादी गोष्टी नेहमीच रघु राय यांच्या फोटोचा विषय राहिले. तसं पाहता, फोटोग्राफर्सना नदी, तलाव, पर्वत यासारख्या गोष्टी कॅमेऱ्यात टिपायला आवडतं. मग रघु राय यांच्या आवडीमागे काय कारण होतं?
हा प्रश्न ऐकताच त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. ते लगेच म्हणाले, "हे पाहा, माझी जडणघडण, संगोपन अशा समाजात झालं, जिथे सर्वसामान्य माणसांचा आदर करायला शिकवलं होतं. सर्वसामान्य माणसांच्या भावनांशी आमचा रोज संबंध येतो. तुम्हाला विश्वास बसो ना बसो, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनीदेखील याच सर्वसामान्य माणसांची परिस्थिती तशीच राहिली आहे. असे लोक मला आकर्षित करत आले आहेत."
ते म्हणाले, "भारतातील सर्वसामान्य लोक, त्यांचं राहणीमान आणि जीवनशैली यांची जगभरात चर्चा होते. मीदेखील त्यांच्याकडे आदरानं पाहतो. माझ्या फोटोंमुळे सत्तेतील लोकांचं लक्ष सर्वसामान्य लोकांच्या समस्यांकडे वेधलं जावं, यासाठी मी अनेकदा प्रयत्न करत असतो. सर्वसामान्य लोकांचे फोटो काढण्यात मला खूप जास्त मन:शांती मिळते."
अनेकदा त्यांच्या फोटोंची सेरीज पाहिल्यावर असं वाटतं की ते फक्त फोटोग्राफर नव्हते, तर ते गेल्या 60 वर्षांचा इतिहास, व्हिज्युअल मेमरी म्हणजे दृश्यात्मक स्मृतीच्या रुपात नोंदवणारे एक कस्टोडिन, संरक्षकदेखील होते.
इंदिरा गांधी आणि मदर तेरेसा यांच्याबरोबरच्या त्यांच्या जवळच्या संबंधांबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं होतं, "हे पाहा, या लोकांबरोबरची जवळीक कामाच्या संदर्भात निर्माण झाली. मी जेव्हा स्टेट्समनमध्ये काम करत होतो. त्यावेळेस इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. खरं सांगायचं तर, मी त्यांच्यासारखं दुसरं राजकीय व्यक्तिमत्वं कधीही पाहिलं नाही. त्यांचे टीकाकार काहीही म्हणोत, मात्र त्या एक समर्पित नेत्या होत्या."
रघु राय यांच्या मते, इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्वातील एक वैशिष्ट्यं म्हणजे त्या कला आणि संस्कृतीला खूप अधिक महत्त्व द्यायच्या. फोटोग्राफर कोणत्या कोनातून त्यांचा फोटो काढतो आहे, हे त्यांना माहित असायचं. एक पंतप्रधान म्हणूनदेखील देशाला त्यांच्यासारखा प्रशासकीय नेता मिळू शकला नाही.
रघु राय यांच्या मते, त्यांनी इंदिरा गांधींवर तीन पुस्तकंदेखील प्रकाशित केली.
यासंदर्भात ते म्हणाले होते, "त्यांनी जेव्हा आणीबाणीची घोषणा केली, तेव्हा आम्ही लोकांनी त्यांना विरोध केला होता. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्या तुरुंगात गेल्या. मात्र त्यांची हिंमत पाहा, त्यांनी कशाप्रकारे शानदार पुनरागमन केलं. त्यांची जेव्हा हत्या झाली, तेव्हा त्यांची हत्या होऊ शकते, यावर माझा अनेक दिवस विश्वासच बसला नाही. मात्र ते वास्तव होतं. त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर इंडिया टुडेची एक संग्राहक आवृत्ती प्रकाशित केली होती."
मदर तेरेसा यांच्यामध्ये रघु राय यांना एक आई दिसायची.
याबाबत ते म्हणाले होते, "मदर तेरेसांबद्दल बोलाल, तर त्या अगदी आईसारख्या होत्या. त्या त्यांच्या प्रेमाद्वारे कोणाचंही मन जिंकून घेऊ शकत होत्या. स्वत:च्या देशापासून दूर येऊन त्यांनी इथल्या गरीब, निराधार लोकांसाठी जे केलं, त्याच्यासारखं दुसरं उदाहरण पुन्हा पाहायला मिळणार नाही. त्या सर्वांनाच अतिशय प्रेमानं भेटायच्या. त्यांना भेटल्यानंतर प्रत्येकामध्ये एका नव्या ऊर्जेचा संचार व्हायचा."
याव्यतिरिक्त, दलाई लामा, बिस्मिल्लाह खान किंवा हरी प्रसाद चौरसिया, या सर्वांचंच काम रघु राय यांनी ज्या शैलीत टिपलं, त्याच्यासारखं दुसरं उदाहरण नाही.
रघु राय यांनी 10 वर्षे स्टेट्समनमध्ये काम केलं. त्यानंतर ते इंडिया टुडे मासिकाचे फोटो एडिटर झाले. यादरम्यान, या मासिकाचा एक अंक त्यांच्या फोटोग्राफीमुळे स्मरणात राहिला आहे.
कोलकात्याच्या रस्त्यांवर पावसात रिक्षा ओढणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा फोटो असो की वाराणसीच्या घाटावरील विधवा महिलांचा फोटो असो. या सर्वांमध्ये 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेच्या वेळेस त्यांनी काढलेल्या एका फोटोनं हे संपूर्ण संकट, शोकांतिका जगासमोर आणली होती.
एका पिता त्याच्या मुलाला दफन करतानाच्या त्या फोटोचं उदाहरण आजदेखील न्यूज फोटोग्राफीच्या जगात दिलं जातं. या एका फोटोनं जगभरात औद्योगिक धोक्यांबाबत चर्चा सुरू झाली होती. नंतरच्या वर्षांमध्येही रघु राय भोपाळला जात राहिले. या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबांची नोंद करत राहिले.
चित्रपट आणि क्रिकेटपासून राखलेलं अंतर
भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहणाऱ्या, वरचष्मा गाजवणाऱ्या क्रिकेट आणि चित्रपट या दोन विषयांवरदेखील रघु राय यांच्यांशी संवाद झाला.
या दोन्ही क्षेत्रांच्या प्रभावाबद्दल ते म्हणाले होते, "मला चित्रपट आवडत नाही, असं नाही. मात्र त्या माध्यमात काम करण्याची माझी कधीच इच्छा झाली नाही. खरंतर मायानगरीचा थाटमाट, झगमगाट याचा माझ्यावर प्रभाव पडला नाही किंवा असं म्हणूया की मला त्याच्या झगमगाटापासून दूरच राहायचं होतं."
"क्रिकेटबद्दल म्हणाल तर मी सांगेन की एक खेळ म्हणून मला तो आवडतो. क्रिकेटपटू म्हणून मन्सूर अली खान पतौडी आणि कपिल देव मला खूप आवडतात. मात्र खरी अडचण अशी आहे की हा फक्त खेळ राहिलेला नाही. यात इतका पैसा आला आहे की खेळाची मजा, थरार आता कुठेतरी मागे राहिला आहे," असं ते म्हणाले होते.
क्रिकेटच्या कॉर्पोटायझेशनबद्दल त्यांना दु:ख वाटायचं.
"आता याचं रुपांतर कॉर्पोरेट व्यवसायात झालं आहे. आमच्या खेळाडूंचं लक्षदेखील खेळ खेळण्यापेक्षा पैसे कमावण्यावरच अधिक केंद्रित होऊ लागलं. या एका खेळामुळे इतर खेळांचं काय झालं आहे, ही बाब कोणापासूनही लपलेली नाही. कधीकधी तर असं वाटतं की क्रिकेट हा खेळापेक्षा राष्ट्रव्यापी भ्रष्टाचारच अधिक होत चालला आहे," असं ते म्हणाले होते.
रघु राय यांच्या ख्याती सर्व जगभर पसरली होती. त्यांना विचारण्यात आलं होतं की ते ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्यामुळे त्यांना कामासाठी जगभरातून ऑफर आल्या असतील. मग तरीदेखील त्यांनी भारतात राहूनच काम का केलं?
यावर रघु राय यांनी जे उत्तर दिलं होतं, त्यात एक समाधान आणि अनुभव दिसत होता. ते म्हणाले होते, "हे पाहा, भारतापेक्षा चांगला देश दुसरा नाही आणि असूही शकत नाही. देशाच्या मातीच्या सुगंधात काम करण्याचा आनंद जगात इतरत्र कुठेही मिळू शकत नाही."
"भारतात इतकी विविधता आहे की इथे काम करत अनेक जन्म घालवले जाऊ शकतात. संपूर्ण भारत तर सोडाच, फक्त दिल्लीतच इतकं काम बाकी आहे की मला अनेक जन्म घ्यावे लागतील. अलीकडेच मी दिल्लीवरचं माझं एक पुस्तक पूर्ण करत होतो. त्यावेळेस ही भावना आणखी तीव्र होत गेली."
जवळपास 30 वर्षांपूर्वी त्यांनी भारतातील न्यूज फोटोग्राफीच्या विश्वाचा निरोप घेतला होता. मात्र त्यांचं काम सातत्यानं टाइम, लाईफ, जीईओ, न्यूजवीक आणि द न्यूयॉर्क टाइम्ससारख्या महत्त्वाच्या मासिकांमध्ये दिसत होतं, प्रकाशित होत होतं.
त्यांनी फोटोग्राफीवर थोडीथोडकी नाही तर तब्बल 50 हून अधिक पुस्तकंदेखील प्रकाशित केली. ती एका अर्थानं बदलत्या भारताच्या कथेची चित्रं आहेत.
रघु राय जर फोटोग्राफर झाले नसते तर काय झाले असते?
या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे तयार होतं. ते म्हणाले होते, "त्याबद्दल मला खूप विचार करण्याची गरज नव्हती. फोटोग्राफीवर माझं जितकं प्रेम आहे, तितकीच मला बागकामाची आवड आहे. जर मी फोटोग्राफर झालो नसतो, तर नक्कीच बागकाम करणारा माळी झालो असतो."
"मी फोटोग्राफर झाल्यावरदेखील शनिवार-रविवारी कोणतंही काम करत नाही. मी माझ्या फार्म हाऊसवर दिवस घालवतो. माझ्या फार्म हाऊसवर मी सर्वप्रकारची फुलझाडं लावलेली आहेत. मी जगभरातून ती गोळा करत आलो आहे. त्यामध्येदेखील खूप आनंद मिळतो. मला वाटतं की मी निसर्गाच्या छायेत आहे," असं रघु राय म्हणाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)