You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'18 कोटींचं' फार्महाऊस, VIP लोकांची उठबस आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप; अशोक खरातनं आपलं वलय कसं निर्माण केलं? – ग्राऊंड रिपोर्ट
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात)
"हा जोडीशिवाय कुणाला जवळ येऊ देत नाही. मोठ्यामोठ्या लोकांशिवाय कुणाला जवळ येऊ देत नाही आणि पहिलं प्राधान्य लेडिजला देतो. हे सगळं आम्हाला जेव्हा दिसलं, त्यावेळेस आम्ही तिथं जाणं बंद केलं."
मिरगावातील संतोष हिंगे अशोक खरातबद्दल बोलत होते.
मिरगाव हे अडीच हजार लोकसंख्येचं नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातीक एक गाव. याच गावात अशोक खरातनं स्थापन केलेलं शिवनिका संस्थान आहे.
अशोक खरातला महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलीय. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
आम्ही मिरगावात पोहोचलो, तेव्हा अशोक खरातविषयी बोलण्यास गावातील लोक टाळाटाळ करत होते. 'आमची मुलाखत घेऊ नका, आम्हाला भीती वाटते,' असं काही जण म्हणाले. अशोक खरात अटकेतून बाहेर आल्यास त्रास देईल, असंही लोक बोलून दाखवत होते.
अशोक खरात हा मूळचा सिन्नरमधील कहांडळवाडी गावचा. शिवनिका संस्थानविषयीच्या पुस्तिकेत, अशोक खरातचं शिक्षण बीएस्सी झाल्याचं आणि तो व्यापारी नौकानयन, सबमरीन विभागात 22 वर्षं कॅप्टन म्हणून कार्यरत असल्याचा दावा करण्यात आलाय.
अशोक खरातविषयी बोलताना मिरगावचे संतोष हिंगे म्हणतात, "अशोक खरातला आमच्या गावात येऊन 15-16 वर्षं झाली. त्यानं आधी इथं 17-18 एकर जमीन खरेदी केली. त्यानंतर ईशान्येश्वर महादेवाची स्थापना केली. भव्यदिव्य मंदिर बांधलं. त्याला आकर्षकपणा दिला. त्याच्यामुळे महाशिवरात्रीला, श्रावणी सोमवारला लोकांची गर्दी वाढायला लागली. यात्रा भरायला लागली."
'वावरातली वस्ती सोडावी लागली'
अशोक खरात आकडेमोड करुन लोकांना भविष्य सांगायचा. त्यानं सांगितलेल्या भूतकाळाबद्दलच्या गोष्टी लोकांना खऱ्या वाटायच्या. त्यामुळे हा माणूस आपल्या भविष्यातील अडचणी सोडवेल, असा लोकांना विश्वास वाटायचा.
अशोक खरात भक्तांना पूजा, कर्मकांड करायला लावायचा. त्याच्याकडील एक चिंचोका 10 हजारांपासून 1 लाख रुपयांपर्यंत विकायचा. तर, खडे लाखो रुपयांना विकायचा, असं एका फिर्यादीनं पोलिसांमध्ये दाखल केलेल्या FIR मध्ये म्हटलंय. मिरगाव येथील मंदिरात नकली साप व नकली वाघ ठेवून तो लोकांना घाबरवायचा, असंही FIR मध्ये नमूद करण्यात आलंय.
मिरगावापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर अशोक खरातचं फार्महाऊस आहे. त्याचं पूर्णपणे दगडी बांधकाम केलेलं आहे. पहिले इथे एक शेडवजा खोली बांधण्यात आलेली होती. पण आता तीन ते चार मजली हे फार्महाऊस आहे.
16 एकरच्या परिसरात या फार्महाऊसचं बांधकाम झालंय आणि त्यासाठी तब्बल 18 कोटी रुपये खर्च झाल्याचं इथले स्थानिक लोक सांगतात. दर आठ दिवसांनी अशोक खरात इथं यायचा. त्यावेळेस त्याच्यासोबत मोठमोठ्या गाड्यांचा लवाजमा असल्याचंही स्थानिक सांगतात.
अशोक खरातचं फार्महाऊस जामनदीच्या किनाऱ्यावर आहे. इथंच शिवनिका संस्थानचं ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे. अशोक खरातनं नदीपात्रात अतिक्रमण केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
मिरगावचे भागवत शेळके सांगतात, "वर्षं, दीड वर्षं झालं, अशोक खरातनं डायरेक्ट मंदिराला जाळी मारुन घेतली. आमच्या चुलत भावाची 5 एकर जमीन घेतली. नदीपात्रात जमीन घेतली, तिथं कंपाऊंड वगैरे केलं आणि आमचा रस्ता पूर्णपणे बंद केला. त्याच्यामुळे आम्हाला वावरातील वस्ती सोडून गावात यावं लागलं."
सरकारची मेहेरबानी?
2020 साली महाराष्ट्र सरकारनं अशोक खरातच्या शिवनिका संस्थानला पिण्यासाठी 39 लाख लीटर पाणी, 48 किलोमीटर अंतरावरच्या दारणा धरणातून पुरवण्याचा निर्णय घेतला.
हा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश आता देण्यात आलेत. खरातनं मात्र या पाण्याचा वापर शेतीसाठी केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
याआधी, राज्य सरकारनं अशोक खरातच्या ईशान्येश्वर देवस्थानाच्या विकासकामांसाठी 1 कोटी 5 लाख रुपये मंजूर केले. 2017-18 मध्ये इथल्या कामांसाठी 25 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली.
जमिनीच्या व्यवहारांमध्ये अशोक खरात सामील असायचा. एकट्या मिरगावात त्याने 50 ते 55 एकर जमीन खरेदी केल्याचं ग्रामस्थ सांगतात.
आतापर्यंतच्या तपासात अशोक खरातकडे एकूण 40 कोटी 87 लाख रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं निष्पन्न झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात याविषयी माहिती दिली.
धमकावून लैंगिक शोषण
अशोक खरातच्या भक्तांमध्ये क्लास वन अधिकाऱ्यांपासून, राजकारणी, उद्योजक, डॉक्टर असे हायप्रोफाईल लोक असल्याचं स्थानिक कार्यकर्ते सांगतात. अशोक खरातच्या अपॉईंटमेंटसाठी 10 हजार रुपये लागायचे आणि 2 महिने प्रतीक्षा करावी लागायची, असंही ते सांगतात.
अशोक खरातचं ऑफिस नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात आहे. 'ओकस प्रॉपर्टी डिलर्स अँड डेव्हलपर्स' असं शटरवर मोठ्या अक्षरात लिहिण्यात आलंय.
सध्या या ऑफिसला कुलूप असून इथं शुकशुकाट आहे. इथल्या काही लोकांशी आम्ही बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, इथं अशाप्रकारच्या काही घटना घडताहेत किंवा महिलांचा लैंगिक शोषण होतंय, त्याबद्दल त्यांना कीहीही कल्पना नव्हती किंवा कुठलाही थांगपत्ता नव्हता.
ज्या महिलेनं अशोक खरातबद्दल पहिली तक्रार दाखल केलीय, तिनं म्हटलंय की, "या ऑफिसमध्ये तिला वारंवार बोलावण्यात आलं. आधी लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली आणि त्यानंतर वैवाहिक आयुष्यातील अडथळे दूर करण्याच्या नावाखाली, धार्मिक विधीच्या नावाखाली तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले.
अशोक खरातची एक मोडस ऑपरेंडी असल्याचं दिसून येतं. ज्या महिलांनी अशोक खरातच्या विरोधात तक्रार दाखल केली, त्यांचं असं म्हणणं आहे की, या प्रकाराबद्दल बाहेर कुठेही वाच्यता करू नये म्हणून अशोक खरात त्यांना धमकावयाचा.
एका महिलेनं तक्रारीत म्हटलंय की, "याबाबत बाहेर कुणाला सांगितलं तर तिच्या पतीचं निधन होईल अशी भीती अशोक खरातनं तिच्या मनात घालून दिली होती. तर दुसऱ्या महिलेनं म्हटलंय की, तिच्या मुलांचं वाईट होईल, अशी भीती तिच्या मनात घालून दिली होती."
'8 महिलांचे 35 व्हीडिओ'
या आरोपांवर बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही अशोक खरातच्या घरी गेलो. पण प्रतिक्रिया देण्यासाठी तिथं कुणीही उपलब्ध नव्हतं. अशोक खरातच्या नातेवाईकांशीही आम्ही संपर्क साधला, मात्र त्यांचा फोन बंद आला.
खरात यांचे वकील अॅड. सचिन भाटे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न बीबीसीचे नाशिक येथील सहकारी पत्रकार प्रवीण ठाकरेंनी केला पण अॅड. भाटे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशोक खरातशी संबंधित काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
24 मार्च रोजी अशोक खरात प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात म्हटलं, "पोलिसांच्या तपासात 8 महिलांचे 35 व्हीडिओ असल्याचे समोर आलेत. या व्हीडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरुन अनेक महिलांवर बलात्कार व अश्लील चाळे केल्याचं दिसून आलंय."
अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 5 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास SIT म्हणजेच विशेष तपास पथक करत आहे.
पण, जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं म्हणणं आहे. नाशिकस्थित कृष्णा चांदगुडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह आहेत.
ते म्हणतात, "जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्या कायद्याचे नियम अजून बनणं बाकी आहे. एवढंच नाही तर त्या कायद्याच्या अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक करायला सांगितलं आहे. तशाप्रकारे दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक कोणत्याही पोलीस स्टेशनला झालेली नाही.
"महत्त्वाचं म्हणजे या कायद्याच्या बाबत पोलिसांच्या मनात संभ्रम आहे. अनेक प्रकरणांत पोलीस आमची मदत घेतात. आम्ही त्यांची प्रशिक्षण शिबिरंही घेतो. परंतु सरकारनं प्रभावीपणे या कायद्याची अंमलबजाणी करणं आणि प्रचार-प्रसार करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं," कृष्णा पुढे सांगतात.
अशोक खरात प्रकरणात इतर पीडितांचा शोध घेणं सुरू असून आरोपीच्या मालमत्तेची माहिती प्राप्त करुन घेतली जात आहे. अशोक खरातसोबत शासकीय अधिकाऱ्यांचं संगनमत होतं का, याचाही तपास केला जातोय. दरम्यान, अशोक खरातला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
"आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या गोष्टीवर आळाच बसला पाहिजे. त्याला मोठी शिक्षाच झाली पाहिजे. जेणेकरुन दुसरा कुणी भोंदूबाबा आपल्या परिसरात जागा झाला नाही पाहिजे," मिरगावचे संतोष हिंगे त्यांची अपेक्षा बोलून दाखवतात.
अशोक खरातसाठी धार्जिणे ठरतील असे शासकीय निर्णय आणि त्याच्यासोबतचे फोटो यामुळे त्याला राजकीय संरक्षण आहे का, असाही सवाल आता उपस्थित केला जाऊ लागलाय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)