इस्रायल-हमास युद्ध : घरातले म्हणतात 'आपण एकत्र झोपलं पाहिजे, मृत्यू आला तर सगळ्यांना सोबत येईल'

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हमासवर हल्ल्यानंतर त्यांचं प्रत्युत्तर ही केवळ सुरुवात असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या देशाकडे असलेल्या प्रचंड ताकदीचा वापर करून ते हमासचा पराभव करतील, असं त्यांनी म्हटलं.

AFP या वृत्तसंस्थेच्या मते दक्षिण इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान ते म्हणाले, “हमासला याचे परिणाम भोगावे लागतील.”

ते म्हणाले, “ही फक्त सुरुवात आहे. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आमच्या ताकदीच्या बळावर आम्ही त्यांना हरवू. आम्ही मध्य पूर्व आशियाची परिस्थिती बदलून टाकू.”

ओलीस नागरिकांना सोडवण्यासाठी इस्रायल आणि हमासमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न करत असल्याचं करत असल्याचं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

सध्या परिस्थिती कशी आहे?

इस्रायलवर हमासने हल्ला करून आता तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ निघून गेला आहे. मात्र इस्रायलचं म्हणणं आहे की, आतापर्यंत गाझाला लागून असलेल्या सीमेला ते पूर्णपणे सुरक्षित करू शकलेले नाही.

मात्र, ज्या ठिकाणी हमासने हल्ला केला होत्या त्या भागावर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या वस्त्यांमध्ये हमासच्या सैनिकांनी सामान्य माणसांना दिसताक्षणी गोळ्या घातल्या होत्या.

अजूनही पॅलेस्टाईनचे काही कट्टरवादी इस्रायलमध्ये असल्याचा संशय इस्रायलच्या सैन्याला आहे.

'आपण एकत्र झोपलं पाहिजे, मृत्यू आला तर सगळ्यांना सोबत येईल'

इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान, गाझामध्ये राहणारे लोक म्हणतात की त्यांनी 'इतकी वाईट परिस्थिती याआधी कधीही पाहिली नव्हती.'

वेस्ट बँकमध्ये काम करणाऱ्या ऑक्सफॅमच्या कर्मचार्‍यांनी बीबीसीला गाझामधील परिस्थितीबद्दल माहिती दिली.

बुशा खालिदी यांनी सांगितलं की, त्यांचे कुटुंब गाझामध्ये अनेक वर्षांपासून तणावात राहत आहे.

त्या म्हणाल्या की, “अनेक वर्षांपासून आम्ही इस्रायली सैन्याकडून केल्या जाणाऱ्या नाकाबंदीचा सामना करत आहोत. ते आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीत. आम्हाला अभ्यासासाठीही बाहेर जाण्याची परवानगी नाही."

बीबीसी ब्रेकफास्ट या कार्यक्रमात बोलताना बुशा यांनी सांगितलं की, “येथे पाणी नाही, वीज नाही, इंधन नाही आणि दिवसेंदिवस त्यांचा पुरवठाही कमी होतोय."

गाझामध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद असल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळं नातेवाईकांशी संपर्क साधताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

बुशा म्हणाल्या की इस्रायलने ज्या भागाची नाकेबंदी केलेली आहे तेथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

त्या म्हणतात की, "माझे कुटुंब म्हणते की आपण एकत्र झोपलं पाहिजे जेणेकरून मृत्यू आला तर आपण सगळे एकत्र असू."

गाझा पट्टीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला शिक्षा देण्याचा इस्रायलचा निर्णय अत्यंत क्रूर असून त्याचा माणुसकीवर काय परिणाम होईल याचा विचार त्यांनी करायला हवा असं त्या म्हणाल्या.

मृतांची संख्या वाढली

शनिवारपासून (7 ऑक्टोबर) झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत इस्रायलमध्ये कमीत कमी 700 आणि 500 पॅलेस्टिनी लोक मृत्युमुखी पडले.

नऊ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच ब्रिटनच्या 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे किंवा ते बेपत्ता आहेत.

हमासने इस्रायलच्या अनेक नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. त्यातील बहुतांश लोक गाझामध्ये आहेत.

हमासच्या एका प्रवक्त्यांनी सांगितलं की इस्रायलच्या हल्ल्यात चार ओलीस लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही.

गाझाची नाकेबंदी

इस्रायलच्या सैन्याने काल (9 ऑक्टोबर) हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली. लष्कराने सांगितलं की, हमासच्या 500 पेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ला केला आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री योओव गँलेट यांनी गाझाची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचा आदेश दिला आहे. ते म्हणाले की, गाझामध्ये खाणं पिणं आणि वीजेचा पुरवठा खंडित केला आहे. इस्रायलच्या मते गाझा पट्टीतून कोणी बाहेर येऊ शकणार नाही किंवा जाऊ शकणार नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या मते गाझामध्ये 1 लाख 20 हजार पेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत. त्यापैका बहुतांश लोकांनी एका शाळेत आश्रय घेतला आहे.

प्रचंड ताकदीने लढणार - नेतन्याहू

हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षात ते प्रचंड ताकदीनिशी लढून त्यांचा (हमासचा) पराभव करणार असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे.

दुसरीकडे गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायलींनी आम्ही ठार करू असं हमासच्या लष्करी शाखेच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

सोमवारी हमासच्या अबू ओबैदा या प्रवक्त्याचा एक ऑडिओ मेसेज जारी झाला. त्यामध्ये गाझामधील रहिवाशी भागांवर इस्रायलचे हल्ले तीव्र झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"इस्रायलने नागरिकांना इशारा न देता हल्ला केल्यास गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायलींनी आम्ही ठार करू," असं हमासच्या लष्करी शाखेच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे

इस्रायलने मात्र गाझावर थेट युद्ध जाहीर केलंं आहे. याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तर ‘ही फक्त सुरुवात आहे,’ असं म्हटलं आहे.

“ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही प्रचंड शक्तींचा वापर करून मध्य-पूर्व आशिया बदलून टाकणार आहोत,” असं नेतन्याहू म्हटलं आहे.

यातून हे युद्ध आणखी काही दिवस चालणार असल्याचं विश्लेषक सांगत आहेत.

अमेरिकेने पाठवल्या युद्धनौका

या संघर्षात भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडासह पाश्चात्य देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे.

तर अमेरिकेने मध्य पूर्व समुद्रात युद्धनौका पाठवल्या आहेत.

रशिया आणि चीनने या हिंसाचाराचा निषेध केला आहे पण पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 18 थाई नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

सोमवारी (9 ऑक्टोबर) 12 थाई नागरिकांचा मृत्यू झाला आणि 11 अपहरण झाल्याची बातमी आली होती.

तसंच इस्रायलमध्ये राहणाऱ्या नेपाळमधील 10 विद्यार्थ्यांचाही या संघर्षात मृत्यू झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)