'उन्हात दोन तासांपासून रांगेत, कामासाठी सुट्टी घेतली,' गॅस सिलिंडरच्या टंचाईबाबत लोक काय म्हणत आहेत?

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, नागपूर
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

गॅस सिलिंडरच्या नोंदणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी लोकांनी रांगा लावलेल्या दिसत आहेत. ऑनलाइन बुकिंगमध्ये अडचण येत असल्याचं लोकाचं म्हणणं आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त झाल्याचं दिसत आहे.

बीबीसीनं यासंदर्भात नागपुरात गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला.

एका महिलेनं सांगितलं की, "ऑनलाइन बुकिंग करत असताना स्वीच ऑफ असल्याचं ऐकू येत आहे. एकच सिलिंडर आहे. काल येऊन तसंच परत जावं लागलं. त्यांनी नंबर दिला नाही. ओटीपीशिवाय मिळणार नाही असं सांगितलं. आज मॅन्युअली देत आहेत म्हणून आज पुन्हा रांगेत उभं राहिले आहे. आता स्वयंपाक चुलीवर सुरू आहे."

तर आणखी एक गृहस्थ म्हणाले की, "एक-दीड तासापासून रांगेत उभा आहे. नंबर लागत नसल्यामुळे गॅस सिलिंडर मिळणार की नाही याबद्दल काळजी वाटते आहे. ऑनलाइन बुकिंगमध्ये अडचणी येत आहेत. नंबर बंद येतो आहे. यापूर्वी ऑनलाइन बुकिंग केल्यावर दोन-तीन दिवसांतच सिलिंडर घरी येत होतं. मात्र आता खूप वेळ लागतो आहे."

रांगेत उभे असलेले एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले, "घरातील सिलिंडर संपलेलं आहे. दोन तासांपासून रांगेत उभा आहे, मात्र अद्याप सिलिंडरसाठी नंबर लागलेला नाही."

सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याचं सांगितलं असल्याबाबत आणखी एक नागरिक म्हणाला, "इथे आम्ही उन्हात दोन तासांपासून रांगेत उभे आहोत. मी एक तारखेला ऑनलाइन बुकिंग केलं होतं. ओटीपी तर आला आहे, मात्र गॅस सिलिंडर अद्याप घरी आलेलं नाही. त्यामुळे आता इथूनच आम्हाला पावती फाडून घ्यावी लागेल. साठा आहे मात्र, गोदामासमोर देखील मोठी रांग लागलेली आहे. आमच्यासारख्या नोकरदार लोकांना याचा मोठा त्रास होतो आहे. या कामासाठी मी आज सुट्टी घेतली आहे."

"सरकारला आमचं विचारणं आहे की ही समस्या मुळात उद्भवलीच का? दोन दिवसांपूर्वीपर्यंत सर्वांच्या घरी गॅस सिलिंडर पोहोचत होतं. मात्र आता ते पोहोचत नाहिये."

तर लोकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीसंदर्भात एक नागरिक म्हणाला, "गॅस सिलिंडरचा साठा आहे. मात्र आता गॅस सिलिंडरबाबत बातम्या आल्यामुळे लोक साठा करण्यासाठी रांगा लावत आहेत. अर्थात ऑनलाइन बुकिंगमध्ये मात्र समस्या येत आहेत."

ऑनलाइन बुकिंग करताना अडचणी येत असल्याबाबत गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना बीबीसीनं विचारलं.

एक कर्मचारी म्हणाले की "कंपनीनं आधी बुकिंगसाठी 30 टक्के टार्गेट दिलं होतं. आता कंपनीचं म्हणणं आहे की 90-100 टक्के बुकिंग द्या. बुकिंग देणं म्हणजे ओटीपी देणं. मात्र ती सिस्टम इतका लोड सहन करू शकत नाही. त्यामुळेच ऑनलाइन बुकिंगला इतक्या अडचणी येत आहेत. यात सर्व्हरची समस्या आहे."

ते पुढे म्हणाले, "या अडचणी टाळण्यासाठी कंपनीनं आधी जो 15 दिवसांचा नियम ठेवला होता, तोच लागू केला पाहिजे."

रांगेत असलेले एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले, "मी सकाळी 5 वाजेपासून रांगेत आहे. मी ऑनलाइन बुकिंगदेखील केली होती. मात्र 8-10 दिवस झाले तरीदेखील सिलिंडर आलेलं नाही. एजन्सीवाले इकडून तिकडे जायला सांगत आहेत, मात्र सिलिंडर काही मिळत नाहिये. गेल्या 7 दिवसांपासून आम्ही चुलीवर स्वयंपाक करत आहोत. आता कसं करायचं."

सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याचं सांगितलं आहे, यावर ते म्हणाले, "साठा कुठे आहे. मग सिलिंडर का मिळत नाहिये. साठा असेल तर तो कुठे आहे. गरीब वणवण करत फिरतो आहे. तर मंत्र्यांच्या घरी मात्र दहा-दहा सिलिंडर आहेत. याला काय अर्थ आहे. आम्हाला गॅस सिलिंडर मिळत नाहिये, फक्त इकडून तिकडे वणवण करत फिरावं लागतं आहे. आमचं स्वत:चं घर आहे, तर आम्ही चुलीवर स्वयंपाक करत आहोत. मात्र ज्यांचं भाड्याचं घर आहे त्यांनी काय करायचं."

तर सिलिंडर नसल्यानं त्रस्त झालेल्या एका गृहिणी म्हणाल्या,

"मी चार दिवसांपासून स्लीप फाडलेली आहे. चार दिवसांपासून मी रिकाम्या हातानं माघारी जाते आहे. माझ्याकडे एकच गॅस सिलिंडर आहे. मी भाड्याच्या घरात राहते. घरमालक आम्हाला चूल पेटवू देत नाही. आम्ही उपाशी मरायचं का? सरकारनं ही समस्या सोडवली पाहिजे."

"घरात स्वयंपाक करता येत नसल्यामुळे बाहेरून आणून खात होतो. मात्र आता हॉटेल वगैरेही बंद झाले आहेत. आता खायचं काय. आम्ही कसं जगायचं. एका माणसाला बाहेरच्या जेवणासाठी दोनशे ते तीनशे रुपये खर्च येतो. घरात चार लोक असल्यावर कसं खाणार. चार दिवसांपासून फेऱ्या मारते आहे. मात्र अजूनही सिलिंडर मिळालेलं नाही."

"सरकार जर म्हणतंय की सिलिंडरचा साठा आहे. तर मग आम्हाला सिलिंडर का मिळत नाहिये. ऑनलाइन सुविधादेखील बंद आहे. घरातील पाच जणांना बाहेरचं खायला आणून आम्ही कसं भागवणार. बाकीचा खर्च कसा भागवणार. मी पाच दिवसांपासून उन्हात रांगेत उभे आहे."

गॅस टंचाईवर केंद्र सरकारने काय म्हटले आहे?

पेट्रोलिय आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले आहे की देशात पेट्रोल, डिझेलची कमी नाहीये. त्याचवेळी त्यांनी हे देखील मान्य केले आहे की LPG बाबत तणावपूर्ण स्थिती आहे. त्याचबरोबर सरकारने हे देखील आवाहन केले आहे की लोकांनी पॅनिक बुकिंग करू नये.

सरकारने हे देखील स्पष्ट केलं आहे की LPG वरील दबाव कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. त्यात केरोसिनचा सप्लाय वाढवणे आणि कोळशाची व्यवस्था करणे या गोष्टींचा समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)