You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंका बाँबस्फोट: या अमेरिकन महिलेवर पोलिसांनी चुकून संशयित असल्याचा आरोप ठेवला होता
इस्टरला झालेल्या हल्ल्यात एका अमेरिकन महिलेला संशयित हल्लेखोर घोषित केल्याबद्दल श्रीलंकेच्या पोलिसांनी माफी मागितली आहे.
अमरा माजिद ही एक मुस्लिम कार्यकर्ती आहे. तिने 'The Foreigners, to combat stereotypes about Islam' या नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे.
"आज सकाळी श्रीलंका सरकारने दावा केला की मी श्रीलंकेवर हल्ला करणारी ISIS ची हल्लेखोर आहे," असं तिने ट्वीट केलं.
गेल्या रविवारी श्रीलंकेतील विविध चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यात 253 लोकांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्याशी निगडीत व्यक्ती म्हणून श्रीलंकन सरकारने तिचा फोटो जारी केला होता.
अब्दुल कादर फातिमा खादिया असं नाव फोटोबरोबर जोडलं होतं. मात्र तो फोटो बाल्टिमोर येथे जन्मलेल्या माजिदचा आहे. तिचे पालक श्रीलंकेत राहतात.
"साहजिकच हे चुकीचं आहे. खरं सांगायचं तर आमच्या समाजावर आधीच फार पाळत ठेवली जाते. त्यामुळे मला आणखी खोटे आरोप आणि चौकशी नकोय," असं तिने ट्विटरवर लिहिलं.
"माझं नाव या हल्ल्याशी जोडणं कृपा करून सोडा आणि पुढच्या वेळी अशी माहिती जारी करताना नीट काळजी घ्यावी कारण असं केल्याने एखाद्या कुटुंबाचं किंवा समाजाचं नुकसान होऊ शकतो."
श्रीलंकेच्या पोलिसांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
मुस्लिमांच्या विरोधात लढा
माजिद 16 वर्षांच्या असताना चर्चेत आल्या होत्या. त्यांनी हिजाब हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाच्या अंतर्गत मुस्लीम किंवा बिगर मुस्लीम स्त्रियांनी हिजाब घालून त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.
बीबीसीतर्फे 100 women नावाची प्रेरणादायी स्त्रियांची एक यादी तयार करण्यात येते. 2015 च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारावेळी त्यांनी ट्रंप यांना एक खुलं पत्र लिहिलं होतं. अमेरिकेच्या लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेणारा आणि पूर्वग्रहदुषित नेता असल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.
"मुस्लिमांबदद्लचे प्रस्थापित समज दूर करणं हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे." असं ती पुढे म्हणते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)