अशोक खरात प्रकरण : लैंगिक शोषण होऊनही बाई गप्प का बसते?

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

"त्या बाईला अक्कल नाही का?"

"शिकल्या सवरलेल्या बायका असं करायला लागल्या, मग काय म्हणायचं?"

"खरातसोबत फोटो पहा, सगळ्या बायकाच दिसत आहेत, त्याच्या भक्त पुरूष का नाहीत?"

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशोक खरात आणि त्याने धर्माच्या नावाखाली महिलांचे केलेले शोषण प्रकरणावर सोशल मीडियावर आलेल्या या त्यातल्या त्यात काही सभ्य प्रतिक्रिया.

काही अपवाद वगळता संपूर्ण चर्चेचा रोख हाच आहे की महिलांना कळत नाही, किंवा त्यांचं शोषण झालं असेल तर यात त्यांचीच कशी चूक आहे. त्याच कशा बाबांच्या नादी लागतात आणि दुसरं म्हणजे शोषण झाल्यावरही गप्प बसतात.

"शोषण झालं तेव्हा बोलली का नाही? म्हणजे तिची संमती होती का? तीच नादी लागली असेल अशा काही आडून-आडून चर्चाही कानावर येत आहेत."

महिला का प्रतिकार करत नाहीत? समाजात असे कोणते पावर स्ट्रक्चर्स काम करतात, पितृसत्तेच्या कोणत्या यंत्रणा असतात ज्या शोषित महिलांना गप्प बसण्यास भाग पाडतात. महिला अत्याचार सहन करूनही का त्याविरोधात बोलण्यास घाबरतात? आणि बोलणाऱ्या महिलांना काय सहन करावं लागतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भोंदू बाबा आणि बुवांच्या भक्तांमध्ये महिला मोठ्या संख्येने का असतात? याच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी बोललो.

"बाईला एकदा मूर्ख म्हटलं की विषयच मिटतो सगळा, सोपं होऊन जातं सगळं," डॉ ऐश्वर्या रेवाडकर पोटतिडिकीने सांगतात.

डॉ. ऐश्वर्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि स्त्रियांचे प्रश्न सतत मांडत असतात.

"पुन्हा पुन्हा म्हणत राहायचं की बायका कशा बावळट असतात किंवा त्याच कशा व्हीलन असतात. तसं केलं, म्हणजे यात समाजाला, कुटुंबाला आणि सरकारला आपली जबाबदारी आरामात झटकता येते. कोणी हा विचार करतच नाहीये की तुमच्या समाजात, अगदी शिक्षण व्यवस्थेत काहीतरी चुकतंय.

लोक असंही म्हणत आहे, की एवढ्या शिकल्या सवरलेल्या बायका पण याला बळी पडल्या. याचाच अर्थ तुमच्या शिक्षण व्यवस्थेत काहीतरी कमी आहे. तिने नाही शिकवलं बायकांना नीट," त्या पुढे म्हणतात.

डॉ ऐश्वर्या सायकोलॉजिक कंडिशनिंगबद्दलही बोलतात.

"कायम असं सहन कर, सहन कर असं सांगितलं जातं, तेच अपेक्षित असतं. घरात जेव्हा इतक्या वाईट गोष्टी घडतात, तेव्हा कायम बाईला सांगितलं जातं की गप्प बसायचं. ज्या बाईला कायम सांगितलं जातं की तूच चुकीची आणि तोंड गप्प ठेवायचं, घराण्याची इज्जत राखायची, ती बाई असं बाहेर काही झालं की अचानक कशी फाईट करेल? तिला कधी शिकवलंच नाहीये की विरोध करायचा असतो, लहान मुलींना शिकवतो आपण की बोलायचं नाही, ती मोठीपणी कशी शोषणाविरोधात बोलेल? "

गार्डियन वर्तमानपत्राने केलेल्या एका संशोधनात दिसून आलं की बहुतांशी भारतीय कुटुंब महिलेवर झालेल्या अत्याचाराची तक्रार करण्याऐवजी, ती दाबून टाकण्यावर जास्त भर देतात.

'घराण्याची इज्जत' हा एक मोठा फॅक्टर असतो. दुसरी भीती असते ती बहिष्कृत होण्याची.

डॉ. रेवाडकर म्हणतात, "चुकून एखादी बोललीच तर तिला बहिष्कृत केलं जातं हेही पाहातोच की आपण. आताही ज्या बोलल्या त्यांनाच ब्लेम केलं जातंय ना."

भवदीप कांग जेष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी 'स्टोरीज ऑफ इंडियाज लिडिंग बाबाज' या नावाने पुस्तक लिहिलं आहे. बीबीसी हिंदीसाठी लिहिलेल्या एका लेखात त्या म्हणतात, "भक्तांना वाटतं की गुरू कोणतं चुकीचं काम करूच शकत नाहीत. त्यामुळे ते करतील ते योग्यच असेल. गुरू इतका दिव्य समजला जातो, की तो भक्त, त्यांचे परिवार, नातावाईक, मित्रमंडळी सगळ्यांपेक्षा वरच्या पातळीवरचा असतो."

याच लेखात त्या पुढे लिहितात, "गुरू श्रेष्ठ आहे यावर गुरूपेक्षा भक्तालाच जास्त विश्वास ठेवावा लागतो. कारण ज्या गुरूवर भक्ताची श्रद्धा आहे, तो जर भोंदू निघाला, तर भक्तही भोंदूच ठरेल. हा मुद्दा मग आयडेंटिटीचा बनून जातो. गुरूच्या भक्तांचा एक समाज बनतो, आणि या समाजाच्या विरोधात गेलात तर तर तुम्ही बहिष्कृत होता."

म्हणूनच काहीही झालं तर अशा प्रकरणांमध्ये पीडितेला पाठिंबा देऊन गुरूविरोधात तक्रार करण्यापेक्षा, प्रकरण दाबून टाकण्यावर भर दिला जातो.

पीडित महिला शोषण होऊनही गप्प का बसते? असे कोणते सायकोलॉजिकल फॅक्टर तिच्या गप्प बसण्याला करणीभूत असतात? याचं उत्तर देताना क्लिनिकल सायकोलॉजिस्ट पूर्वा दीक्षित म्हणतात, "एकतर जेव्हा अशा गोष्टी त्यांच्यासोबत घडतात तेव्हा त्या अतिशय शॉकमध्ये जातात आणि त्यावेळी फ्रीज रिस्पॉन्स येतो. तो धक्का एवढा मोठा असतो की त्यावेळी ओरडायचं असतं, बोलायचं असतं हेच त्यांना कळत नाही. त्यांना प्रतिकार करता येत नाही.

नंतर त्यांना प्रतिकार न करण्याचा खूप पश्चाताप होतो, पण त्या इतक्या घाबरलेल्या असतात, की त्यांच्याकडून काही बोललं जात नाही. कारण त्या स्वतः एका मानसिक द्वंद्वातून जात असतात.

म्हणूनच जेव्हा आम्ही लहान मुलांना गुड टच, बॅड टच शिकवतो, तेव्हा ओरडा, पळा, कोणालातरी लगेच सांगा कारण हे रिस्पॉन्स तेव्हा खूप नॅचरली येत नसतात."

पीडितेच्या मनातली भीतीही पूर्वा उलगडून दाखवतात.

"दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी प्रतिकार का नाही केला हाच प्रश्न प्रत्येकजण विचारणार असतो त्यांना.

"तू का पळून नाही गेलीस, तू का नाही प्रतिकार केलास, तू का तेव्हा येऊन आम्हाला सांगितलं नाहीस. त्यामुळे त्या आणखी जास्त घाबरतात आणि त्यांना वाटतं की आता मी कसं सांगू?

"तिसरं म्हणजे ते सांगितलं नाही, आणि आता उशीर झाला, म्हणजे आता घरच्यांच्या, ओळखीच्यांच्या समाजाच्या प्रतिक्रिया वेगळ्या येणार आहेत. म्हणजे आता सगळं पुन्हा सांगायचं, ते हो-नाही होणार, सगळं खरं-खोटं होणार. कोणी त्यांचं ऐकूनच घेणार नाही. तेवढ्या वेळात त्यांना वाटतं की लोक त्यांना खोटं ठरवतील, किंवा त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार नाही," असं पूर्वा दीक्षित सांगतात.

कुटुंबाला सामाजिक भीती असते की हिचच चुकलं तर. यापुढे जाऊन घरच्यांची प्रतिक्रिया येते की आता उशीर झालाय ना, आता गप्प बस, आता पुढे जायचं नाही त्या व्यक्तीकडे, पूर्वा आपलं मत मांडतात.

"बऱ्याचदा असंही घडत की एकाच महिलेचं अनेकदा शोषण होत असतं, आणि तरीही ती त्याविरोधात काही बोलत नाही. याचा अर्थ असा नसतो की त्या महिलेने या संबंधांना संमती दिलीय. त्या महिलेला ब्लँकमेल केलं जातं, भीती दाखवली जाते, मी तुला असं करीन, तसं करीन, घरच्यांना इजा करीन. मला माहितेय तुझ्या घरचे कुठे जातात, काय करतात. आणि या सतत भीतीखाली ती महिला वावरत असते. सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा मी गप्प बसलेलं बरं असं त्या महिलेला वाटतं."

आपण ज्या समाजात राहातो, ती सामाजिक रचनाही पीडितेलाच दोषी ठरवते. डॉ. ऐश्वर्या यांच्या मते ही व्यवस्थाच पुरूषांना फायदा देणारी आहे. जेव्हा यात स्त्रिया यात बळी जातात तेव्हा फायदा घेणारे सगळ्याच पुरूषांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या याचा फायदा असतो.

"एकतर जो प्रत्यक्ष शोषण करत असतो पुरूष त्याचा तर फायदा असतोच, त्याचबरोबर जे बघे असतात, जोवर आपल्या घरातली, आपल्या मालकीतली स्त्री त्याला बळी पडत नाही, तोवर त्यांनाही बघून मजा घेता येते. सर्कशीतली मजा घेण्यासारखी मजा घेतात काही लोक. कारण ज्यांना खरंच दुसऱ्याचं शोषण पाहून त्रास होतो ते लोक पीडितेला ब्लेम करत नाही. मला वाटतं बहुतांश स्त्रियांना समजत असेल की या शोषित महिला कोणत्या मानसिकतेतून गेल्या असतील की त्यांना अशा शोषणकर्त्याचा आधार घ्यावा लागला," असं डॉ. ऐश्वर्या सांगतात.

रेप कल्चर महिलांचा आवाज कशाप्रकारे हिसकावून घेतं यावर भाष्य करताना त्या म्हणतात, "एक बलात्कारी पुरूष झाला, पण इतरांच्या प्रतिक्रिया पाहिल्यात का सोशल मीडियावर की... अरे आपण बाबा असतो, तर आपणही मजा केली असती. ही जी वृत्ती आहे, स्त्रीला येनकेन प्रकारे लुबाडणे, तिचे लैंगिक शोषण करणे, ही वृत्ती कोणा एका पुरूषाची नाही, संपूर्ण पुरूषसत्ताक समाजाची आहे. यात कोणाचं शोषण झालं यापेक्षा कोणी मजा घेतली या दृष्टीकोनातून पाहिलं जातं."

पूर्वा आपल्या अभ्यासादरम्यान एका अशा पुरूषाला भेटल्या ज्याने ज्याने तीन चार मुलींना छेडणे, त्रास देणे, त्यांचं शोषण करणे असे प्रकार केले होते. त्याबद्दल बोलताना त्या सांगतात, "मी त्याला विचारलं की तू कोणत्या मुलींना टार्गेट केलंस? तेव्हा त्याने सांगितलं की प्रत्येक मुलगी नाही, ज्या मुली घाबरायच्या, व्हल्नरेबल होत्या, ज्या मुलींनी विरोध केला, त्यांनाच मी त्रास द्यायचो. ज्यांनी विरोध केला, त्यांना त्रास देणं मी लगेचच बंद केलं."

मुळात शोषणकर्ते शोषणासाठी महिलाही त्याच निवडतात ज्या स्वतःच मानसिक, शारिरीक, आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या कमकुवत आहेत.

त्यामुळे या महिला प्रतिकार करू शकत नाहीत.

"जेव्हा हे गुरू-वुरू अशा प्रकारचे अत्याचर करतात, तेव्हा तर आधी कुटुंबच विश्वास ठेवत नाहीत. त्यांची प्रतिक्रिया असते की..नाही नाही, ते तर एवढे मोठे गुरू आहेत, ते कसं असं करतील? आणि समजा कोणी विश्वास ठेवलाच, तरी समाजात त्यांचे इतके अनुयायी असतात की ते अनुयायी याच कुटंबाला टार्गेट करतात. त्यामुळेही लोक गप्प बसतात," पूर्वा पुढे म्हणतात.

आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या बुवाबाबांच्या भक्तांमध्ये सर्वाधिक प्रमाण महिलांचे का असते?

भवदीप कांग म्हणतात, भारतीय समाजात महिला मोठ्या संख्येने अंधश्रद्धेच्या बळी ठरतात. "हे गुरू अंधश्रद्धेच्याच बळावर मोठे होतात. त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी अंधश्रद्धाळू भक्तांची गरज असतेच. लैंगिक शोषणाचे आरोप लागलेल्या बाबा-बुवांची यादीही मोठी आहे."

अस्थिर मन, एकटेपणा, आर्थिक अडचणी यासारख्या गोष्टींशी सतत संघर्ष करणाऱ्या महिला बाबा-बुवांच्या प्रवचनामध्ये आश्रय शोधतात, त्यांना वाटतं की निदान यातून त्यांच्या आयुष्यातल्या समीकरणांचं निराकरण होईल.

सामाजिक शास्त्रज्ञ दीपांकर गुप्ता बीबीसी हिंदीच्या एका लेखात म्हणतात, "लोकांना वाटतं की बाबा-बुवा त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतात, घरातला आजारी माणूस बरा करू शकतात. भारतात लोक (विशेषतः महिला) जादू, चमत्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि गुरू, बाबा असल्या चमत्कारांचा दावा करतात."

डॉ. रेवाडकर एक वेगळा दृष्टीकोन मांडतात. त्यांच्यामते भारतीय कुटुंबामध्ये भयंकर प्रकारची दडपशाही होत असते. मुली होतात म्हणून अबॉर्शन होतात, मुलगा हवा म्हणून कुटुंबच दबाब आणतं अशा बुवाबाबा कडे जाण्यासाठी. आणि स्त्री ही कायम खालच्या पायरीवर राहाते, कुटुंबात तिच्याकडे सत्ता नसतेच.

"मी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून याकडे जेव्हा पाहाते, भयंकर गोष्टी घडत असतात. अनेक कुटुंबात घरातला नातेवाईकच रेप करत असतो, किंवा नवराच काहीतरी विचित्र कृत्य करत असतो सहसा ती एकटी पडलेली असते, तिने आपल्या विरोधात होणाऱ्या शोषणाबद्दल आवाज उठवलाच तर तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही अशी व्यवस्था हे लोक करून ठेवतात. पुरूष पण त्या व्यवस्थेचाच भाग आहेत. असा बुवा एखाद्या कुटुंबात शिरून जेव्हा पावरफुल होतो, तेव्हा दुर्बल घटकाला टार्गेट केलं जातं, तो दुर्बल घटक हा नेहमीच त्या कुटुंबातली स्त्री असते."

पीडित व्यक्तीलाच दोषी समजण्याची मानसिकता जोवर संपणार नाही, तोवर पीडिता आपली कहाणी सांगायला पुढे येणार नाहीत. एक समाज म्हणून अशी व्यवस्था निर्माण करणं आपली जबाबदारी आहे, पण ते न करता शोषणकर्त्याला फायद्याची ठरेल हीच व्यवस्था आपण पुढे नेत राहातो हे दुर्दैव.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.