'इराणने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत'; सर्वात मोठ्या पेट्रोलियम प्रकल्पावर हल्ल्यानंतर कतारनं नेमकं काय म्हटलं?

वाचन वेळ: 6 मिनिटे

जगातील नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा साठा असलेल्या इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर इस्रायलनं हल्ला केला. यानंतर इराणनं प्रत्युत्तरादाखल कतारच्या रास लाफान औद्योगिक क्षेत्रावर हल्ला केला. यात कतारचं मोठं नुकसान झालं आहे.

कतारच्या सरकारी पेट्रोलियम कंपनीनं यासंदर्भात एका निवेदन जारी करत म्हटलं की, बुधवारी (18 मार्च) झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात त्यांच्या मुख्य गॅस प्रकल्पात आग लागली. यामुळे मोठं नुकसान झालं.

त्यानंतर कतारनं इराणच्या 2 मुत्सद्द्यांची देशाबाहेर हकालपट्टी केली आहे.

साऊथ पार्सवर हल्ला केल्यानंतर इराणनं आखातातील इतर ऊर्जा ठिकाणांवर आणखी विनाशकारी हल्ले करण्याची धमकी दिली. तसंच इराणनं म्हटलं की, ऊर्जा क्षेत्रावरील कोणत्याही हल्ल्याला ते जोरदार प्रत्युत्तर देतील.

रॉयटर्सनुसार, रेव्होल्युशनरी गार्ड्सनं इराणमधील प्रसारमाध्यमांमधून जारी झालेल्या वक्तव्यात म्हटलं आहे, "आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा इशारा देतो की, तुम्ही इस्लामिक रिपब्लिकच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला करून मोठी चूक केली आहे. जर याची पुनरावृत्ती झाली, तर तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या ऊर्जा केंद्रांवरील हल्ले तोपर्यंत थांबवणार नाहीत, जोपर्यंत ते पूर्णपणे नष्ट केले जात नाहीत."

रॉयटर्सनुसार, साऊथ पार्सवरील हल्ल्याबाबत इस्रायलच्या सैन्यानं कोणतंही वक्तव्यं केलेलं नाही. तर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेला या हल्ल्याची माहिती होती, मात्र यात त्यांचा सहभाग नव्हता.

सौदी अरेबियानं देखील म्हटलं आहे की, त्यांच्या पूर्व भागातील ऊर्जा केंद्राला लक्ष्य करून पाठवण्यात आलेला ड्रोन त्यांनी पाडला आहे. तर एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अवशेष रियाधच्या दक्षिणेला एका तेल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ पडले.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक जवळपास बंद होण्याच्या आधीच वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत गुरुवारी (19 मार्च) आणखी वाढ झाली. अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या प्रमुख निर्देशांकात 3 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवण्यात आली आहे.

ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत म्हटलं, "पश्चिम आशियात घडलेल्या घटनांमुळे चिडलेल्या इस्रायलनं इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्ड नावाच्या एका मोठ्या ऊर्जा केंद्रावर हल्ला केला. या हल्ल्यात या संपूर्ण क्षेत्राचा फक्त एक छोटा भागच प्रभावित झाला आहे."

"अमेरिकेला या विशिष्ट हल्ल्याची कोणतीही माहिती नव्हती. कतारचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. तसंच त्यांना या हल्ल्याची आधीपासून कोणतीही माहिती नव्हती."

"दुर्दैवानं, इराणला या तथ्यांची माहिती नव्हती. त्यांनी कोणत्याही योग्य कारणाशिवाय कतारच्या एलएनजी गॅस केंद्राच्या एका भागावर हल्ला केला. आता जोपर्यंत इराण कोणतंही अविवेकी पाऊल उचलून कतारसारख्या निर्दोष देशावर हल्ला करत नाही, तोपर्यंत या अत्यंत महत्त्वाच्या आणि मौल्यवान साऊथ पार्स फील्डवर इस्रायलकडून कोणताही हल्ला केला जाणार नाही."

ट्रम्प यांनी म्हटलं, "अशा परिस्थितीत, अमेरिका, इस्रायलची मदत किंवा सहमतीनं किंवा त्यांच्याशिवाय देखील, साऊथ पार्स गॅस फील्डला पूर्ण ताकदीनं नष्ट करेल. इराणनं आधी कधीही पाहिलं नसेल अशा ताकदीनं हे केलं जाईल."

"मला या पातळीवरील हिंसाचार आणि विनाशाला मंजूरी द्यायची नाही. कारण याचा इराणच्या भविष्यावर दीर्घकालीन परिणाम होईल. मात्र जर कतारच्या एलएनजी केंद्रांवर पुन्हा हल्ला झाला, तर मी असं करण्यास अजिबात संकोच करणार नाही."

कतारच्या ऊर्जेशी संबंधित पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान

रास लाफानमधील कतारच्या सर्वात मोठ्या ऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

कतारच्या सरकारी कंपनीनं एका वक्तव्यात म्हटलं, "आग आटोक्यात आणण्यासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम घटनास्थळी तात्काळ तैनात करण्यात आल्या. या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे."

यानंतर काही तासांनी कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलं की, रास लाफानवरील हल्ल्यानंतर लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली आहे. यात कोणीही जखमी झाल्याची बातमी नाही.

'इराणनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत'

कतारच्या सरकारनं म्हटलं, 'रास लाफान औद्योगिक शहरावरील लज्जास्पद क्षेपणास्त्र हल्ला, त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रदेशातील स्थैर्यासाठी थेट धोका आहे.'

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, "इराणनं तणाव वाढवणारं धोरण सुरू ठेवलेलं आहे. यामुळे हा प्रदेश धोकादायक स्थितीकडे ढकलला जातो आहे. यामुळे या संकटाचा भाग नसलेले देशदेखील संघर्षात कक्षेत येत आहेत."

या वक्तव्यात पुढे म्हटलं आहे की, कतार "याला प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार राखून आहे आणि ते त्यांचं सार्वभौमत्व, सुरक्षा आणि त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व पावलं उचलण्यास संकोच करणार नाही."

परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, शेजारी देशांवर क्रूर हल्ले करून इराणनं 'सर्व मर्यादा' ओलांडल्या आहेत.

इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर हल्ला

याआधी बुधवारी (18 मार्च), 'तस्नीम' या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सशी (आयआरजीसी) संबंधित वृत्तसंस्थेनं माहिती दिली होती की, इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर असलेल्या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर हवाई हल्ला झाला आहे.

पार्स क्षेत्र हे नैसर्गिक वायूचं जगातील सर्वात मोठं क्षेत्र आहे. यावर इराण आणि कतार आपापले प्रकल्प चालवतात.

फार्स न्यूज एजन्सीनं वृत्त दिलं की तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील काही वायू साठे आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं.

बीबीसी फारसीनुसार, असालूयेहचे गव्हर्नर इस्कंदर पासालार म्हणाले की "शत्रूनं केलेल्या हल्ल्यांमुळे साऊथ पार्सचे अनेक भाग प्रभावित झाले आहेत."

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी इराणच्या ऊर्जा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याबद्दल निषेध केला आहे. ते म्हणाले की, 'या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिका आणि इस्रायलला काहीही साध्य होणार नाही.'

त्याचबरोबर त्यांनी साऊथ पार्स गॅस फील्डवर झालेल्या हल्ल्यानंतर, 'अनियंत्रित परिणामां'चा इशारा दिला आहे.

पेजेश्कियान यांनी एक्सवर लिहिलं आहे की, या परिस्थितीमुळे "अनियंत्रित परिणाम निर्माण होऊ शकतात आणि या संघर्षाच्या तडाख्यात संपूर्ण जग सापडेल अशी भीती आहे."

मॅक्रॉन यांचं उर्जा केंद्रांवरील हल्ले थांबवण्याचं आवाहन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, इराण आणि कतारच्या नैसर्गिक वायू उत्पादन केंद्रांवर हल्ल्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि कतारचे अमीर यांच्याशी चर्चा केली आहे.

त्यांनी एक्सवर लिहिलं, "नागरी पायाभूत सुविधा, विशेषकरून ऊर्जा आणि पाणीपुरवठा सुविधांना लक्ष्य करणारे हल्ले तात्काळ थांबवणं, हे आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. नागरी वस्त्या आणि त्यांच्या मूलभूत गरजांबरोबरच ऊर्जा पुरवठ्याच्या सुरक्षेचं लष्करी तणावापासून रक्षण करणं आवश्यक आहे."

हल्ल्यानंतर आखाती देशांमधील संबंधांना तडा

फ्रँक गार्डनर, संरक्षण प्रतिनिधी, दोहा, कतारहून

रास लाफान हे ठिकाण कतारच्या नैसर्गिक वायूच्या पायाभूत सुविधांचा मुकुटमणी आहे. साहजिकच या हल्ल्यामुळे कतारचं सरकार अत्यंत नाराज झालं आहे.

जवळपास 18 दिवसांआधी युद्ध सुरू होईपर्यंत कतारचे आखातातील त्यांच्या शेजारी असलेल्या इस्लामिक रिपब्लिकबरोबरचे संबंध सामान्यपणे चांगले होते.

साऊथ पार्स गॅस फील्ड दोन्ही देशांमध्ये विभागण्यात आलेली आहे. यामुळे या छोट्याशा आखाती देशाला अभूतपूर्व आर्थिक समृद्धी मिळवून दिली आहे.

कतारच्या मंत्र्यांनी इराणचा दौरा केला आहे. ज्या देशांनी या युद्धाला विरोध केला होता, अशांमध्ये कतारचाही समावेश होता.

आता इराणनं प्रत्युत्तरादाखल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि स्फोटक ड्रोननं हल्ला केला आहे. आखातातील अरब देश आणि इस्लामिक रिपब्लिक यांच्यातील विश्वास आता निचांकी पातळीवर पोहोचला आहे.

वाढता संघर्ष

इराण युद्ध सुरू होऊन 3 आठवडे झाले आहेत. आतापर्यंत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते मारले गेले आहेत.

बुधवारी (18 मार्च) इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दावा केला होता की, इराणचे गुप्तहेर मंत्री इस्माईल खातिब मारले गेले. त्याआधी इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांचादेखील मृत्यू झाला होता.

इस्रायलनं म्हटलं आहे की, इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपवण्याची मोहीम ते पुढे नेत आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांनी खातिब यांच्या हत्येचं वर्णन 'भ्याड हत्या' असं केलं. तर देशाचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी बदला घेण्याबद्दल भाष्य केलं.

रॉयटर्सनुसार, मोज्तबा खामेनी यांनी लेखी संदेशात म्हटलं, "सांडण्यात आलेल्या प्रत्येक रक्ताची किंमत मोजावी लागते."

मोज्तबा खामेनी त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनी यांचा युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर सत्तेची जबाबदारी घेतल्यापासून, सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लारिजानी यांना कोम शहरातील एका धार्मिक स्थळी दफन केलं जाणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)